पालघरमध्ये महाराष्ट्र-गुजरात सीमावादाची ठिणगी; 'घुसखोरी'चं हे प्रकरण नक्की काय आहे? - ग्राऊंड रिपोर्ट

महाराष्ट्र-गुजरात सीमाभाग
    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्र आणि गुजरात सीमावादानं पालघरमध्ये डोकं वर काढलं आहे.

पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजी आणि गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंबा ग्रामपंचायत हद्दीत जागेबाबत आणि सीमेबाबतच्या वादाची ठिणगी पडली आहे.

पालघरच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंबा ग्रामपंचायत प्रशासन आणि काही नागरिकांकडून घुसखोरी होत असल्याचा आरोप वेवजीतील ग्रामस्थांनी केला आहे, तर गुजरातमधील सोलसुंबा गावातील नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून ही जमीन आमचीच असल्याचा दावा करण्यात येतोय.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही जिल्हा प्रशासनांकडून गावांची सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

10 डिसेंबरला दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून संयुक्त मोजणी होणार होती. मात्र, ही मोजणी कोणतेही कारण न देता स्थगित केल्याचा आरोप वेवजी ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत पालघर जिल्हा प्रशासनाकडून हे सर्वेक्षण नसून केवळ एका सर्व्हे क्रमांकाची हद्द निश्चिती होती, ज्याबाबत भूसंपादनामुळे काही वाद होता आणि ते काम आधीच पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नक्की प्रकरण काय आहे?

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी, गिरगाव, घीमाणीया, झाई, संभा आणि अच्छाड या ग्रामपंचायतींच्या सीमाविषयक मुद्द्यांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये वाद वाढताना दिसत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अलीकडे अतिक्रमणाच्या वाढत्या घटनांमुळे अधिक गंभीर झाला आहे.

वेवजी आणि सोलसुंबा या भागांमध्ये सीमारेषा स्पष्ट न ठरल्याने अतिक्रमणावरून दोन्ही राज्यांच्या नागरिकांमध्ये तणाव निर्माण होत असून वारंवार वादाचे प्रसंग घडत आहेत.

साधारण 5 ते 6 वर्षांपासून तलासरी-उंबरगाव राज्यमार्गावर गुजरात हद्दीत जागा सर्वे नं. 173 चा 300 मिटरचा त्रिकोणी आकाराचा भुखंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला जोडून आहे. त्यानंतर 300 मीटरनंतर हा रस्ता पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सर्वे नं 204 ला जोडतो. मात्र या दोन्ही राज्यांनी हद्द कायम केलेली नाही.

परिणामी या त्रिकोणी कोपऱ्याचा आधार घेऊन महाराष्ट्र सीमेत 1500 मीटर गुजरात राज्याचे अतिक्रमण झाले आहे, असा दावा वेवजी ग्रामस्थांचा आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमाभाग
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2019 दरम्यान गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने शैक्षणिक सोईचे कारण सांगून वेवजी ग्रामपंचायतीला पत्र देऊन स्ट्रीट लाईटचे खांब टाकले. मात्र ही स्ट्रीट लाईट गुजरातच्या इंडिया कॉलनीच्या रहिवाशांसाठी करण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर वेवजी ग्रामपंचायतीने सोलसुंबा ग्रामपंचायतीला महाराष्ट्राच्या हद्दीत उभारलेले वीजेचे खांब काढून नेण्याबाबत पत्राद्वारे कळवले. तसा ग्रामपंचायतीने ठरावही घेतला होता.

मात्र सोलसुंबा ग्रामपंचायतीने वेवजी ग्रामपंचायतीच्या पत्राला उत्तर न देता अतिक्रमण कायम ठेवले आहे. तसेच या परिसरातील जागा आपली असल्याचा दावा सोलसुंबा येथील रहिवासी करीत आहेत. हा वाद गेल्या काही वर्षांपासून असाच सुरू आहे.

त्यात मागील काही महिन्यांमध्ये गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत प्रशासकीय आणि इतर बांधकामे करून घुसखोरी केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वेवजीतील स्थानिकांनी राज्य सरकारकडे हद्दनिश्चितीची ठोस मागणी पुन्हा केली.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन 10 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही राज्यांच्या महसूल यंत्रणांनी सीमारेषेची प्रत्यक्ष तांत्रिक मोजणी करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र-गुजरात सीमाभाग

पालघरच्या तलासरी आणि गुजरातमधील उंबरगाव या दोन्ही ठिकाणच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत मोजणी सुरू झाली. ग्रामस्थांना न कळवता सुरू असलेल्या मोजणीदरम्यान स्थानिक नागरिक आणि उपसरपंचांनी घेतलेल्या आक्षेपांमुळे संपूर्ण मोजणी तात्पुरती स्थगित करावी लागली.

हद्द निश्चिती न झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून वेवजी गावातील सर्वे नंबर 204 आणि सोलसुंबा गावातील सर्वे नंबर 173 या दोन्ही जागांवर दोन राज्यातील ग्रामपंचायतींचा दावा आहे. त्यामुळे या दोन्ही भूखंडांवरील वाद हा आता गुंतागुंतीचा मुद्दा ठरत आहे.

'वाद असणारी ही जागा आमचीच'

यासंदर्भात वेवजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जाण्या दोडिया म्हणाले, "वाद असणारी ही जागा आणि सीमा आमच्या हद्दीत आहे. तिथे गुजरात प्रशासनाचे काही काम सुरू आहे. वादामुळे दोन्ही प्रशासनांनी या परिसरातील रस्ताही केलेला नाही. पण आमच्या 500 मीटरच्या परिसरात गुजरात प्रशासन आणि काही लोकांकडून इमारती बांधल्या जात आहेत."

"यावर निर्णय होत नाही तोपर्यंत हे काम स्थगित करायला हवं. 10 डिसेंबरला सीमांकनासाठी दोन्ही तहसील कार्यालयातील अधिकारी आले होते. मात्र पुढे काम स्थगित का केले याबाबत काही सांगितले नाही."

गुजरातमधील सोलसुंबा ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्राच्या हद्दीत बांधकामे उभारली जात असल्याचा आरोपही वेवजी ग्रामस्थांकडून केला जातोय.

वेवजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जाण्या दोडिया
फोटो कॅप्शन, वेवजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जाण्या दोडिया

'सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवा'

संयुक्त मोजणीसाठी 10 डिसेंबरला दोन्ही गावांतील काही अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली गेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता पाळली गेल्याचा आरोप वेवजीच्या ग्रामस्थांकडून करण्यात येतोय.

ग्रामस्थ आकाश धोडी म्हणाले, "महाराष्ट्र आणि गुजरात सीमा निश्चिती राज्य सरकारने लवकरात लवकर करावी. गुजरात प्रशासनाकडून हळूहळू घुसखोरी होत आहे."

"इमारती आणि विकास कामे सुरू आहेत. ते तात्काळ थांबवले पाहिजेत. आम्ही वारंवार पाठपुरावा केला, पण तरीही हे वाढत आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवा."

महाराष्ट्र-गुजरात सीमाभाग

एका सर्व्हे नंबरची सीमारेषा स्पष्ट करण्याची प्रक्रिया

या वादासंदर्भात आणि 10 डिसेंबरच्या सर्वेसंदर्भात पालघरच्या जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "हा काही सर्व्हे नव्हता. फक्त एका सर्व्हे नंबरची सीमारेषा स्पष्ट करण्याची प्रक्रिया होती. जमिनीच्या अधिग्रहणामुळे त्या ठिकाणी वाद होता आणि ती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. अधिक माहितीसाठी आमचे कार्यालय पुढे संपर्क साधेल."

गुजरातच्या सोलसुंबा गावाच्या बाजूने सध्या महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत 500 ते 700 मीटर घुसखोरी करण्यात आल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्राच्या हद्दीत स्ट्रीट लाईट बसवणे आणि अनधिकृत बांधकामे उभारणे, असे प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय.

'आम्ही घुसखोरी केलेली नाही, जागा आमचीच'

या प्रकरणाविषयी वलसाड जिल्हाधिकारी भव्य वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही. प्रतिक्रिया मिळाल्यानंतर येथे अपडेट केली जाईल.

मात्र वेवजी ग्रामस्थांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत आणि सुरू असलेल्या सीमावादाबाबत सोलसुंबा ग्रामपंचायतीचे सरपंच कर्सनभाई भारवड यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "या जागेसंदर्भात सीमांकन होणे गरजेचे आहे. आम्ही घुसखोरी केलेली नाही. पदपथ दिव्यांचे आणि इमारतींचे काम काही वर्षांपासून आम्ही केले आहे आणि ते गुजरातमधीलच आहे."

"वेवजी दावा करत असलेली जागा आमच्या हद्दीत येते असे आमचे मत आहे. संयुक्त सीमांकन झाल्यावर स्पष्ट होईल की जागा कोणाच्या हद्दीत येते. हे प्रकरण प्रशासकीय पातळीवर जाईल आणि दोन्ही प्रशासनांच्या चर्चेनंतर सुटेल असे आम्हाला वाटते," असेही त्यांनी नमूद केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)