अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळी BBC च्या प्रतिनिधींनी काय पाहिलं? विमान प्रवासाच्या सुरक्षेविषयी तज्ज्ञांना काय वाटतं?

अहमदाबाद विमानतळावरून 12 जून 2025 च्या दुपारी एक वाजून 38 मिनिटांनी लंडनच्या गॅटविक विमानतळावर जाण्यासाठी हवेत झेपावलेलं एअर इंडियाचं विमान एका मिनिटाच्या आतच कोसळलं.

या बोईंग ड्रीमलायनर विमानात असलेल्या 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला. यातील फक्त एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला.

विमान जिथं कोसळलं, तिथले लोकही विमान अपघाताचे बळी ठरले.

या विमान अपघातातील एकूण मृतांची संख्या 270 वर पोहोचली आहे.

हे विमान अहमदाबाद विमानतळाच्या जवळच असणाऱ्या एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर कोसळलं होतं.

याआधी ऑगस्ट 2020 मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 कोळीकोडमध्ये धावपट्टीवर उतरत असताना दरीत कोसळलं होतं. त्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता.

मे 2010 मध्ये एअर इंडियाचं विमान मंगळूरूमध्ये धावपट्टीवरून पुढे निघून गेलं होतं. या अपघातात 158 जणांचा मृत्यू झाला होता.

ही पार्श्वभूमी लक्षात घेता अहमदाबादच्या विमान अपघातात नेमकं काय झालं? हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

तसंच, बोईंगच्या विमानांबद्दल देखील प्रश्न उपस्थित होत आले आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी बोईंगनं लोकांच्या मनातील शंका, चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांच्यासमोर अडचणी कमी झालेल्या नाहीत.

अहमदाबाद विमान अपघातानंतर बोईंगच्या क्वालिटी कंट्रोलवर आणखी प्रश्न उपस्थित होतील का, हवाई प्रवासाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या अपघातामागचं संभाव्य कारण काय असू शकतं?

भारतानं हवाई प्रवासाबाबत कोणत्या गोष्टींची आणखी काळजी घेतली पाहिजे? मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या मृतकांच्या नातेवाईक, कुटुंबीयांची काय परिस्थिती आहे?

या अपघातात बचावलेल्या एकमेव प्रवाशाची म्हणजे विश्वासकुमार रमेश यांची स्थिती कशी आहे आणि ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं, तिथली परिस्थिती काय आहे?

बीबीसी हिंदीच्या 'द लेन्स' या साप्ताहिक कार्यक्रमात कलेक्टिव्ह न्यूजरूमचे डायरेक्टर ऑफ जर्नालिझम, मुकेश शर्मा यांनी याच प्रश्नाबाबत चर्चा केली.

या चर्चेत हवाई सुरक्षा तज्ज्ञ वंदना सिंह, लंडनमधील बीबीसीच्या प्रतिनिधी नेहा भटनागर यांच्यासह अहमदाबादमध्ये असलेले बीबीसीचे प्रतिनिधी, रॉक्सी गागडेकर, इशाद्रिता लाहिरी आणि लक्ष्मी पटेल सहभागी झाले होते.

कसा झाला बोईंगच्या ड्रीमलायनरचा अपघात?

अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर धावपट्टीपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाला अपघात कसा काय झाला?

एआय171 हा त्या विमानाचा क्रमांक होता. या विमानात प्रत्यक्षात काय झालं, हे तर सखोल तपासानंतरच समोर येऊ शकेल. मात्र, या अपघातानंतर उपस्थित होणारा सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे?

हवाई सुरक्षा तज्ज्ञ वंदना सिंह म्हणतात, "सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, हा अपघात कशाप्रकारे आपल्याला टाळता आला असता का? आपल्या कामकाजात काही उणीवा राहिल्या का? एअर इंडियाच्या मेंटेनन्समध्ये काही कमतरता किंवा दोष होता का? रेग्युलेटरी चेकमध्ये काही दोष राहिला का? इंजिनीअरिंग चेकमध्ये काही उणीवा राहिल्या का, ज्यामुळे आपल्याला हा अपघात टाळता आला नाही."

वंदना सिंह म्हणतात, "विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चा, आडाखे, अंदाज यांना तेव्हाच पूर्णविराम मिळेल, जेव्हा तज्ज्ञ, डेटा रेकॉर्डर आणि व्हॉईस रेकॉर्डर एकत्र ठेवून त्याचा तपास करतील."

वंदना सिंह यांना वाटतं, "हे इलेक्ट्रिकल आणि सॉफ्टवेअर सिस्टम निकामी झाल्यामुळे घडलं आहे. कारण ते विमान दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं. त्यावेळेस जे लोक यात प्रवास करत होते, त्यांनी तक्रार केली होती की विमानात काहीतरी गडबड आहे. एसी काम करत नव्हता, तसंच एंटरटेनमेंट सिस्टमदेखील काम करत नव्हती."

त्या प्रश्न उपस्थित करतात की, "आता हे म्हटलं जाऊ शकतं की, या किरकोळ बाबी आहेत. मात्र, त्याबाबत प्रश्न निर्माण होतो की, एक तास प्रवास करून जेव्हा हे विमान अहमदाबादला आलं, त्यानंतर या गोष्टींची तपासणी झाली होती का?"

त्या पुढे म्हणतात, "मला पूर्ण विश्वास आहे की, लंडनला जाण्यासाठी उड्डाण करण्याआधी या सर्व गोष्टींची चांगल्या प्रकारे तपासणी झाली असेल. मात्र, माझ्या मनात असा प्रश्न येतो की, यामध्ये काही चूक तर झाली नाही ना? यामध्ये काहीतरी उणीव तर राहिली नाही ना?"

वंदना सिंह म्हणतात, "मला वाटतं की तिथे एक इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर होतं. त्याच्यात काही दोष निर्माण झाल्यामुळे तर हा अपघात झाला नाही ना. मात्र हा फक्त एक अंदाज आहे."

विमान अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी काय सांगतायेत?

भारताचे नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी विमान अपघाताचा तपास करणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, ज्यावेळेस हा विमान अपघात झाला, त्यावेळेस तो होत असताना पाहणारे काय म्हणत आहेत?

घटनास्थळावरून बीबीसीच्या प्रतिनिधी इशाद्रिता लाहिरी सांगतात, "हे विमान जिथे कोसळलं, तिथे एक पदव्युत्तर हॉस्टेल आहे. विमान अपघात होऊन कित्येक तास उलटले आहेत, तरीही विमानाचा एक भाग हॉस्टेलवर लटकलेला आहे."

इशाद्रिता सांगतात, "इथे लोकांच्या दोन प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पहिल्या प्रकारचे म्हणजे ज्यांनी या अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी जाऊन लोकांना वाचवलं. त्यांनी ढिगाऱ्यातून अनेक मृतदेह काढले. तेव्हापासून त्या सर्वानाच धक्का बसलेला आहे."

"दुसरे म्हणजे विमानतळाच्या जवळपास राहणारे लोक. या लोकांना भीती वाटते आहे की, असा अपघात त्यांच्याबाबतीत देखील कधीही होऊ शकतो. इथे लोकांना धक्का बसला आहे आणि त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे."

इशाद्रिता म्हणाल्या, "एक व्यक्ती या अपघातात जिवंत वाचलेल्या एकमेव प्रवाशाशी बोलला होता. त्यांनी मला सांगितलं की अशा भयानक अपघातातून कोणी जिवंत देखील वाचू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता."

त्या म्हणतात की त्यांना एक महिला भेटली, ज्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाला या अपघातामुळे कोणताही अपाय झाला नाही. मात्र ते रात्रभर रडत राहिले आणि जागेच होते.

इशाद्रिता सांगतात, "या हॉस्टेलच्या जवळपास किती जणांचा मृत्यू झाला आहे, त्याची कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र ज्यावेळेस हा अपघात झाला, त्यावेळेस डॉक्टर्सचा लंच ब्रेक होता. ते सर्व मेसमध्ये जेवायला आले होते. तिथे मृत्यू झाले आहेत, हे नक्की."

'विमानाची उंची पाहून वाटली होती शंका'

बीबीसी प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर सांगतात, "मेघाणीनगरमध्ये लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की गुरुवारी (12 जून) विमानाचं संतुलन बिघडताना दिसलं. आधी विमान झाडावर आदळलं आणि मग वरून खाली येत क्रॅश झालं."

ते म्हणाले, "इथे लोकांनी सांगितलं की, त्यांना विमानं पाहण्याची आणि त्यांचे आवाज ऐकण्याची सवय आहे. मात्र, असं दृश्य त्यांनी कधीही पाहिलेलं नाही."

"विमान फारच कमी उंचीवर होतं आणि हे पाहून ते आधीच घाबरले होते. विमान क्रॅश झाल्यानंतर सर्वात आधी हेच लोक मदत करण्यास पोहोचले होते."

रॉक्सी गागडेकर म्हणाले, "पोलीस आणि अग्निशमन दल येण्याआधी इथे पोहोचलेल्या लोकांनी पाहिलं की तिथे अनेक मृतदेह जळालेल्या अवस्थेत होते. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो, तेव्हा आम्हीदेखील तेच दृश्य पाहिलं. घटनास्थळाजवळच्या झाडांना आग लागली होती. त्यामुळे झाडंदेखील जळाली होती."

रॉक्सी गागडेकर सांगतात, "तिथे ज्या प्रकारे आग लागली होती आणि जे दृश्य दिसत होतं, ते खूपच भयानक होतं. त्याबद्दल बोलताना लोक अजूनही घाबरतात. ते दृश्यं इतकं भयानक होतं की कॅमेरासमोर त्याबद्दल सांगितलं जाऊ शकत नाही."

अपघातानंतर ब्रिटनमधील वातावरण कसं आहे?

अपघातग्रस्त विमानात ब्रिटनचे 50 हून अधिक रहिवासी होते. अशा परिस्थितीत सरकारकडून कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते आहे?

लंडनमधील बीबीसी प्रतिनिधी नेहा भटनागर म्हणाल्या, "विमान अपघाताची बातमी आल्यानंतर काही वेळातच ब्रिटनचे पंतप्रधान किएर स्टार्मर यांचं वक्तव्य आलं. ब्रिटनच्या राजांनी देखील याबद्दल शोक व्यक्त केला."

"ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत सांगितलं की ते कशाप्रकारे तपासात सहकार्य करत आहेत. माजी पंतप्रधान ऋषि सुनिक यांनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत."

नेहा भटनागर म्हणाल्या, "इथे शोकाकुल वातावरण आहे. लोकांना धक्का बसला आहे. विमानाचा अपघात झाल्याची बातमी येताच लोकांना खूप मोठा धक्का बसला."

"इथे भारतीय लोक खूप मोठ्या संख्येनं आहेत आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. प्रत्येक क्षणी लोकांना माहित असतं की कोणाच्या तरी कुटुंबातील कोणीतरी येत-जात असतं."

नेहा भटनागर सांगतात, "इथे लोकांना खूपच धक्का बसला. इथल्या मंदिरांमध्ये एक विशेष प्रार्थनादेखील करण्यात आली. या दु:खाच्या क्षणी लोक एकमेकांबरोबर उभे आहेत."

अपघातानंतर काय होती हॉस्पिटलमधील परिस्थिती?

विमान अपघातानंतरची परिस्थिती भयानक होती. सिव्हिल हॉस्पिटलमधील दृश्यं देखील बदललं होतं. अपघातात मृत पावलेल्यांचे कुटुंबिय, नातेवाईक त्यांना शोधत होते. डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू होती.

अशा परिस्थितीत कुटुंबीय, नातेवाईक तिथे पोहोचल्यानंतर तिथलं नियोजन कसं केलं जात होतं?

अहमदाबादच्या हॉस्पिटलमधील परिस्थिती पाहिलेल्या बीबीसीच्या प्रतिनिधी लक्ष्मी पटेल यांनी सांगितलं की, "सुरुवातीच्या पहिल्या तासात जखमी लोक देखील येत होते आणि मृतदेह देखील येत होते. त्यानंतर मात्र अशी परिस्थिती झाली की येणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेत फक्त मृतदेहच होते."

लक्ष्मी पटेल पुढे सांगतात, "जसजसं प्रवाशांच्या कुटुंबियांना माहित होत गेलं तसतसे ते सर्व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले. ट्रॉमा सेंटरमध्ये एखादा डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी आल्यानंतर सर्वजण फोटो आणि तिकिट दाखवून विचारायचे की यातील कोणाला तुम्ही पाहिलं आहे का?"

लक्ष्मी पटेल यांनी सांगितलं की सर्वजण माहिती घेण्यासाठी इकडून तिकडे पळत होते.

विमान अपघाताचा तपास कसा होतो?

विमान अपघात झाल्यानंतर त्याच्या तपासासाठी अमेरिका आणि ब्रिटनच्या टीम येत आहेत. बोईंग कंपनीनं देखील म्हटलं आहे की, ते या तपासात सहकार्य करतील. याप्रकारे जेव्हा एखादा विमान अपघात होतो, तेव्हा त्याच्या तपासाची प्रक्रिया काय असते?

वंदना सिंह म्हणतात, "याप्रकारे जेव्हा तपास होतो, तेव्हा त्यात पूर्ण ज्युरींचा समावेश असतो. यामध्ये सर्व तज्ज्ञ असतात. या प्रकरणात अमेरिका, युके, बोईंग, डीजीसीए आणि सिव्हिल एव्हिएशनच्या तज्ज्ञांचा समावेश असेल."

वंदना सिंह पुढे सांगतात, "तपासात कॉकपिट डेटा रेकॉर्डर, फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स यामधून जी माहिती मिळेल ती एकत्र केली जाईल. 59 सेंकदात काय झालं? यासाठी व्हॉईस रेकॉर्डिंग तपासली जाईल."

वंदना सिंह म्हणाल्या, "यानंतर एकापाठोपाठ एक संपूर्ण घटनाक्रम जुळवला जाईल. मग सर्व मुद्दे जोडून नेमकी घटना कशी घडली त्याचं आकलन केलं जाईल."

वंदना सिंह पुढे म्हणाल्या, "ही खूपच गंभीर बाब असते. ते खूपच न्यायिक प्रक्रियेनं केलं जातं. सर्व तज्ज्ञ एकत्रित विचार करून, विमान अपघातामागं काय कारण होतं आणि तो अपघात कसा झाला? याचा निष्कर्ष काढतात."

बोईंगला याचा फटका बसेल का?

बोईंग कंपनीच्या विमानांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. या अपघातानंतर बोईंगच्या परिस्थितीत बदल होईल का?

वंदना सिंह म्हणतात, "बोईंग आणि एअरबस या कंपन्यांची विमानं खूपच विश्वासार्ह असतात. अशा अपघातांमुळे विमानांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित होतात. मात्र ड्रीमलायनर विमानांचा ट्रॅक रेकॉर्ड खूपच चांगला आहे."

वंदना सिंह पुढे म्हणतात, "या विमानात खूप बॅकअप आणि वॉर्निंग सिग्नल असतात. एखाद्या समस्येबद्दल ते आधीच संकेत देतात. जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर ऑडिओ वॉर्निंग्स येऊ लागतात. अशावेळी तुम्ही ती टाळू शकत नाहीत."

वंदना सिंह म्हणाल्या की, विमानाचे 65 टक्के अपघात टेकऑफच्या वेळेस होत आहेत. कारण ते पूर्णपणे भरलेले असतात.

वंदना सिंह सांगतात, "विमानांचा दर्जा आणि तंत्रज्ञानाबाबत बोईंग कंपनीला आत्मपरिक्षण करावं लागेल. ते ज्या विमानांचा पुरवठा करत आहेत ती कशी आहेत याबद्दल त्यांना विचार करावा लागेल."

"कारण त्यांना अजून एअर इंडियाला 500 विमानं पुरवायची आहेत. अशा परिस्थितीत बोईंग कंपनीला विमानांच्या दर्जाची खबरदारी घ्यावी लागेल. ते सर्वात महत्त्वाचं आहे."

आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवाई सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वंदना सिंह म्हणतात की "अजून भारतातील स्थिती खूपच चांगली आहे. मार्चपर्यंतच अमेरिकेत अनेक अपघात झाले आहेत. आता झालेला अपघात भीषण आहे आणि तो ड्रीमलायनरला झाला आहे. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. मात्र आपल्याला पुढे जायचं आहे."

विमान प्रवास किती सुरक्षित आहे?

वंदना सिंह म्हणतात, "अपघात तर होणाच. मात्र, त्याचा अर्थ असा नाही की आपण हातावर हात ठेवून बसावं आणि त्याचा स्वीकार करावा. आपल्याला 15 ते 20 दिवसात तपास पूर्ण करायचा आहे. पंतप्रधान स्वत: यात लक्ष घालत आहेत. त्यामुळे अपघात का झाला? हे त्यांना जाणून घ्यायचं असेल."

आपली विमानं खूप जुनी आहेत आणि वैमानिकांवर कामाचा खूप ताण आहे. ही गोष्ट किती महत्त्वाची आहे?

वंदना सिंह म्हणतात, "या गोष्टींचा खूप परिणाम होतो. मात्र, हल्ली रोस्टर्सद्वारे व्यवस्थापन होतं आणि या गोष्टीची खूप काळजी घेतली जाते. अर्थात काही ठिकाणी अजूनही स्थिती चिंताजनक आहे."

त्या म्हणतात की "विश्रांती न घेता विमानातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या उड्डाणासाठी पाठवलं जावं, असं अजिबात होता कामा नये. माझ्या मते असं होत नाहीये."

वंदना सिंह पुढे म्हणाल्या, "एअर इंडियाला त्यांच्या सर्व गोष्टीची तपासणी करावी लागेल. त्यांच्याकडे आता दुसरा मार्ग नाही. हा भारताच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. याप्रकारचा अपघात होता कामा नये. हे सर्व व्यवस्थित करावंच लागेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)