'हिंदू सफाई कामगाराला वाचवायला मुस्लीम युवक धावला', दोघांचा गुदमरून मृत्यू; जबाबदार कोण?

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, संगमनेर
"एका हिंदू युवकाचा जीव वाचवण्यासाठी मुस्लीम युवक शहीद, रियाज पिंजारीने दाखवलेलं शौर्य, धाडस आम्ही कधीही विसरणार नाही", असं लिहिलेलं संगमनेरमधील एक बॅनर सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.
सफाई कामगार अतुल पवारला वाचवण्यासाठी रियाज पिंजारी गटारात उतरला. यात या दोघांचाही मृत्यू झाला.
मदतीचे आवाहन झाल्यावर कुठलाही विचार मनात न आणता रियाज पिंजारी हा गटारात उतरला. त्याच्या या निस्वार्थी कृतीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे पण त्याच बरोबर दोन तरुणांचा जीव गेल्याची हळहळ देखील परिसरात व्यक्त होताना दिसत आहे.
"धर्माच्या नावाने भिंती उभ्या राहिल्या, पण त्यानं त्या भिंती फोडल्या, एका अनोळखी जीवासाठी स्वतःचा प्राण दिला, तो फक्त मित्र नव्हता, तो माणुसकीचा खरा चेहरा होता," असंही या बॅनरवर पुढे लिहिलं आहे.
ही घटना संगमनेरमधील पाबळे वस्तीजवळील कोल्हेवाडी रोडवर घडली. तेथीलच स्थानिक नागरिकांनी हा बॅनर लावला आहे.
मात्र कायद्यानं बंदी असतानाही गटार सफाई करायला कामगार खोल गटारात कसा उतरला? या दोन तरुणांचा मृत्यू का झाला? त्याला जबाबदार कोण? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
या पार्श्वभूमीवर आतापर्यंत काय घडलं? एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? पीडित कुटुंबाचं म्हणणं काय? संगमनेर नगरपरिषदेनं काय स्पष्टीकरण दिलं? आणि आरोपींनी त्यांच्या बचावात काय म्हटलं? समजून घेऊयात.
एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
11 जुलै 2025 रोजी संगमनेर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमजद बशीर पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 105, 125अ, 125ब, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी ठेकेदार आर. एम. कातोरे आणि निखील कातोरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला. बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांनाही 30 जुलैला न्यायालयानं जामीन दिला.
या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, 10 जुलै 2025 रोजी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर गटार साफ सफाई करताना अतुल रतन पवार (वय 19) या मजुराचा आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या रियाज जावेद पिंजारी (वय 21 वर्षे) यांचा मृत्यू झाला.
संगमनेर नगरपरिषदने 12 जुलै 2021 रोजी रामहरी मोहन कातोरे व निखील रामहरी कातोरे यांच्या आर. एम. कातोरे अँड कंपनीला भूमिगत गटार योजनेचे काम दिले. या आदेशानुसार भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ते ठेकेदाराने अद्याप नगरपरिषदेकडे हस्तांतरित केलेले नाही.
करारनाम्यातील अट क्रमांक 38 नुसार भूमिगत गटार योजनेचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर ते नगरपरिषदेकडे रितसर हस्तांतरीत होईपर्यंत योजनेतील सर्व बाबींच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही ठेकेदार कातोरे यांची आहे. भूमिगत गटार योजनेत बांधलेल्या या चेंबरची देखभाल व दुरुस्ती करण्याचीही संपूर्ण जबाबदारी सर्वस्वी त्यांची आहे.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
संगमनेर शहरातील व उपनगरीतील गोठ्या व बंदिस्त गटारी साफ करण्यासाठी बी. आर. क्लिनिंगचे मुश्ताक बशीर शेख यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
गटारी साफ करण्याबाबतच्या करारामध्ये एकूण 30 अटी व शर्ती आहेत. करारनाम्याप्रमाणे बंदिस्त व उघड्या गटारी साफ करण्यासाठी आरोग्य विभागाने लेखी वर्क ऑर्डर दिल्यानंतरच गटार साफ सफाईचे काम करावे आणि परस्पर अथवा विना वर्क ऑर्डर काम करू नये याबाबत करारनाम्यात नमूद आहे. असं असताना त्यांनी करारनाम्याचा भंग केला.
मुश्ताक शेख यांनी आरोग्य विभागाची परवानगी न घेता त्याच्याकडील मजुरांमार्फत कोल्हेवाडी रोडवरील बंदिस्त गटार साफ सफाईचे काम सुरू केले. ठेकदाराने मजुराच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही आणि करारनाम्यातील अट क्रमांक 6 चे उल्लंघन केले.
गटार साफ सफाई करणाऱ्या मजुरांना अपाय होणार नाही यासाठी खबरदारी म्हणून रबरी हातमोजे, गमबुट, मास्क, गॉगल, कॅप, अॅप्रन तसेच गटार स्वच्छ करण्यासाठी सक्शन मशिनचा वापर करण्यात आला नाही.
हे साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत करारनाम्यातील अट क्रमांक 21 मध्ये उल्लेख आहे. असं असतानाही ठेकेदार मुश्ताक शेख यांनी त्यांच्याकडील मजूर अतुल पवारला आवश्यक साहित्य न देता गटारीचे साफ सफाईचे काम करण्यास पाठवले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
सिव्हेज ट्रिटमेंट प्लँट (एसटीपी) योजनेचे ठेकेदार रामहरी कातोरे व निखील कातोरे यांनी त्यांचा नगरपालिकेशी झालेल्या करारनाम्याप्रमाणे काम केले नाही आणि कराराचे उल्लंघन केले.
एसटीपी प्लँटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच कोल्हेवाडी रोडवरील गटारीची साफसफाई करण्यासाठी ठेकेदार मुश्ताक बशीर शेख आणि कातोरे या दोन्ही ठेकेदारांनी करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले.
मजुराला विनासाहित्य गटारीत उतरविल्यास त्याचा मृत्यू होण्याची शक्यता आहे, याची जाणीव असतानाही त्यांनी निष्काळजीपणाचे कृत्य केले.
या घटनेत सफाई कामगार अतुल पवार आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेला तरूण रियाज जावेद पिंजारी या दोघांचा गटारीमध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्या दोघांच्या मृत्यूला कातोरे आणि शेख हे कारणीभूत आहेत, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
पीडित कुटुंबांनी काय म्हटलं?
या घटनेत मृत्यू झालेल्या सफाई कामगार अतुल पवार यांच्या कुटुंबानं आमच्या वकिलांशी बोला असं सांगितलं.
पीडित कुटुंबाची बाजू मांडणारे अॅड. श्रीराम गणपुले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या प्रकरणात सुरुवातीला केवळ भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल झाल्याचा मुद्दा नमूद केला.
तसेच 2013 मध्ये केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या ह्युमन स्कॅव्हेंजिंग अॅक्टनुसार दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
ते म्हणाले, "या घटनेत तिसराही एक तरूण होता. तो या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तोही गटारात उतरला होता. मात्र, गटारात उतरल्यावर त्याला श्वास घ्यायला त्रास झाल्यावर लोकांनी त्याला वरती ओढून घेतलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला.
"जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या क्षेत्रात असंख्य कामगार काम करतात. ते संघटित नाहीत. सुरक्षेबाबत काळजी घेण्याची मागणी करण्यासाठी त्यांना एकत्र येता येत नाही. त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नसते. आमच्या घरातील मुलं तर गेली, पण इतरांवर ही वेळ येऊ नये, अशी पीडित कुटुंबांची अपेक्षा आहे," असं अॅड. गणपुले म्हणाले.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
"प्रथमदर्शनी दिसत आहे की, ते चेंबर आणि गटार एका ठेकेदाराच्या नियंत्रणात होतं. ते नगरपरिषदेकडे हँडओव्हर झालेलं नाही. दुसर्या ठेकेदारानं सुरक्षेची काळजी घेतलेली नाही. लेखी आदेशाशिवाय काम करायचं नाही, असं ठेकेदाराचं नगरपरिषदेशी कंत्राट आहे. असं असेल तर या कामाचा लेखी आदेश कुठं आहे? तो लेखी आदेश नसेल, तर त्यानं कुणाच्या सांगण्यावरून काम सुरू केलं?" असे प्रश्न अॅड. श्रीराम गणपुले यांनी विचारले.
सफाई कामगाराला वाचवताना मुलाचा मृत्यू, वडील भावूक
या घटनेवर बीबीसीशी बोलताना पीडित रियाज पिंजारीचे वडील जावेद पिंजारी भावूक झाले. ते म्हणाले, "रियाज फॅब्रिकेशनचं (वेल्डिंग) काम करायचा. जेवायला घरी आला होता आणि जेवण करून पुन्हा कामावर चालला होता. रस्त्यात त्याला एक माणूस हात करून मदत करा म्हटला. त्यावर रियाजनं त्या व्यक्तीला तुम्ही दावं आणा, मी मदत करतो सांगितलं. मात्र त्या व्यक्तीनं कामगाराचा जीव जाईल म्हणत घाई केली. त्यामुळे तो गटारीत उतरला. तेव्हा रियाजच्या नाका तोंडात गटारीचं घाण पाणी गेलं."
गटार साफ करणाऱ्या ठेकेदारानं दावं न आणताच रियाजला गटारात उतरवलं. गटारात ऑक्सिजन आहे की नाही हेही कुणाला माहिती नव्हतं. बेशुद्ध झाल्यावर त्याला गटारीतून वर काढताना तो एकदा पडलाही, अशी माहिती रियाजची आई शबाना पिंजारी यांनी दिली.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
पीडित रियाजचे चुलत भाऊ आणि संगमनेर पिंजारी समाज संघटनेचे अध्यक्ष आसिफ पिंजारी म्हणाले, "नगरपालिका कर्मचारी अतुल पवार 15 ते 20 फूट चेंबर असलेल्या गटारीत बेशुद्ध पडला. त्यावेळी त्याला वाचवायला इतर कुणी पुढे येत नसताना रियाज पुढे आला. त्याने दावं आणायला सांगितलं आणि तो गटारीत उतरला. मात्र दावं येईपर्यंत रियाज गटारीतील विषारी वायुमुळे बेशुद्ध झाला."
"जवळपास 1 तास त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जेसीबी आणला गेला. चेंबरच्या दरवाजाजवळ खड्डा खोदण्यात आला आणि चेंबर फोडला. त्यामुळे विषारी वायू काही प्रमाणात कमी झाला. यानंतर एक माजी सैनिक प्रकाश कोटकर यांनी श्वास रोखला आणि गटारीत उतरून रियाजला बाहेर काढलं. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच रियाजचा मृत्यू झाला. अतुल पवारला गटारीतून काढलं तेव्हाच त्याचा मृत्यू झाला होता," अशी माहिती त्यांनी दिली.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
स्थानिक माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांनीही या गटारात उतरणारे 10 ते 15 सेकंदात बेशुद्ध व्हायचे, असं सांगितलं. तसेच शेवटी फायरफायटर आल्यावर ऑक्सिजनच्या दोन टाक्यांचे वॉल्व्ह उघडून सोडल्याचं आणि त्यानेही परिणाम न झाल्याचं म्हटलं.
नगरपालिका कर्मचारी रवी गायकवाड यांना ऑक्सिजन लावून खाली सोडलं. मात्र, त्यांनाही गटारात अडकलेल्या दोघांना वर काढता आलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
प्रत्यक्षदर्शी आणि मदतीला जाणाऱ्यांनी काय बघितलं?
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि पीडित रियाज पिंजारीला वाचवण्याचा प्रयत्न करणारे माजी सैनिक प्रकाश कोटकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी कोल्हेवाडी रोडवरून जोर्वे येथे चाललो होतो. घटनास्थळावर खूप गर्दी जमा झाली होती आणि वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मी थांबून काय झालं आहे याबाबत चौकशी केली. तेव्हा दोन मुलं गटारात उतरल्यावर बेशुद्ध झाल्याचं समजलं. तेव्हा गर्दी खूप असूनही गटारात उतरण्याचं धाडस कुणीच करत नव्हतं."

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
"प्रथम एक तरूण गटारीत अर्ध्यावर उतरला, पण गटारात गेल्यावर त्याला अस्वस्थ झालं. त्यामुळे त्याला तेथूनच वरती ओढण्यात आलं. दुसऱ्या एका तरुणालाही हाच अनुभव आला. अग्निशामक दलानं ऑक्सिजन सिलेंडर गटारात सोडले. तसेच ऑक्सिजन मास्क लावून अग्निशामक दलाचा एक कर्मचारी गटारात उतरला. तो अर्ध्यावर गेल्यावर तोही अस्वस्थ झाला आणि त्यानंही त्याला बाहेर घेण्याचा इशारा केला. त्यालाही बाहेर ओढून काढण्यात आलं."
"मला गटारात एक तरूण हालचाल करताना दिसला. त्या तरुणाला काहीही करून वाचवलं पाहिजे असा विचार करून मी कमरेला दावं बांधलं आणि गटारात उतरलो. मी रियाज पिंजारीच्या छातीला दावं बांधत असतानाच मलाही त्रास होईल असा विचार करून वरच्या लोकांनी मला वर ओढलं. दावं बांधून झालेलं नसल्यानं मी त्याला हातानं पकडून वरती आणलं, परंतु दावं सुटल्यानं तो युवक खाली पडला. मला वरती ओढून काढल्यानंतर मलाही अस्वस्थ वाटत होतं. मी थोडावेळ बसून पुन्हा गटारात उतरलो आणि रियाज या युवकाला वरती काढलं," अशी माहिती प्रकाश कोटकर यांनी दिली.
एसटीपी योजनेचं काम पूर्ण नसताना त्यात सांडपाणी कसं आलं?
संगमनेर नगरपरिषदेनं एफआयआर दाखल करताना संबंधित गटार हस्तांतरित झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत या मृत्यूंना ठेकेदार जबाबदार असल्याचं म्हटलं.
दुसरीकडे आरोपी ठेकेदारांनी गटारीचं काम अपूर्ण असताना आणि हस्तांतर झालेलं नसताना या गटारीत सांडपाणी का सोडण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित केला.

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
आरोपी ठेकेदार निखील कातोरे म्हणाले, "जवळपास 30 किलोमीटरची लाईन आम्ही बांधली आहे. या गटारीला स्थानिक नागरिक किंवा नगरपरिषदेने परस्पर गटारी सोडल्या आहेत. त्यामुळे त्या वाहिन्या कार्यान्वित झाल्या आहेत. या गटारी अतिशय चुकीच्या पद्धतीने कार्यान्वित केल्या आहेत."
3 वर्षांपूर्वी तक्रार येऊनही नगरपरिषदेकडून कारवाई का नाही?
"शासनाने जी योजना आखली आहेत त्यात चेंबर टू चेंबर केवळ सेप्टिक टँकमधील पाणी वाहणं आवश्यक आहे. त्यात कोणतंही सरफेस वॉटर किंवा कचरा जाता कामा नये. अशाच प्रकारे ही एसटीपी योजना डिझाईन केलेली आहे. परंतु या चेंबरला परस्पर होल पाडून त्यात गटार सोडण्यात आली," असा आरोप निखील कातोरे यांनी केला.
विशेष म्हणजे याबाबत कातोरे यांनी तीन वर्षांपूर्वीच नगरपरिषदेला पत्र लिहून लक्षात आणून दिलं होतं की, लोकांनी परस्पर गटारी एसटीपी लाईनला जोडल्या आहेत. भविष्यात या लाईन तुंबू शकतात. असं असूनही त्यावर नगरपरिषदेने कोणतीही कारवाई केलेली नाही. अशातच ही लाईन तुंबली, असं कातोरे यांनी सांगितले.
'मुख्य सुत्रधाराला वाचवण्यासाठी नगरपरिषदेची एफआयआर'
कातोरे यांच्या वकिलांनी त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावरील सुनावणीत युक्तिवाद केला होता की, तक्रारदार संगमनेर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक आहेत. तेच या घटनेतील आरोपी आहेत.
कारण गटार साफसफाई करताना सुरक्षिततेची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्यांची होती. मात्र, मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी नगरपरिषदेने ही तक्रार (एफआयआर) दाखल केली आहे.
या गुन्ह्याला नगरपरिषद जबाबदार आहे. कारण एसटीपी प्रकल्प हस्तांतरित झालेला नसताना त्यांनी गटार साफसफाईचा ठेका सहआरोपीला दिला, असे वकिलांनी सुनावणीवेळी म्हटले होते.
'सफाई कामगार मृत्यूप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा'
आमदार सत्यजीत तांबे यांनी ही घटना विधान परिषदेत मांडत ठेकेदारांसह नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, "ठेकेदारांवर कारवाई केली ते ठीक आहे, पण नगरपालिका प्रशासनातील ज्या अधिकाऱ्यांनी हे अनाधिकृत गटार जोडले, त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त
या घटनेतील नगरपरिषदेच्या भूमिकेवर बीबीसीशी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, "या घटनेत निश्चितच नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचाही दोष असू शकतो. त्यामुळे कुणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत."

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
"भूमिगत गटारीचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. एसटीपी योजनेचं काम अर्धवट असताना त्याची काळजी घेणं जबाबदारी होती. ती जबाबदारी पूर्ण करण्यात निश्चितच नगरपालिकाही कुठेतरी कमी पडली. कारण जर परस्पर ठेकेदार मनमानी करत असेल, तर हे अपयश आरोग्य प्रमुखाचंही आहे. त्यामुळे त्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत," असं खताळ यांनी नमूद केलं.
नगरपरिषदेने एसटीपी लाईन कार्यान्वित नसताना त्याला गटारं जोडल्याच्या आरोपावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले, "या भागातील पूर्वीची जुनी गटार लाईन नादुरुस्त होती. त्यामुळे या नव्या एसटीपी लाईनमधूनच पाणी वाहत होतं. त्यामुळे एसटीपी लाईन कार्यान्वित नव्हती असं म्हणता येणार नाही. त्याचा उपयोग सुरूच होता."

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
तपासात नगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली का? या प्रश्नावर बोलताना तपास अधिकारी रविंद्र देशमुख म्हणाले, "अद्याप तपासात नगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झालेली नाही. या संदर्भात तपास सुरू आहे. या प्रकरणात ज्या कुणाचा निष्काळजीपणा असेल आणि कामगाराच्या मृत्यूस कारण ठरले असतील त्या सर्व संबंधितांना यात आरोपी करण्यात येणार आहे. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही."

फोटो स्रोत, Pravin Sindhu/BBC
नगरपरिषदेने काय म्हटलं?
संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले, "मॅन्युअल स्कॅवेंजिंग अॅक्ट 2013 नुसार, कुठल्याही मॅनहोलमध्ये माणसाला उतरवायला बंदी आहे. याबाबत आम्ही ठेकेदार मुश्ताक बशीर शेख यांना वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता, नगरपालिकेला माहिती न देता कामगाराला मॅनहोलमध्ये उतरवलं. त्यामुळे ती दुर्घटना घडली."
"या साफसफाईसाठी मशिन देखील उपलब्ध आहेत. या मॅन्युअली करण्यासारख्या गोष्टी नाहीत. घटनास्थळावर जे ब्लॉकेज झालं होतं ते काढण्यासाठी शिर्डी येथील आधुनिक मशिन बोलावलं. त्या मशिनचा वापर करून गटार व्यवस्थित साफ झाली. कुठे काही अडचण असेल तर सांगा. आपण जवळपास उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक व्हेईकल बोलवू, असं मी पूर्वीही ठेकेदारांना सांगितलं होतं," अशी माहिती कोकरे यांनी दिली.
आरोपी ठेकेदार मुश्ताक शेख यांचे वकील अॅड. अंतुल आंधळे म्हणाले, "संगमनेरमध्ये अतुल पवार या कामगाराचा गटार चेंबर साफसफाई करताना मृत्यू झाला. या कामगाराचा ठेकेदार मुश्ताक शेख यांना न्यायालयानं जामीन दिला आहे. आरोपीच्या वतीने बाजू मांडताना मी न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून दिलं की, ज्या गटारी नगरपालिकेकडे वर्ग केलेल्या आहेत त्याच गटारी सफाईचं काम मी करतो. मला लेखी ऑर्डर असल्याशिवाय मी कुठलंही काम करत नाही. याबाबत मला कुठलीही लेखी ऑर्डर नव्हती."
"मुळात मुख्य ठेकेदार कातोरे यांनी त्या गटारी अद्याप नगरपालिकेकडे वर्ग केलेल्या नव्हत्या. त्यामुळे स्वच्छता निरीक्षकाने केलेली ही तक्रारच मुळात कायद्यानं टेनेबल होत नाही. कारण त्यांना तो अधिकारच नाही. हे मुद्दे न्यायालयानं ग्राह्य धरून गटार साफ करणारे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख यांना जामीन दिला."
सफाई कामगार मृत्यूप्रकरणी जबाबदार नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
सफाई कामगार मृत्यूप्रकरणी जबाबदार नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रश्नावर कोकरे म्हणाले की, हे गटार साफ करण्यास माणूस उतरवला जात आहे याची कल्पना ठेकेदारांनी नगरपालिकेला दिलीच नव्हती.
त्यामुळे भविष्यातील ठेकेदारांना आमच्या या स्पष्ट सूचना असतील की, गटाराचं काम करायचं असेल, तर ते देखरेखीखालीच व्हावं. गटारात माणूसच उतरू नये हे आधी पहावं.
साफसफाईची अडचण असेल, तर अत्याधुनिक मशिन्स आहेत. त्याचा वापर करावा. माणूस गटारात उतरणार नाही. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही.
पीडितांना किती आर्थिक मदत मिळाली?
ठेकेदाराकडे कामाला असलेल्या अतुल पवारला शासनाच्या नवीन नियमानुसार, 30 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. आधी ही रक्कम 10 लाख इतकीच होती. 30 लाखपैकी एक टप्पा मदत देण्यात आली आहे. इतर मदत कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर करण्यात येईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
सफाई कामगाराला वाचवण्यासाठी गेल्यानंतर मृत्यू झालेल्या रियाज पिंजारी या तरुणाच्या कुटुंबालाही आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "ही मदत नियमात बसत नसली तरी तो युवक सफाई कामगाराला वाचवायला गेला होता. त्यामुळे विशेष बाब म्हणून मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या तरुणाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचा प्रस्ताव दिला आहे."
"या घटनेमुळे नगरपालिकेची चूक असल्याचा संदेश गेला आहे. त्यामुळे नगरपालिकेनेही या कुटुंबाला आर्थिक मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. त्यानुसार नगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पिंजारी कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे," असं त्यांनी नमूद केलं.
माजी नगरसेवक नूर मोहम्मद शेख यांनी पीडित कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेण्याबाबत म्हटलं की, रियाजच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नगरपालिकेत नोकरीसाठी सामावून घेण्यावर पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी चर्चा केली.
मात्र दुसरा मुलगा केवळ 14 वर्षांचा आहे. तो नववीला आहे. त्याला शिक्षणानंतर नोकरीचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
देशात किती सफाई कामगारांचा मृत्यू? महाराष्ट्राची स्थिती काय?
राज्यसभेत खासदार डोला सेन यांनी सफाई कामगारांच्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिलं होतं.
यात त्यांनी 2023 मध्ये देशभरातील 15 राज्यात 63 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये झाले आहेत. या तिन्ही राज्यात प्रत्येकी 10 सफाई कामगारांचा मृत्यू झाला.
2024 मध्ये मृत सफाई कामगारांची संख्या 50 इतकी आहे. त्यातील सर्वाधिक 10 मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाले. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून तेथे 9 कामगारांचा मृत्यू झाला.
अशाप्रकारे 2023 आणि 2024 या दोन वर्षात एकूण 113 कामगारांचा मृत्यू झाल्याची सरकारकडे नोंद आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











