बीअरच्या पुरामुळे जेव्हा लंडनमध्ये लोकांचे जीव गेले होते

    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि संशोधक

तेव्हाच्या काळात दारूच्या टाकीला लावलेली लोखंडी रिंग तुटणं आणि ती पुन्हा दुरुस्त करणं ही अगदी सर्वसामान्य बाब होती. 17 ऑक्टोबर 1814 च्या दुपारी लंडनमध्ये 'हॉर्सशू ब्रुअरी'च्या ओव्हरसियरनं एका टाकीची रिंग तुटत असलेलं पाहिलं. त्यांनी लगेचच दुरुस्तीसाठी एक पत्र लिहिलं.

1764 मध्ये सुरू झालेल्या या दारुच्या भट्टीमध्ये फक्त 'पोर्टर' ही डार्क बीअर तयार केली जात होती. या पेयाच्या लोकप्रियतेमुळं ब्रिटनच्या दोन सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या हेन्री मेयो अँड कंपनीच्या मालकीतील दारुच्या भट्टीमध्ये दरवर्षी एक लाख बॅरलपेक्षा अधिक पोर्टरचं उत्पादन होत होतं.

पत्रकार क्रिस्टोफर क्लेन लिहितात की, पोर्टर यीस्ट हे दारुच्या भट्टीच्या गोदामात 22 फुटी उंच लाकडी टँकमध्ये तयार केलं जायचं.

'त्यांच्या आजुबाजुला लोखंडाच्या अनेक सळया असायच्या. काहींचं वजन एक टनापर्यंत होतं. एका पूर्णपणे भरलेल्या टाकीमध्ये जवळपास 3555 बॅरल (पाच लाख लीटरपेक्षा जास्त) बीअर होती.'

रिंगच्या दुरुस्तीचा संदेश केअरटेकरच्या हातात पोहोचलाच होता, त्याचवेळी सायंकाळी 5.30 वाजता स्टोअरच्या दिशेनं जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला होता. तो लगेचच आवाजाकडं धावला.

पत्रकार मार्टिन कॉर्नेल यांनी लिहिलं की, ज्या टँकची दुरुस्ती करायची होती ती फुटलेली पाहून तो प्रचंड घाबरला होता. या दुर्घटनेमुळं दारुच्या भट्टीची 25 फूट उंचीची भिंत आणि छताचा बहुतांश भाग वाहून गेला होता.

त्याशिवाय गोदामाची देखरेख करणारे कर्मचारी आणि त्यांचा भाऊ इतर अनेक कर्मचाऱ्यांबरोबर ढिगाऱ्याखालू बेशुद्धावस्थेत पडले होते.

वीटा आणि ढिगाऱ्यांचा असा पूर आला होता की न्यू स्ट्रीटमध्ये दोन घरं वाहून गेली आणि दारुच्या भट्टीमधून जणू 15 फूट उंचीची भरतीची लाट आली होती. कारण अंदाजे 14 लाख लीटर बीअर वाहून गेली होती.

हा बीअरचा पूर फॅक्टरीच्या मागच्या बाजुला असलेल्या सेंट जाइल्स रूकरीच्या दिशेनं जात होता.

त्यावेळी 17 व्या शतकात सेंट जाइल्स हे श्रीमंत कुटुंब पश्चिम लंडनच्या ब्रेनब्रिज येथे स्थायिक झालं होतं.

नफ्याच्या लालसेपोटी त्यांनी त्याठिकाणी घाई-घाईत पण निकृष्ट बांधकामं केली. त्याचा परिणाम म्हणजे त्याठिकाणी अंधाऱ्या आणि अरुंद गल्ल्या तयार झाल्या. 18 व्या शतकापर्यंत दाट लोकवस्ती असलेला हा भाग, लंडनमधील गुन्हेगारीचा अड्डा असलेली झोपडपट्टीची वस्ती बनली.

'याठिकाणच्या घरांमध्ये एवढे जास्त लोक राहायचे की गल्ल्या आणि स्वयंपाक घरातही त्यांना राहावं लागत होतं. अनेकदा तर एकाच खोलीत अनेक कुटुंब राहायची.'

जॉन डनकम 'द डेन्स ऑफ लंडन' मध्ये लिहितात की, 19 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जाईल्स हे गुन्हेगारी, वेश्या व्यवसाय आणि इतर वाइट कृत्यांचा अड्डा बनलं होतं.

याठिकाणची घरं कोंबड्यांच्या खुराड्यांसारखी होती. त्याठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक आश्रय घेत होते. अगदी पोलिसही याठिकाणी जाण्याआधी एकदा विचार करायचे.

ती संध्याकाळ जाइल्समधल्या इतर संध्याकाळसारखी नव्हती. लोक त्यांच्या नेहमीच्या कामांमध्ये व्यग्र होते.

याठिकाणची ड्रेनेज व्यवस्था चांगली नसल्यामुळं घाण पसरलेली असल्यानं इथं कायम रोग पसरलेले असायचे.

जेव्हा याठिकाणी दारुचा पूर आला त्यावेळी इथली घरं आणि लोकही त्यात बुडाले होते.

अशा परिस्थितीत बचावासाठीचे प्रयत्न लगेचच सुरू करण्यात आले. त्याठिकाणी कमरेपर्यंत बीअर साचलेली होती. त्यात बुडालेल्यांपैकी जे वाचले त्यांचा लोक शोध घेत होते.

या आपत्तीचा भयावह परिणाम स्पष्टपणे दिसत होता. जखमी आणि या सर्वामध्ये गोंधळलेले लोक रस्त्यांवर उभे होते. आतमध्ये अडकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्या ऐकून ते वेगानं ढिगारा उपसायला जात होते.

19 ऑक्टोबर 1814 ला चौकशीत या दुर्घटनेमुळं झालेल्या नुकसानची माहिती पुढे आली.

सुरुवातीला या दुर्घटनेत मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त असेल असं वाटलं होतं. कारण सेंट जाइल्समधील जवळपास प्रत्येक घराचं तळघर बीअरनं भरलेलं होतं. पण जेव्हा हा पूर ओसरला तेव्हा एकूण आठ लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यापैकी बहुतांश मुलं आणि महिलांचा समावेश होता.

भट्टीतील 31 कर्मचाऱ्यांसह अनेक लोक जखमी झाले होते. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही ब्रुअरीमधील एकाही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नव्हता.

घटना घडली तेव्हा दारुभट्टीमध्ये बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. क्लेन यांच्या मते, भट्टीतील कर्मचाऱ्यांनी तर आलेल्या लोकांकडून पाहण्यासाठी पैसे घ्यायलाही सुरुवात केली होती.

कॉर्नेल म्हणतात की, "अजूनही असा दावा केला जातो की नातेवाईक तेव्हा बघ्यांकडून मृतदेह पाहण्यासाठीही पैसे घेत होते. लोक एवढ्या मोठ्या संख्येनं इमारतीत घुसले होते की, ज्या मजल्यावर मृतदेह ठेवले होते तो मजलाच कोसळला होता. त्यामुळं पाहायला आलेले लोकच बीअरनं भरलेल्या तळघरात पडले होते."

19 व्या शतकामध्ये शववाहिका नक्कीच लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होतं. पण बीअरचा पूर आल्यानंतरची परिस्थिती अशीच होती, याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.

तपासात असंही समोर आलं की, पूर एवढा भीषण होता की, एक टाकी फुटल्यामुळं इतरही डाक्यांवर दाब वाढला होता. त्यामुळे त्याही फुटल्या होत्या. तपासानुसार या दुर्घटनेतील मृत्यूमागं ब्रुअरीचा काहीही दोष नव्हता. तर त्याचमागचं कारण अपघाती आणि आकस्मिक मृत्यू असं होतं.

त्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तसंच घरांचं आणि इतर नुकसान झालेल्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

क्लेन यांच्या मते, कंपनीला झालेला तोटा हा जवळपास 23 हजार पाऊंड( आजचा विचार करता लाखो पाऊंड) एवढा होता. कंपनीला दिवाळखोरीतून वाचवण्यासाठी सरकारनं कंपनीला आगाऊ करामधून 7250 पाऊंड परत केले. आजचा विचार करता ही रक्कम जवळपास 4 लाख पाऊंड एवढी होते.

सरकारनं पीडितांना काहीही मदत केली नाही. मात्र लंडनच्या इतर भागातील लोकांनी मृतांचा अत्यंविधी योग्य व्हावा म्हणून स्वतः गरीब होते तरी शक्य तेवढी मदत केली.

बेन जॉन्सन यांच्या संशोधनानुसार, अशा अफवा पसरल्या होत्या की घटनेनंतर अनेक दिवस लोक रस्त्यावर वाहणारी बीअर पिऊन मद्यधुंद व्हायचे. असंही म्हटलं गेलं की, काही लोकांचा जास्त बीअर प्यायल्यानं मृत्यू झाला होता.

पण मार्टिन कॉर्नेल पूरानंतरच्या या सार्वजनिक नशा करण्याचा प्रकार मान्य करत नाहीत. अशा प्रकारच्या घटनेचा पुरावा असलेल्या वृत्तपत्रातील बातम्या किंवा इतर माहिती नाही.

'या भागामध्ये आयरिश स्थलांतरीत लोक मोठ्या प्रमाणात राहत होते. लंडनमधील लोकांना ते आवडत नसायचे. जर असं काही घडलं असतं तर वृत्तपत्रांनी त्याची वर्णनं करण्याची संधी सोडली असती का?' असंही ते म्हणाले.

पुढं, 19 व्या शतकामध्ये सेंट जाइल्स आणि इतर झोपडपट्ट्या उखडून टाकत न्यू ऑक्सफर्ड स्ट्रीट तयार करण्यात आला. आज हा लंडनमधील एक महागडा भाग आहे. ही ब्रुअरीही आता राहिली नसून, तिथं आता डॉमिनियन थिएटर आहे.

याठिकाणी आणखी एक बदल झाला.

अमेरिकन लेखक टॉम क्लिओन यांच्या मते, 'लंडन बीअर फ्लड' या अपघातानंतर मोठ्या लाकडी टँकचं उत्पादन बंद करण्यात आलं. त्याजागी काँक्रिकेटचे टँक तयार केले जाऊ लागले. त्यामुळं गेल्या 210 वर्षांमध्ये असा मोठा अपघात झाला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)