आमदार अपात्रता: राज्यघटनेचं दहावं परिशिष्ट काय आहे? पक्षांतराबद्दल यामध्ये काय म्हटलंय?

फोटो स्रोत, Getty Images
शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने राज्यातील राजकारणात नव्या नाट्याची नांदी होईल का, अशाही चर्चा सुरू झाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून घेऊ आणि तेच मुख्यमंत्रिपदावर राहतील.
पण खरंच असं होऊ शकतं का?
कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी याबाबत म्हटलं की, देवेंद्र फडणवीस हे वकिली शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत. अत्यंत निष्णात संविधानतज्ज्ञ श्रीहरी अणे यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी वकील म्हणून काही काळ काम केले आहे व तरीही ते आज असंवैधनिक गोष्टी करण्यात ते नेहमी पुढाकार घेतांना दिसतात.
हे सांगायला पाहिजे की संविधानाच्या कलम 102/2 व 191/2 मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की जर संविधानाच्या 10 व्या परिशिष्टानुसार जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीतच. शिवाय ते विधानपरिषदेत सुद्धा सदस्य असू शकणार नाहीत.
याच निमित्ताने मुळात घटनेचं दहावं परिशिष्ट काय आहे? आमदारांच्या अपात्रतेबद्दल ते काय सांगतं हे जाणून घेऊया.
काय आहे दहाव्या परिशिष्टात?
1985 साली राज्यघटनेमध्ये 52व्या घटनादुरुस्तीद्वारे दहाव्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला.
दहाव्या परिशिष्टात आमदार किंवा खासदारांना कोणत्याही सभागृहातील इतर सदस्यांच्या याचिकेच्या आधारे पीठासीन अधिकारी (विधानसभा/लोकसभा अध्यक्ष) पक्षांतरबंदीच्या नियमांनुसार अपात्र ठरवू शकतात.
पक्षांतर बंदी कायद्याच्या आधारे सदस्यांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला असतो आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो, असं या परिशिष्टाच्या 6व्या परिच्छेदात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
परिशिष्टाच्या 7 व्या परिच्छेदात म्हटलं होतं की, कोर्ट या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार सभागृहाच्या अध्यक्षांच्या निर्णयावर न्यायालयीन पुनर्विचार होऊ शकत नव्हता.
मात्र, 1992 साली सर्वोच्च न्यायालयाने ही अट रद्दबातल ठरवली आणि त्यामुळेच अध्यक्षांच्या निर्णयाला उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ लागलं.
अर्थात, जोपर्यंत पीठासीन अधिकारी आदेश देत नाही, तोपर्यंत न्यायालय कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही.
एखादा आमदार किंवा खासदार कधी अपात्र ठरतो?
1. जर स्वेच्छेने आपल्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर
2. आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन सभागृहात मतदान केलं किंवा संगितल्या प्रमाणे मतदान केलं नाही तर
3. जर निवडून आल्यानंतर एखादा अपक्ष उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास
4. सभागृहाचा सदस्य बनल्यानंतर सहा महिन्यात एखादा नामनिर्देशित सदस्य एखाद्या पक्षात सामील झाल्यास
या नियमांना अपवाद कोण ठरू शकतं?
जर कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

म्हणजेच जर एकनाथ शिंदेंना भाजपत जायचं असेल आणि आपलं सदस्यत्व रद्द होऊ द्यायचं नसेल तर शिवसेनेच्या दोन तृतीयांश आमदारांचं त्यांना समर्थन हवं आणि त्यांनी शिंदेसोबत नवा गट स्थापन करायला हवा. हा गट भाजपला समर्थन देऊ शकतो. अशा परिस्थितीत नव्या गटातले आणि मुळच्या पक्षातले असे दोन्हीकडचे आमदार अपात्र ठरत नाहीत. पण, शिंदे गटाचं स्वतंत्र अस्तित्व राहू शकत नाही.
पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणेची गरज आहे का?
गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारणात जे पडसाद उमटले त्यापार्श्वभूमीवर अनेक तज्ज्ञांना वाटतं की सध्याच्या पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा व्हायला हवी.
घटनातज्ज्ञ फैजान मुस्तफा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं होतं की, "गेल्या काही वर्षांत गोवा, मणिपूर, झारखंडसारख्या लहान आणि कर्नाटक तसंच मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यांमध्ये जे घडलं ते पाहून असं वाटतं की निवडणुकीला अर्थच राहिला नाहीये."
त्यांच्यामते या कायद्यात बदल होण्याची गरज आहे.
"नवीन तरतुदी आणायला हव्यात, जसं की पक्षांतर करणारा लोकप्रतिनिधी त्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये निवडणूक लढवू शकणार नाही किंवा त्यांनी अविश्वास ठरावात पक्षाच्या विरोधात मत दिलं तर त्यांचं मत ग्राह्य धरलं जाणार नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








