गुजरातमध्ये फटाक्यांच्या गोदामात स्फोट, 21 कामगारांचा मृत्यू; आतापर्यंत काय काय घडलं?

- Author, तेजस वैद्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गुजरातमधील बनासकांठा इथल्या धुवा किरी गावात फटाक्यांच्या गोदाम वजा कारखान्यात मंगळवारी (1 एप्रिल) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला.
या स्फोटात 21 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 4 महिला आणि 3 लहान मुलांचाही समावेश आहे.
पण, हा स्फोट कसा झाला? तिथे काय परिस्थिती आहे? हे बघण्यासाठी बीबीसीची टीम ग्राऊंडवर पोहोचली.
धुवा किरी हे गाव डीसा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. याच गावाच्या शेजारी असलेल्या फटाक्याच्या गोदामवजा कारखान्यात स्फोट झाला. गोदामाच्या शेजारी कामगारांच्या झोपड्या होत्या. इथंच मजुरांचे कुटुंब राहत होते.
हा स्फोट इतका भयंकर होता की, परिसरात असलेल्या एका रिक्षाचेही दोन तुकडे झाले. तसेच याच रिक्षात मागे बसलेल्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला.
स्फोटामुळे कारखान्याच्या लोखंडी शटरला मोठे भगदाड पडले असून कारखान्यासमोरील कार्यालयाची काच देखील फुटलेली दिसली. तसेच, इथं टेबल आणि खुर्च्याही छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेल्या होत्या.


पाणी प्यायला गेला आणि जीव वाचला
याठिकाणी सकाळी 10 वाजता सुरू झालेलं बचावकार्य रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होते. इथेच उपस्थित असलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याने बीबीसीला सांगितले की, "मी चार मृतदेह बाहेर काढले. त्यांना स्ट्रेचरवरून नेण्यात आलं. त्या मुलाचा मृतदेह पाहून हृदय पिळवटून गेलं."
या स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना डीसा आणि पालनपूर इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. याच स्फोटात जखमी झालेला मध्य प्रदेशातला राजेश नावाचा तरुण उपचार घेत होता. त्याच्या शेजारी एक छोटी मुलगी देखील होती. ती सुद्धा या स्फोटात जखमी झाली होती.

राजेश सांगतात, "या स्फोटात माझ्या भावाचाही मृत्यू झाला. मी रविवारी कामावर आलो होतो. फटाका फॅक्टरीत काम करत होतो. आम्ही सगळे मजूर मध्य प्रदेशातले असून काही हरदा तर काही देवास जिल्ह्यातले होते."
राजेश स्फोट झाला, तिथेच काम करत होते. पण, ते पाणी पिण्यासाठी बाहेर गेले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.
बीबीसी गुजरातीचे सहकारी पत्रकार परेश पढियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदाममालक खुबचंद मोहनानी आणि दीपक खूबचंद दोघेही कोणत्याही प्राधिकरणाची परवानगी न घेता गोदामाच्या नावाखाली फटाके तयार करत होते.
स्फोटानं मजुरांच्या शरीराचे तुकडे 200 फुटांवर उडाले
होळीच्या सणानंतर मध्य प्रदेशातून जवळपास 25 कामगार कारखान्यात आले आणि त्यांनी फटाके बनवण्याचं काम सुरू केलं, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
जिल्हाधिकारी मीहिर पटेल बीबीसी गुजरातीसोबत बोलताना म्हणाले, स्फोट झाला ती जागा औद्योगिक वसाहत होती. ज्या कारखान्यात स्फोट झाला तिथं कामगार देखील राहत होते. यामध्ये मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेक मध्य प्रदेशातील होते.

मध्य प्रदेशातील एक पथक डीसा इथं पोहोचलं असून त्यांच्या उपस्थितीत मृतदेहांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर 10 मृतेदह देवास इथं रवाना करण्यात आले, तर 8 मृतदेह हे हदर जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहे.
या कामागारांसोबत ठेकेदार पंकजही देवास येथून गुजरातला आला होता. पण, अद्यापही तो सापडलेला नाही.

बीबीसी गुजरातीचे सहकारी पत्रकार परेश पाधियार यांच्या मते स्फोट इतका भयानक होता की मजुरांच्या शरीराचे तुकडे 200 फुटावर असलेल्या शेतात उडाले. गोदामाचे छत आणि कारखान्याची भींतही कोसळली. छताचे तुकडे देखील 300 मीटर अंतरापर्यंत पडलेले होते.
गोदामाच्या छताखाली मजूर अडकले होते आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू होतं.
यावेळी शेजारच्या गावातल्या लोकांनी देखील इथं गर्दी केली होती. पोलीस ही गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत होते.

या स्फोटात 21 लोकांचा मृत्यू झाला. सोबतच 6 कामगार जखमी झाले असून त्यांना डीसा, पालनपूर आणि अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बनासकांठा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अक्षय राज मकवाना म्हणाले, "छत कोसळल्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करत आहोत. आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल."
बीबीसी प्रतिनिधी परेश पढियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारखान्याच्या मालकाचे भाऊ जगदीश सिंधी आणि दीपक खुबचंद यांना अटक केली आहे. अद्यापही एक आरोपी खुबचंद मोहनानी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केलं दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर केली आहे. बनासकांठा इथल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटातील जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे.
ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे त्यांच्याबद्दल संवेदना, तसेच जखमींनी लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत असल्याचं मोदी म्हणाले.
तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली.

गुजरात सरकारनं देखील या दुर्घटनेतील पीडितांसाठी मदत जाहीर केली आहे. सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे.
तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारनं पाच सदस्यीय एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
या गोदामात नक्की काय काम सुरू होतं?
दुर्घटना झालेल्या गोदामात फटाके बनवण्याचं काम सुरू होतं, अशी माहिती मिळाली आहे.
याबद्दल जिल्हाधिकारी म्हणाले की प्राथमिक माहितीनुसार स्फोट झाला तिथं फटाके बनवण्याचं काम सुरू होतं. पण, या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

बीबीसी प्रतिनिधी परेश पढियार यांच्यानुसार, खूबचंद रेलुमल मोहनानी यांची दीपक ट्रेडर्स ही कंपनी फटाके बनवत होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
पण, गोदामात कुठलेही फटाके ठेवलेले नव्हते असं बनासकांठा पोलीस अधीक्षक राज मकवाना यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Paresh Padhiyar
बीबीसी गुजरातीसोबत बोलताना ते म्हणाले, "प्राथमिक तपासानुसार याठिकाणी फटाके बनवत असल्याचं आढळून आलं नाही. आमच्या एफएसएल टीमला फटाके बनत असल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही."
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी पुन्हा माध्यमांना माहिती दिली की, या गोदामात फटाके ठेवले जात होते. त्यासाठी 2021 मध्ये परवाना देण्यात आला होता. पण, डिसेंबर 2024 मध्ये त्यांना परवाना संपला. त्यामुळे त्याच्या नुतनीकरणासाठी मालकानं अर्जही केला होता.
ते पुढे म्हणतात, 15 मार्चच्या सुमारास पोलिसांनी या गोदामाला भेट दिली होती. त्यावेळी व्हीडिओही काढले होते. पण, तेव्हा फटक्यांचा साठा दिसला नव्हता. गेल्या 15 दिवसांत हा बेकायदेशीर साठा ठेवला असावा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











