कृष्णवर्णीय कुटुंबात जन्मली श्वेतवर्णीय मुलगी, पण 12 व्या वर्षी समजलं जीवनातलं मोठं सत्य

    • Author, सँड्रीन लुंगुम्बू
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

हादिया त्यावेळेस 12 वर्षांची होती. ती तिच्या आईबरोबर सोफ्यावर बसून चित्रपट पाहत होती. तेव्हा अचानक तिची आई म्हणाली, समजा, "मी तुला सांगितलं की असंच तुझ्या बाबतीत देखील घडलं होतं तर?" त्यानंतर जो संवाद घडला त्यामुळे हादियाचं आयुष्यच बदलून गेलं.

हादियाला आधी सांगण्यात आलं होतं की तिचा जन्म इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आयव्हीएफनं (IVF) झाला होता. मात्र या प्रक्रियेच्या वेळेस एक चूक झाली होती.

हादिया म्हणतात, "मला आठवतंय की ही एक खूप विचित्र आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे. मात्र त्याचवेळी, मला असं वाटलं की, हे मला आधी कधीच का जाणवलं नाही? मग मी विचार केला की, मी लहान होते. त्यामुळे मी हा प्रश्न विचारणं स्वभाविक नव्हतं."

"त्या क्षणी माझ्यासमोर एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली होती," असं हादिया म्हणतात.

"काहीतरी चुकलं आहे, हे पहिल्याच नजरेत स्पष्ट होत होतं. मात्र मी त्याबद्दल कधीही खोलात जाऊन विचार केला नव्हता. मला जीवशास्त्रात तसा काही रस नव्हता. त्यामुळे मी असं गृहित धरलं होतं की, माझी आई श्वेतवर्णीय असल्यामुळे मीदेखील श्वेतवर्णीय आहे," असं 26 वर्षांच्या हादिया म्हणतात. त्या कॅनडातील पुरावत्वशास्त्रज्ञ आहेत.

"मी घानामधील एका मिश्र कुटुंबाची सदस्य झाले. हे सर्वकाही नकळत घडलं होतं," असं त्या पुढे म्हणाल्या.

डॉ. दिमित्रीओस मावरलोस युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटलमधील प्रसूती, स्त्रीरोग आणि प्रजनन वैद्यक विभागातील तज्ज्ञ आहेत.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की आयव्हीएफ या उपचार पद्धतीची सुरूवात 1978 साली झाली होती. तेव्हापासून जगभरात आयव्हीएफद्वारे 1 कोटीहून अधिक मुलं जन्माला आली आहेत.

आयव्हीएफमध्ये अशाप्रकारच्या चुका दुर्मिळ आहेत. मात्र आयव्हीएफच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये यासंदर्भातील नियम आणि देखरेखीचा अभाव होता. त्या काळात याप्रकारची प्रकरणं आढळणं हे अगदी सामान्य होतं.

'माझं बालपण खोटं नव्हतं'

हादिया म्हणतात, "ज्यांनी मला वाढवलं, माझ्यासाठी ते नेहमीच माझे वडील होते."

हादिया कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रिन्स एडवर्ड आयलंडवर असलेल्या एका छोट्या गावात वाढल्या. त्या म्हणतात, शहरातील इतर लोकांपेक्षा त्यांचं कुटुंब थोडंसं वेगळं दिसत होतं.

त्या म्हणतात की शाळेत असताना त्यांना काही वंशभेदावर आधारित वक्तव्यं आणि टोमणे ऐकावे लागले. त्यांच्यासाठी ते दिवस खूप कठीण होते.

"इतर मुलं माझ्यावर अनेकदा कॉमेंट्स करायचे. ते म्हणायचे की तू कृष्णवर्णीय असायला हवं होतंस किंवा ते मी आफ्रिकन असल्याबद्दल माझी चेष्टा करायचे," असं हादिया म्हणतात.

त्या म्हणतात की त्यांच्या वेगळ्या वंशाच्या छोट्या भावंडांना जो वंशभेद सहन करावा लागला, तितका गंभीर स्वरुपाचा वंशभेद त्यांच्या वाट्याला आला नव्हता. (हादिया यांना आयव्हीएफद्वारे जन्म दिल्यानंतर तिच्या आई वडिलांना नैसर्गिकरित्या आणखी चार अपत्यं झाली होती.)

त्या म्हणतात, "आम्ही एका छोट्याशा शहरात राहत होतो. तिथे मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय होता. त्यामुळे माझ्या भावंडांना वंशभेदाला थेट तोंड द्यावं लागलं. मग ते माझ्याशी संबंधित असोत की नसोत."

मात्र हादिया यांना त्यांच्या जन्मामागचं धक्कादायक सत्य समजल्यानंतर देखील त्यांचं त्यांच्या वडिलांबरोबर असलेलं नातं बदललं नाही.

यामुळे त्यांच्या आयुष्यातील फक्त एकच सत्य समोर आलं.

आई-वडिलांचा प्रेमविवाह

त्या म्हणतात, "यामुळे माझ्या मनातील एका प्रश्नाचा नक्कीच उलगडा झाला. मात्र मी ज्या उत्तराचा शोध घेते आहे, ते अजूनही मला मिळालेलं नाही."

हादिया पुढे म्हणतात की ती चूक नेमकी झाली तरी कशी, हे समजून घेण्याचा त्या अजूनही प्रयत्न करत आहेत.

त्या म्हणाल्या, "ते नेहमीच माझे वडील आहेत. त्यांनीच मला वाढवलं. त्यांनीच माझं संगोपन केलं. माझ्या जन्माच्या दिवशी ते तिथे होते. त्याआधीच्या माझ्या प्रवासातदेखील ते साथीदार होते. आजदेखील ते माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला त्यांच्याविषयी कधीही वेगळं वाटलं नाही."

हादिया पुढे म्हणाल्या, "माझं बालपण म्हणजे खोटी गोष्ट नव्हती. मी नेहमीच या कुटुंबाचा भाग राहिली आहे. काही प्रमाणात, मी स्वत:ला घानाच्या वांशिकतेशी जोडते. कारण मी तेच अन्न खाऊन मोठी झाली आहे. मला ती भाषा समजते. मला ती भाषा बोलता येत नाही. मात्र कधीकधी ऐकून ती भाषा मला समजते."

ते म्हणतात की त्यांचे आई-वडील 1990 च्या दशकात टोरंटोमध्ये भेटले होते. त्यानंतर वर्षभरातच त्यांचं लग्न झालं.

"माझ्या वडिलांचा जन्म घानामधील टेमा या किनारपट्टीच्या शहरात झाला होता. ते त्यांच्या विशीतच कॅनडात स्थलांतरित झाले होते. ते टोरंटोमध्ये राहत होते. तिथेच त्यांची माझ्या आईशी भेट झाली. माझी आई, प्रिन्स एडवर्ड आयलंडवरील नॉर्थ रस्टिकोची होती," असं त्या म्हणतात.

अपत्यप्राप्तीसाठी आयव्हीएफचा मार्ग

हादिया म्हणतात की गर्भधारणा होण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करूनदेखील अडचणी आल्यानं, त्यांनी टोरंटो फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी इन्स्टिट्यूटमध्ये आयव्हीएफ उपचार घेण्याचं ठरवलं. ते क्लिनिक दिवंगत डॉ. फिरोझ खामसी चालवत होते.

आयव्हीएफ या उपचार पद्धतीत, प्रयोगशाळेत महिलेच्या स्त्रीबीजाचं पुरुषाच्या शुक्राणूशी मिलन घडवू आणलं जातं. त्यानंतर जो भ्रुण जन्माला येतो. त्याचं रोपण महिलेच्या गर्भाशयात केलं जातं.

"आयव्हीएम उपचार पद्धतीतून माझा जन्म होण्याआधी माझ्या आई-वडिलांनी जवळपास सात वर्षे प्रयत्न केले होते. ती खूप प्रदीर्घ आणि कठीण प्रक्रिया होती," असं त्या म्हणाल्या.

त्या म्हणतात की त्यांच्या आईवडिलांनी त्या क्लिनिकला स्पष्ट सूचना दिल्या होत्या की त्यांना कृष्णवर्णीय व्यक्तीचे शुक्राणू हवे आहेत, जेणेकरून बाळामध्ये त्या दोघांचं प्रतिबिंब दिसेल.

कृष्णवर्णीय कुटुंबात जन्माला आली श्वेतवर्णीय मुलगी

"मी जेव्हा जन्माला आले, तेव्हा माझा रंग पाहून माझ्या आईवडिलांना धक्काच बसला. त्यांनी यासंदर्भात आयव्हीएफ क्लिनिकमध्ये संपर्क केला. त्यावर त्यांना सांगण्यात आलं की, एक वर्षभर वाट पाहा, मग रंग बदलू लागेल," असं हादिया म्हणाल्या.

मात्र एक वर्षानंतरही रंगात बदल न झाल्यानं, त्यांच्या आईनं त्या क्लिनिकला या प्रकरणात तपास करण्यास सांगितलं. त्या तपासातून समोर आलं की शुक्राणू देणारा व्यक्ती कॉकेशियन होता. त्यांनी सांगितलं की ती व्यक्ती लाल केस असलेला पुरुष होता.

त्या म्हणतात, "वर्ष झाल्यानंतर, क्लिनिकनं कबूल केलं की शुक्राणूच्या डोनरच्या सिरिंजच्या क्रमांकात चूक झाली होती...त्यातून असं घडलं होतं."

नंतर, त्यांच्या लक्षात आलं की आधी सांगण्यात आलं होतं, त्याप्रमाणे त्यांच्या जैविक वडिलांचे केस लाल नव्हते, तर तपकिरी होते.

हादिया म्हणतात की, "जेव्हा त्यांचे आई-वडील डॉ. खामसी यांना भेटले, तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणाले की, तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल कृतज्ञता बाळगा, तुमचं सुंदर कुटुंबं आहे. तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला मिळालं आहे. तुमची इच्छा असेल तर माझ्याविरोधात न्यायालयात जा. विमा त्यासाठीच आहे."

त्या म्हणतात की 2003 मध्ये त्यांच्या आईवडिलांनी त्या क्लिनिकविरोधात दिवाणी खटला दाखल केला. शेवटी एका अज्ञात रकमेनिशी या प्रकरणात तडजोड करण्यात आली.

त्या म्हणाल्या, "ते काहीसं मजेशीर होतं. कारण न्यायालय म्हणालं की मी एक कॉकेशियन मुलगी आहे हे सिद्ध केलं जाऊ शकत नाही. त्यासाठी डीएनए चाचणी आवश्यक आहे."

"मात्र मला वाटतं की चित्र अगदी स्पष्ट होतं. ती जवळपास एक वैद्यकीय घोटाळा किंवा फसवणूकच होती आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत ते वारंवार जाणवलं."

ते म्हणतात की, त्यांच्या प्रकरणाचा कोणताही थेट परिणाम झाला नाही आणि ते क्लिनिक सुरू राहिलं.

डॉ. खामसी यांनी मार्च 2011 मध्ये कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ओंटारियो (सीपीएसओ) मधून राजीनामा दिला.

एका निवेदनात सीपीएसओ म्हणालं की वैद्यकीय सेवांचं नियमन करणाऱ्या संस्थेनं 26 रुग्णांची काळजी, उपचार आणि नोंद ठेवण्याशी संबंधित बाबींवरील सुनावणी रद्द करताना केलेल्या करारानंतर हा राजीनामा झाला आहे.

त्यांनी असंही मान्य केलं होतं की ते ओंटारियो किंवा कॅनडातील इतर कोणत्याही प्रांतात डॉक्टर म्हणून नोंदणीसाठी पुन्हा अर्ज करणारन नाहीत.

15 डोनर भावंडं आणि वाढती संख्या

हादिया यांनी त्यांच्या जैविक पित्याच्या कुटुंबाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी 2019 मध्ये डीएनए चाचणी केली. त्यावेळेस त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.

मात्र पाच वर्षांनी, कोणीतरी त्यांना संपर्क केला आणि सांगितलं की त्यांचे डीएनए जुळले आहेत. या खुलाशातून, त्यांना माहित झालं की त्यांना 12 सावत्र भावंडं आहेत.

त्यातील बहुतांश भावंडांचा जन्म 1994 ते 1998 दरम्यान त्याच शुक्राणू दात्याकडून झाला होता.

हादिया म्हणाल्या, "जेव्हा मला माहित झालं की मला 12 भावंडं आहेत, तेव्हा मला खूपच आश्चर्य वाटलं. त्यानंतर मला आणखी तीन भावंडं सापडली."

त्या पुढे म्हणाल्या, "त्यातून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फक्त एक वैद्यकीय आकडेवारी आहात. त्याचा भाग असण्याची अपेक्षा तुम्ही कधीही केली नव्हती. त्या 1 टक्क्यामध्ये असण्याची तीच भावना होती. मात्र ते जाणून घेणं हे खूप मोठं ओझं होतं."

"आम्हाला समजलं की अशाप्रकारे घोळ झालेली कदाचित मी काही एकटीच नव्हती. माझ्या भावंडांच्या बाबतीत देखील तसं झालेलं असू शकतं. यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यातून यासंदर्भात पुढील तपास करण्यास मला प्रवृत्त केलं."

"हे स्पष्ट झालं की आम्हा सर्व भावंडांच्या मातांना हे आश्वासन देण्यात आलं होतं की त्यांचा शुक्राणू दाता 6 -8 पेक्षा जास्त मुलं जन्माला घालणार नाही," असं हादिया म्हणाल्या.

मात्र किमान 15 आयव्हीएफ प्रक्रियांमध्ये डोनर शुक्राणूचा वापर झाला होता. या माहितीमुळे याच्याशी संबंधित प्रत्येकालाच धक्का बसला. विशेषकरून ज्या भावंडांना हे माहित नव्हतं की त्यांचा जन्म शुक्राणू डोनरकडून झाला आहे.

हादिया यांनी सांगितलं की त्यांच्या जैविक पित्याच्या नैसर्गिक मुलींनी त्यांना सांगितलं की त्यांच्या वडिलांनी 1994 मध्ये वैद्यकीय संशोधनासाठी कॅलगरी विद्यापीठाला शुक्राणू दान केले होते. मात्र कुठूनतरी ते शुक्राणू त्या क्लिनिकमध्ये पोहोचले होते.

शुक्राणू कितीवेळा दान करावे किंवा एका शुक्राणू दात्यापासून किती मुलांचा जन्म व्हावा यावर कॅनडामध्ये कोणतीही कायदेशीर मर्यादा नाही. मात्र काही क्लिनिक त्यांच्या व्यावसायिक विवेकबुद्धीनुसार स्वत:लाच मर्यादा घालून घेतात.

'दोन संस्कृतींचा संगम हे मोठं सुदैवं'

या सर्व गोष्टींनंतर, शुक्राणू दान करून जन्माला आलेली बहुतांश भावंडं एकमेकांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी एका ग्रुप चॅटशी जोडली गेली.

"पूर्व किनाऱ्यावर माझा एक जैविक भाऊ राहतो. आम्ही दोघे एकमेकांपासून फक्त दोन ब्लॉकच्या अंतरावर राहत होतो, मात्र आम्हा दोघांनाही ते माहित नव्हतं," असं त्या म्हणाल्या.

एकंदरितच, दोन वेगवेगळ्या वारसा संस्कृती असलेल्या कुटुंबात जन्म झाल्याबद्दल हादिया स्वत:ला 'नशीबवान' किंवा 'सुदैवी' समजतात.

"माझे वडील कॅनडातील पहिल्या पिढीचे स्थलांतरित होते. त्यांना घानाच्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान होता. त्यांनी ते उघडपणे त्याचा आनंद घेतला. त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान मानते. कारण मला घानामधील संस्कृती आणि प्रिन्स एडवर्ड आयलंडवरील फ्रेंच अकॅडियन संस्कृती, दोघांचाही अनुभव घेता आला," असं हादिया म्हणतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.