You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी, कोलकाता कसोटी 30 धावांनी गमावली, 93 धावांत संपूर्ण संघ गारद
गोलंदाजांनी कमावलं ते फलंदाजांनी गमावलं अशी परिस्थिती कोलकाता कसोटीत पाहायला मिळाली. तिसऱ्याच दिवशी संपलेल्या या कसोटीत भारतीय संघाचा 30 धावांनी पराभव झाला.
दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात विजयासाठी भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताचा संपूर्ण संघ 35 ओव्हरमध्येच गारद झाला.
दक्षिण दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा आणि गोलंदाज सिमन हार्मर हे या विजयाचे शिल्पकार ठरले. तर दुसऱ्या डावात भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 26 धावा केल्या.
त्या आधी भारताकडूनही गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 153 धावांवर रोखलं होतं. भारताकड़ून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 4 विकेट घेतल्या होत्या.
या पराभवाचा थेट परिणाम वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यावर होणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेला 2-0 नं पराभूत करून गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवण्याची संधी भारतीय संघाला होती. ती भारतानं गमावली आहे.
बवुमाची कॅप्टन्स इनिंग
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी भारतीय गोलंदाजांसमोर दुसऱ्या डावातही फसली असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. त्यांचा अर्धा संघ 60 धावांमध्ये तंबूत परतला होता.
पण एकामागून एक विकेट पडत असताना कर्णधार टेंबा बवुमानं दुसरी बाजू चांगलीच लावून धरली होती. त्यानं अत्यंत संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याजोरावरच दक्षिण आफ्रिकेला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला.
बवुमाची 55 धावांची धावांची खेळी ही या सामन्यातील सर्वोत्तम धावसंख्याही ठरली. बवुमाला बॉशनं 25 धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं.
तीन दिवसांत 38 विकेट
कोलकाता कसोटी ही फलंदाजांच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं कर्दनकाळ ठरली असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण म्हणजे तीन दिवसांत किंवा अडीच दिवसांतच संपलेल्या या सामन्यात तब्बल 38 फलंदाज बाद झाले.
संपूर्ण सामन्यात जवळपास 220 ओव्हर गोलंदाजी झाली. भारत किंवा दक्षिण आफ्रिका कोणत्याही देशाच्या फलंदाजांनी संपूर्ण दिवसभर फलंदाजी केली असं या सामन्यात पाहायला मिळालं नाही.
पहिल्या डावात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच दिवशी 159 धावांवर बाद केलं. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतानं पहिल्या दिवशी एकच विकेट गमावली.
पण दुसऱ्या दिवशी भारताचे सर्व नऊ फलंदाज 189 धावांवर बाद झाले. तर दुसऱ्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेनंही तब्बल 7 विकेट गमावल्या.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या तीन आणि भारताच्या नऊ अशा 12 विकेट गेल्याचं पाहायला मिळालं.
पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताचा कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळं बाहेर गेला. त्यानंतर तो परत खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.
दक्षिण आफ्रिकेची टीम सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्स 19 डिसेंबरपर्यंत दोन टेस्ट मॅच, तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी-20 सामन्यांची सिरीज खेळणार आहेत.
दुसरी टेस्ट मॅच 22 नोंव्हेबरपासून गुवाहाटीमध्ये खेळवण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)