नांदेड: डीनना टॉयलेट साफ करायला लावलं, शासकीय कर्मचाऱ्याच्या अशा अपमानाची काय आहे शिक्षा?

नांदेडमध्ये शासकीय रूग्णालयात मृत्यू झाल्याचं प्रकरण चर्चेत असतानाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयाचे डीन शामराव रामजी वाकोडे यांना हिंगोलीचे शिवसेना ( शिंदे गट) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील शौचालय साफ करायला लावल्याची घटना घडली.
मंगळवारी (3 ऑक्टोबर) खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांना रुग्णालयात घाण पसरली असल्याचं निदर्शनास आलं.
पाहणी करताना त्यांच्या सोबत रुग्णालयाचे डीन (अधिष्ठाता) हे देखील होते. त्यांना शौचालय साफ करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकार काल समोर आला. या प्रकाराबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तर रुग्णालयातील अस्वच्छता पाहून त्यापायी आपण हे कृत्य केल्याचं हेमंत पाटील यांनी म्हटलं असलं तरी महाराष्ट्रातील ही गेल्या काळातील पहिली घटना नाही.
‘सरकार जबाबदार असतं पण डॉक्टरांना टार्गेट केलं जातं,’ नांदेड प्रकरणावरून निवासी डॉक्टर आक्रमक
“शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी माफी मागावी,” या मागणीसाठी आज राज्यभरात निवासी डाॅक्टरांची संघटना केंद्रीय मार्ड आणि राज्य मार्ड यांनी आंदोलन केले.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 1 ऑक्टोबर पासून 48 तासांत 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनावर अनेक आरोप केले जात आहेत.

फोटो स्रोत, Central Mard
यादरम्यान शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी या शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट दिली होती आणि अधिष्ठात्यांना स्वच्छता गृह साफ करण्यास सांगितलं. या कृत्याच्या निषेधार्थ महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसोबत गैरवर्तन केल्याचं सांगत सेंट्रल मार्डने राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे.
मुंबईमध्ये जेजे रुग्णालयात आज मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर खासदार हेमंत पाटील यांच्या वर्तनाच्या निषेधार्थ आंदोलनात उतरले. तसंच आज दिवसभर निवासी डाॅक्टरांनी आज हाताला काळ्या फिती बांधून आपला निषेध दर्शवला. तसंच हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही निवासी डॉक्टरांची विविध संघटनांनी दिला आहे.
‘डॉक्टर सॉफ्ट टार्गेट’
सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अभिजीत हेळगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “डॉक्टरांना सॉफ्ट टार्गेट केलं जातं. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्व सोयी सुविधा पुरवण्याचं काम सरकारचं आहे. उदाहरणार्थ, औषधांचा साठा, पुरवठा, मनुषबळाची कमतरता, मशीन्स याचा तुटवडा असतो. यामुळे काही घटना घडली की सर्व दोष डॉक्टरांना दिला जातो कारण डॉक्टर सॉफ्ट टार्गेट आहे. सरकारचं अपयश डॉक्टरांवर ढकलण्यात येतं.”
खासदार हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास सेंट्रल मार्डकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे.
“कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता सर्वोच्च पद आहे. त्यांच्याकडून स्वच्छता गृह साफ करवून घेणं हे चुकीचं आहे. सरकारने त्यांच्या खासदाराला समज द्यावी आणि हेमंत पाटील यांनी माफी मागावी अन्यता सर्व निवासी डॉक्टर तीव्र आंदोलन करतील,” असंही डॉ. अभिजीत हेळगे यांनी सांगितलं.
लोकप्रतिनिधींकडून डॉक्टरांना अशी वागणूक देणं अपेक्षित नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सर्वोच्च पदावर असलेल्या डॉक्टरांना असं वागवलं तर त्यांचं खच्चीकरण होतं, असं मत महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश दोधी यांनी मांडलं.
ते म्हणाले, “लोकप्रतिनिधींनीच असे वर्तन केल्यास इतर डॉक्टरांवरही त्याचा परिणाम होतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपत्कालीन विभाग सुरू असतो. डॉक्टर्स म्हणून ते 24 तास तयारीतच असतात. डॉक्टर हजर नाहीत असं होत नाही पण अशा घटना घडण्यामागे इतर अनेक गोष्टी कारणीभूत असतात. याची चौकशी व्हायला हवी, पण काहीही कारण असलं तरी डॉक्टरांना अशी वागणूक देणं चुकीचं आहे.”
‘सरकारच सर्वस्वी जबाबदार’
राज्यात सरकारी रुग्णालयात अशापद्धतीच्या घटना अनेकदा होत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णलयात आवश्यक त्या सोयी-सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधांचा साठा, वैद्यकीय चाचणी अशा अनेक महत्त्वाच्या बाबी अपुऱ्या असल्याचं अनेकदा समोर येतं. याला जबाबदार कोण आहे? डॉक्टरांकडून वेळोवेळी यासाठीची मागणी केली जाते का?
याबाबत बोलताना डॉ. अभिजीन हेळगे सांगतात, “वारंवार आम्ही सांगत असतो की व्हेटींलेटर, ऑक्सिजन, गोळ्या यांची कमतरता आहे त्याची माहिली दिली जाते. प्रत्येक महाविद्यालयात जीवनावश्यक औषधांचा तुटवडा आहे. याची माहिती डॉक्टर देत असतात. पण निधी नाही असं सांगितलं जातं. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.”
“शासनाकडे अनेकदा मागणी केली जाते, स्मरणपत्र दिली जातात. पण रुग्णांना समोर डॉक्टर दिसतात. औषधांचा साठा, सोयी-सुविधा हे सरकारने देणं अपेक्षित आहे. आम्ही डॉक्टर रुग्ण सोडून मंत्रालयात फेऱ्या नाही मारू शकत. काही गोष्टी पॉलिटिकल स्टंट असतो. डॉक्टरांची चूक असते असंही काही लोक बोलतात. पण तुम्ही सरकारी रुग्णालयात पाहिलं तर किती अनास्था आहे. ही परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. मग प्रत्येक ठिकाणी डॉक्टर जबाबदार कसा असू शकतो?” असाही प्रश्न डॉक्टरांनी आंदोलनादरम्यान उपस्थित केला.
खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा
डीनला शौचालय साफ करायला लावून अपानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी हेमंत पाटील यांच्यासह इतर 10 ते 15 जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयाचे डीन शामराव वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 353 , कलम 506 , कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसंच अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3 (1) आणि 3 (2) अंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधीकडून शासकीय कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक
लोकप्रतिनिधींनी शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा वाईट वागणुक देण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा वागणुकीचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जुलै महिन्यात खासदार हेमंत पाटील यांनीच माहूरच्या तहसीलदारांना झापल्याचा व्हिडिओ तेव्हा समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. "इंग्लिशमध्ये सांगू की वेगळ्या पद्धतीने सांगू, एका मिनिटात तुमच्या अंगातील मस्ती उतरवीन," अशा शब्दात खासदार हेमंत पाटलांनी तहसीलदार किशोर यादव यांना धारेवर धरलं होतं.
हेमंत पाटील आणि तहसीलदार यादव यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. "तहसीलदार आमचे फोन घेत नाही, आमच्या अडचणी जाणून घेत नाही," अशा तक्रारी हेमंत पाटलांकडे आल्या आहेत. यावरून खासदारांनी तहसीलदारांना वाईट शब्दात सुनावलं होतं

याच वर्षी ( 2023) जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा औरंगाबाद दौऱ्यावर आले होते तेव्हा बैठकीसाठी आलेल्या रमेश बोरनारे यांचा ताफा अडवल्यानं त्यांना पोलिसांशी हुज्जत घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
काही महिन्यापूर्वी हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर हे मारहाण करत असल्याचा व्हीडिओ वायरल झाला होता. संतोष बांगर यांनी प्राचार्यांचा कानच पकडला होता. केवळ आमदार संतोष बांगरच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्राचार्यांचा कान पकडत त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत होतं.
2019 साली आमदार नितेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या खराब अवस्थेला जबाबदार धरत एका उपअभियंत्यावर चिखलफेक केली होती. आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता प्रकाश खेडेकर यांच्यावर चिखल ओतताना कॅमेऱ्यात कैद झालं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कलम 353 मध्ये काय तरतूद आहे?
भारतीय दंड संहितेच्या कलम 353 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची तरतूद आहे. या कलमाच्या तरतुदींनुसार, जर एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल आणि तो कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत असेल. अशा वेळी जर त्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या किंवा धमकावण्याच्या उद्देशानं बळाचा वापर किंवा हल्ला करणे शिक्षेस पात्र आहे.
सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तीला कायद्याच्या दृष्टीने अपराधी मानलं जातं आणि त्या व्यक्तीला भारतीय दंड संहितेच्या कलम 353 च्या तरतुदींनुसार शिक्षा होऊ शकते.
या कलमाअंतर्गत 2 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. तसेच आर्थिक दंडाची तरतूद आहे. न्यायालय आवश्यकतेनुसार शिक्षा वाढू शकते.
अॅट्रॉसिटी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी
हा कायदा 1989 मध्ये भारतीय संसदेने संमत केला होता.
या कायद्यानुसार अनुसुचित जाती जमातींना संरक्षण दिलं जातं. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, लोकसेवकाने कोणताही अपराध करणे, या गोष्टी सुद्धा या कायद्यानुसार गुन्हा मानला गेला आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








