You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मशीन जेंडर पाहत नाही', आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव यांचा 36 वर्षांचा प्रवास कसा होता?
"कोणतंही मशीन जेंडर पाहत नाही. मशीन तुमची ताकद पाहते. तुम्ही त्याला कसं हाताळता आणि नियंत्रण कसं करता, हे कौशल्य पाहते."
हे शब्द आहेत आशियातील पहिल्या महिला लोको पायलट असलेल्या सुरेखा यादव यांचे.
30 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सुरेखा यादव निवृत्त होत आहेत. पण सबंध आशियातून पहिल्या महिला रेल्वे चालक बनत त्यांनी एक मोठा इतिहास रचला होता.
सुरेखा यादव यांच्या 36 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या प्रवासाबाबत त्यांनी बीबीसी न्यूज मराठीशी बातचित केली. पाहूया त्यांचा हा प्रवास कसा होता.
'क्लासरुममध्ये सगळी मुलंच, एकही मुलगी नाही'
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात 2 सप्टेंबर 1965 रोजी सोनाबाई आणि रामचंद्र भोसले यांच्या घरात सुरेखा यादव यांचा जन्म झाला. त्या पाच भावंडांमध्ये सगळ्यात मोठ्या आहेत.
शेतकरी कुटुंब असल्याने लहानपणापासूनच मेहनतीची सवय होती असं त्या सांगतात. तसंच, पालकांनी कायम आपल्या शिक्षणाला प्राधान्य आणि महत्त्व दिल्यानेच आपण इथपर्यंत पोहचू शकले, असंही त्यांनी सांगितलं.
सुरेखा यादव सांगतात, "माझे आई-वडील सामान्य घरातले असले तरी विचारांनी ते उच्च होते. त्यांनी मला शिकवलं आणि काम करण्यायोग्य बनवलं. घरातली कामं तर कधीही करेल पण शिक्षण महत्त्वाचं आहे त्यांनी यावर लक्ष दिलं आणि म्हणूनच मी करू शकले."
शालेय शिक्षण पार पडल्यानंतर सुरेखा यादव यांनी सातारा जिल्ह्यातूनच इलेक्ट्रिक इंजिनीअरींगमध्ये डिप्लोमाचं शिक्षण पूर्ण केलं. आणि यानंतर एका सरकारी नोकरीच्या जाहिरातीने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं.
भारतीय रेल्वेत सहाय्यक चालकासाठीची जाहिरात सुरेखा यादव यांनी पाहिली आणि त्यांनी अर्ज दिला आणि परीक्षाही पार केली. परंतु त्यावेळी सुरेखा यांना याची अजिबात कल्पना नव्हती की या क्षेत्रात एकही महिला नाही.
आतापर्यंत केवळ पुरुषच काम करत असलेल्या रेल्वेच्या लोको पायलट या क्षेत्रात सुरेखा यादव यांनी 9 सप्टेंबर 1989 रोजी दाखल झाल्या.
मुंबईजवळील कल्याणपासून त्यांची सुरुवात झाली. सुरुवातीला सहाय्यक चालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
या दरम्यानच त्यांनी रेल्वे चालक म्हणून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. हे काम कठीण होतं आणि त्रासदायक सुद्धा पण तरीही काम करायचं ठरवलं होतं असं सुरेखा यादव सांगतात.
त्या म्हणाल्या, "माझी निवड झाल्यानंतरही माझ्या पालकांनी माझी साथ दिली. मी पहिल्यांदा क्लासमध्ये आले तेव्हा सगळी मुलं होती एकही मुलगी नाही. मला त्यावेळी प्रश्न पडला की काय करायचं. पण मी विचार केला की मी नाही केलं तरी दुसरं कोणीतरी करणारच. आता माझी नीवड झाली आहे तर मीच करते. थोडा त्रास होणार पण मी निश्चय केला होता की आपल्याला हे काम करायचंच आहे. मग माझी पोस्टींग कल्याण येथे झाली."
'मशीन जेंडर पाहत नाही'
काही वर्ष सहाय्यक चालक म्हणून काम करत असताना प्रशिक्षण झाल्यानंतर 1996 मध्ये सुरेखा यादव या लोको पायलट बनल्या. म्हणजेच रेल्वेच्या सहाय्यक नव्हे तर चालक.
प्रवाशांच्या जबाबदारीसह महिला म्हणून हे काम करणं अधिक त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक बनलं पण त्या मागे म्हटल्या नाहीत.
आपल्या आत्मविश्वासाबद्दल सांगताना सुरेखा यादव सांगतात, "कोणतीही मशीन जेंडर पाहत नाही. मशीन तुमची ताकद पाहते. तुम्ही त्याला कसं हाताळता आणि नियंत्रण कसं करता हे कौशल्य पाहते."
महिला म्हणून सुद्धा हे काम वेगळं होतं, वेगळं वाटत होतं, पण आपण लक्ष दिलं नाही, असं त्या सांगतात.
"लोक काय विचार करतील याचा मी विचार करत नव्हते. कोणी चांगलं म्हणायचं तर कोणी वाईट," असंही सुरेखा म्हणाल्या.
मेल एक्स्प्रेस नंतर सुरेखा यांनी गुड्स, लोकल रेल्वे ट्रेन, लेडिज स्पेशल रेल्वे, डेक्कन क्वीन आणि वंदे भारत सारख्या रेल्वेच्या त्या लोको पायलट राहिलेल्या आहेत.
प्रत्येक रेल्वेचं आपलं स्वतंत्र वैशिष्ट्य त्याचं आव्हान आणि जबाबदारी वेगळी आहे, असंही त्या आपला मागचा प्रवास पाहताना सांगतात.
"मला खूप जबाबदारीचं काम वाटायचं, कारण प्रवाशांना घेऊन जायचं आहे. ही जबाबदारी आपोआप येतेच. जबाबदारी विकत घेता येत नाही ती कामासोबत आपोआप तुमच्यात येते," असं त्या सांगतात.
सर्व पुरूष कर्मचाऱ्यांसोबत काम करतच सुरेखा यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आलेल्या नवीन जबाबदारीसह त्या वेगवेगळ्या रेल्वे चालवत गेल्या.
केवळ पुरुष सहकाऱ्यांसोबत काम करण्याबाबत त्यांनी सांगितलं की, "माझे सर्व सहकारी खूप चांगले होते. त्यांनी मला कधी हा विचार करू दिला नाही की, मी मुलगी आहे. लोक मात्र हा विचार करायचे की मुलगी आहे. पण सहकारी असे नव्हते. आम्ही खूप काम करायचो. कामाबद्दल एकमेकांशी बोलायचो. का हा विचार करायचा की मी मुलगी आहे?" असं त्या अभिमानाने सांगतात.
महिला म्हणून या कामातलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे कामाच्या वेळा असं त्या सांगतात. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, "आमची जागा दर दिवशी बदलते. हे मोठं आव्हान आहे. यामुळे खाण्या-पिण्याला वेळ निश्चित वेळ नसतो. हे दररोजचं आहे. याचा आरोग्यावर परिणाम होतो. आरोग्य सुदृढ ठेवण्यावरही त्याचा परिणाम होतो. त्रास होतो. पण मेंटेन करावं लागतं."
"रेल्वे चालवतााना अगदी 30 सेकंद किंवा मायक्रो सेकंद सुद्धाही तुम्ही तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ शकत नाही. हा प्रवाशांसाठी ही धोका आहे."
'मुलं, आई काहीच लक्षात राहत नाही, फक्त समोर लक्ष द्यावं लागतं'
सुरेखा यादव या सध्या ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे राहतात. आपले पती आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. मुलं आता मोठी झाली असून ती आपापल्या क्षेत्रात स्थिरावली आहेत, असंही त्या अभिमानाने सांगतात. पण त्यांच्या या प्रवासात पती आणि मुलांनी दिलेली साथ अनमोल आहे आणि आपण त्यांचे ऋणी आहोत हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.
"माझी मुलं खूप प्राऊड फील करतात की, मम्मी को-पायलट आहेत," असं त्या म्हणाल्या.
सुरेखा यांनी आपल्या दोन्ही गरोदरपणात काम केलं. इतर सामान्य महिलेप्रमाणेच मी काम करत होते, असं त्या म्हणाल्या. परंतु, मुलं मोठी होत असताना आणि रेल्वे चालवत असताना दोन्ही गोष्टी कशा साधल्या?
यावर बोलताना त्या म्हणाल्या, "सिग्नलवरती लक्ष ठेवायचं आहे. ट्रॅकवर फोकस करायचा आहे. लाईन्सवर लक्ष द्यायचं आहे. सोबत साथी आहे, तो काय बोलतोय त्याकडे पाहायचं आहे. गाडीचा वेग व्यवस्थित ठेवायचा आहे. या सगळ्यात मुलं कुठून लक्षात राहणार. हे कामच असं आहे की यात काहीच लक्षात राहत नाही. तहान लागली आहे की कुठे दुखतय काहीच लक्षात राहत नाही."
"हे काम सहज आणि फक्त आनंददायी काम नाही. मुलं, आई वडील काहीच ध्यानात राहत नाही. फक्त समोर लक्ष द्यावं लागतं," असंही त्या सांगतात.
कोणत्याही महिलेला आव्हानात्मक जाॅब आणि आपली मुलं यात समतोल साधावा लागतो आणि त्यासाठी एकावेळी एकाच कामावर फोकस हा आपला कानमंत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या, "कोणतंही काम करताना त्यावरच लक्ष द्यायचं आहे. रेल्वे चालवताना त्यावर लक्ष आणि मुलांसोबत असताना मुलांकडेच लक्ष. रेल्वे चालवताना दुसरीकडे लक्ष देणं म्हणजे धोका आहे. आणि माझी आधीपासून सवय राहिली आहे की, I am present wherever I am working."
'मी त्याच खुर्चीवर राहिले जिथे मी स्वतःला पाहिलं होतं'
2 सप्टेंबर रोजी सुरेखा यादव या 60 वर्षांच्या झाल्या.
"मला कधीच वाटलं नव्हतं की मी 60 व्या वर्षीपर्यंत गाडी चालवू शकेन. मी निवृत्तीपर्यंत त्याच खुर्चीवर राहिले जिथे पाहण्याची मला इच्छा होती."
18 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच काही दिवसांपूर्वी सुरेखा यादव राजधानी रेल्वे चालवून छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसला पोहचल्या, त्यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्यांचं जंगी स्वागत झालं.
गळ्यात हार टाकून ढोल ताशा अशा पारंपरिक पद्धतीने त्यांचं रेल्वे प्लॅटफॉर्मवरती स्वागत करण्यात आलं.
हा क्षण शेअर करताना त्या सांगतात, "आपल्या सहकाऱ्यांचं हेच प्रेम आपण लक्षच ठेऊ. माझं स्वागत झालं. मला इतकं प्रेम मिळालं. आपुलकीने फुलं टाकण्यात आली माझ्यावर. हा दिवस खूप चांगला होता."
त्या पुढे म्हणाल्या, "36 वर्षांत अनेक दिवस तसे आठवणीत राहणारे आहेत. पण लेडिज स्पेशल ट्रेन आणि 8 मार्च 2011 रोजी चालवलेली डेक्कन क्वीन जी भारतात यापूर्वी कोणत्याही महिलेने चालवली नव्हती. आणि यानंतर सोलापूरहून वंदे भारत चालवली हा एक इतिहास होता."
महिला म्हणूनही आणि रेल्वे चालक म्हणूनही सुरेखा यादव यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेललं. पण यामागे त्यांना अथक मेहनत, दृढ निश्चय, फोकस आणि अगणित तडजोडी कराव्या लागल्या.
त्या सांगतात,"मी माझ्या एवढ्या वर्षात मित्र परिवार किंवा सोसायटी यांच्या कार्यक्रम किंवा कुठेही जाण्याची संधी कमी मिळाली. मी इथे खूप तडजोड केली. लोकांना वाटायचं मी कुठे जात येत नाही. पण यापुढचा संपूर्ण वेळ मी केवळ कुटुंबाला देणार आहे."
तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आठवत राहील, यावर उत्तर देताना त्यांनी अगदी सेकंदात 'सिग्नल' असं सांगितलं.
त्या म्हणाल्या, "मी सर्वाधिक सिग्नल्स मिस करेन. कारण सिग्नल्सवरतीच गाडीचं सर्वकाही आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)