आयुष्मान भारत योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज कसा करावा? महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेणुका कल्पना
- Role, बीबीसी मराठीसाठी
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून 'प्रधान मंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य' ही विमा योजना राबवली जाते.
2018 पासून सुरू असणाऱ्या या योजनेमध्ये पात्र कुटुंबातल्या व्यक्तींसाठी मिळून 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात.
या योजनेत फक्त द्वितीय आणि तृतीय स्तरावरच्या आरोग्य केंद्रांवरच्याच सेवा येतात. द्वितीय स्तरात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेलं सामुदायिक आरोग्य केंद्र यांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या सेवा येतात; तर तृतीय स्तरावरच्या आरोग्य केंद्रांमध्ये पुण्यातल्या ससूनसारख्या रुग्णालयातून तज्ज्ञांकडच्या, विशेष आरोग्य सेवा घेता येतात. अशा संपूर्ण भारतातली जवळपास 30,000 रुग्णालयात ही योजना चालते.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ फक्त 2011 च्या सामाजिक, आर्थिक आणि जातिगणनेत म्हणजे SECC यादीत नाव असणाऱ्या कुटुंबांनाच घेता येत होता. कुटुंबातल्या सगळ्या वयातल्या सगळ्या सदस्यांसाठी मिळून ही 5 लाख रूपयांची मर्यादा होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर मागच्या वर्षी या योजनेत आधीच असलेल्या कुटुंबातल्या 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी वेगळा 5 लाखांचा 'टॉप-अप' म्हणजे जास्तीचं कव्हरेज सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे ते इतर कुटुबीयांसोबत शेअर होत नाही.
या योजनेचं आणखी विस्तारीकरण मंगळवारी 29 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. त्यामुळे आता ही योजना 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या देशातल्या सरसकट सगळ्या नागरिकांसाठी लागू झाली आहे.
त्यासाठी उत्पन्नाची किंवा इतर कोणतीही अट नाहीय. पण एका कुटुंबात 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली दोन किंवा जास्त माणसं किंवा पती-पत्नी असतील तर दोघांत मिळून 5 लाखांचे उपचार मोफत मिळतील.
त्यामुळे 70 पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची या योजनेत कशी नोंदणी करायची, हे आता आपण समजून घेऊ.
कार्डसाठी कसा कराल अर्ज?
योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर द्वितीय आणि तृतीय दर्जाच्या सेवा देणाऱ्या कोणत्याही रुग्णालयात जाऊन तुम्हाला 'आयुष्मान वय वंदना कार्ड' दाखवावं लागेल.
त्यानंतर लगेचच तुमचे सगळे उपचार, औषधं, चाचण्या, हॉस्पिटलचं बिल, सर्जरी याचा खर्च आपोआप केला जाईल. इतर कोणत्याही कार्डची, डॉक्युमेंट्सची गरज तुम्हाला पडणार नाही.
त्यामुळेच या योजनेचा फायदा घेण्यासाठी हे कार्ड आवश्यक ठरतं. त्यासाठी अर्ज करावा लागेल. हा अर्ज वेबसाईट आणि मोबाईल ॲप अशा दोन माध्यमातून करता येतो.


वेबसाईटवरून अर्ज करण्यासाठी अशी आहे प्रक्रिया
1. योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी pmjay.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. तिथं होमपेजवर म्हणजेच पहिल्या पानावर वरती टूलबारवर ‘PMJAY for 70+’ हा ऑप्शन दिसेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
2. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘Enrol for PMJAY 70+’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
3. इथून आपल्याला दुसऱ्या टॅबवर किंवा पानावर नेलं जातं. तिथं ‘Beneficiary’ ला सिलेक्ट करून आवश्यक ती माहिती टाकावी लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
4. त्यात पहिल्यांदा कॅप्चा म्हणजे चौकटीत दिलेले आकडे आणि अक्षरं जशी आहेत तशी लिहावी लागतील.
त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ‘verify’ वर क्लिक केल्यावर ओटीपी येईल. ओटीपी टाकला की पुन्हा कॅप्चा टाकावा लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
5. या पेजवर दोन वयस्कर माणसं असलेलं आयुषमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचं एक मोठं बॅनर दिसेल. त्या बॅनरच्या ‘Click here to enroll’ या ऑप्शनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
6. त्यापुढील पानावर आधार कार्डचा नंबर आणि कॅप्चा टाकावा लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
7. सामाजिक, आर्थिक आणि जातिगणनेनुसार पात्र असणाऱ्या, आधी नोंदणी केलेल्या कुटुंबांची माहिती इथं येते. पण अर्ज करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची आधीपासून नोंद नसेल तर ‘No records found linked to your Aadhar Number. Please Click here for fresh enrollment’ असा मजकूर दिसतो. या आधार कार्ड नंबरसोबत कोणतीही नोंद सापडली नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे नवीन नोंदणी करण्यासाठी आपल्याला निळ्या अक्षरात लिहिलेला ‘Click here’ हा पर्याय निवडायचा आहे.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
8. आता इथं आधार कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर ओटीपी मागवून आपण e-kyc पडताळणीची प्रक्रिया सुरू करू शकतो.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
9. ‘Verify’ वर क्लिक केल्यानंतर हिंदी आणि इंग्रजी भाषेतून एक consent form अर्थात सहमती दर्शवण्यासंदर्भातील मजकूर येतो. तो वाचून खाली दिलेल्या बॉक्सवर टीक केलं की ओटीपी येतो. आधार कार्डशी फोन जोडलेला नसेल तर ही पायरी पूर्ण होणार नाही.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
10. महत्त्वाचं असं की या पायरीवर दोन ओटीपी येतात. एक आधार कार्डशी जोडलेल्या फोन नंबरवर; तर दुसरा, मगाशी सगळ्यात पहिल्या पेजवर टाकलेल्या फोन नंबरवर. दोन्ही नंबर एकच असतील तर एकाच मोबाईलवर दोन ओटीपी येतील. ते व्यवस्थित पाहून त्या-त्या जागी टाकावे लागतील.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
11. यानंतर स्क्रिनवर एक मजकूर दिसेल. तुम्ही या 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असल्याने या योजनेसाठी पात्र आहात असं त्यात लिहिलेलं असेल. शिवाय, सरकारी योजनांची एक यादी तिथे असेल आणि तुम्ही फायदे घेत असलेल्या योजना तुम्हाला निवडायला लागतील.
आयुषमान भारत जन आरोग्य योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्ही आधी घेत असलेल्या योजनेचा फायदा तुम्हाला सोडावा लागेल. कोणत्याही योजनेचा फायदा घेत नसाल तर ‘none of these’ वर क्लिक करून पुढे ‘proceed’ हा ऑप्शन निवडावा लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
12. पुढच्या पेजवर अर्जदाराची आधार कार्डमध्ये असलेली सगळी माहिती दिसू लागेल. तिथेच आधार कार्डच्या फोटो शेजारी ‘capture photo’ नावाचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल. तिथं तुमचा एक फोटो काढून KYC पूर्ण करता येईल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
13. त्यानंतर आयुष्यमान भारत कार्डसोबत नोंद करायचा फोन नंबर तुम्हाला टाकावा लागेल. त्या फोन नंबरवर पुन्हा एक ओटीपी येईल. तो टाकून मोबाईल नंबर ‘verify’ करून घ्यावा लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
14. त्यानंतर अर्जदाराची सगळी माहिती भरायची आहे. शेवटी, तुमच्या कुटुंबातल्या इतर सगळ्या सदस्यांची माहिती विचारली जाईल.
त्यात त्या व्यक्तीचं अर्जदाराशी असलेलं नातं, जन्म तारीख, आधार नंबर अशा गोष्टी असतील. कुुटुंबातल्या सगळ्या 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळून हे एकच कार्ड असेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
15. त्यानंतर ‘Submit’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आयुषमान भारत कार्डासाठीचा फॉर्म जमा झालेला असेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
16. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा https://beneficiary.nha.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ‘beneficiary’ हा पर्याय निवडावा. तिथे पुन्हा आधी सांगितल्याप्रमाणे कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाकून पुढच्या पेजवर जाता येईल.
आता या पानावर आधार कार्डचा नंबर टाकल्यावर 'आयुष्मान भारत वय वंदना कार्ड' तुम्हाला डाऊनलोड करून घेता येईल. अर्ज भरल्यानंतर साधारण 15 ते 30 मिनिटांमध्ये हे कार्ड उपलब्ध होईल.
मोबाईल ॲपवरून असा करु शकता अर्ज
1. प्लेस्टोअरवरून आयुष्मान ॲप डाऊनलोड करून घ्यावं लागेल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
2. डाऊनलोड झाल्यावर ॲप उघडा. त्यानंतर NHA Data Privacy Policy असं स्क्रिनवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसेल. Accept वर क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवर जाता येईल.

फोटो स्रोत, Youtube/ AyushmanNHA
3. आता स्क्रिनच्या सगळ्यात खाली भाषा निवडण्याची सुविधा आहे. त्यानंतर शेजारचा ‘LOGIN’ हा पर्याय निवडावा लागेल.
4. इथून पुढची प्रक्रिया वेबसाईटप्रमाणेच आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











