You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Cola : सॉफ्ट ड्रिंक्स आरोग्यासाठी चांगली आहेत का? त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात?
- Author, डॉ. देशम पी. आर.
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
बिर्याणी, बर्गर, पिझ्झा, फ्राईड राईस असा कोणताही पदार्थ असो, त्यासोबत एक गोष्ट हमखास दिसते. ते म्हणजे एखादं सॉफ्ट ड्रिंक. या नॉन-अल्कोहोलिक पेयांना कोल्ड ड्रिंकही म्हटलं जातं.
पण तुमच्या आरोग्यासाठी ही सॉफ्ट ड्रिंक्स किती सुरक्षित आहेत? तुम्ही त्यांचं वरचेवर सेवन केलं, तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?
समजून घेऊयात.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये काय असतं?
आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं की आपल्याला तहान लागते. आपल्या मेंदूतली hypothalamus ग्रंथी आपल्याला तहान लागल्याची जाणीव करून देते. आपल्या शरीरासाठी पुरेसं पाणी त्या वेळी प्यायल्यास तहान भागते.
पण पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंक प्यायल्यास तहान तर भागते, पण शरीराला गरज असते तितकं पाणी शरीराला मिळत नाही. यामुळेच शरीरातल्या पाण्याचं प्रमाण घटतं, त्यामुळे रक्तदाब घटतो.
परिणामी महत्त्वाच्या अवयवांना होणाऱ्या रक्त पुरवठ्यात घटत होते किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) होऊ शकतं. यातून पुढे किडनीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
सॉफ्ट ड्रिंक्सने तहान भागते?
अशा पेयांमुळं ते पिणाऱ्या व्यक्तीची तहान कशी भागते, हेच प्रामुख्यानं सॉफ्ट ड्रिंक्सच्या जाहिरातीत दाखवलेलं असतं.
बहुतेक सगळ्या प्रकारच्या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये 90 ते 99 टक्के पाणी असतं आणि यासोबत कार्बन डायऑक्साईड, साखर, कृत्रिम रंग आणि कृत्रिम गोडपदार्थ (Artificial Sweeteners) असतात.
पाण्यामध्ये उच्च तापमानाला कार्बन डाय ऑक्साईड मिसळला गेल्यानंतर तो लहान लहान बुडबुड्यांच्या रूपात पाण्यात मिसळतो. आपण हे मिश्रण तोंडात घेतल्यावर आपल्याला ते थंड पाण्यासारखं वाटतं, पण खरं तर आपल्या शरीराला यातून पुरेसं पाणी मिळत नाही.
दातांवर काय परिणाम होतो?
पाण्याचा pH (अॅसिड पातळी) हा सहसा 7 असायला हवा. पण कार्बन डाय ऑक्साईड मिसळल्यानंतर ही पातळी pH3 किंवा pH4 पर्यंत कमी होते.
ज्यावेळी फॉस्फरिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिडचा दातांना स्पर्श होतो, त्यावेळी दातांवरचं आवरण (Teeth Enamel) विरघळायला लागतं.
यामध्ये बॅक्टेरियांची वाढ होऊन मग दातांची झीज होते. जर या अॅसिड्सच्या सोबत शर्करा असेल तर मग बॅक्टेरिया अधिक वाढतो.
कोल्ड ड्रिंक्सची सवय का लागते?
पेयांमध्ये असलेले साखरेचं अधिक प्रमाण, फ्लेवर्स, अॅसिड आणि कॅफीन या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला या पेयांची सवय होते.
सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखर किंवा गोडवा आणण्यासाठीच्या पर्यायी कृत्रिम घटकांचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळेच या पेयांच्या सवयीचं व्यसनात रूपांतर होऊ शकतं.
250 - 300 मिलीलीटर सॉफ्ट ड्रिंकमध्ये साधारण 8 ते 10 लहान चमचे (टीस्पून) साखर असते. म्हणजेच तुम्ही एक बाटलीभर सॉफ्ट ड्रिंक पिता, तेव्हा तुमच्या शरीरात 45 ते 50 ग्रॅम साखर जाते.
शीतपेयं आरोग्यासाठी चांगली आहेत का?
काही प्रकारच्या अन्नामध्ये कोणतीही पोषक मूल्यं नसतात. यामध्ये कर्बोदकं (कार्बोहायड्रेट्स) असतात ज्याद्वारे शरीराला कॅलरीज मिळतात.
मैद्याचा ब्रेड, पिझ्झा, बर्गर, केक, कोल्ड ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी याच प्रकारात येतात. आंबा, संत्री किंवा स्ट्रॉबेरीज असल्याचं सांगत अनेक कंपन्या 'फ्रूट ज्यूस' विकतात.
पण यामध्ये प्रत्यक्ष फळांचा रस हा फक्त नावापुरता असतो आणि हे प्रमाण 5% पेक्षा जास्त नसतं. यामध्ये साखर आणि सोडा मिश्रित पाणीच जास्त असतं. या ज्यूसच्या बाटलीवरच्या वा पॅकवरच्या घटकांची यादी पाहिल्यास हे लक्षात येईल.
आपल्या रोजच्या आहारात 1 टक्क्यापेक्षा अधिक साखरेची गरज नसते आणि शरीराला मिळणाऱ्या एकूण कॅलरीजपैकी 5 टक्क्यांपेक्षा अधिक साखरेतून येऊ नयेत, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय.
1 ग्रॅम साखरेपासून मानवी शरीराला 4 कॅलरीज मिळतात. म्हणजेच जेव्हा आपण सॉफ्ट ड्रिंकची लहान बाटली पितो, तेव्हा शरीरातल्या 5 ते 10 टक्के कॅलरीज यातून मिळतात. रोज आपण घेत असलेला चहा वा कॉफीतली साखर यामध्ये भर घालते. पिझ्झा - बर्गर - नूडल्ससोबत आपण खात असलेल्या केचप आणि सॉसमध्ये 25 ते 30 टक्के साखर असते. त्यामुळेच या सगळ्या गोष्टी शरीरासाठी हानीकारक ठरतात.
तुम्ही रोज सॉफ्ट ड्रिंक पिता का?
शीतपेयांचं रोज सेवन केल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे यकृतातलं फॅट्सचं म्हणजे चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्याने फॅटी लिव्हर सिंड्रोम (Fatty Liver Syndrome) होण्याची शक्यता असते.
या शीतपेयांमध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक असल्याने टीनएजर्सना निद्रानाशाचा (insomnia) त्रास होत असल्याचं संशोधनातून आढळलंय.
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही पदार्थात साखर घालू नये, असं आरोग्य यंत्रणा सांगतात.
पण असं असूनही काही पालक आपल्या मुलांना या सॉफ्ट ड्रिंकची चव देताना पहायला मिळतात. या सॉफ्ट ड्रिंक्सच्या सेवनामुळे स्थूलता वाढते.
काय काळजी घ्यायला हवी?
शहरातल्या मोठ्या मॉल्सपासून ते गावांतल्या किराणा मालाच्या लहान दुकांनांपर्यंत सगळीकडे ही शीतपेय सहज विकत मिळतात.
किमान शाळा - कॉलेजांमध्ये या शीतपेयांच्या विक्रीवर सरकारने बंदी घालावी अशी मागणी अनेक संस्थांनी केलेली आहे. तर साखर अधिक प्रमाणात असणाऱ्या पदार्थांवर जास्त टॅक्सेस लावले तर त्यांची खरेदी आणि वापर कमी होण्याची शक्यता असल्याचं WHO सह इतरांनीही म्हटलंय.
सूचना : ही माहिती जनजागृतीसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाही. वैद्यकीय निर्णय हे डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार घेण्यात यावेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.