हिटलर एकाकी आयुष्य जगत होता का? त्याच्या पत्नीने केलेल्या व्हीडिओ चित्रिकरणात काय दिसतं?

फोटो स्रोत, getty images
सर्वसाधारणपणे, ज्या राजा-महाराजांनी, हुकूमशहांनी सामूहिक नरसंहार केला, मानवी शोकांतिका घडवून आणल्या अशांबद्दल इतिहासात अनेक दंतकथा प्रचलित असतात.
त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेणं आपल्याला आवडतं. अशीच एक दंतकथा अॅडॉल्फ हिटलर बाबतीत प्रचलित आहे.
1941-1945 च्या दरम्यान दुसरं महायुद्ध शिगेला पोहोचलं होतं. त्यावेळी 6 लाख ज्यूंना छळछावणीत टाकून त्यांचा नरसंहार करणारा हिटलर आयुष्यात एकटा होता, स्वतःच्या जीवनाबद्दल दुःखी असलेला हिटलर क्वचितच कोणाशी बोलायचा.
पण हिटलरची पत्नी इव्हा ब्राऊनने त्याच्या खाजगी आयुष्याचे चित्रण केलेले व्हीडिओ वेगळीच परिस्थिती समोर आणतात.
या चित्रणात हिटलर त्याची पत्नी, कुटुंब आणि मित्रांसह आनंदाने हसताना दिसतोय.
म्हणजेच हिटलरचं खाजगी आयुष्य वेगळं होतं ते यातून दिसतं.
हिटलरला खरोखर मित्र नव्हते का?
हिटलरची पत्नी इव्हा ब्राऊनने तिच्या खाजगी आयुष्याचे जे व्हीडिओ चित्रित केले होते ते 1970 मध्ये प्रसिद्ध झाले होते. हे व्हीडिओ पाहून लोक हैराण झाले होते.
कारण या फुटेजमध्ये हिटलर एक दयाळू, आनंदी, हसतमुख व्यक्ती दिसतोय.
यातल्या काही फुटेज वरून दिसतंय की, त्याला जवळचे मित्र होते.
जर्मन इतिहासकार हेके गोर्टेमेकर सांगतात की, हिटलर नेहमीच त्याच्या जवळच्या लोकांनी, मित्रमंडळींनी वेढलेला असायचा.
हेके गोर्टेमेकर यांनी हिटलर आणि त्याची पत्नी इव्हा ब्राऊन यांच्या व्यक्तिमत्त्वावर संशोधन करून त्यांची चरित्र लिहिली आहेत.

त्या सांगतात, "त्याच्या जवळचे लोक त्याच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी हिटलरच्या राजकीय विचारसरणीवर विश्वास ठेवला आणि त्याचं समर्थन केलं. शिवाय ते साध्य करण्यासाठी त्याला मदत केली."
पण 1945 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर तो एकटा, मित्र नसलेला दुःखी माणूस अशी प्रतिमा जर्मन लोकांमध्ये पसरल्याचं गोर्टेमेकर सांगतात.
त्या पुढे सांगतात की, "त्याला मित्रहीन, एकाकी पडलेला असं चित्रित करून जर्मन लोकांनी स्वतःला त्याच्यापासून, नाझी विचारसरणीपासून, नाझींनी केलेल्या गुन्ह्यांपासून दूर केलं होतं."
हिटलरची मनस्थिती कशी होती?
इव्हा ब्राऊनच्या खासगी आयुष्यातील व्हीडिओ फुटेज पाहून धक्का बसतो.
हेके गोर्टेमेकर म्हणतात की, "हिटलरला स्वतःबद्दल असुरक्षिततेची भावना होती म्हणून तो इतरांवर अवलंबून होता. तो जे करतोय ते योग्य आहे का? याची खात्री करण्यासाठी त्याला मित्रांची गरज होती."

त्या पुढे सांगतात की, "त्याला अशा मित्रांची गरज होती, जे त्याला नेता म्हणून स्वीकारतील."
स्टेजवर लाखो लोकांसमोर उत्कट भाषण देणारा हिटलर आणि खासगी आयुष्यात आपल्या मित्रांसोबतचा हिटलर यांच्यात खूप फरक होता.
इव्हा ब्राऊनचे व्हीडिओ आणि हिटलरचा माउंटन पॅलेस
हिटलरची पत्नी इव्हा ब्राऊनने 1930 च्या दशकात हिटलरच्या खाजगी जीवनाचे व्हीडिओ फुटेज घेतले होते. हे फुटेज बव्हेरिया मधील आल्प्स पर्वतरांगांमध्ये वसलेल्या बर्घॉफ येथील आहेत.

हिटलरने 1920 च्या दशकाच्या उत्तरार्धात इथे घर विकत घेतल्याचं इतिहासकारांचं मत आहे. हिटलरचं आत्मचरित्र माइन काम्फच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून त्याने हे घर विकत घेतलं होतं.
सुरुवातीला ते आल्प्समधील इतर घरांइतकंच लहान होतं. पण 1930 मध्ये या घराचा विस्तार करून त्याचा राजप्रासाद करण्यात आला. या घराच्या संरक्षणासाठी स्वतंत्र लष्करी छावणी तैनात होती.
अशाप्रकारे, 1930 पासून बर्घॉफला राजधानी बर्लिननंतर मोठं महत्त्व प्राप्त झालं.
हिटलरच्या मित्रांच्या अंतर्गत वर्तुळाचा केंद्रबिंदू
बर्घॉफ मधूनच हिटलरला त्याच्या राज्याचा गाडा हाकायचा होता. या ठिकाणी त्याने अनेक जागतिक नेत्यांचीही भेट घेतली होती.
याच ठिकाणी त्याने ब्रिटनचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन आणि विंडसर कोमागन यांची भेट घेतली. भेटीनंतर, कोमागन यांची पत्नी हिटलरच्या दृढनिश्चयाने प्रभावित झाली होती.
या महत्त्वाच्या पाहुण्यांपैकी कोणीही इव्हा ब्राऊनची भेट घेतली नव्हती. ती हिटलरची प्रेयसी होती आणि शेवटच्या क्षणी त्याने तिच्याशी लग्न केलं त्यामुळे ती कोणत्याही अधिकृत फोटोंमध्ये दिसत नाही.
पण, खरं तर हिटलरच्या घरातील तीच सर्वात महत्त्वाची आणि सर्वात शक्तिशाली व्यक्ती होती.

हेके गोर्टेमेकर सांगतात की, "इव्हा बर्घॉफची राजकुमारी होती. तिथे होणाऱ्या मेजवानीत कोणाला बोलावायचं कोणाला नाही हे ती ठरवायची. प्रत्येकाला तिचं ऐकावं लागायचं, सहन करावं लागायचं. कोणीही तिच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नव्हतं."
जसजशी वर्ष सरत गेली तसतसं इव्हा ब्राऊनचं महत्त्वही वाढत गेलं. बर्घॉफमध्ये ती हिटलरच्या मित्रांच्या अंतर्गत वर्तुळाचा केंद्रबिंदू बनली.
हिटलरचे त्याच्या मित्रांसोबत घालवलेल्या खाजगी क्षणांचे व्हीडिओ पाहून असं दिसतं की अभूतपूर्व मानवी संहार करणाऱ्या हिटलरसारख्या हुकूमशहाचं आयुष्य आनंदी क्षणांनी भरलेलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








