येमेनमध्ये हूती बंडखोरांवर अमेरिकेचे हवाई हल्ले सुरू, ट्रम्प यांनी दिला 'विनाश करण्याचा' इशारा

अमेरिकेने येमेनची राजधानी सनामधील हुथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेने येमेनची राजधानी सनामधील हुथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

येमेनमधील हूती बंडखोरांवर अमेरिकेनं 'निर्णायक आणि शक्तिशाली' हवाई हल्ले सुरू केले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

हूती बंडखोरांनी रेड सीमधील जहाजांवर केलेले हल्ले हे या हल्ल्यांचं कारण असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.

ट्रम्प यांनी त्यांचा सोशल प्लॅटफॉर्म ट्रुथवर लिहिलंय की, "इराणचं आर्थिक पाठबळ असलेल्या हूतींनी अमेरिकन विमानांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत आणि आमच्या सैनिकांना व मित्र राष्ट्रांना लक्ष्य केले आहे."

हूती बंडखोरांच्या 'दरोडे, हिंसाचार आणि दहशतवादामुळे' अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे आणि लोकांचे जीवन धोक्यात आले आहे, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, 9 जण जखमी झाल्याची माहिती हूती आरोग्य मंत्रालयाने दिली.

'धुराचे लोट दिसले'

गाझामधील इस्रायल-हमास युद्धाला प्रत्युत्तर म्हणून हूती बंडखोरांनी जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. हूती बंडखोरांनी म्हटलं की, त्यांचे लष्कर अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देईल.

शनिवारी (15 मार्च) संध्याकाळी सना आणि उत्तरेकडील सादा प्रांतात अनेक स्फोट झाल्याची माहिती हूतींनी दिली. हा भाग सौदी अरेबियाच्या सीमेवरील हूती बंडखोरांचा बालेकिल्ला आहे.

इराणचं समर्थन असलेला हा बंडखोर गट इस्रायलला आपला शत्रू मानतो. त्यांचं सना आणि येमेनच्या वायव्य भागावर नियंत्रण आहे. मात्र, त्यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही.

अनेक छायाचित्रांमध्ये सना विमानतळाच्या परिसरात काळ्या धुराचे लोट दिसत आहेत. येथेच लष्करी तळ देखील आहे. असं असलं तरी या छायाचित्रांची पुष्टी झालेली नाही.

लाल रेष
लाल रेष

एका निवेदनात हूती बंडखोरांनी म्हटलं, "येमेनची राजधानी सना येथील निवासी भागांना लक्ष्य करून केलेल्या 'सैतानी' हल्ल्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन जबाबदार आहे."

शनिवारी अमेरिकेने हूतींच्या ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात ब्रिटनने भाग घेतला नव्हता हे स्पष्ट असले तरी, त्यांनी अमेरिकेला नियमित इंधन भरण्यास मदत केली.

नोव्हेंबर 2023 पासून हूती बंडखोरांनी लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील डझनभर व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लहान बोटींनी हल्ले केले आहेत.

त्यांनी दोन जहाजेही बुडवली आहेत, एक ताब्यात घेतले आहे आणि चार क्रू मेंबर्सची हत्या केली आहे.

हूती बंडखोरांमुळे मालवाहतुकीच्या खर्चात वाढ

ट्रम्प म्हणाले की, हे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. आमचे ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही घातक शक्तीचा वापर करू.

हूती बंडखोरांनी म्हटलं की, ते गाझामधील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ काम करत आहेत.

त्यांनी अनेकदा खोटे दावे केले आहेत की, ते फक्त इस्रायल, अमेरिका किंवा ब्रिटनच्या जहाजांना लक्ष्य करत आहेत.

गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून रेड सी आणि एडनच्या आखातात व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्यासाठी पाश्चात्य युद्धनौका तैनात करून किंवा हूथीच्या लष्करी तळांवर अमेरिका आणि ब्रिटिशांनी असंख्य हवाई हल्ले करूनही हूती विचलित झालेले नाहीत.

हूती बंडखोरांनी म्हटलं की, ते पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हूती बंडखोरांनी म्हटलं की, ते पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ काम करत आहेत.

जुलैपासून इस्रायलने हूती बंडखोरांवर हवाई हल्लेही केले आहेत. येमेनमधून इस्रायलवर झालेल्या 400 क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा बदला म्हणून हे हल्ले करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला. त्यापैकी बहुतेक हल्ले हाणून पाडण्यात आले.

नोव्हेंबर 2023 पासून झालेल्या हल्ल्यांमुळे रेड सीचा वापर करणारी जहाजे युरोप आणि आशिया दरम्यानच्या सुएझ कालव्याचा वापर करण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेकडे जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे त्यांचा खर्च वाढत आहे आणि जागतिक आर्थिक संकटाची शंका निर्माण होत आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन ध्वज असलेले जहाज सुएझ कालव्यातून सुरक्षितपणे गेल्याला एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे.

गेल्या चार महिन्यांत पूर्व आफ्रिका आणि अरबी द्वीपकल्पातील जलक्षेत्रातून एकही अमेरिकन युद्धनौका गेलेली नाही, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

सुएझ कालवा हा आशिया आणि युरोपमधील सर्वात जलद सागरी मार्ग आहे आणि तेल व द्रव नैसर्गिक वायूच्या (एलएनजी) वाहतुकीसाठी विशेष महत्त्वाचा आहे.

'हूती बंडखोरांचा 'विनाश' होईल'

हूतींना थेट संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, जर ते थांबले नाही तर 'त्यांचा विनाश होईल जो त्यांनी यापूर्वी कधीही पाहिला नसेल."

दुसरीकडे हूतींनी त्यांची भूमिका बदलली नाही. या हल्ल्यामुळे पॅलेस्टिनींना असलेला हूतींचा पाठिंबा कमी होणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

हूती म्हणाले, "या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल. येमेनमधील आमचे सशस्त्र दल या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत."

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, हूतींना 'आर्थिक मदत' करणाऱ्या इराणला 'इशारा' देण्यात आला आहे.

एका वर्षापेक्षा जास्त काळ, मोठ्या शिपिंग कंपन्यांना रेडी सीचा वापर थांबवावा लागला आहे. जागतिक सागरी व्यापारापैकी 15 टक्के व्यापार या मार्गाने होतो. त्याऐवजी त्यांना दक्षिण आफ्रिकेभोवतीचा लांब मार्ग वापरावा लागला.

हूतींना थेट संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, जर ते थांबले नाही तर 'त्यांचा विनाश होईल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हूतींना थेट संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, जर ते थांबले नाही तर 'त्यांचा विनाश होईल

अमेरिकन काँग्रेसच्या मते, नोव्हेंबर 2023 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान हूती बंडखोरांनी रेड सीमध्ये 190 हल्ले केले.

यापूर्वी, ब्रिटन आणि अमेरिकेने हूती बंडखोरांविरुद्ध संयुक्त नौदल आणि हवाई हल्ले केले होते. इस्रायलने वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये हूती बंडखोरांच्या ठिकाणांवरही हल्ला केला आहे.

ट्रम्प यांनी इराणला हूती बंडखोरांना पाठिंबा देणे थांबवण्याचे आवाहन केले आणि इशारा दिला की, अमेरिका यासाठी "इराणला पूर्णपणे जबाबदार धरेल" आणि "त्यांच्याशी चांगले वागणार नाही."

त्यांनी जो बायडेन यांच्या नेतृत्वाखालील मागील अमेरिकन प्रशासनावर 'कमकुवत' असल्याचा आणि 'अनियंत्रित हूती बंडखोरांना' टिकून राहण्याची परवानगी दिल्याचा आरोपही केला.

हूती कोण आहेत आणि त्यांचा उद्देश काय?

हूती हा येमेनच्या अल्पसंख्याक शिया 'झैदी' समुदायाचा एक शस्त्रधारी समूह आहे.

त्यांचं नाव त्यांच्या मोहिमेचे संस्थापक हुसैन अल हूती यांच्या नावावरून पडलं. ते स्वतःला 'अन्सार अल्लाह' म्हणजे ईश्वराचे सोबती असंही म्हणतात.

या समुदायानं 1990 च्या दशकात येमेनचे तत्कालीन राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या तथाकथित भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी या गटाची स्थापना केली होती.

हुती बंडखोरांनी नोव्हेंबर महिन्यात एका जहाजाचं अपहरण केलं होतं.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हुती बंडखोरांनी नोव्हेंबर महिन्यात एका जहाजाचं अपहरण केलं होतं.

2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वात इराकवर झालेल्या हल्ल्यात हुती बंडखोरांनी घोषणा दिली होती. "ईश्वर महान आहे. अमेरिका नष्ट व्हावी, इस्रायल नष्ट व्हावे. ज्यूंचा विनाश व्हावा, इस्लामचा विजय असो," अशी ती घोषणा होती.

हूती स्वतःला हमास आणि हिजबुल्लाहच्या साथीनं इस्रायल, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या विरोधात इराणच्या नेतृत्वातील विरोधी अक्ष गटाचा भाग मानतात.

युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे तज्ज्ञ हिशाम अल-ओमेसी म्हणाले की, हूती आखातातून इस्रायलकडे जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य का करत आहे, याचा अंदाज यावरून लावता येऊ शकतो.

"आपण आता वसाहतवाद्यांशी आणि इस्लामिक राज्याच्या शत्रूंशी लढत आहोत, हा विचार त्यांच्या विचारधारेशी मेळ खाणाराही आहे," असं ते म्हणाले.

हूतींनी येमेनच्या मोठ्या भागावर ताबा कसा मिळवला?

येमेनमध्ये 2014 च्या सुरुवातीला हूती हे राष्ट्रपती पदावरील अली अब्दुल्लाह सालेह यांचे उत्तराधिकारी बनलेले अब्दरब्बुह मन्सूर हादी यांच्या विरोधात उभे राहिले. पुढे ते राजकीयदृष्ट्या बलशाली बनले.

त्यांनी त्यांचे आधीचे शत्रू असलेले सालेह यांच्याबरोबर एक करार केला आणि त्यांना पुन्हा सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला.

येमेनच्या उत्तरेत हुतींना सादा प्रांतावर ताबा मिळवण्यात यश आलं. नंतर 2015 च्या सुरुवातीला त्यांनी राजधानी सनावर ताबा मिळवला. त्यातच राष्ट्रपती हादी येमेन सोडून विदेशात पळून गेले.

येमेनच्या उत्तरेत हुतींना सादा प्रांतावर ताबा मिळवण्यात यश आलं.

फोटो स्रोत, Reuters

येमेनचा शेजारी देश सौदी अरबनं लष्करी हस्तक्षेप केला आणि हूती बंडखोरांना हटवून पुन्हा हादी यांना सत्तेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना युएई आणि बहरीनचीही साथ मिळाली.

हूती बंडखोरांनी या हल्ल्यांचा सामना केला आणि येमेनच्या मोठ्या भागावर ताबा कायम ठेवला.

त्यांनी 2017 मध्ये अली अब्दुल्लाह सालेहची हत्या केली. त्यावेळी सालेहनं सौदीला साथ देण्याचा प्रयत्न केला होता.

या बंडखोरांची मदत कोण करतं?

हूती बंडखोर लेबनानच्या सशस्त्र शिया समूह हिजबुल्लाहच्या मॉडेलकडून प्रेरणा घेतात.

अमेरिकेतील रिसर्च इन्स्टिट्यूट 'कॉम्बॅटिंग टेररिझम सेंटर' नुसार हिजबुल्लाहद्वारेच त्यांना 2014 पासून मोठ्या प्रमाणावर लष्करी मदत आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.

हूती हे इराण त्यांचे सहकारी असल्याचा दावाही करतात, कारण दोघांचा शत्रू एकच म्हणजे सौदी अरेबिया आहे.

इराण हुती बंडखोरांना शस्त्र देत असल्याची शंकाही व्यक्त केली जाते.

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या मते, इराणनं हूती बंडखोरांना बॅलेस्टिक मिसाइल पुरवली होती. त्याचा वापर 2017 मध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियादवर हल्ल्यासाठी करण्यात आला होता. ती क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आली होती.

सौदी अरेबियानं इराणवर हूती बंडखोरांना क्रूझ मिसाईल आणि ड्रोन दिल्याचा आरोपही केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सौदी अरेबियानं इराणवर हूती बंडखोरांना क्रूझ मिसाईल आणि ड्रोन दिल्याचा आरोपही केला आहे. 2019 मध्ये सौदी अरेबियाच्या तेल कारखान्यांवर हल्ल्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला होता.

हूती बंडखोरांनी सौदी अरेबियावर कमी पल्ल्याची हजारो क्षेपणास्त्रही डागली आहेत. तसंच त्यांनी यूएईलाही लक्ष्य केलं आहे.

अशा प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा करण्याचा अर्थ म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी लावलेल्या शस्त्रांवरील निर्बंधांचं उल्लंघन करणं. पण इराणनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

येमेनच्या किती भागावर हूतींचा ताबा?

एप्रिल 2022 मध्ये अब्दरब्बुह मन्सूर हादी यांनी प्रेसिडेन्शियल लीडरशिप काऊन्सिलला त्यांचे सर्व अधिकार बहाल केले होते. हे काऊन्सिल सौदी अरेबियाची राजधानी रियादमधून काम करते. त्यालाच येमेनचं अधिकृत सरकार समजलं जातं.

पण येमेनची बहुतांश लोकसंख्या हूती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे. त्यांची संघटना देशाच्या उत्तर भागातून कर वसुली करते आणि त्यांचं चलनही छापते.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं हूती आंदोलनाचे अभ्यासक अहमद अल-बाहरी यांच्या हवाल्यानं म्हटलं होतं की, 2010 पर्यंत हूती बंडखोरांसोबत 1,00,000 ते 1,20,000 एवढे समर्थक होते. त्यात शस्त्रधारी सदस्य आणि बिगर शस्त्रधारी समर्थकांचा समावेश होता.

येमेनची बहुतांश लोकसंख्या हूती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे.

फोटो स्रोत, Reuters

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार हूती बंडखोरांनी लहान मुलांचीही भरती केली होती. त्यांच्यापैकी 1500 जणांचा 2020 मध्ये झालेल्या युद्धात मृत्यू झाला आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणखी शेकडो मुलं मारली गेली होती, असंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

हुतींचा तांबड्या समुद्र किनारच्या मोठ्या भागावर ताबा आहे. तिथूनच ते जहाजांवर हल्ले करत आहेत.

युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीसचे एक तज्ज्ञ हिशाम अल-ओमेसी म्हणाले की, या हल्ल्यांमुळं त्यांना सौदी अरेबियासोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत त्यांची बाजू मजबूत करण्यासाठी मदत मिळाली आहे.

"ते बाब अल-मंदब म्हणजे लाल समुद्रातील अरुंद सागरी मार्ग बंद करू शकतात हे दाखवून त्यांनी सौदी अरेबियावर सवलती देण्यासाठी दबाव वाढवला आहे," असंही ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)