You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ती' रशियन महिला गोकर्णच्या गुहेत का राहायची? BBC च्या मुलाखतीत सांगितला अनुभव
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज रशियन
गोकर्ण हे कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या गावची लोकसंख्या साधारण 25 हजारच्या आसपास आहे.हा परिसर तेथील पवित्र स्थळांमुळे भाविकांना देखील आवडतो.
गोकर्ण जवळच्या जंगलात सोनेरी केस असलेला एक छोटा मुलगा अनवाणी फिरताना दिसला.
स्थानिक पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना काही अनपेक्षित सापडलं. रशियन महिला नीना कुटीना आणि तिच्या पाच आणि सहा वर्षांच्या दोन मुली, एका गुहेत राहत होत्या. आजूबाजूचा परिसर हा हस्तनिर्मित कलाकुसर आणि निसर्गाने वेढलेला होता.
"आम्ही यापूर्वी कधीही गुहेत राहिलो नव्हतो," असं 40 वर्षीय नीना कुटीना यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
मग त्या तिथे कशा पोहोचल्या?
नीना कुटीना यांनी सांगितलं की, त्या आणि त्यांच्या मुली त्या गुहेत नऊ महिने राहिल्या. त्या वेळी त्यांचा मुलगा लुचेझार हा तेथून काही तासांच्या अंतरावर असलेल्या शेजारच्या राज्यातील अरंबोलमध्ये एका मित्राकडे राहत होता. तिथे तो शाळेत जात होता.
हे ठिकाण जंगलात होतं, पण गोकर्णपासून अगदी जवळ होतं. तेथून फळं खरेदी करता येत होती. ते मांस खात नव्हते. त्यांच्या मुली जन्मापासून शाकाहारी आहेत आणि नैसर्गिक जीवनशैलीमुळे त्या कधी आजारीही पडल्या नाहीत, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
"खूप लोक येथे तीर्थयात्रेसाठी येतात. हे खूपच विशेष असं ठिकाण आहे. आम्हाला निसर्ग खूप आवडतो आणि जगभर विविध ठिकाणी राहिलेलो आहोत. दाट जंगलात राहिलो आहोत. गुहेत राहणं हा नवीन अनुभव होता," असं त्यांनी सांगितलं.
नीना यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांची गुहेत राहण्याची इच्छा होती. कारण त्यांना त्यांचा मोठा मुलगा दिमित्रीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायचं होतं. दिमित्रीचा सप्टेंबर 2024 मध्ये गोव्यातील अपघातात मृत्यू झाला होता. हा काळ खूप कठीण होता, असं त्यांनी म्हटलं.
त्यांनी लाकडी फळ्यांपासून पलंग बनवले, जमिनीवर चटई घातली आणि गुहेत सजावट केली होती.
त्यांना शोधून काढलेल्या पोलिसांनी सांगितलं की, हे कुटुंब गुहेत आरामात दिसत होते. मुलांसह जंगलात राहणं सुरक्षित नाही, कारण पावसाळ्यात साप, जंगली प्राणी आणि भूस्खलनामुळे धोका असतो, हे त्यांनी नीना कुटीना यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
"सापांनी कधीही आम्हाला त्रास दिला नाही. कधीही प्राण्यांनी आमच्यावर हल्ला केला नाही. अनेक वर्षे आम्हाला फक्त माणसांचीच भीती वाटत होती," असं त्यांनी नंतर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिलं.
पोलिसांचं म्हणणं आहे की, नीना कुटीना यांचे इमिग्रेशन कागदपत्रं कालबाह्य झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला स्थलांतर केंद्रात ठेवण्यात आलं होतं.
मुलाच्या मृत्यूनंतर आवश्यक कागदपत्रांची तरतूद करण्याची ताकदच उरली नव्हती, असं नीना यांनी बीबीसीला सांगितलं.
सप्टेंबरमध्ये, त्यांना रशियात परत पाठवलं गेलं. रशिया त्यांच्यासाठी नवीन नव्हतं.
15 वर्षांपूर्वीच रशिया सोडलं
माझा जन्म लेनिनग्राड (सध्याचं सेंट पीटर्सबर्ग) येथे झाला. सायबेरियातील क्रास्नोयार्स्क शहरात सुमारे आठ वर्षे शिक्षण घेतलं. त्यानंतर मी रशियामध्ये प्रवास सुरु केला आणि नंतर युक्रेन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, कोस्टा रिका, नेपाळ आणि अखेर भारतात वास्तव्य केलं, असं नीना यांनी सांगितलं.
त्यांनी शिक्षण क्षेत्रात पदवी मिळाली. मॉस्कोमध्ये त्यांनी इंटिरियर डिझायनर म्हणून काम केलं. 15 वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा मोठा मुलगा दिमित्रीसह रशिया सोडलं.
"मला मॉस्कोतील एका अपार्टमेंटमध्ये राहायचं नव्हतं. मला समुद्राजवळ राहायचं होतं, जेणेकरून माझी मुलं वाळूवर धावू शकतील, जग पाहू शकतील. त्यांचं जीवन अधिक मनोरंजक आणि निरोगी व्हावं," असं नीना यांनी सांगितलं.
त्यांनी परदेशातच लुचेझार या मुलाला जन्म दिला आणि नंतर त्यांच्या दोन मुली- अमा आणि प्रेमा यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म घरातच, डॉक्टरांच्या मदतीशिवाय झाला, असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
"मी 24 तास माझ्या मुलांसोबत घालवते. माझ्याकडे शिक्षणाची पदवी आहे, कला क्षेत्राचा अनुभव आहे आणि मी संगीतकारही आहे," असं त्यांनी सांगितलं.
अनेक वर्षे 'मोकळ्या आकाशाखाली, निसर्गासोबत शांततेत' राहिल्याचं नीना यांनी सांगितलं.
त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनेल पेचेरनाया झेहीझनवर (ज्याचा अर्थ साधारणपणे 'गुहेतील जीवन') विणकाम शिकवण्याचे धडे दिले आणि तुरुंगातही असताना चित्रकला व शिल्पकला शिकवल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामधील त्यांचे परिचित व्यक्ती वासिली कोन्ड्राशोव्ह यांनी नीना यांचं वर्णन 'दंतकथेतील व्यक्तिरेखा' असं केलं आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मुलांसह गोव्यातील जंगलात राहायला सुरुवात केली होती.
उत्तर गोव्यातील जंगलात वासिली कोन्ड्राशोव्ह यांनी नीना यांची भेट घेतली होती. त्यांनी नीना यांच्या जीवनशैलीचं वर्णन करताना सांगितलं की, 'एक उष्णकटिबंधीय झाडाच्या मोठ्या मुळांमध्ये, निनाने कापडाने झाकलेल्या दोन खोल्या तयार केल्या होत्या.
एक लिव्हिंग रूम बैठक खोली पूजा स्थळासह, आणि दुसरी बेडरूम.' 'खाली, झाडाजवळ, एक छोटा नैसर्गिक तलाव बनवून ओढा तयार केला होता. भोवतालचा परिसर मातीने सजवला होता.
हातानं बनवलेली आसनं, आगीसाठीचे ठिकाण, भांडी आणि मुलांची खेळणी होती. 'तुला सापांचा भीती वाटत नाही का?' असं मी तिला विचारलं. त्यावेळी तिने 'आमच्या घराजवळ दोन साप राहतात आणि आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो,' असं उत्तर दिलं होतं.
पोलिसांवर आरोप आणि चौकशी
कुटीना म्हणाल्या की, मी अधिकाऱ्यांना विनंती केली होती की मला जामिनावर सोडावं आणि घर भाड्याने घेऊ द्यावं. पण त्याऐवजी त्यांनी मला माझ्या मुलींसह बंगळुरूजवळील महिला बंदी (ताबा) केंद्रात ठेवलं. माझ्या मुलाला जवळच्या आश्रयगृहात ठेवलं गेलं. हे माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं.
त्या ताबा केंद्राची अवस्था गुहेपेक्षाही खूप वाईट होती, असं कुटीना यांनी बीबीसीला सांगितलं.
त्या केंद्रातील कर्मचारी त्यांचं अन्न आणि काही वस्तू चोरत असत, असा आरोप त्यांनी केला. गुहेत ठेवलेला त्यांच्या मुलाचा अस्थिकलश जप्त केला, पण तो परत दिला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, "पोलिसांनी आम्हाला जंगली प्राण्यांपासून वाचवलं असं ते म्हणतात. पण खरं तर त्यांनी आम्हाला अशा केंद्रात ठेवलं, जिथं रात्री लोकांवर मोठमोठे झुरळं धावत असतात आणि त्यांना टाळणं शक्यच नसतं."
बीबीसीने या प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
यावर कर्नाटक सरकारच्या समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव पी. मणिवन्नन म्हणाले की, "रशियन नागरिकाने केलेल्या आरोपांकडे आम्ही आवश्यक गांभीर्याने पाहत आहोत. आम्ही तुमकुरू जिल्ह्याच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलं आहे. जर हे आरोप खरे ठरले, तर आम्ही ते दुरुस्त करण्यासाठी त्वरीत आवश्यक ती कारवाई करू."
एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "प्राथमिक चौकशीत दिसून आलं आहे की, वस्तू चोरीचे आरोप अतिशयोक्तीपूर्ण सांगितले गेले आहेत. आम्ही आता जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल येईपर्यंत वाट पाहत आहोत."
इस्रायलच्या व्यावसायिकाची मुलांसाठी कोर्टात धाव
बीबीसीशी बोललेल्या एका भारतीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नीना कुटीना यांनी रशियाला परत जाण्यासाठी मदत मिळावी म्हणून रशियन दूतावासाशी संपर्क साधला होता.
पण ही प्रक्रिया उशिरा झाली. कारण गोव्यात राहणाऱ्या इस्रायली व्यावसायिक ड्रोर श्लोमो गोल्डस्टीन यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अमा आणि प्रेमा या दोन्ही त्यांच्या मुली आहेत आणि त्यांना रशियाला पाठवू नये, असा दावा त्यांनी केला होता.
गोल्डस्टीन यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की, "गेल्या काही वर्षांत त्यांच्याशी (मुलींशी) संपर्क ठेवणं कठीण झालं होतं. मी त्यांना शोधलं तरी त्या दूरदूर राहिल्या आणि म्हणाल्या की मी त्यांना जन्माआधीच सोडून दिलं होतं. पण मी त्यांच्यावर प्रेम करणं कधीच थांबवलं नाही."
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, ते मुलांच्या संयुक्त पालकत्वासाठी प्रयत्न करत होते, पण न्यायालयाने त्यासाठी डीएनए चाचणीची अट घातली होती. मात्र, ती चाचणी होण्यापूर्वीच नीना यांनी मुलांसह भारत सोडला.
नीना कुटीनांनी बीबीसीशी गोल्डस्टीनबद्दल बोलण्यास नकार दिला. 'त्या व्यक्तीशी' संपर्क ठेवला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्या आता मॉस्कोमध्ये नातेवाईकांसोबत राहत आहेत. नीना यांना मुलींना शाळेत पाठवायचं नाही, त्याऐवजी त्या त्यांना घरच्या पद्धतीने शिकवणार आहेत.
त्यांनी पुढं सांगितलं की, त्यांना मुलींसोबत जंगलात फेरफटका मारायला आवडतो, पण त्यांचं भविष्याकडेही लक्ष आहे. भविष्यात नवीन कागदपत्रे मिळवून त्या आणि मुलं नवीन ठिकाणी फिरू शकतील आणि नवीन साहसी अनुभव घेऊ शकतील.
(इम्रान कुरेशी यांचं अतिरिक्त वार्तांकन)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.