'मांजामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलाच्या गळ्याला 20 टाके पडले'; बंदी असूनही नायलॉन मांजा कसा मिळतोय?

फोटो स्रोत, Kiran Sakale
(सूचना : या लेखातील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)
"मांजामुळे इतकी गंभीर जखम झाली होती की, तुम्ही कोंबडी-बकरं कापताना बघता, तसं माझ्या मुलाच्या गळ्यातून रक्त उडत होतं."
छत्रपती संभाजीनगरमधील संजीव जाधव यांच्या 3 वर्षांच्या मुलाचा मांजामुळे गळा चिरला. 4 डिसेंबरला ही घटना घडली.
आम्ही संजीव यांच्या घरी पोहचलो तेव्हा घरासमोर मोटारसायकल दिसली. याच मोटारसायकलवरून संजीव आपल्या मुलासोबत प्रवास करत होते. मोटारसायकलच्या इंधन टाकीवर रक्ताचे डाग दिसत होते.
संजीव यांचा मुलगा पलंगावर खेळत होता. परिसरातील माणसं त्याला पाहण्यासाठी येत होते.
संजीव त्यांच्या मुलाला आणि पत्नीला घेऊन दर्शनासाठी निघाले होते. त्यांचा मुलगा हा मोटारसायकलवर त्यांच्या पुढे बसला होता.
घटनेविषयी विचारल्यावर संजीव सांगतात, "आम्ही दर्शनासाठी जात असताना सेंट्रल नाका या ठिकाणी मोटारसायकलवर माझा मुलगा समोर बसलेला होता. अचानकच नायलॉनचा मांजा त्याच्या गळ्यात घुसला आणि त्याने आवाज काढला… पप्पा !"
"मी बघितल्याबरोबर हातानं तो मांजा रोखला आणि जागीच गाडी थांबवली. मी मांजा हातानं अडवला, पण तोपर्यंत त्याचा खूप सारा गळा कापलेला होता."
यानंतर संजीव यांनी लगेच त्यांच्या मुलाला खासगी रुग्णालयात दाखल केलं.
5 दिवसांच्या उपचारानंतर संजीव यांच्या मुलाला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.
गळ्याला 20 टाके
संजीव सांगतात, "20 पेक्षा जास्त टाके आहेत आणि जखम पण खूप आतमध्ये आहेत. एकूण 5 दिवस त्याच्यावर उपचार चालू होते. आयसीयूमध्येच होता तो 5 दिवस लगातार."
या घटनेप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या मांजाचा वापरकर्ता कोण होता, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांविरोधात कठोर मोहीम राबवण्यात येत आहे.

फोटो स्रोत, kiran sakale
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले सांगतात, "शहरातील सातारा पोलीस स्टेशन, जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 3 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ मांजाचे 55 रिल जप्त करण्यात आलेले आहेत. 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटकही करण्यात आली आहे."
"जनजागृती करणं, ज्या ठिकाणी विक्री होते तिथे कारवाई करणं आणि जे गुन्हे दाखल होतात यात तपास बारकाईनं आणि सखोलपणे करणं या तिन्ही पातळीवर पोलीस प्रशासन काम करत आहे," अशी माहिती नवले यांनी दिली.
मांजाची विक्री छुप्या पद्धतीने
छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला दुपारच्या सुमारास काही मुलं पतंग उडवताना दिसली. ते वापरत असलेला मांजा हातात घेऊन पाहिला, तर तो नायलॉनचा असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. हा मांजा कुठून विकत घेतला, अशी विचारणा केल्यावर त्या मुलांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.
छत्रपती संभाजीनगरमधील पतंगांच्या काही दुकानांमध्ये आम्ही नायलॉन मांजाची विचारणा केली, तेव्हा दुकानदार म्हणाले की, कायद्यानं विकणं बंदी आहे, आमच्याकडे मांजा मिळत नाही.
पण शहरातील काही घरांमध्ये मात्र मांजाची विक्री होत असल्याचं दिसून आलं. ओळखीतल्याच लोकांना मांजा विकला जात असल्याचं दिसलं. नायलॉन मांजाच्या एका गट्टूची किंमत 800 ते 1000 रुपयांदरम्यान असल्याचंही आम्हाला आढळून आलं.

फोटो स्रोत, kiran sakale
पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाची खरेदी-विक्री आणि वापर करण्यावर महाराष्ट्रासह इतर काही राज्यांनी बंदी घातलीय. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेही पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी घालण्याचे निर्देश सर्व राज्य सरकारांना दिलेत.
बंदी असतानाही मांजा उपलब्ध होणं, हे सरकारचं अपयश नाहीये का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
"हे सरकारचं अपयश आहे. कारण तुम्ही त्याच्यावर बंदी आणता, मग ते विकण्यासाठी मार्केटमध्ये येतं कुठून? आणि हा मांजा थोडाथोडका येत नाही, तर प्रत्येक मुलगा संक्रांतीला पतंग उडवतो, तर त्याच्या पतंगाला तोच मांजा असतो. एवढ्या प्रमाणात हा मांजा शहरात येतो कुठून?" असा प्रश्न संजीव उपस्थित करतात.

फोटो स्रोत, Kiran sakale
संजीव म्हणतात, "प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण दर वर्षी या घटना घडत राहतात. शहरात दरवर्षी 40 ते 50 घटना घडतात. काही वेळा तर मुक्या प्राण्यांचेही खूप हाल होतात."
"संक्रांत झाल्यानंतर हजार-पाचशे पक्षी तर झाडांवर अडकलेले दिसतात. दरवर्षी नायलॉन मांजा बंद होतो आणि परत चालू होतो. विक्री कुठे होते, हेच कळत नाही. पोलिसांनी याच्यावर कडक बंदोबस्त केला पाहिजे," संजीव अपेक्षा व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Kiran Sakale
नायलॉन मांजा सर्वसाधारण मांजाच्या तुलनेत धारदार असतो. तो सहजपणे तुटू शकत नाही. नायलॉन मांजामुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना दरवर्षी समोर येतात. काही प्रकरणात तर जीवितहानीही झालेली पाहायला मिळते.
शहरात फिरताना झाडांवर, वीजेच्या तारांवर पतंग अडकल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसून येतं. हे पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाचं उत्पादन नेमकं कुठं होतं, त्यानंतर त्याचा प्रवास कुठून कसा होतो, हे शोधणं पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











