'मी 8 महिने न्यायासाठी वाट बघतेय, मी तुमची लाडकी बहीण नाहीय का?' सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा सवाल

फोटो स्रोत, kiran sakle
"पूर्वी म्हणायचे की, सरकार गरिबाचं मायबाप असतं. पण हे सरकार पैशावाल्याचं मायबाप हाय, गुन्हेगाराचं मायबाप हाय, हे माझं गरिबाचं मायबाप नाही. आज आठ महिने झाले. मला न्याय भेटेल म्हणून मी वाट बघतेय."
विजयाबाई सूर्यवंशी बीबीसी मराठीशी बोलताना या भावना व्यक्त करत होत्या. परभणीत जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली.
विजयाबाई यांचा 35 वर्षीय मुलगा सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर 2024 मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तेव्हापासून विजयाबाई न्यायासाठी सरकार दरबारी फेऱ्या मारत आहेत आणि कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आल्यानंतर 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं.
या घटनेनंतर पोलिसांनी अनेकजणांना ताब्यात घेतलं. या ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी एक होते.
सोमनाथ सूर्यवंशी वकिलीचं शिक्षण घेत होते.

फोटो स्रोत, Avinash Suryawanshi
'मी तुमची लाडकी बहीण नाहीय का?'
सर्वोच्च न्यायालयानं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दाखल याचिकेवर नुकताच निर्णय दिला. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत 'अनोळखी' व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वाचा : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू : पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टातही कायम
विजयाबाई म्हणतात, "सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली गरिबाला, सुप्रीम कोर्टानं बी आदेश कायमच ठेवला. त्याचं पालन सरकार करत नसेल तर कोण करणार?"
"एका गरिबासाठी सरकाराच्या डोळ्यावरची पट्टी का निघत नाही? आज लाडकी बहीण-लाडकी बहीण तुम्ही म्हणलो. आज लाडक्या बहिणीला वेळ आल्यावर तुम्ही धावून येत नाही म्हटल्यावर कोण धावून येणार आहे आणि न्याय कोण देणार आहे आम्हाला?" असा आर्त सवाल विजयाबाई करतात.
महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही सातत्यानं चर्चेत असते. त्या संदर्भात विजयाबाई बोलत होत्या.

फोटो स्रोत, Shrikant Bangale
सोमनाथ यांच्या मृत्यूप्रकरणी विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या खंडपीठानं 4 जुलै 2025 रोजी या याचिकेवर निर्णय देताना एका आठवड्यात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सोमनाथ यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
विजयाबाई म्हणतात, "10 ते 15 डिसेंबरपर्यंत जे जे पोलीस कर्मचारी ड्यूटीवर होते, याच्यामध्ये जे कुणी असतील, ज्यांनी मारहाण केलेली आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी."
याच मागणीसाठी परभणीत 8 ऑगस्ट 2025 रोजी 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं.

फोटो स्रोत, Kiran Sakle
आंबेडकरी कार्यकर्ते आशिष वाकोडे सांगतात, "या FIR मध्ये गुन्हा हा अज्ञातांविरोधात दाखल झालेला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोषी पोलिसवाले दिसत आहेत. याप्रकरणी ज्या 31 पोरांचे जबाब घेतलेले आहेत, त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की, त्यांना मारहाण कुणी केली. हे सर्व स्पष्ट असताना परभणी प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार या दोषी पोलिसांना वाचवण्याचं काम करत आहे."
वाचा : 'माझ्या लेकराचा खून करणाऱ्यांना मन मोठं करून कसं माफ करायचं?' सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा प्रश्न
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सांगतात, "सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिलेले आहेत, त्या अनुषंगाने तपास पुढे चालू आहे. याप्रकरणी CID तपास करत आहे. तपासात जे काही निष्पन्न होईल, निश्चितपणे त्याच्यावर नियमानुसार कारवाई होईल. याप्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे."
'मारहाणीमुळे अजूनही दुखण्याचा त्रास कायम'
डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या हिंसाचारात वत्सला मानवते जखमी झाल्या होत्या. शहरातील प्रियदर्शनी नगर भागात त्या राहतात. घटनेला 8 महिने उलटल्यानंतरही दुखण्याचा त्रास होत असल्याचं त्या सांगतात.
त्या सांगतात, "सगळंच त्यायला माहितीये आणि त्यायनंच मारलेलं आहे. त्यायला एक एक माणसं माहिती आणि सगळ्या दुनियेनं बघितलंय. त्यांनी किती बी लपवलं, पण आमचा उच्च न्यायालयावर भरोसा आहे, सुप्रीम कोर्टावर पण भरोसा आहे."

फोटो स्रोत, kiran sakle
दर 15 दिवसांनी दवाखान्यात जावं लागतं असल्याचं वत्सला सांगतात.
"मला गुडघ्यांवर मारलेलं आहे, तर मला आता जास्त उठता येत नाही. जेव्हापासून मारलंय बीपीचा पण त्रास झालेला आहे, ती पण गोळी चालू आहे. डोके आणि पाठीमागचा भाग पूर्ण दुखतो."
वत्सला यांना दवाखाना आणि गोळ्यांसाठी दरमहा दीड ते दोन हजारापर्यंत खर्च येत असल्याचं त्या सांगतात.
'मारहाण नाही, मग अंगावर खुणा कसल्या?'
सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण झाल्याचं दिसत नाही, असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच केलं होतं. पण सोमनाथचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचा आणि त्याचे फोटोही असल्याचा सूर्यवंशी कुटुंबीयांचा दावा आहे.
20 डिसेंबर 2024 रोजी विधीमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "ते (सोमनाथ सूर्यवंशी) पोलीस कस्टडीत असतानाचे व्हीडिओ फुटेज उपलब्ध आहे. अनएडिटेड. 100 %. या पूर्ण व्हीडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही."
वाचा : 'जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळणार तोपर्यंत मदत नाही स्वीकारणार', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा निर्धार
तर विजयाबाई म्हणतात, "माझ्या लेकराच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत. पोलिसांनी जर मारले नसेल तर ह्या खुणा होत्या कशाच्या, हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. माझ्या लेकराच्या अंगावर डोक्यापासून पायापर्यंत खुणा होत्या, पोलिसांनी मारले नसतील तर या खुणा कशाच्या होत्या? काळे-निळे डाग सगळे कशाचे होते?"

फोटो स्रोत, kiran sakle
"सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मी यावर कमेंट करू शकत नाही," असं परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आम्ही त्यांच्या कार्यालयात पोहचल्यानंतर आमच्याशी बोलताना सांगितलं.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CID कडे वर्ग करण्यात आल्याचं याप्रकरणी दाखल झालेल्या FIR मध्ये नमूद करण्यात आलंय.

फोटो स्रोत, kiran sakle
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
- 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची नासधूस.
- या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी 11 डिसेंबरला शहरात बंद पुकारला. या बंदला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि इतर काही जणांना ताब्यात घेतलं.
- 15 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती.
- 20 डिसेंबर 2024 रोजी या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. सोबतच मृत सोमनाथ यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर.
- सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत नाकारली. विजयाबाई सूर्यवंशींची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा विजयाबाईंच्या बाजूने युक्तिवाद.
- एका आठवड्यात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे 4 जुलै 2025 रोजी न्यायालयाचे आदेश. राज्य शासनाची या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव.
- सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2025 रोजी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











