You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भांडण झालं म्हणून 'लाडक्या' मुलानं आई-बाबांनाच संपवलं, 'आत्महत्येचा बनाव' करुनही कसा सापडला आरोपी?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
इंजिनिअरींग करणाऱ्या मुलानं स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केली. ही घटना नागपुरातील कपिल नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. हत्येच्या सहा दिवसानंतर घटना उघडकीस आली.
पण, शिक्षण घेणाऱ्या मुलानं आपल्या आई-वडिलांना का संपवलं? ही घटना कशी समोर आली? आणि आई-वडिलांची हत्या करण्याचं पाऊल उचलण्याइतपत मुलं हिंसक का होत आहेत? त्यांचा अहंकार इतका लगेच का दुखावतो? पाहुयात.
लिलाधर डाखुळे (वय 50) आणि अरुणा लिलाधर डाखुळे (वय 42) अशी हत्या झालेल्या आई-वडिलांची नावे असून उत्कर्ष डाखुळे (वय 24) असं आरोपी मुलाचं नाव आहे.
क्रूरपणे दोघांची केली हत्या
नागपुरातील झोन 5 चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, लिलाधर हे कोराडी पॉवर प्लांटमध्ये नोकरीला होते, तर त्यांच्या पत्नी अरुणा शिक्षिका होत्या.
अरुणा 26 डिसेंबरला घरात एकट्या असताना मुलगा उत्कर्षनं बेडरुममध्ये आईची गळा दाबून हत्या केली. बेडरुमचा दरवाजा बाहेरून बंद केला आणि तो वडिलांची वाट पाहत बसला.
नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेलेले वडील सायंकाळच्या सुमारास घरी परतले. वडील बाथरूममध्ये गेले असता तर त्यानं वडिलांच्या खांद्यावर चाकूने तीन वार केले.
त्यानंतरही वडिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. 'आपण बसून बोलू, काय झालं तुला?', असं म्हणत शांत करण्याचा प्रयत्न केला. 'तुझ्या आईला बोलावं, आपण सगळे मिळून मार्ग काढू,' असं वडील म्हणाले.
पण, आईला आपण आधीच मारल्याचं उत्कर्षनं वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडील हादरले. त्यानं वडिलांना पुन्हा चाकूनं भोसकलं. यामध्ये वडिलांचाही जागीच मृत्यू झाला.
आई-वडील मेडिटेशनला गेल्याचा केला बनाव
इतक्यात बीएएमएस करत असलेल्या बहिणीची कॉलेजमधून घरी यायची वेळ झाली होती. तिला हे सगळं कळणार, या भीतीनं त्यानं घराला कुलूप लावून वडिलांचा फोन बंद केला आणि स्वतःजवळ ठेवला.
चारचाकी गाडी घेऊन तो बहिणीला घ्यायला गेला. आई-बाबा अचानक मेडिटेशनसाठी बंगळुरूला गेले आहेत. त्यामुळे आपल्याला बैलवाडाला काकांकडं राहायला जायला सांगितलं, असं त्यानं बहिणीला सांगितलं. पण, बहिणीचा विश्वास बसत नव्हता.
बहिणीनं आई-बाबांच्या मोबाईलवर फोन केला. पण, वडिलांचा मोबाईल बंद येत होता, तर आईच्या मोबाईलवरून कोणी उत्तर देत नव्हतं. त्यामुळे मुलीलाही चिंता वाटत होती.
बहीण सतत आई-बाबांबद्दल बोलत असल्यानं त्यानं वडिलांचा मोबाईल सुरू केला आणि बहिणीला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला. आम्ही बंगळुरूला मेडिटेशनसाठी आलो असून 5 जानेवारीपर्यंत नागपुरात परत येऊ, असा मेसेज त्यानं केल्यानं बहिणीचाही विश्वास बसला.
हत्येला 4 दिवस उलटले तरी तो बहिणीला घेऊन काकांच्या घरी राहत होता.
हत्या झाल्याचं कसं समोर आलं?
लिलाधार डाखुळे यांना आणखी तीन भावंड आहेत. दोघे त्यांच्या घराच्या शेजारी नागपुरात राहतात, तर एक बैलवाडा इथं राहतात.
घराशेजारी राहणाऱ्या भावांना तसेच शेजाऱ्यांना डाखुळे यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे उत्कर्षच्या चुलत भावांनी त्याला फोन करून घरातून कसलीतरी दुर्गंधी येत असल्याचं सांगितलं.
त्यानंतर उत्कर्ष 31 डिसेंबरला लगेच आला आणि आई-बाबांची आठवण येत आहे असं सांगून भावांजवळ खूप रडू लागला.
मला आई-बाबांबद्दल वाईट स्वप्नं पडत आहेत. त्यांना काही झालं तर नसेल ना, आपण दरवाजा उघडू असं म्हणत त्यानं रात्रीच दरवाजा उघडायला लावला. एकानं पोलिसांना फोन करून कळवलं. पण, पोलीस पोहोचायच्या आधीच त्यांनी दरवाजा उघडला होता.
इतक्यात आरोपी उत्कर्षनं त्याच्याकडे असलेला वडिलांचा मोबाईल तिथंच घरात टेबलवर ठेवला आणि वडिलांनी आत्महत्या केली असेल असा बनाव रचला.
मोबाईलमध्ये लिहून ठेवली सुसाईड नोट
वडिलांचा मोबाईल आरोपी उत्कर्षकडे होता. त्यानं वडिलांच्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोट लिहिली होती. "बाळांनो आम्हाला मिस करू नका. सॉरी आम्ही हे पाऊल उचलतोय. पोलिसांत तक्रार करू नका. आम्हाला थेट स्मशानभूमीत घेऊन जा", असं लिहून त्याचा स्क्रीनशॉट काढून तो मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवला होता.
पण, या सुसाईड नोटवरून काहीच स्पष्ट होत नव्हतं. तसेच आई-बाबा बंगळुरूला गेले असं तोच सगळ्यांना सांगत होता. त्यामुळे प्राथमिक संशयित मुलगा उत्कर्षच होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन कपिल नगर पोलिसांत नेलं. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली.
आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं. पण, नंतर कसून चौकशी केल्यानंतर त्यानं हत्या केल्याचं कबुल केलं, अशी माहिती निकेतन कदम यांनी दिली.
वाद झाल्याचं कारण
पण, इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या मुलानं आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना का मारलं?
याबद्दल पोलिस उपायुक्त निकेतन कदम सांगतात, उत्कर्ष 6 वर्षांपासून इंजिनिअरिंग करत होता. पण, तो सातत्यानं नापास व्हायचा.
मुलाला इंजिनिअरिंग जमत नाही. त्यामुळे आता त्यानं दुसऱ्या क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि घरची शेती आहे तिकडे लक्ष द्यावं असं आई-वडिलांनी ठरवलं. पण, उत्कर्ष ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. या गोष्टीवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होते. 25 डिसेंबरलाही यावरूनच वाद झाला.
उत्कर्षला शेती करायला बैलवाडा इथं पाठवायचं ठरलं होतं. त्यामुळे कडाक्याचं भांडण झालं होतं. त्याला शेती करायला जायचं नव्हतं. त्यानंतर उत्कर्षनं चाकू विकत घेतला आणि बहीण कॉलेजला निघून गेल्यानंतर आईला संपवलं.
त्यानंतर वडिलांनाही चाकूनं भोसकलं. वडिलांवर दोन तीन वार केल्यानंतर वडिलांनी बसून निर्णय घेऊ असं म्हणत, त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळीही तुम्ही मला अजूनही बैलवाड्याला पाठवणार आहात का? असं विचारलं. तेव्हा वडील म्हणाले, हो आपलं ठरलं ते ठरलं. त्यानंतर उत्कर्षनं वडिलांचा जीव घेतला.
मुलगा घरात लाडाचा होता. त्याला जे पाहिजे ते मिळत होतं. त्याच्या सगळ्या इच्छा आई-बाबांनी पूर्ण केल्या होत्या. आई-बाबांनी कधीच त्याला मारलं नाही, असं आरोपी उत्कर्षच्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं. पण, 25 तारखेला झालेल्या भांडणात वडिलांनी मारल्याचा दावा आरोपी उत्कर्षनं केलाय.
हा ट्रेंड फार धोकादायक आहे
अशा घटनांमध्ये एक वेगळा ट्रेंड दिसून येतो. मुलं आधी आई-बाबांसोबत भांडण झालं की, घरातून निघून जायची. यानंतर आई-वडिलांसोबत वाद झालेल्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढू लागल्या. पण, आता हा ट्रेंड थेट आई-वडिलांचा खून करण्यापर्यंत पोहोचलाय.
हा ट्रेंड फारच धोकादायक असून आई-वडिलांनी आपल्या मुलाचे इतके लाड पुरवू नये, त्याला नाही ऐकण्याची सवय लावावी. या प्रकरणात देखील तो घरात प्रचंड लाडाचा होता. त्याच्याकडे सगळ्या सुख-सुविधेच्या गोष्टी आहेत, असं पोलीस उपायुक्त निकेतन कदम म्हणतात.
पण, मुलं थेट टोकाचं पाऊल का उचलतात? आई-वडिलांसोबत वाद झाल्यानंतर आत्महत्या करणं असेल किंवा अशा प्रकारे आई-वडिलांचा जीव घेणं असेल? असं पाऊल मुलं का उचलतात? त्यांचा अहंकार इतक्या लवकर का दुखावला जातोय? याबद्दल आम्ही मानसोपचार तज्ज्ञांसोबत बोललो.
मुलं इतकी हिंसक का होऊ लागली?
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मनसोपचार तज्ज्ञ डॉ. मनिष ठाकरे सांगतात की, सध्याच्या स्थितीत मुलांचं आवेगावर नियंत्रण नसतं.
ते कुठल्याही गोष्टीसाठी उशीर सहन करू शकत नाही. त्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्या असतात आणि ते मिळालं नाही भावनिक आवेगात येऊन त्यांनी असं केलेलं असतं.
भावनिक आवेगातून कसं बाहेर निघायचं यासाठी मुलांसमोर पर्याय राहिलेला नाही. कारण, मुलं थोडा कंटाळा आला की मोबाईल बघतात. चारचौघांमध्ये वावरणं कमी झालेलं आहे.
अशा बहुतेक घटना या त्वरीत निर्माण झालेल्या परिस्थितीतून भावनिक आवेगातून घडलेल्या असतात.
डॉ. मनिष गेल्या 20 वर्षांपासून प्राध्यापक आहेत, तसेच ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्याकडे आलेल्या अल्पवयीन आरोपींची देखील तपासणी करतात. ते सांगतात, आमच्याकडे हल्ल्यातील, खुनातील असे अल्पवयीन आरोपी येतात.
अनेकांमध्ये Oppositional Define Disorder म्हणजे अजिबात सहकार्य करायचं नाही, कोणाचंही ऐकायचं नाही असे हे मुलं असतात.
दुसरं म्हणजे Conduct disorder चे लक्षणं मुलांमध्ये दिसतात. अशी मुलं ही अँटीसोशल असतात. समाजातील कुठलेही नियम त्यांना मान्य नसतात.
तर नागपुरातील डागा हॉस्पीटलमधील मनसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे हे मुलांच्या मेंदूबद्दल सविस्तर सांगतात.
ते म्हणतात, मुलांचा फ्रंटल ब्रेन हा 18 वर्षापर्यंत हळूहळू विकसित होत जातो. हा ब्रेन पूर्ण विकसित न झाल्यामुळे मुलं इम्पलसिव्ह असतात. त्यामुळे ते कुठलीही गोष्ट कसलाही विचार न करता त्वरीत करतात. त्याचे पुढे काय होणार आहे हे त्याला त्या क्षणाला माहिती नसतं. फ्रंटल ब्रेन या सगळ्या कृतींना ब्रेक लावण्याचं काम करतो.
डॉ. नवखरे गेल्या 14 वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ आहेत. तसेच ते रिमांड होममध्ये सुद्धा आरोपींच्या मानसिक तपासणीसाठी जात होते.
प्रत्येकच आरोपी हा मनोरुग्ण नसतो, असंही ते याठिकाणी नमूद करतात.
पालकांनी काय काळजी घ्यायला हवी?
पण, सध्याच्या मुलांचा अहंकार इतक्या लवकर का दुखावतो? त्यांना कुठल्याही गोष्टी सहन का होत नाहीत? याबद्दल डॉ. नवखरे सध्याच्या पालकत्वावर बोट ठेवत जीवनमूल्यांचं महत्व सांगतात.
ते म्हणतात, पालकांनी आपल्या मुलांना जीवनपयोगी मूल्य शिकवणं गरजेचं असतं. दुसऱ्यासोबत कसं बोलायचं, कसं वागायचं, आत्मीयता काय असते, संयम काय असतो? हे सगळं शिकवणं महत्वाचं आहे. पण, दुर्दैवानं सध्या या गोष्टी समाजातूनच कमी झालेल्या दिसतात.
मुलं चित्रपट आणि हिंसक गेम्सचं देखील अनुकरण करताना दिसतात. काही मुलं अँटी सोशल असतात. त्यांना सोसायटीचे नियम मान्य नसतात.
प्रत्येकाला उद्धट बोलण्यापासून तर पब्लीक प्रॉपर्टीचं नुकसान करण्यापर्यंत सगळं काही ते करतात. अशा मुलांकडेही आई-वडिलांनी लक्ष द्यायला दवं. आपल्या मुलांच्या वागण्यात फरक पडलाय का? याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष द्यायला हवं"
तर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनिष ठाकरे हे मुलांचे सर्वच लाड न पुरवण्याचा सल्ला पालकांना देतात.
ते म्हणतात, आपला मुलगा एखादी गोष्ट कशापद्धतीनं मागतोय याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. तो जिद्दीने पेटून मागत असेल तर त्याचे लाड पुरवू नका.
आपल्याला कुठलीही गोष्ट जिद्द केली तर लगेच मिळतेय असं त्याला वाटायला नको. त्याला पाहिजे असेल ती वस्तू द्या पण, त्यासाठी त्याला वाट बघायला लावा.
एखादी वस्तू त्याला द्यायची असेल तर त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी त्याला बक्षीस म्हणून द्या. त्यामुळे आपल्याला कुठलीही गोष्ट त्वरित आणि सहज मिळत नाही, ती चांगलं काहीतरी करून मिळवावी लागते हे त्याच्या डोक्यात बसतं.
आपली मुलं कोणालाही उगाच कारण नसताना काहीही फेकून मारत असतील, जनावरांना मारहाण करत असतील, प्रत्येकवेळी उद्धट बोलत असतील तर पालकांनी सजग व्हायला हवं.
त्याला बळजबरीनं चांगलं वागण्यासाठी त्याच्या दबाव आणायला नको. आई-वडिलांनी शांतपणे समजून घेऊन हळूहळू मुलामध्ये बदल घडवून आणायला हवा, असाही सल्ला डॉ. ठाकरे देतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.