नांदेड : 'आधी बाळ गेलं, मग लेकही गेली, आम्हाला आतबी जाऊ दिलं नाय' – ग्राऊंड रिपोर्ट

- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, नांदेडहून
4 ऑक्टोबरच्या दुपारी 12 वाजता नांदेडच्या सरकारी रुग्णालयाबाहेर एक महिला हंरबडा फोडून रडत होती.
काळीज चिरत जाणारा तिचा आवाज ऐकून बरेच जण आजूबाजूला जमा झाले. लक्ष्मीबाई टोम्पे असं या महिलेचं नाव आहे.
लक्ष्मीबाईंची मुलगी अंजली वाघमारे आणि तिच्या 2 दिवसांच्या नवजात बाळाचा या दवाखान्यात मृत्यू झालाय.
अंजलीला 30 सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. 1 ऑक्टोबरच्या रात्री तिनं मुलीला जन्म दिल्याचं कुटुंबीय सांगतात.
लक्ष्मीबाई सांगतात, “नॉर्मल बाळंतपण होऊन लेकरू बी नॉर्मल जन्मिलं. दोन रोज मला चांगलं बोलली. चांगलं झालं म्हणली. हे बाळ बघ कसं चिरकायलं म्हणली. माझ्या लेकराला तकलीफ काहीच नव्हती. दुसऱ्या दिवशी कोमात गेल्यावानी झालं. तिला घंटाभर ताप आला, तरीबी डाक्टर बघना. एवढ्याल्या दवा आणल्या त्या कुठे नेऊन ठेवल्या की?”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदम्यान नांदेडच्या डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये 12 नवजात बालकं होती. यात अंजली वाघमारेच्या 2 दिवसांच्या बाळाचाही समावेश होता.
नांदेडपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावरील विष्णुपरी भागात हा दवाखाना आहे.
आई लक्ष्मीबाईंच्या शेजारी बसलेला अंजलीचा भाऊ राजेश टोम्पे म्हणाला, “सोमवारी सकाळी 4 वाजता बाळ नाही राहिलं म्हणून सांगितलं. कारण मेल्याच्या नंतर सांगितलं की, त्याला संडास झाली म्हणून. त्याच्या आधी काहीच सांगितलं नाही. त्याच्या आधी सगळं चांगलं आहे असंच सांगितलं. आम्ही गेलो की म्हणायचे चांगलं आहे बाळ, तुम्ही मधी येऊ नका.”

फोटो स्रोत, bbc
दवाखान्यानं काढलेल्या पत्रकात, अंजली वाघमारेंच्या बाळाचं वजन 4 किलो होतं आणि ‘meconium aspiration syndrome with birth asphyxia’ हे बाळाच्या मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलंय.
डिलीव्हरीच्या वेळी बाळाने शी केली आणि गर्भाशयातील पाणी श्वासाद्वारे फुफ्फुसात जाऊन बाळ गुदमरलं आणि त्याचा मृत्यू झाला, असा याचा अर्थ होतो.
अंजलीला मुलगी झाल्याचं टोम्पे कुटुंबीयांचं म्हणणं आहे, तर अंजलीनं पुरुष जातीच्या भ्रूणाला जन्म दिल्याचं दवाखान्याच्या पत्रकात नमूद केलेलं दिसतंय.
4 ऑक्टोबरला लक्ष्मीबाईंची मुलगी अंजली वाघमारेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फोटो स्रोत, rajesh tompe
3 ते 4 ऑक्टोबरदरम्यानच्या 24 तासांत या दवाखान्यात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 3 नवजात बालकं आहेत. ही बालकं प्रिमॅच्युयर बेबीज असल्याचं दवाखान्यानं म्हटलंय.
दरम्यान, नांदेडच्या सरकारी दवाखान्यात औषधं उपलब्ध नसल्याचं अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं. दवाखान्यातील काही कर्मचाऱ्यांशीही आम्ही बोललो. तेव्हा इथं डॉक्टरांची कमतरता असल्याचंही त्यांनी आम्हाला ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगितलं.
यामागे दवाखान्यानं औषधी पुरवठा करणाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं बिल थकवल्याची चर्चा आहे.

फोटो स्रोत, bbc
यावर बोलताना दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे म्हणाले, “या सर्व रुग्णांचे जे मृत्यू झाले त्याच्यामध्ये डॉक्टरांची कमतरता किंवा औषधांची कमतरता हा मुद्दा फारसा नव्हता. मूळातच वेगवेगळ्या नैसर्गिक स्थितीमुळे किंवा आजारामुळे यांची डेथ झालेली आहे.
“या ठिकाणी 508 खाटा किंवा बेड्स मंजूर झालेले आहेत. त्यामुळे त्या 508 चा निधी आम्हाला मिळतो. पण प्रत्यक्षात 1080 एवढ्या बेडमध्ये रुग्णांची सर्व्हिस दिली जाते.”

फोटो स्रोत, bbc
नवजात बालकांच्या मृत्यूंचं कारण विचारल्यावर वाकोडे म्हणाले, “बालरोग विभागामध्ये जे एकूण 12 बालमृत्यू झाले, त्यामध्ये एकदम कमी वजनाचे बाळं हे होते आणि त्यांचं वयसुद्धा 0 ते 4 दिवसाचं म्हणजे नुकतेच जन्मलेले होते. शिवाय ते प्रिमॅच्युअर बेबी म्हणून त्या वॉर्डमध्ये अॅडमिट होते. प्रिमॅच्युअर बेबी म्हणजे वजन कमी असलं की त्या बाळाचं फुफ्फुस हे पूर्णत: डेव्हलप होत नाही. मग त्याची श्वसनाची प्रक्रिया बरोबर होत नाही."
“बाळासाठी जे वॉर्मर्स असतात ते आजघडीला आमच्याकडे 24 वॉर्मर आहेत. ज्यामध्ये आम्ही 70 बालकं मॅनेज करतो. आता हे सर्व मॅनेज करत असताना बाळाला ज्या काही इन्फेक्शन, रेस्पायरी सिस्टीमचे प्रॉब्लेम होतात, तर त्याच्यामध्ये बाळाचे मृत्यू हे घडू शकतात. म्हणजे 50 % पर्यंत त्याची शक्यता असते,” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

फोटो स्रोत, bbc
4 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजता आमची भेट लोहा तालुक्यातील रामचंद्र घुले यांच्याशी झाली. दवाखान्यातून त्यांना एका साध्या कागदावर गोळ्या-औषधींची नावं लिहून देण्यात आली होती. ती बाहेरुन खरेदी करुन ते दवाखान्यात परतत होते.
500 रुपयांची ही औषधी होती.
“सरकारी दवाखान्यातच औषधी मिळायला पाहिजे की नाही, याचे नियम आपल्याला माहिती नाही. आपुन भिलेलं राहतं, की पेशंटला काही होईल म्हणून, त्यामुळे गडबडीत औषधं आणावी लागतात,” रामचंद्र सांगत होते.
नांदेडच्या या सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं रुग्णालयातील अस्वच्छ स्वच्छतागृह दाखवून देत होते. शिवाय रुग्णालयच्या मुख्य आवारात डुकरं फिरतानाही दिसत होते.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी एवढ्या मोठ्या रुग्णालयाची स्वच्छता करणं अशक्यप्राय असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, bbc
काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या एका रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचे मृत्यू झाले.
ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांशी मी बोलत होतो, त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की, राजकीय नेते येतात-जातात, दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप करतात. पण त्यातून गरिबाच्या मृत्यूचं केवळं राजकीय भांडवल केलं जातं.
राजेश टोम्पे म्हणाला, “आरोग्य मंत्री आल्ते, आरोग्यमंत्र्यापुढं असं झोपलो तरी आरोग्यमंत्री थांबले नाही आमच्यासमोर. आरोग्यमंत्री पुढे गेले. ते फक्त चक्कर मारायसाठी पुढे गेले. ते फक्त मतदान घेण्यासाठी येतात. हा दवाखाना नव्हे तर फक्त पैसे कमावण्याची फॅक्टरी आहे. या दवाखान्यात काहीच नाही.”
“हातातल्या कागदांसहित आणायला लावलं बाहेरून. बाईचं आंग पुसायचा जो कपडा असतो तोसुद्धा इथं नाही,” लक्ष्मीबाई पुढे सांगत होत्या.

फोटो स्रोत, bbc
टोम्पे कुटुंबीय मजुरीकाम करुन कुटुंबाची उपजीविका भागवतं. कधी ऊसतोडणी आणि तर कधी वीटभट्टीवर ते काम करतात. दवाखान्यातील उपचारासाठी 45 हजार रुपये खर्च झाल्याचं ते सांगतात.
त्यासाठी त्यांनी मुकादमाकडून 50 हजार रुपये उचल घेतल्याचंही ते सांगतात. त्यांचं मुख्यमंत्र्यांना एकच सांगणं आहे.
“मुख्यमंत्र्यांना हेच सांगणार की, जे पेशंट येईल त्याला चांगली ट्रीटमेंट द्या. त्याला गोळ्या द्या, त्याला औषधी द्या. सरकारी दवाखाना आहे की नाही, तर त्यात मधल्या मध्ये सगळ्या सुविधा राह्यते. गोळ्या, औषधी सगळं राह्यते. इथं काहीच नाही.”

फोटो स्रोत, bbc
दरम्यान, नांदेडमधील घटनेची चौकशी करू, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी टोम्पे कुटुंबाची मागणी आहे.
नांदेडहून निघताना आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलो. तर तिथं सुरक्षासरक्षक म्हणून काम करणारी व्यक्ती म्हणाली, मला आईला मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी दवाखान्यात न्यायचं होतं. पण या प्रकरणामुळे ते लांबलं आहे. वरून पैसेच येत नसतील तर डॉक्टर बिचारे काय करतील? वरुन तुम्ही त्यांना संडास साफ करायला लावणार हे काही बरोबर आहे का?"
तर एक पोलिस कर्मचारी म्हणाला, "अहो राजकारणी लोक तेच करतात जे त्यांच्या मतदारांना आवडतं. आपण कितीबी काहीबी म्हणलं तरी लोकांना जे आवडतं, तेच राजकारणी करतात."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








