You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लाहोरचं एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केल्याचा भारताचा दावा, तर भारताचे 25 ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावा
बुधवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातील अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भारताच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
दुसरीकडे, पाकिस्ताननेही भारतावर तसाच आरोप करत, भारताचे 25 ड्रोन्स पाडल्याचे म्हटले आहे. बीबीसीने दोन्ही देशांच्या कोणत्याही दाव्याची स्वतंत्रपणे खात्री केलेली नाही.
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, पाकिस्तानने ड्रोन्सच्या माध्यमातून अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुजसह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानच्या या हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टिमने निकामी करण्यात आल्याचं, भारताच्या संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.
पाकिस्तानी ड्रोनचे अवशेष आता अनेक ठिकाणी सापडत आहेत. यावरून हे हल्ले पाकिस्ताननेच केल्याचे सिद्ध होते, असंही भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. भारतानेही पाकिस्तानला त्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिल्याचा दावा केला आहे.
'पाकिस्तानचा नियंत्रण रेषेवर गोळीबार'
भारतीय सशस्त्र दलांनी गुरुवारी सकाळी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि सिस्टिमला लक्ष्य केले. विश्वसनीय माहितीनुसार, लाहोरमधील एक एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट करण्यात आली आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.
भारताने 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातील पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केले नसल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर भारतीय लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, याचा पुनरुच्चारही केला होता.
भारताच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की, पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार आणि तोफांचा वापर करून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबारात तीन महिला आणि पाच मुलांसह 16 निष्पाप भारतीय लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
25 भारतीय ड्रोन पाडले - पाकिस्तानचा दावा
दुसरीकडे, पाकिस्तानने 25 भारतीय ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. हे ड्रोन पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाडले गेले आहेत, पाकिस्तानचं म्हणणं आहे.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी गुरुवारी (8 मे) पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत 7 मेच्या रात्रीपासून "ड्रोनच्या मदतीने घुसखोरीचे प्रयत्न" करत आहे.
लष्कराची कारवाई सुरूच असल्याचं जनरल चौधरी यांनी सांगितलं आहे. लाहोर, गुजरांवाला, चकवाल, अटक, रावळपिंडी, मियांवली आणि कराची येथे ड्रोन नष्ट करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या प्रवक्त्याच्या या वक्तव्यावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीबीसीने पाकिस्तानच्या या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
पाकिस्तानने गोळीबारात शीख समुदायाला लक्ष्य केले: भारतीय परराष्ट्र सचिव
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये सीमेपलीकडून शीख समुदायाला लक्ष्य केल्याचे, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले की, पाकिस्तानच्या गोळीबारात एका गुरुद्वाराला लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये शीख समुदायातील तिघांचा मृत्यू झाला. पहलगाम हल्ल्यासाठी भारत 'द रेझिस्टन्स फ्रंट' म्हणजेच टीआरएफला जबाबदार मानतो.
राजधानी दिल्लीतील पत्रकार परिषदेत मिस्री म्हणाले की, टीआरएफ ही पाकिस्तान मधील कट्टरवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा एक गट आहे. लष्कर-ए-तैयबा ही संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली संघटना आहे.
भारताविरुद्ध कोणत्याही गटाला आपल्या भूमीचा वापर करण्याची परवानगी दिल्याचे पाकिस्तानने नाकारले आहे.
भारतीय हवाई हल्ल्यांमुळे नीलम-झेलम धरणाचे नुकसान झाल्याचा पाकिस्तानचा दावा मिस्री यांनी 'साफ खोटं' असल्याचं म्हटलं आहे.
ते म्हणाले की, भारताने केवळ पाकिस्तान आणि पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील "दहशतवादी पायाभूत सुविधांना किंवा इमारतींना" लक्ष्य केलं आहे.
"आम्ही तणाव वाढवू इच्छित नाही, हा प्रकार 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील हल्ल्यापासून सुरू झाला आणि भारताने काल (मंगळवारी रात्री) त्या चिथावणीखोर कारवाईला प्रत्युत्तर दिलं आहे", असंही मिस्री म्हणाले.
तीव्र प्रत्युत्तर दिलं जाईल: एस. जयशंकर
पाकिस्तानकडून भारताविरुद्ध लष्करी कारवाई करण्यात आली, तर त्याला कठोर उत्तर दिलं जाईल, असं भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.
जयशंकर यांनी हे विधान इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान केलं.
भारत - इराण मैत्री कराराच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्यासाठी ते सध्या नवी दिल्लीत आहेत.
जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली.
त्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. "या हल्ल्यामुळे आम्हाला सीमेपलिकडे कारवाई करणं भाग पडलं", असं ते म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर 22 एप्रिल रोजी भारताने 7 मे रोजी पाकिस्तानमधील काही ठिकाणी हवाई हल्ले केले.
"आम्हाला तणाव वाढवायचा नाही, पण आमच्यावर लष्करी कारवाई झाल्यास, त्याला आम्ही ठाम आणि कठोर उत्तर देऊ, याबद्दल काहीच शंका नाही," असं जयशंकर म्हणाले.
अरागची यांच्याशी चर्चा करताना जयशंकर पुढे म्हणाले की, "शेजारी आणि जवळचा भागीदार म्हणून, तुम्हाला या परिस्थितीची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे."
रिजिजू म्हणाले- 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली.
संरक्षणमंत्र्यांनी बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांना 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माहिती दिल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं.
"ऑपरेशन सिंदूर हे सध्या सुरू आहे", असंही किरेन रिजिजू म्हणाले.
"राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक चांगल्या प्रकारे पार पडली. हा गंभीर विषय होता, त्यामुळे सर्वांनी आपापली मते गांभीर्याने मांडली. सर्वात आधी संरक्षणमंत्र्यांनी सर्व नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.
त्यांनी संपूर्ण परिस्थिती आणि सरकारच्या हेतूबद्दल सांगितले. विविध पक्षांच्या नेत्यांनीही आपली मते मांडत काही सूचनाही केल्या," असंही ते म्हणाले.
सर्व नेत्यांनी लष्कराच्या प्रत्येक कारवाईला पाठिंबा देण्याचा विश्वास दिला, असंही रिजिजू यांनी यावेळी सांगितलं.
रविवारीचा आयपीएलचा सामना धर्मशालातून हलवला
गुरुवारी बीसीसीआयनं धर्मशाला येथे होणारा 11 मे रोजीचा IPL सामना रद्द केला. हिमाचल प्रदेशातील कांगडा इथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धरमशालामध्ये पोहोचू शकणार नसल्यामुळे हा सामना रद्द झाल्याचं सांगितलं आहे.
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता रविवारी दुपारी अहमदाबादमध्ये होणार आहे, असं गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.
या सामन्याबद्दल अनिश्चितता होती. कारण देशातील 20 हून अधिक विमानतळ 10 मे पर्यंत बंद असणार आहेत. त्यात धर्मशाला विमानतळाचाही समावेश आहे.
धर्मशाला स्टेडियमवर होणारा आजचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल क्रिकेट सामना नियोजनाप्रमाणे खेळला जाईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच सरावासाठी धर्मशाळा येथे आले होते.
IPL पाठोपाठ PSL वरही भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCBनं रावळपिंडीमधला आजचा सामना पुढे ढकलला आहे.
PCB नं जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात पेशावर झल्मी आणि कराची किंग्स या संघांमधला सामना आज होणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच सामन्याची पुढची तारीख लवकरच निश्चित केली जाईल असंही स्पष्ट केलं आहे.
हा सामना पुढे ढकलण्यामागचं कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिलेलं नाही. मात्र काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रावळपिंडी स्टेडियमजवळ एका ड्रोन हल्ल्यानंतर हा सामना स्थगित करण्यात आला. पाकिस्तान सरकारनं या ड्रोनविषयी अधिकृत दुजोरा दिला नाही.
पण पाकिस्तानच्या लष्करानं भारतीय ड्रोन स्टेडियमजवळ पाडल्याचा दावा केला आहे. भारतानं त्याविषयी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारतात जशी सध्या इंडियन प्रीमियर लीग सुरू आहे, तसं पाकिस्तानात 11 एप्रिल ते 18 मे या कालावधीत PSL चं आयोजन करण्यात आलं आहे.
इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीजसह बांग्लादेशातले खेळाडूही या स्पर्धेत खेळत आहेत.
पण भारतानं पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानची हवाई हद्द जवळपास बंद झाली आणि हे खेळाडू आता पाकिस्तानातून बाहेर पडू शकत नाहीयेत. त्याविषयीही काहींनी चिंता व्यक्त केली आहे.
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट बोर्डानं त्यांचे प्रतिनिधी भारत आणि पाकिस्तानातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं आणि BCCI तसंच PCB सोबत संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनसह आम्ही या प्रदेशात असलेल्या वेस्ट इंडीजच्या खेळाडूंच्या स्वास्थ्य आणि सुरक्षेची काळजी घेत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.