मकरसंक्रात : 'गळा कापणाऱ्या मांजाची नागपुरात अजूनही कशी होते विक्री'

फोटो स्रोत, Getty Images
पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजाने गळा कापला गेल्याने नागपूरमध्ये गेल्या महिनाभरात एकाचा मृत्यू झालाय, तर तीन जण जखमी झालेत. पण असं असूनही बंदी घालण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री सर्रास होताना दिसतेय.
काही कामानिमित्त आपल्या वडिलांसोबत नागपूरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या 21 वर्षांच्या प्रणय ठाकरे या तरुणाचा तिथून परतताना मांजामुळे गळा कापला गेल्याने मृत्यू झाला.
नायलॉन मांजा आणि सिंथेटिक मांजा यांची निर्मिती, विक्री आणि वापरावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातलीय. पण नागपुरात अनेक ठिकाणी या मांजाची विक्री सुरू आहे.
प्रणय ठाकरेच्या मृत्यूबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितलं,
"मंगळवारी (12 जानेवारी) पावणेसहा वाजताच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये मांजाने गळा कापल्यामुळे मृत्यू झालेल्या 21 वर्षीय प्रणय ठाकरे या युवकाचा मृतदेह आणण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार नायलॉनच्या मांजामुळे मृत प्रणयच्या गळ्यातील श्वसननलिका, गळ्यातून मेंदूकडे रक्तपुरवठा करणारी 'कॅरोटीड' (Carotid) धमनी आणि मेंदूकडून अशुद्ध रक्त ह्रदयाकडे नेणारी 'जग्युलर' रक्तवाहिनी आणि इंटर ट्रॅकियासह मसल ट्रॅकिया या श्वसनलिका पूर्णत: कापल्या गेल्या होत्या. यामुळेच श्वसननलिका अभावी श्वास न घेता आल्याने प्रणयचा जागीच मृत्यू झाला."
दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यात नायलॉनच्या मांजामुळे लहानमोठ्या जखमा झालेले चार ते पाच लोक दररोज आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि दरवर्षी याच काळात अशा मांजामुळे किमान दोन लोकांचे मृत्यू झाल्याच्याही केसेस आपल्याकडे येत असल्याचं डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images / Hindustan Times
सौरभ पाटणकर या 22 वर्षांच्या तरुणालाही मंगळवारी (12 जानेवारी) नागपुरात असाच अपघात झाला. मानेवाडा रिंग रोडने दुचाकीने सौरभ जात असताना समोर मांजा आला. गळ्याभोवती नायलॉनचा मांजा फास आवळणार, तेवढ्यातच सौरभने गळ्यासमोर हात धरल्याने तो बचावला. पण यात त्याचा हात कापला गेला आहे.
याआधी ३० डिसेंबरला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून क्लासला जाणाऱ्या आदित्य भारद्वाजचाही मांजामुळे जीवघेणा अपघात झाला होता.
कारवाई का होत नाही?
राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजावर बंदी घातलीय.
नायलॉन मांजा येतो कसा आणि मिळतो कुठे, याचा शोध ग्रीन व्हिजील या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थेने घेतला.
या मांजाविषयी खोदून-खोदून मागणी केल्यानंतर काही दुकानांमध्ये आपल्याला दुसरीकडे ठेवलेला मांजा आणून देण्यात आल्याचं ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी सांगतात. काही दुकानांत त्यांना चायनिज मांजाही मिळाला.
कौस्तव चॅटर्जी सांगतात, "कुठल्याही पतंगाच्या दुकानाची पूर्ण झडती घेतली तरी त्यात नायलॉनचा मांजा सापडणार नाही. पण एकदा तुम्ही दुकानात गेलात, तुम्ही योग्य ग्राहक आहात ह्यावर विक्रेत्यांचा विश्वास बसला की विक्रेते दुसऱ्या ठिकाणाहून नायलॉनचा मांजा आणून देतात. नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथक-NDSच्या वतीने शहरातील नायलॉनच्या मांजाच्या संदर्भात छापे मारण्यात येतात. पण यात त्यांना हवं तसं यश येत नाही. शिवाय आता व्हॉट्सअॅप ग्रुप स्थापन करून घरपोच नायलॉनचा मांजा पोहचवण्याची युक्ती नायलॉनचा मांजा विक्रेत्यांनी शोधली आहे."

फोटो स्रोत, Getty Images/ NARINDER NANU
नागपूर महानगरपालिकेचं म्हणणं काय?
गेल्या वर्षभरात नागपूर महानगर पालिका हद्दीत 11 रिळं नायलॉनचा मांजा जप्त केला असून 1,268 प्लास्टिक पतंग जप्त केल्याचं नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे कमाडंट विरसेन तांबे यांनी सांगितलं.
अशा प्रकारच्या मांजाची विक्री सुरू असल्यास नागरिकांनी त्याविषयीची माहिती देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
नायलॉन मांजा विरोधी अभियान
नायलॉनच्या मांजावर बंदी आहे, पतंग उडण्याच्या संक्रांतीच्या परंपरेचा आनंद हा साध्या मांजाने पंतग उडवत घ्यावा असं आवाहन नायलॉन मांजा विरोधी समितीचे अध्यक्ष अरविंद कुमार रतुडी यांनी केलंय.
नायलॉन मांजा तयार करणारे, विकणारे आणि वापरणारे अशा सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.

फोटो स्रोत, Getty Images / INDRANIL MUKHERJEE
नायलॉन मांजाचा पर्यावरणावर परिणाम
नायलॉन मांजामुळे पर्यावरणावर आणि विशेषत: पक्ष्यांवर विपरित परिणाम होत असल्याचं नागपूरमधले मानद वन्यजीव वार्डन कुंदन हाथे सांगतात.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने डिसेंबर आणि जानेवारीत पंतगासाठी नायलॉन मांजाचा वापर होत असला तरी वर्षभर अशा मांजामुळे जखमी झालेले पक्षी आणि प्राणी नागपूरच्या सेमिनरी हिल्समधल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये येत असतात.
घुबड, कबुतर, कावळे , शिक्रा या पक्ष्यांना या नायलॉन मांजाचा सर्वाधिक त्रास होतो. यावर्षी नायलॉन मांजा अडकल्यामुळे जखमी झालेलं अजगर आणि कोब्रा सापही उपचारासाठी आणण्यात आल्याचं हाथे सांगतात.
का वापरतात नायलॉन मांजा?
बीबीसी मराठीने काही पतंग प्रेमींशी संवाद साधला. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर त्यांनी काही माहिती दिली.
साध्या कापसापासून तयार करण्यात आलेल्या मांजाचा वापर करून पतंग उडवल्यास ती सहज कापली जाते, पण नायलॉन मांजामुळे असं सहजासहजी करणं शक्य नसल्याने हा मांजा वापरण्याकडे पतंगप्रेमींचा कल असल्याचं या व्यक्तीने सांगितलं.
गेल्या महिनाभरात नागपूर शहरात नायलॉन मांजामुळे झालेल्या तीन अपघातांनंतर नागपूर पोलिसांनी अवैधपणे नायलॅान मांजा विकणाऱ्यांवरची कारवाई वाढवली आहे. शिवाय गुरुवार 14 जानेवारी रोजी नायलॉनच्या मांजामुळे अपघात होऊ नयेत म्हणून शहरातील सर्व उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








