You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धावत्या गाडीतून उडी मारत बालविवाहाच्या बेडीतून स्वातंत्र्य मिळवणाऱ्या सोनालीची गोष्ट
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
"छोटीसी उमर और... "
टिव्हीवर हे गाणं लागायचं आणि घराघरात बालिका वधू ही सिरियल पाहत लोक हळहळायचे.
या बालिका वधूला पाहत तिचे त्रास जाणून घेत कुटुंब उसासे टाकत असण्याच्या काळातच सोनाली बडे स्वत: बालिका वधू बनली.
"मी 9 वी मध्ये होते तेव्हा आई वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. लग्न जमवलं तेव्हा माझं वय होतं 13 आणि त्याचं 30."
मुलं-मुली ज्या वेळी 'वयात' येतात त्यावेळी सोनालीचं लग्न लागलं होतं. आता 26 वर्षांची असणारी सोनाली 13 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवून आजही अस्वस्थ होते.
सोनाली बडे बीड तालुक्यातील शिरूर कासार या गावातली. आई वडिल ऊस तोड कामगार. घरात तीन बहिणी आणि त्यांच्या पाठी चौथा जन्मलेला भाऊ. आई वडील लहान मुलांना सोडून दरवर्षी उस तोडणी करण्यासाठी जायचे.
मुलांना कोण सांभाळणार आणि त्यातही मुलीची जबाबदारी कोण घेणार यामधून कमी वयातच सोनालीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
बीडमध्ये त्यावेळी होणाऱ्या अनेक बालविवाहांपैकीच एक सोनालीचाही बालविवाह होता. त्यामुळं त्याकडे तिथल्या कोणाचं लक्ष जाण्याचं कारण नव्हतंच.
लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी यायचे तेव्हाही आपल्याला शाळेतून ओढत घरी आणलं जायचं आणि मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडायचा, असं सोनाली सांगते.
पण या प्रत्येक वेळी ती मात्र घरी एकच विनंती करायची. ती म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण होऊ देण्याचं.
सोनाली सांगते , "मी घरी फक्त एकच गोष्ट मागत होते. ती म्हणजे मला 12 वी पर्यंत शिकू द्या. मग मी नंतर पुढचे शिक्षण सासरी देखील पूर्ण करू शकेन याची मला खात्री वाटत होती. पण लोक म्हणायचे तुझी जबाबदारी कोण घेणार?"
सोनाली सांगते, दहावी पूर्ण करण्याआधी मुलींची लग्न होणं हे तिच्या भागात नेहमीचं. त्यामुळे ती लग्नाला तयार का होत नाही? असा प्रश्न तिच्या पालकांना पडायला लागला.
त्यातच घरातच मोठ्या बहीणीचाही बालविवाह झाला होता. सोनाली मात्र शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न पाहत होती. पण 9 वी मध्ये असताना मात्र तिला फारसा विचार करायलाही वेळ मिळाला नाही इतकं वेगाने तीचं लग्न ठरवलं गेलं आणि लागलंही.
सोनाली सांगते, "तो मुलगा नाशिकचा होता. लग्न जमवलं तेव्हा त्याचं वय होतं 30 आणि माझं 13. आदल्या दिवशी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मध्ये एक दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी लग्न लागलं."
तिने लग्न करावं म्हणून तिच्या वडीलांनी थेट आत्महत्या करण्याचीच धमकी दिल्याचं ती सांगते.
"हळदीचा कार्यक्रम होता तेव्हा नवी नवरी असल्यासारखं मी वागत नव्हते. त्यामुळे मला खूप मारलं गेलं. पप्पांनी धमकी दिली की मी आत्महत्या करेन.
त्याच दरम्यान मुलीच्या कारणावरूनच शेजारच्या एका काकांनी फास लावून घेतला होता. त्यामुळे मला सगळे म्हणायला लागले की. आई-वडील मेल्यानंतर तू कोणाकडे बघणार आहेस?"
आईला होणारी मारहाण, लग्नासाठीचा दबाव या सगळ्या परिस्थितीत सोनाली अडकली होती. नेमकं काय चुकतंय ते लक्षात येत नव्हतं. मात्र आपल्या सोबत जे घडतंय ते योग्य नाही याची जाणीव तिला होती.
या दोन दिवसांच्या गडबडीतही तिने दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पण बालविवाह नित्याचेच असल्यानेही काय तिला तिथेही दाद मिळाली नसल्याचं ती सांगते.
पोलीस आणि सरपंचांचीही लग्नाला हजेरी असल्याचं ती नोंदवते. सोनालीच्या लग्नाचे विधी सुरू झाले ते शाळेच्या परिसरातील मंदिरातच. समोर दिसणारी शाळा पाहून सोनालीला रडू आवरेना.
मुलगी इतकी का रडते असं तिच्या पालकांना विचारल्यावर मात्र, आपल्याला सोडून राहायची सवय नसल्याने ती रडत असल्याचं कारण पालकांनी दिल्याचं सोनाली सांगते.
लग्न लागलं आणि सासरी पाठवणी करण्यासाठी तिला गाडीत बसवून देण्यात आलं. पण तिने मात्र सासरी न जाण्याचा निर्धार केला होता. ती गाडीच्या दाराच्याच बाजूला बसली होती.
गावातून गाडी निघून हायवेपर्यंत आली आणि सोनालीने उलटी होत असल्याचं सांगत गाडीची खिडकी उघडायला लावली. आणि एक क्षण पाहून दरवाजा उघडून चालू गाडी मधूनच बाहेर उडी मारली.
सोनाली सांगते " मी बेशुद्ध पडले पण फ्रॅक्चर वगैरे झालं नव्हतं. मला वाटलं आपण गाडीतून उडी मारूनही वाचलो आहे म्हणजे आपण काहीतरी करू शकतो."
ही उर्मी मनात ठेवून सोनाली माहेरी परतली. पण ते संपूर्ण वर्ष लोकांचे टोमणे नको म्हणून तिला विविध नातेवाईकांकडे पाठवण्यात आलं.
काही दिवस या गावात काही दिवस त्या असं करत 9 वीचं संपूर्ण वर्ष वाया गेलं. पण तरीही तिचा शिकण्याचा निर्धार कायम होता.
मैत्रीणींच्या मदतीने तिने परीक्षा दिली आणि दहावीचाही परीक्षेचा फॉर्म भरला. पण या सगळ्या काळात तिचा नवरा तिला नेण्यासाठी प्रयत्न करत होताच.
तिच्या घरी येत कधी तिला सांगून तर कधी जबरदस्ती तिला न्यायचा प्रयत्न करत असल्याचं सोनाली सांगते.
"माझे आई वडील म्हणायचे आमच्यासाठी तू मेली. त्याला म्हणायचे की तुमचीच आहे आता तुम्हीच बघून घ्या काय करायचं.
मग मी डोंगरात निघून जायचे. तो परतेपर्यंत घरी यायचे नाही. कधी कधी हिंमत करून यायचे तेव्हा काही ना काही असायचं हातात. एकदा मी चाकू ठेवला होता. एकदा ब्लेड घेऊन आले होते."
अशा परिस्थितीत सोनालीने शिक्षण मात्र सुरू ठेवलं. पुस्तकांना पैसे नाहीत म्हणून लोकांच्या शेतात काम करायला जाऊन 70 रुपये रोजाने पैसे कमावले.
याच दरम्यान तिची गाठ गावातील एका आशा सेविकेशी पडली आणि त्यांच्या मदतीने सोनालीने पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडण्याचा निर्धार घेतला.
त्या दरम्यानच तिला सातारच्या अँडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्याबाबत समजलं. त्या बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करतात याची माहिती मिळाली. मग त्यांच्याशी संपर्क साधला आणि तिने साताऱ्याला जाण्याचा निश्चय केला.
पण हाताशी पैसे मात्र नव्हते. त्यावेळी लग्नातलं मंगळसूत्र तिच्या उपयोगी पडलं. आईकडे असलेलं ते मंगळसूत्र चोरून तिने ते विकलं. त्याच्या किंमतीची जाण नसणाऱ्या सोनालीने तेव्हा गरज असलेले 5 हजार रुपयेच त्या मंगळसूत्राच्या बदल्यात घेतले आणि सातारा गाठलं.
साताऱ्यात आली तेव्हा वर्षा देशपांडेंनी सुरू केलेल्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाची माहिती तिला मिळाली. त्यात मग नर्सिंगचा कोर्स पूर्ण करण्याचा निश्चय तिने केला.
प्राथमिक पातळीवरचा नर्सिंगचा कोर्स तेव्हा साताऱ्यात शिकवला जात होता. तो पूर्ण करून नोकरी करण्यासाठी सोनालीने पुणे गाठलं.
विविध रुग्णालयातून नर्स म्हणून काम करत असताना तिला पुढच्या शिक्षणाबद्दल माहिती मिळाली. पण पुन्हा पैश्यांचा प्रश्न उभा होताच.
मग काम करून पैसे साठवत दर वर्षाची एक लाखाची फी भरत तिने जेएनएमचा नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सध्या ती पुण्यातल्या एका मोठ्या रुग्णालयात काम करते.
26 वर्षांची सोनाली आता स्वत:च्या पायावर उभी आहे. तिच्या या प्रयत्नांमुळे तिच्या पाठच्या बहिणींना 12 वी पर्यंत का होईना शिकण्याची संधी मिळाली आहे.
आता ती स्वप्न पहाते आहे ती स्वतचं स्वप्न पूर्ण करताना सोबतीला नवा जोडीदार असण्याची.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.