You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
10 रुपये मजुरी ते लखपती होण्यापर्यंतचा प्रवास, शिवगंगा पोफळेंच्या जिद्दीची गोष्ट
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"नर्सरीत एवढा पैसा मिळाला आम्हाला, की आम्ही आता आमचं सप्पर (शेड) काढलं. पत्राच्या खोल्या केल्या, त्या पत्र्याच्या खोल्यात आता लेबर राहायला आहेत. आम्हाला आता देवबाप्पानी सगळं दिलं. घर, गाडी-घोडी, सगळं दिलं."
नर्सरीमुळे आयुष्य कसं बदललं हे सांगताना 60 वर्षीय शिवगंगा पोफळे यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं.
छत्रपती संभाजीनगरमधील हिवरा गावात शिवगंगा राहतात. 80 च्या दशकात त्यांनी पती विठ्ठल पोफळे यांच्याकडे नर्सरी टाकायचा आग्रह धरला आणि विठ्ठल यांनीही तो मान्य केला. शिवगंगा या अल्पभूधारक शेतकरी आहेत.
शिवगंगा सांगतात, "माझं लग्न 1982 मध्ये झालं. त्यावेळेस हे फॉरेस्टमधी वॉचमन होते. त्यायला पगार नुसता 80 रुपये होता. मी गड्डे खंदायला जायचे. चार वर्षं आम्ही डोंगराचे गड्डे खंदायचं काम केलं.
"गड्डे खंदायला जायचो, तर आम्हाला रोपं कळत होतं. यांनी फॉरेस्ट्रीचं काम केलं होतं, तर यायला त्याच्यातलं ज्ञान होतं. मग मला वाटलं झाडात चांगलंच राहणार आहे. नर्सरी टाकून पाहू आपण."
त्यानंतर शिवगंगा यांना कृषी विभागाकडून रोपं मिळाली. त्यांनी ती लावली. पण सुरुवातीला त्यांना अडचणी आल्या.
मुख्य अडचण पैशांची होती. मग शिवगंगा आणि विठ्ठल दोघंच काम करू लागले.
शिवगंगा सांगतात, "त्याच्यात बी खूप दैन झाली आमची. रातच्च्या पिश्या (रात्रीच्या पिशव्या) भरायच्या, दिवसा पिश्या भरायच्या. लेबरला द्यायला आपल्याकडे पैसे नाही. ते झाडं काही ताबडतोब विकले नाही, दोन-तीन वर्षं त्याला काही आलंच नाही. सुरुवातीला 82 साली मी कामाला जायचे तर 10 रुपये रोज. यांना 80 रुपये पगार. घरात काय फक्त 90 रुपये यायचे."
नर्सरीसाठी कष्ट एवढे केले की कुबड निघाल्याचं शिवगंगा बोलून दाखवतात.
'विमानानं झाडं गेली'
पाणी उपलब्ध नसल्यामुळे पोफळे दाम्पत्यानं शेतात बोअर खणले, शेततळं तयार केलं, 2 विहिरी खोदल्या.
शिवगंगा आणि विठ्ठल पोफळे 40 वर्षांहून अधिक काळापासून नर्सरी चालवतात. 'संत तुकाराम नर्सरी' असं त्यांच्या नर्सरीचं नाव असून ते परवानाधारक नर्सरी चालक आहेत.
सध्या त्यांच्या नर्सरीत पेरू, चिकू, आंबा अशा वेगवेगळ्या 15 फळांची रोपं असून एकूण रोपांची संख्या 1 लाखांपेक्षा अधिक आहे. नर्सरीतून महिन्याला चांगली कमाई होत असल्याचं त्या सांगतात.
"पहिलं जवळच विक्री व्हायची. दुधाड, हिवरा, करमाड या जवळच्या गावात झाडं जायचे. पण त्याच्यानंतर जसजसं कार्ड छापले तसतसे पूर्ण राज्यात आमच्या नर्सरीचं नाव झालं. विमानानं झाडं गेली आमची. मंत्रालयात मोरे साहेब होते त्यांनी विमानानं झाडं नेलेली आहेत आमचे. पूर्ण महाराष्ट्रात झाडं गेलेत आमचे, दर जिल्ह्यात."
उन्हाळ्यात सीझन नसतानाही महिन्याला 60 ते 70 हजारांची कमाई होत असल्याचं शिवगंगा सांगतात.
शाळेची पायरी चढली नाही...
शिवगंगा यांनी कधी शाळेची पायरी चढली नाही. पण, आज त्या नर्सरीच्या माध्यमातून इतरांना रोजगार उपलब्ध करुन देत आहेत.
आम्ही त्यांच्या नर्सरीवर गेलो तेव्हा काही जण सीताफळाच्या कलमा बांधत होते.
"आता आम्ही लेबर लावून काम करतो. लाखानं रुपये जाते त्यांना. त्यायची टीम एक-एक लाख रुपये नेती. समजा, 1 लाख डाळिंब बांधायचे आम्हाला, तर आम्हाला ती 5 रुपयानं कलम पडती. काहून की, ते दोन-अडीच रुपयानं बांधिते, 1 रुपया पन्नीचा खर्चा, 1 रुपयानं उतरायचा, म्हणजे साडे चार ते पावणे पाच अशी कलम जाती. एक लाख कलम बांधली, तर 5 लाख रुपये आमचे बाहेर जाती, निसत्या दाळिंबाच्या कलमाचे," शिवगंगा हिशेब करुन दाखवतात.
शिवगंगा यांच्याकडे आधी अडीच एकर शेती होती. कालांतरानं त्यांनी आणखी अडीच एकर शेती विकत घेतली.
एखाद्या अल्पभूधारक महिलेसाठी एखादा व्यवसाय वर्षानुवर्षं चालू ठेवणं, टिकवून ठेवणं नक्कीच सोपी गोष्ट नसते.
अशास्थितीत जर का एखादा व्यवसाय यशस्वी करायचा असेल, तर त्यासाठीचा कानमंत्र नेमका काय असू शकतो, याविषयी शिवगंगा सांगतात, "फक्त मनाची तयारी ठेवायची. धंद्यात हो की शिक्षण हो. तुमच्या पेनानं सगळं होणार नाही, पोट भरणार नाही. तुमच्या बुद्धीची आणि इमानदारीची तयारी जिथं आहे, तिथं तुम्हाला यश येईल."
नर्सरीच्या यशाचं सूत्र
शिवगंगा यांच्या कार्याची दखल घेत कृषी विभागाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं त्यांना 'महिला शेतकरी प्रेरणा सन्मान' हा पुरस्कार देऊन गौरवलं.
शिवगंगा यांना त्यांच्या पूर्ण प्रवासात पती विठ्ठल पोफळे यांची साथ लाभली.
विठ्ठल पोफळे सांगतात, "आज आपण ह्या जागेवर उभं आहोत, तिथं काय होत होतं, तर कुंटलभर माल होत होता. नर्सरीच्या हिशोबानं आमचे चांगले पैसे झाले. घर झालं 22-23 लाखांचं, गाडी आहे 10-12 लाखांची, ट्रॅक्टर आहे. शिक्षण-पाणी झालं. म्हणजे सुविधा झाल्या."
शिवगंगा यांच्या दुमजली घरासमोर गाडी, ट्रॅक्टर उभा असलेला दिसून येतो.
आधी रोपं आणून वावरात लावायची, त्यांच्या फळांचा अनुभव स्वत: घ्यायचा आणि मगच ती लोकांना विकायची, शिवगंगा यांनी नर्सरी चालवताना आणि या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी हे सूत्र पाळलंय.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.