'लापता लेडीज' ची ऑस्करसाठी निवड पण आता टीका का होतेय?

फोटो स्रोत, CHHAYA KADAM/FACEBOOK
- Author, अजय ब्रह्मात्मज
- Role, सिनेपत्रकार, बीबीसी हिंदी
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने यावर्षी आमिर खान निर्मित आणि किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करसाठी पाठविण्याची घोषणा केली आहे. या घोषणेने एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
पायल कपाडिया यांचा 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' हा चित्रपट अधिक पात्र होता अशी चर्चा सुरू झाली आहे.
यावर्षी भारतात निर्माण केलेल्या विविध भाषांतील 29 चित्रपटांचा यासाठी विचार करण्यात आला होता.
यामध्ये 'कल्कि 2898 एडी', 'अॅनिमल', 'चंदू चॅम्पियन', 'सॅम बहादूर', 'केट्ट्रकल्ली', 'आर्टिकल 370' आदी चित्रपटसुद्धा विचारात घेण्यात आले होते.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या 13 सदस्यीय समितीने परस्पर विचारविमर्श करून किरण राव यांचा 'लापता लेडीज' चित्रपट ऑस्करला पाठविण्याची शिफारस केली.
हा चित्रपट गतवर्षी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. भारतीय सिनेमागृहांमध्ये मात्र हा चित्रपट एक मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला.
त्यानंतर 8 आठवड्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलिज करण्यात आला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेल्याचा दावा केला जात आहे.
भारताच्या लापता लेडीजससह अन्य 50 ते 52 देशांचेही चित्रपट या श्रेणीत पाठविण्यात आले आहेत.
ऑस्कर एन्ट्रीसाठी लापता लेडीजची निवड झाल्यानंतर दिग्दर्शक किरण राव म्हणाल्या, "हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमाचा सार आहे. टीमच्या समर्पण आणि पॅशनमुळे ही कथा जीवंत झाली."
राव म्हणतात, "चित्रपट नेहमीच एकमेकांना जोडण्याचे, सीमा ओलांडण्याचे आणि सार्थक विचारविमर्शाची सुरूवात करण्याचे माध्यम राहिले आहे. मला आशा आहे, की हा चित्रपट भारतीय दर्शकांप्रमाणेच संपूर्ण जगातील प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करेल.
मी आमिर खान प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओकडून मिळालेली साथ आणि त्यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास याबाबबत त्यांचे आभार मानते. मी नशिबवान आहे कारण माझ्यासोबत एक प्रतिभावान टीम होती. ज्यांनी ही कथा मांडण्यासाठीच्या माझ्या महात्त्वाकांक्षेला मूर्त रूप दिलं."
आमिर खानच्या अनुभवाचा होईल फायदा
लापता लेडीज चित्रपटाचा निर्माता आमिर खान आहे. यापूर्वी त्याच्या प्रोडक्शनखाली तयार झालेले लगान आणि तारे जमीन पर हे चित्रपट या श्रेणी अंतर्गत ऑस्करसाठी पाठविण्यात आले आहेत.
त्यामुळे आमिरच्या पूर्वानुभवांचा फायदा लापता लेडीजला ऑस्कर एन्ट्रीपर्यंत पाठविण्यास नक्कीच होईल, अशी आशा बाळगली जात आहे.
या श्रेणीत पाठविण्यात आलेल्या जगभरातील चित्रपटांचे परिक्षण करण्यासाठी ऑस्करची एक निर्णायक समिती असते.
त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पाठविण्यात आलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांना प्रचार आणि प्रसिद्धीसाठी मेहनत घ्यावी लागते.

फोटो स्रोत, Getty Images
या अभियानात भरपूर पैसा खर्च होतो. निवड झालेल्या चित्रपटाच्या पाठीशी धनदांडगा निर्माता नसेल तर अशावेळी प्रचार आणि इतर महत्वाच्या खर्चासाठी निधी उभारण्यासाठी अभियानही राबवले जाते.
यासाठी प्रचंड प्रतिभा आणि उर्जा खर्ची होते. पाच-सहा महिन्यांचा वेळही जातो. हे सर्व करूनही जर चित्रपटाला नामांकन मिळाले नाही, तर देशातील प्रेक्षकांसह चित्रपटप्रेमींचा अपेक्षाभंग होतो.
ऑस्कर पुरस्कार अभ्यासकांच्या मते चित्रपटाचे योग्य परिक्षण करण्याची, त्याचे कौतुक करण्याची आणि त्यास पुरस्कारयोग्य ठरविण्याची एक खास पद्धत आहे. यामध्येच भारतासह अनेक देशांतील चित्रपट मागे राहतात.
मुंबईची हिंदी चित्रपटसृष्टी आणि अन्य प्रादेशिक भाषांच्या सिनेसृष्टीतील अनेक चित्रपट निर्माते ऑस्कर अभियानाची भारतीय चित्रपटांना गरज नसल्याचे मानतात.
काहींद्वारे तर 'भारतीय चित्रपटांच्या श्रेष्ठत्वासाठी ऑस्करच्या शिक्क्याची गरजच काय?' असा सवालही केला जातो.
कला, संस्कृती आणि सिनेमाच्या सार्वत्रिकीकरणाच्या या काळात आपले चित्रपट कशा पद्धतीने बनतात आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना किती मान मिळतो हे सर्वश्रुतच आहे.
लापता लेडीज चित्रपटाचे वैशिष्ट्य
किरण राव यांच्या लापता लेडीज चित्रपटाची कथा 2001 सालची म्हणजेच 23 वर्षांपूर्वीची आहे.
किरण राव यांनी संभाव्य वादविवाद आणि आरोप टाळण्यासाठी 'निर्मल प्रदेश' नावाच्या एका काल्पनिक राज्याची कथा निवडली आहे. हे उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश राज्य नाही.
असे असले तरी पडद्यावर साकारण्यात आलेला काल्पनिक प्रदेश हा हिंदी भाषिक प्रदेशच (बिहार, पूर्व उत्तर प्रेदश) आहे हे लगेच कळून येते. राजकीय भाषेत या राज्यांना 'मागासलेली राज्ये' असंही संबोधलं जातं.
किरण राव यांनी या निर्मल प्रदेशातील सामाजिक संरचना पडद्यावर दाखवत समाजात पूर्वीपासून चालत आलेली पुरुषप्रधान मानसिकता उघड केली आहे.
चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शकांनी अत्यंत सहजतेने समाजातील लैंगिक भेदभाव आणि रुढी परंपरांवर आधारीत एका लहानशा कथेद्वारे दोन महिलांचे चरित्र अत्यंत खुबीने मांडले आहे.


हिंदी भाषिक प्रदेशातील गवई समाजाशी जुळलेली पात्र आणि कमकुवतपणा रंगवताना ते कुठेही हास्यास्पद वाटणार नाही याकडे लक्ष देण्यात आलंय, हे या चित्रपटाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी किंवा आक्रमक स्त्रिवादी विचारसरणीचा आधार न घेता चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे.
लेखक-दिग्दर्शकांनी हिंदी भाषीक समाजातील महिलांची अवस्था आणि भावनांना संवेदनशील पद्धतीने रोजच्या जीवनातील लहान-लहान प्रसंगांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हा चित्रपट समाजात उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या महिलांचं जीवन दाखवितानाच विकसित भारताच्या वल्गना करणाऱ्या सत्तारूढ राजकीय पक्षांचेही वास्तव उघड करतो.
चित्रपटाच्या मुख्य कथेसोबतच त्यातील भाष्य, दृष्य आणि संभाषणांमधून वर्तमान स्थितीतील सामाजिक विसंगती दर्शविण्यात आली आहे.
दीर्घ काळानंतर एखाद्या हिंदी चित्रपटात गाव-खेड्याची दृष्ये दाखवण्यात आली आहेत.
शेतं, आणि गावकुसातील दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि साधनसुविधांचं दर्शन होते. तसेच तेथे भेडसावणारे प्रश्न, अडचणीही अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
एक शहरी प्रेक्षक म्हणून चित्रपट बघताना, भारतीय ग्रामीण भाग विकासाच्या वाटेवर किती मागे राहून गेला आहे.
स्वातंत्र्य आणि आधुनिकतेचा गंध अजुनही तेथे पोहचलेला नाही. तसेच समाजातील बहुतांश बदल फार संथपणे होत असल्याची जाणीव आपल्याला होते.
सावकाश पुढे जाणाऱ्या आयुष्याची कथा
सावकाश पुढे जाणाऱ्या आयुष्यात फारसे तणाव जाणवत नाहीत. मात्र त्यांचा सभोवताल आणि त्यांच्या जिवनाकडे पाहून आश्चर्य होते की विकासाचा प्रवाह यांच्यापर्यंत अजून का पोहोचला नसेल. त्यांचे आयुष्य इतके गुंतागुंतीचे का झाले?
चित्रपटाची कथा फूल आणि जयाच्या आयुष्यावर आधारीत असली तरी दिग्दर्शकाची त्या कथेतील सभोवतालावर चौफेर नजर आहे. तेथील भाषा, संवाद आणि वातावरणात गवई समाजातील सहजता जाणवते.
कोणत्याही प्रकारच्या कृत्रिमतेची जाणीव होत नाही. चित्रपट निर्माण करत असताना नैसर्गिक वातावरण निर्मितीसाठी अनुकूल बदल करावे लागतात.
थोडी जरी चूक झाली तर ते दृष्य, परिसर, सेट आणि कास्ट्यूम नकली वाटायला लागतो. लापता लेडीजच्या क्रिएटीव्ह आणि टेक्निकल टीमच्या सामुहिक प्रयत्नांमुळे हे सगळं वास्वतवादी वाटतं.
फूल आणि जया या दोन नववधू आहेत. लग्ननानंतर त्या एका रल्वेने प्रवास करत आहेत. लग्नसराईचे दिवस असल्याने डब्यात सगळीकडे वधूच बसलेल्या आहेत. सर्वच वधूंनी नाकापर्यंत चेहरा झाकलेला घुंगट ओढलेला आहे. हा घुंगट त्या वधूंच्या वास्तवासह समाजाचं रुपक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
धावपळ आणि हलगर्जीपणामुळे दोन वधूंची अदलाबदली होते. या अदलाबदलीच्या प्रसंगावेळी हसू येतं. मात्र कथा पुढे गेल्यावर आपल्याला परिस्थीतीची गुंतागुंत लक्षात येते.
फूल आणि जया पुन्हा आपापल्या निश्चित ठिकाणी कशा पोहोचतील? त्यांच्यासोबत काही अप्रिय घटना तर घडणार नाही ना? ही चिंता प्रेक्षक म्हणून आपल्यालाही सतावत राहते.
फूल आणि जयाची परिस्थिती वेगळी असूनही एकच आहे. दोघींचंही वर्तमान अनिश्चिततेच्या गर्तेत आहे.
फूलचा साधेपणा आणि जयाकडे कमालीची बुद्धीमत्ता असूनही या स्त्रिया पुरुषप्रधान समाजात खितपत पडल्या आहेत. दोघींच्या नवऱ्यांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. दीपक हा प्रगत विचारांचा तरुण आहे, तर प्रदीप हा रुढीवादी आणि पुरुषी मानसिकतेचा आहे.
फूल, जया, दीपक आणि प्रदीप या चौघांच्या चरित्रातील धुसफुशीत महिलांची अस्मिता, ओळख आणि प्रतिष्ठा याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. किरण राव यांनी अत्यंत थेटपणे हे प्रश्न सादर करत महत्वपूर्ण बाबींवर भाष्य केले आहे.
कलाकारांनी भूमिकांना दिला न्याय
बिप्लव गोस्वामी, स्नेहा देसाई आणि दिव्यनिधी शर्मा यांच्या लेखनीत एक आधुनिकता आहे. तसेच कथेताली पात्रांच्या भूमिकेत असलेल्या सर्व नवीन कलाकारांमुळे प्रेक्षकांना पुढे काय घडेल हा अंदाज बांधता येत नाही.
कलाकारांच्या आचरणात एक नाविन्य जाणवते. जुने कलाकार नवीन पात्र साकारताना त्यांच्या अभिनयाचा तोचतोचपणा जाणवत असल्याने ती निरस वाटू लागतात. कारण प्रेक्षकांना त्यांच्या हावभावावरूनसुद्धा अनुमान काढता येतो.

फोटो स्रोत, Getty Images
लापता लेडीजमध्ये किरण राव यांनी रवि किशन वगळता एकाही नवीन किंवा लोकप्रिय कलाकार निवडलेला नाही.
रवि किशनसुद्धा आपल्या नेहमीच्या छबीत नसून एका साधारण पात्रामध्येच आहे. ते आपल्या वेगळ्या शैलीने, अभिनयाने आणि हावभावांनी ते पात्र आणखी रोचक बनवतात. तसेच त्यांच्या पात्रात जो एक ट्विस्ट येतो त्यामुळे ते पात्र प्रेक्षकांमध्ये अजूनच लोकप्रिय होते.
लापता लेडीजच्या टीकाकारांच्या मते गेल्या अनेक दशकांपासून आपण आंतरराष्ट्रीय मंचांवर गरिबी, दुर्दशा आणि आपल्या उणिवांवर आधारितच चित्रपट पाठवत आहोत.
लापता लेडीज हा एक नवीन प्रयत्न आहे. बहुभाषिक भारतीय फिल्म इंडस्ट्रीत प्रत्येक वर्षी चित्रपट निवडण्यावरून वाद होतो. कारण फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया मुंबईत आहे.
टीका करणाऱ्यांचं म्हणणं काय आहे ?
ऑस्करसाठी सर्वाधिक हिंदी चित्रपटच विचारात घेतले जातात. निवड समितीतसुद्धा मुंबई फिल्म इंडस्ट्रीचेच प्रतिनिधी असतात. त्यामुळे हिंदी चित्रपट मोठ्या प्रमाणात निवडले जातात.
यावर्षीसुद्धा विचारात घेतलेल्या 29 पैकी 14 चित्रपट हिंदीचेच आहेत.
तसेच निवड समिती सदस्यांच्या योग्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित चित्रपटच ऑस्कर एन्ट्रीसाठी पाठविण्यात यावा, अशीही सूचना समोर आली होती.
मागील वर्षी ऑस्करसाठी विचारात घेण्यासाठी पाठविण्यात आलेल्या चित्रपटासाठी आकारण्यात आलेल्या शुल्काच्या मोठ्या रकमेबाबतही अनेकांनी टीका केली.
अनेक चित्रपट निर्माते त्यांना फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून या प्रक्रियेसाठी वेळेवर माहिती दिली जात नसल्याचीही तक्रार करतात.
काही निर्माते आपले चित्रपट विचारात घेण्यासाठी पाठवतच नाहीत, तर दुसरीकडे काही आर्थिकदृष्ट्या समर्थ असलेले निर्माते आपल्या साधारण चित्रपटांचीसुद्धा एन्ट्री करतात.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्करच्या सर्वश्रेष्ठ आंतराष्ट्रीय चित्रपटांच्या श्रेणीत पाठविण्यात आलेल्या चित्रपटांनी कसे प्रदर्शन केले याबाबत चित्रपटप्रेमींमध्ये एक जिज्ञासा निर्माण होते. पण शेवटी काही निवडक बातम्या आणि फोटोंवरच आपल्याला समाधान मानावे लागते.
दरवर्षी भारतीय फिल्म इंडस्ट्रीत सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान ऑस्कर अभियान राबविले जाते. अर्थात या अभियानाचे वास्तव आपल्याला माहितीच आहे.
2001 साली आमिर खान प्रोडक्शन आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान चित्रपटही नामांकन यादीपर्यंत पोहोचला होता.
त्याआधी आणि नंतरही दरवर्षी एक चित्रपट पाठवला जातो. मात्र केवळ तीन वेळा भारतीय चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.
नोंदींनुसार 1957 पासून दरवर्षी एक भारतीय चित्रपट या श्रेणीसाठी पाठवला जातो. मात्र आतापर्यंत मदर इंडिया (1957), सलाम बॉम्बे (1988) आणि लगान (2001) हे तीनच चित्रपट नामांकनापर्यंत पोहोचू शकले आहेत.
(हे लेखकाचे स्वत:चे विचार आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











