'मी आधी जमिनीवर बसून योगासनं करायचे, आता खुर्चीवर करते', 105 वर्षांच्या आजीची गोष्ट

"मी आधी जमिनीवर योगासनं करायचे. योगा मी आजही करते फक्त फरक एवढा आहे की, आता मी खुर्चीवर बसून योगासनं करते," डेझी टेलर नावाच्या आजीबाई त्यांच्या 105 वा वाढदिवस साजरा करताना हे सांगत होत्या.

डेझी टेलर या मूळ पूर्व लंडनच्या स्टार्टफोर्ड भागातील आहेत. वयाची शंभरी ओलांडूनही त्या कायम उत्साहात असतात. अशाच उत्साहात त्यांनी जीवन जगलं आहे.

एवढं दीर्घ आणि आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र म्हणजे योगासनं, रोज स्ट्रेचिंग करणं आणि अगदी लहान लगान गोष्टींबाबत देवाचे आभार माननं हा असल्याचं डेझी सांगतात.

योगासनांमुळं त्यांचा मेंदूही आणखी तल्लख झाला असून त्या वाढत्या वयामध्ये त्या अधिक बुद्धिमान बनल्या असल्याचंही टेलर सांगतात.

डेझी टेलर सध्या इसेक्समधील केम्सफोर्ड याठिकाणच्या एका केअर होममध्ये राहतात. कायम पुढं चालत राहण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. कारण त्यातून त्यांना जीवनाचा मनमुराद आनंद लुटण्याची प्रेरणा मिळते.

त्या गेल्या दोन वर्षांपासून योगा करत आहेत. अर्धचंद्रासन केल्यानं त्यांच्या शरीराचं चांगलं स्ट्रेचिंग होतं, असं त्या सांगतात.

"मी जमिनीवरही योगासनं करू शकते. पण कोणीतरी लक्ष ठेवण्यासाठी असायला हवं. कारण गरज पडल्यास मला उठण्यासाठी मदत लागू शकते," असं त्या म्हणाल्या.

दीर्घायुष्याची जणू परंपराच त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत. त्यांची बहीण अॅलिस या 103 वर्षांच्या आहेत. तर त्यांची सर्व पाच भावंडं नव्वदी पूर्ण करून त्यांचं जीवन जगले.

डेझी म्हणतात की, "माझं गुपित म्हणजे, तुम्ही जेव्हा रोज उठता तेव्हा जीवनाचा आनंद घ्यायला शिका.

"मी माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांनाही व्यायाम करायला सांगते. पण ते हे करत नाहीत.

"मी सांगेल की ताठ उभं राहा, खांदे गोल फिरवा पण सुरुवातीला थोडं आरामात करा."

डेझी टेलर यांचा जन्म पूर्व लंडनमध्ये लिटोनस्टोनमध्ये नोव्हेंबर 1919 मध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी शाळा सोडली होती.

त्यांनी कामाला सुरुवात केली ती मशिनरीपासून. सुरुवातीला त्यांनी साबणाच्या फॅक्टरीमध्ये काम केलं आणि नंतर एका बेकरीत आणि पुढं काही कॅफेची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

वयाच्या 19 व्या वर्षी त्या त्यांचे पती रे यांच्याशी एका इलेक्ट्रिक लाईट कंपनीच्या कार्यक्रमात भेटल्या.

या दाम्पत्याला पॅट, जॉन आणि जीन अशी तीन मुलं आहेत. तर 10 नातू आणि 25 पणतू असं मोठं कुटुंब आहे.

टेलर या अत्यंत आनंदाने जीवन जगत असल्याचं सांगतात.

"मी नक्कीच जीवनाचा आनंद घेते कारण या घडीला मी अत्यंत आनंदी जीवन जगत आहे," असं त्या म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.