'पैसा, विमा मिळत राहील, पण गेलेल्या माणसाचं काय?', दहीहंडीत पोटची पोरं गमावलेल्यांच्या व्यथा

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"हंडीला गेला नसता, तर मुलगा वाचला असता..."

मुंबईतील दहिसर पूर्वच्या केतकीपाड्यातील जाधव कुटुंबीयांच्या या वेदना. घरातील मोठ्या मुलाच्या जाण्याने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

"आमचा मोठा मुलगा गेला. तोच आमचा आधार होणार होता. आता आम्ही कसं जगायचं? दहीहंडीला गेला नसता, तर मुलगा वाचला असता," असं महेशचे वडील रमेश जाधव म्हणत होते.

केतकीपाड्यात दहीहंडीच्या सरावादरम्यान 11 वर्षीय महेश जाधवचा मृत्यू झाला.

रविवारी संध्याकाळी (10 ऑगस्ट) महेश मंडळाच्या गोविंदा पथकासोबत पिरॅमिडच्या सहाव्या थरावर चढला होता.

अचानक तोल जाऊन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेसंदर्भात महेशच्या शेजारी असलेल्या उज्वला म्हणाला की, "गेल्या दोन वर्षापासून महेश हा या मंडळामध्ये दहीहंडीसाठी सहभागी होत असे. गेले 40 वर्ष हे मंडळ सर्व सण उत्सव आणि दहीहंडी साजरी करत आहे.

"सर्व नियम व अटी पाळून सर्व कार्यक्रम साजरे होत आहेत, मात्र कधीही अशी अपरिचित घटना घडली नाही. ही घटना दुर्दैवी आहे. प्रशासनानं या मुलाच्या कुटुंबीयांना मदत करायला हवी."

तर नाव न छापण्याच्या अटीवर स्थानिक रहिवासी म्हणाले की, "घटनेच्या वेळी महेशकडे हेल्मेट किंवा सेफ्टी बेल्टसारखी सुरक्षेची कोणतीही उपकरणं नव्हती.

"पिरॅमिडखाली गादी, दोरी किंवा इतर साधनेही नव्हती. तसेच गर्दीही कमी होती. 14 वर्षांखालील मुलांना पिरॅमिडमध्ये भाग घेण्यास मनाई असूनही त्याला सहाव्या थरावर चढवण्यात आले, त्यामुळे अशा प्रकारचे दुर्घटना घडली."

घटनेचं गांभीर्य पाहता आणि नियमांचं उल्लंघन झाल्यानं दहिसर पोलिसांनी महेशच्या आईच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 (गंभीर निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि कलम 233 (बालकाचा मृत्यू) अंतर्गत गोविंद पथक मंडळाचे अध्यक्ष बालाजी सुरणार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

घटनेसंदर्भात बीबीसी मराठीनं मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क झालेला नाही.

मंडळातील इतर सदस्यांनी मात्र, अनौपचारिकपणे बोलताना घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. सर्व नियमांचं पालन करून गोविंदा साजरा करतो असं ते म्हणाले.

तर मृत महेश जाधव यांच्या कुटुंबीयांना स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी पाच लाख रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे.

आमदार प्रकाश सुर्वे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "सर्व गोविंदा पथकांनी कोर्टाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. आम्हीही गोविंदा पथकांना साहित्य पुरवत असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून शासनाकडून या कुटुंबीयांना काही मदत मिळते का? याविषयी मी पाठपुरावा करणार आहे."

महेश दहिसर केतकीपाड्यात आई-वडिलांसोबत आणि दोन लहान भावंडांसह राहत होता. महेशचे आई-वडील स्थलांतरित मजूर आहेत. स्थलांतरित असल्यामुळं महेशचा शाळेत देखील प्रवेशही झाला नव्हता.

या घटनेमुळं केतकीपाडा परिसरात शोककळा पसरली असून, दहीहंडी उत्सवातील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

'नियम पायदळी तुडवले जातात'

यासंदर्भात दहीहंडी विषयावरील याचिकाकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडी संदर्भात सरकारच निष्काळजीपणा करत असल्याचं मत व्यक्त केलं.

अनेक दहीहंडी सोहळ्यांत मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, आमदार असे राज्यकर्ते असताना त्यांच्यासमोरच नियम पायदळी तुडवले जात आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

"कोर्टाने स्पष्ट आदेश दिले तरी, पाळले जात नाही. त्यामुळं दहिसरमधील घटनेत जसा अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला. तसाच नियमांचं पालन होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे.

"दहीहंडी संयोजक आणि आयोजकांनी नियम पाळायला हवेत. नियम पाळले जात नसतील तर राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे," असंही त्या म्हणाल्या.

मुंबई हायकोर्टाच्या दहीहंडी संदर्भात सूचना

दहीहंडीसंदर्भात मुंबई हायकोर्टाने काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार -

  • गोविंदांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आखण्यात याव्या. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट आदी उपाययोजनांची व्यवस्था आयोजकांनी आणि पथकांनी करायची आहे.
  • प्रत्येक गोविंदा पथकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गोविंदा पथकांची माहिती द्यावी. यामध्ये गोविंदा पथकातील सदस्यांची नावे, वय व पत्ता असावा. त्याशिवाय बाल गोविंदा असल्यास त्याचे वय आणि वयाचे प्रमाणपत्रही दाखल करावे.
  • गोविंदा पथकात 14 वर्षांखालील मुलांचा समावेश असू नये.
  • दहीहंडी आयोजनात नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची देखरेख ठेवण्यासाठी वॉर्ड निहाय पाचजणांची समिती असावी.
  • उंचीवरील निर्बंध सरकारने ठरवावे.
  • रस्त्यावर दहीहंडीचे आयोजन करू नये. मोकळ्या मैदानात दहीहंडीचे आयोजन व्हावे. दहीहंडी होणाऱ्या मैदानात माती, गादी मॅटची व्यवस्था करावी.
  • दहीहंडीचे आयोजन होत असलेल्या ठिकाणी मोबाइल रुग्णवाहिका असावी
  • दहीहंडी आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी पोलिसांनी व्हिडिओ रेकोर्डिंग करावे. जेणेकरून आयोजक आणि गोविंदा पथकाकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत पुरावे पोलिसांकडे असतील.

राज्यात दहीहंडी दरम्यान अनेक बाळगोपालांना आपला जीव गामवावा लागला आहे. तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.

यामुळे लहान मुलं आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही दहीहंडी उत्सव साजरा करताना नियमांचं पालन करायला हवं, अशी बाब आता दहिसरच्या घटनेतून समोर येत आहे.

'...तर आज आयुष्य वेगळं असतं'

16 वर्षांपूर्वी दहीहंडी उत्सवातल्या अपघातात जखमी झालेल्या नागेश भोईर यांनीही अपघातानंतर व्यथा मांडली.

दहीहंडी अपघातात जखमी झालेले नागेश म्हणाले की, "14 ऑगस्ट 2009 हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी 22 वर्षांचा होतो. भिवंडीच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकातर्फे दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून मी पडलो. गंभीर जखमी झालो. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या छातीपासून शरीराच्या खालच्या भागात काहीच संवेदना नाहीत."

"हात हलवू शकतो पण हाताची बोटं कडक झाली आहेत. पडलो नसतो तर आयुष्य वेगळं असतं. आता सर्व इच्छा संपल्याच आहेत. फक्त पुन्हा बरा होऊ दे एवढीच इच्छा आहे." असं नागेश सांगतात.

नागेश पुढं म्हणाले की, "दहा वर्षांपूर्वी मी खेळायचो तेव्हा हार्नेस किंवा हेल्मेट या गोष्टीही वापरल्या जात नव्हत्या. पण अपघातानंतर त्याची आवश्यकता लक्षात आली.

त्यावेळी कधीच असं वाटलं नव्हतं की, आपल्यासोबत असं काही होईल. ज्याचा माझ्यासह घरच्यांनाही त्रास होईल. त्यामुळं पुढच्याला ठेच लागली तर मागच्याने शहाणं व्हायला हवं."

दीड लाख गोविंदांना विमा कवच

दहीहंडीला सरकारने साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे. त्याचबरोबर खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे.

त्यासाठी मागील काही वर्ष सरकारकडून 75 हजार गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा कवच दिलं जाणार असल्याची माहिती, क्रीडामंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत दिली होती.

त्यासाठी अंदाजे एक कोटी 25 लाखांचा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

त्यामुळं गोविंदाला दुर्दैवाने अपघाती मृत्यू आल्यास 10 लाख रुपये, अपघातग्रस्त असेल तर 5 लाख, अडीच लाख किंवा किरकोळ जखमी असेल तर एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

'पैसा मिळेल, पण माणसाचं काय?'

2022 मध्ये चिंचपोकळीच्या प्रथमेश सावंतचा दहीहंडी अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या काकाशीही बीबीसी मराठीने संपर्क साधला.

त्यावेळी प्रथमेशचे काका संतोष सावंत म्हणाले की," दहिसरमध्ये दहीहंडीच्या सरावावेळी 11 वर्षीय महेश जाधवचा मृत्यू झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले.

19 ऑगस्ट 2022 रोजी आमचा 20 वर्षीय पुतण्या प्रथमेश सावंतही दहीहंडी अपघातात जखमी झाला होता. काही दिवसांनी केईएम रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. कधीही न भरून येणारं हे दुःख आम्हाला झालं. इन्शुरन्स, आर्थिक साह्य मिळत राहतं, पण माणसाचं काय?"

20 वर्षीय प्रथमेशला आई-वडील नव्हते. एक बहीण होती, पण तिचाही तापानं मृत्यू झाला होता. शिक्षण सुरू असलेला प्रथमेश हा वृत्तपत्र विक्रेता आणि पिझ्झा डिलिव्हरी एजंट म्हणून कामही करत होता.

प्रथमेशला दहीहंडीच्या थरावरून पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं होतं की, त्यानं पॅड किंवा हेल्मेट घातले नव्हते.

थर कोसळल्यानंतर सर्व लोक त्याच्यावर पडले. त्यात तो बेशुद्ध झाला. पुढे काही काळ व्हेंटिलेटर होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्य झाला.

प्रथमेशच्या निधनाबद्दल बोलताना संतोष सावंत पुढे म्हणाले की, "उपचार सुरू असताना अनेकांनी मदत केली. मदत होत राहते. पण घरचा व्यक्ती मदती पेक्षा मोठा असतो. नियम पाळून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. सर्व गोविंदानी स्वतःची आणि घरच्यांचां विचार करावा. गेलेली व्यक्ती परत येत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)