‘पक्षात जी बजबज माजलीये ते बघता मी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला’

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या मनिषा कायंदे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला.
मनिषा कायंदे या शिवसेनेच्या विधान परिषदेतील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्तेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
2012 साली डॉ. कायंदेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेत प्रवेश केला. आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्या एकनाथ शिंदेंच्या गटात गेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, “रिटायरमेंट घेतल्यावर मी पूर्ण वेळ शिवसेनेचे काम करत होते. 2019 साली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र लढल्या. लोकांनी आम्हाला एकत्र कौल दिला. पण त्यानंतर महाविकास आघाडी तयार झाली. महाविकास आघाडी तयार झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनाचं संकट आलं. त्यामुळे विचारधारांचे जे काही संघर्ष होते ते काही त्यावेळी दिसले नाहीत.”
“नंतर कोरोनाच संकट जसं टळू लागलं तसतसं हे सगळं दिसू लागलं. उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांची तब्येतही बरी नसायची. अशात एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं, सुरुवातीला काहीच कळलं नाही. वरवर गद्दारी जरी दिसत असली तरी हा वैचारिक संघर्ष होता. काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी, शिवसेनेची विचारधारा वेगळी होती. महाविकास आघाडी हा एक अनोखा प्रयोग होता पण यात बऱ्याचदा शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागलं बऱ्याचदा आम्हाला साईडलाईन व्हावं लागलं. तरी सभागृहाबाहेर आम्ही आमची बाजू मांडत होतोच.”

त्या पुढे म्हणाल्या, “आता पक्षातली ज्येष्ठ मंडळी बाहेर पडल्यावर मी पक्षप्रमुखांकडे काम करण्यासाठी एक जबाबदारी मागितली. पण रोज उठून जी वक्तव्य होतात, आरोप प्रत्यारोप होतात त्यात मला रस नव्हता. एखादं विधायक कार्य करण्यात आपला उपयोग होत नाहीये असं दिसत होतं. पक्षात जी बजबज माजलीय ते बघता एकनाथ शिंदेंची भेट घेऊन मी हा निर्णय घेतला.”
त्यांच्या मुलाखतीचा हा सारांश
प्रश्न : नेमकं चार महिन्यात असं काय घडलं की तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागला ? यासाठी शिंदे गटाकडून विचारणा करण्यात आली की तुम्ही स्वतःहून हा निर्णय घेतला?
मी पक्ष बदललेला नाही मी शिवसेनेतच आहे. सध्या शिवसेना अधिकृतरीत्या एकनाथ शिंदेंकडे आहे. सरकार चांगलं काम करतंय, आणि सकारात्मक काम करायचं असेल तर शिंदे साहेब काय वाईट आहेत? ते पूर्वीही आमचे नेतेच होते.
मी पक्षप्रमुखांकडे एखादी जबाबदारी मागत होते. पक्षांमध्ये आता नवीन जबाबदाऱ्यांचा काहीतरी वाटप झालं पाहिजे. काहीतरी नवीन करा, पण नेमकं तेच होत नव्हतं. शिवाय महिला आघाडीत अस्वस्थता आहेच, इतर महिला नेत्यांमध्येही हीच अस्वस्थता आहे.
प्रश्न : एकनाथ शिंदे यांची तुमचा संपर्क कसा आणि कधी झाला?
मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्या भेटीगाठी घेत होतो त्यांच्याकडे निवेदन देत होतो तेव्हा संपर्क होतच होता. शिवाय कुठली बळजबरी असण्याचा प्रश्नच नाही. पण नंतर मला हळूहळू पटू लागलं की आपण काहीतरी सकारात्मक काम केलं पाहिजे. दिवसभर माध्यमांमध्ये बडबडत राहणं आणि काहीतरी वाचाळपणा करणं यापेक्षा निदान काहीतरी काम तरी करूया.
प्रश्न : आता तुम्ही एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहात आणि आधी सुद्धा ठाकरे गटाच्या प्रवक्त्या होता, पण नेमक्या कोणत्या संधीसाठी तुम्ही हा निर्णय घेतला?
संघटनात्मक काम. संघटनात्मक कामाला मी जास्त महत्व देते, पक्ष वाढला पाहिजे. पक्ष वाढला तर आपल्या जागा वाढतात, आपली बार्गेनिंग पॉवर वाढते, स्वबळावर लढता येतं. 2014 मध्ये शिवसेना स्वबळावर लढली त्यावेळी आमच्या 63 जागा आल्या. आणि युतीमध्ये जरी लढलात तरी निवडणुकांचे निकाल लागल्यावर तुम्ही युती तोडता मग जनतेत काय मेसेज जातो याचा विचार करायला हवा. तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल?
प्रश्न : हिंदुत्ववादाचा मुद्दा असेल, युती तोडण्याचा मुद्दा असेल या सगळ्याला आज अडीच तीन वर्षे लोटली पण मग तुम्हाला आत्ताच हे सगळं का वाटलं?
पक्षाची स्वतःची एक भूमिका आहे, पक्ष नवीन प्रयोग करतोय त्यामुळे काही बोलता येत नाही. शिवाय हे जास्त दिवस टिकणार नाही असं सुरुवातीपासूनच वाटत होतं. आणि ज्या नेते मंडळींनी बंड केलं ते तर माझ्यापेक्षा सीनियर आहेत यातल्या अर्ध्या जणांनी तर मंत्रिपदं भूषवली आहेत.
त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे आपली कुचंबना होत असल्याची तक्रार देखील केली, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला हरवतच ही नेतेमंडळी वारंवार निवडून आली आहेत. पण कोरोनाच्या संकटामुळे सगळे गप्प होते.

प्रश्न : विधिमंडळात गद्दार म्हणून हिणवणं असेल, पन्नास खोके असा उल्लेख करणं असेल या सगळ्यांमध्ये तुम्हीही होतात तरीही आज तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत की हे सगळं नैतिकतेला धरून आहे का?
आता या सगळ्या घोषणा असतील त्या पक्षाच्या भूमिकेला धरून होत्या. शिवाय भविष्यात हिंदुत्ववादाचे मुद्दे असतील, सावरकरांचे मुद्दे असतील यात बोलताना अडचणी येणारच. आता बाळासाहेबांची भूमिका होतीच ना, 370 कलम हटवा किंवा राम मंदिर बनवा.
प्रश्न : येत्या दोन दिवसात शिंदे गटाला बंड करून वर्ष पूर्ण होईल. शिवाय आज शिवसेनेचे वर्धापन दिन देखील आहे. तुम्हाला काय वाटतं, पक्षप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे पक्षाची पुनर्बांधणी करायला कमी पडतायत का ?
हे सगळे नेते माझ्यापेक्षा वरिष्ठ असल्याने मी याबाबत बोलणं संयुक्तिक ठरणार नाही मात्र एक कम्युनिकेशन गॅप निश्चितच आहे. हा गॅप भरला जात नाहीये किंवा आम्ही ज्यांच्याकडे आमच्या भूमिका मांडतो ते नेते पक्षनेतृत्वापर्यंत आमची खदखद पोहोचवत नाहीयेत. लोक अस्वस्थ आहेत त्यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजेत.
प्रश्न : थेट नेतृत्वाबरोबर संवाद कमी होतो?
हो, अगदीच तुरळक संवाद होतो.
प्रश्न : शिंदे गटातला नेत्यांनी पक्ष सोडताना ही जी तक्रार केली होती ती आजही आहे असं तुम्हाला वाटतं का?
एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांसाठी 24 तास उपलब्ध असतात. मात्र उद्धव ठाकरे अगदीच क्वचित भेटायचे किंवा भेटण्याचा असं काही प्रयोजनच नसायचं.
प्रश्न : आता असाही अर्थ काढला जातोय की महिला आघाडीत तुम्हाला संधी मिळत नव्हती. त्या तुलनेत सुषमा अंधारे नवीन असताना देखील त्यांना संधी दिली जात होती त्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला यात किती तथ्य आहे?
हे बघा संधी आणि लाईमलाईट यात मी गल्लत करत नाहीये. पक्षात नवनवीन लोक येतच राहणार. पण तुमची आणि त्यांची विचारधारा मेळ खाते आहे का? पक्षात येताना ते कोणती विचारधारा घेऊन येत आहेत? पूर्वीची त्यांची वक्तव्य हिंदू संत देव देवतांना गलिच्छ पणे बोलणे आणि आताची वक्तव्य यात तुम्हाला तफावत आढळून येत नाही का?
आता ही त्यांची विचारधारा होती, याला मी दोष देत नाही पण एक शिवसैनिक ही विचारधारा खपवून घेऊ शकतो का? भाजपमधून शिवसेनेमध्ये किंवा शिवसेनेमधून भाजपमध्ये जाणं हा एक कॉमन धागा आहे किंवा कॉमन विचारधारा आहे. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. प्रियंका चतुर्वेदी पण काँग्रेस मधून शिवसेनेत आल्या त्यांनी असं केलं का?
प्रश्न: म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सुषमा अंधारे जी मतं मांडतात ती पक्षाने स्वीकारायला नको?
मला असं वाटू लागलंय पक्षाचा डीएनए कुठेतरी बदलू लागलाय की काय? आणि हे असं पूर्वी नव्हतं.
प्रश्न : दुसरा असा एक अर्थ काढला जातोय की तुमची विधानपरिषदेची टर्म आता संपते आहे त्यामुळे तुम्ही सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय?
काही लोकांचा अभ्यास कमी पडतोय, त्यांनी विधानभवनाची डायरी उघडून पहावं कोणाची टर्म कधी संपते. माझी टर्म संपायला अजून एक वर्ष आहे. आणि एका वर्षानंतर पुढे काय घडेल हे कुणीच सांगू शकत नाही, शिवाय त्या आश्वासनावर मी गेलेले सुद्धा नाही.
पण मला असं जेव्हा वाटू लागलं की पक्षात आता माझी गरज उरलीच नाहीये, तेव्हा इथे रेंगाळण्यात काही अर्थ नाही असं मी समजून घेतलं.

फोटो स्रोत, ANI
प्रश्न : हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला का?
माझ्या कृतीतून ते दिसत होतं. गेल्या चार-पाच महिन्यात याबद्दल मला कोणीही विचारलं नाही. मी तर माध्यमांशीही बोलणं बंद केलं होतं. आता मुख्य प्रवक्ते राऊत साहेब बोलत असतात त्यामुळे ते बोलले की विषय संपतो.
प्रश्न : राऊत म्हणाले की, तुम्ही आल्याही घाईघाईत आणि गेल्याही घाईघाईत?
मी तर कोणतंही पद न घेता, चार वर्ष थांबले होते. एखाद्या पदासाठी मी तगादाही लावला नाही. आणि हे त्यांचं म्हणणं आहे त्यांनी माझ्याशी कधी चर्चा केली का? त्यांनी मला कधी समजून घेतलं का? आताही जेव्हा ते जेलमधून बाहेर आले होते तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आणि कार्यकर्त्यांशी संवाद यालाच तर म्हणतात ना.
प्रश्न : अनेक नेत्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला लवकर आमदारकीची संधी मिळाली?
असं अजिबात नाहीये. मी 2009 मध्ये सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवली होती, त्यावेळी 18 हजार मतं मला कमी मिळाली होती, कारण मनसेची लाट होती. नाहीतर तेव्हाच मी आमदार झाले असते. 1997 मध्ये मी महापालिका लढले तेव्हा अडीचशे मतांनी हरले. प्रत्येक कार्यकर्त्याला पदाची अपेक्षा असतेच पण साडेचार वर्ष मी थांबलेच ना.
प्रश्न : तुम्हाला ठाकरे गटाचे भविष्य काय दिसतं?
मला याबाबत बोलणं योग्य वाटत नाही. आता मी पुढचा मार्ग धरला आहे त्यामुळे मागे वळून बघण्यात काही अर्थ नाही. बऱ्याच लोकांची नाराजी आहे, महिला संघटनेतही नाराजी आहे, बऱ्याच लोकांनी त्यांचा फीडबॅक पक्ष नेतृत्वाकडे दिलाय. आता ते सगळं सोडून मला पुढे काम करायचं आहे.
प्रश्न : शिंदे गटातल्या काही आमदारांनी असा मुद्दा मांडला होता की आमचं म्हणणं पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही देखील तोच मुद्दा मांडलाय. तुम्हाला काय वाटतं आता ही तीच परिस्थिती आहे का?
त्यांनी त्यांचा पक्ष कसा चालवायचा याबद्दल मला काही बोलायचं नाही.
प्रश्न : तुम्ही शिंदे गटाच्या प्रवक्त्या आहात, आता शिवसेनेचे दोन गट पडले असले, अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदेंकडे असली तरी जमिनीवरचा शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरेंसोबत दिसतो याबाबत तुम्हाला काय वाटतं?
हो, परिस्थिती तर तशीच आहे. कारण एक इमोशनल अटॅचमेंट असते बाळासाहेबांचे विचार आणि या सगळ्या गोष्टी. पण शिंदे साहेबांसोबत गेले ते आमदार असतील किंवा स्वतः शिंदे साहेब असतील ते सुद्धा बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ना.
शिंदे साहेबांसोबत पण असंख्य कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्री पद आणि पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे असून देखील ते सलग चोवीस तास काम करतात, थेट जनतेपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करतात.
प्रश्न : भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) कुरबुरी आहेत का?
1995 पासून भाजप शिवसेना युती आहे. या छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहिल्या पण वैचारिक मतभेद तर नव्हते.

फोटो स्रोत, ANI
प्रश्न : मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे, उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना जे मंत्री शिंदेंबरोबर गेले त्यांना मंत्रिपदाची आश्वासन दिली गेली होती. मात्र वर्ष झालं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, वर्षभरानंतर तुमचाही असाच अपेक्षाभंग झाला तर?
शिंदे साहेबांसोबत जाताना मी त्यांच्याकडे कोणतही आश्वासन मागितलं नाही. त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं की तुम्हाला आमच्यासोबत काम करायला आवडेल का? त्यावर मी वेळ घेतला. वर्षभर तर मी आमदार आहेच, मला काम करायचं आहे आणि नशिबात असेल तर पुन्हा एकदा संधी मिळेल.
आणि मला पक्षात काम करायचं होतं आताही मी प्रवक्ते पदी आहे त्यामुळे पुढची चिंता कशाला करायची? त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हे माझे विषय नाहीत. वरिष्ठ नेतेमंडळी त्यासाठी आहेत.
प्रश्न : तुम्ही गेल्या दहा-अकरा वर्षांपासून शिवसेनेत आहात. शिवसेनेचे आज दोन गट पडलेत, तुम्ही आधी ठाकरे गटात होता आज शिंदे गटात आलाय, जनतेचा विश्वास कमी होत चाललाय तुम्ही यावर काय सांगाल?
एक लक्षात घ्या मी शिवसेनेतच होती आणि मी शिवसेनेतच आहे. हिंदुत्वाची विचारधारा तीच आहे. आपण एखादा नेत्याला जेव्हा फॉलो करतो तेव्हा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्या मागे असतो. प्रवक्त्याचं सुद्धा तेच काम असतं नेत्याच्या वतीने बोलायचं. पूर्वी एकनाथ शिंदे आमचेच नेते होते, त्यामुळे पक्षाची जी पूर्वीची म्हणजेच बाळासाहेबांची जी भूमिका होती त्याबद्दलच आताही बोलायचं आहे.
दहा महिन्यांपूर्वी शिंदे गटातल्या नेत्यांनी बाहेर पडताना जे म्हटलं होतं तेच आता मी सुद्धा म्हणणार आहे, पुढेही कोणीतरी म्हणेल. मला असं वाटतं की या गोष्टींविषयी आपण किती जरी बोललं तरी त्याला काही अंत नाहीये.
प्रश्न : पुन्हा दोन गट एकत्र येतील का?
हा माझ्या आवाक्यातला प्रश्न नाहीये. पूर्वी आम्हाला वाटत होतं सगळं नीट होईल. आज दोन शिवसेना झाल्यात त्याबद्दल दुःख आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








