You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतानं हल्ला केलेली ठिकाणं नेमकी कुठे, किती नुकसान झालं? जाणून घ्या 15 फोटोंच्या माध्यमातून
भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी 'दहशतवादी तळांवर' हल्ले केल्याची माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे 7 मेच्या मध्यरात्री केवळ 25 मिनिटांमध्ये ही कारवाई झाली. मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी सुरू झालेलं 'ऑपरेशन सिंदूर' 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत चालल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी 'दहशतवादी पायाभूत सुविधांना' लक्ष्य केल्याची माहिती भारत सरकारनं दिली. या हल्ल्यांमध्ये नागरिक किंवा लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही, असंही भारतानं नमूद केलं.
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मुझफ्फराबाद, बहावलपूर, पाकिस्तान प्रशासित काश्मिरमधील कोटली या ठिकाणी अधिक नुकसान झालं आहे. या नुकसानाचे नवीन फोटोही समोर आले आहेत.
भारतानं हल्ला केलेली ठिकाणं नेमकी कुठे होती, या हल्ल्यानंतर किती नुकसान झालं आहे, तिथली परिस्थिती कशी आहे, जाणून घेऊया 15 फोटोंच्या माध्यमातून.
कोटली इथल्या गुलफूर कॅम्प आणि अब्बास कॅम्पला भारताने लक्ष्य केलं. गुलफूर कॅम्प हे नियंत्रण रेषेपासून दूर असलेलं लष्कर ए तोएबाचं तळ होतं. अब्बास कॅम्प इथं लष्कर ए तोयबाचे आत्मघातकी हल्लेखोर प्रशिक्षित केले जात होते.
अहमदपूर शार्किया हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील सुभान मशिद परिसरात 4 हल्ले करण्यात आले.
बंदी घातलेल्या जैश-ए-मुहम्मद संघटनेचे मध्यवर्ती मुख्यालय देखील बहावलपूरमध्ये आहे. मदरसा अल-सबीर आणि जामिया मस्जिद सुभान हे त्याचाच भाग आहेत.
मुझफ्फराबाद हे शहर पाकिस्तान प्रशासित काश्मीरची राजधानी आहे, जिथे अनेक महत्त्वाची कार्यालये आणि शासकीय इमारती आहेत.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, इथे बिलाल या मशिदीवर हल्ला करण्यात आला आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बिलाल मशिदीवर सात हल्ले करण्यात आले.
मुरीदके हे पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील शेखुपुरा जिल्ह्यातलं शहर आहे. ते लाहोरपासून उत्तरेकडे 40 किलोमीटर अंतरावर आहे.
मुरिदके इथं जमात-उद-दावा या संघटनेचं दावत-उल-इरशाद हे केंद्र आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, मुरिदके येथील उम्म अल-कुरा मशीद आणि तिच्या आसपासचे भाग हे भारताच्या हल्ल्यांचे लक्ष्य होते.
हल्ला झालेल्या मुरिदके गावातील एका कुटुंबाने आपलं घर सोडून स्थलांतर केलं होतं.
मुरिदके इथले लोक स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर रस्त्यावर आले.
हल्ल्यांनंतर लोक घाबरून आपल्या घरातून बाहेर रस्त्यावर आले.
मुरिदकेमध्ये हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी बचाव पथकाचे अधिकारी, पोलीस तसेच वैद्यकीय मदतीची टीम घटनास्थळी पोहोचली.
भारत सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, की या कारवाईत पाकिस्तान आणि पाकिस्तान
प्रशासित काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानी टीव्ही चॅनल 'जिओ न्यूज'शी बोलताना सांगितले की, भारताने आपल्या हवाई हद्दीतून पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागली.
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद शहरात लोक रस्त्यावर उतरले आणि सुरक्षादलांना सर्वत्र तैनात करण्यात आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)