स्मार्टफोन वापरायचं या 10 मुलांनी सोडून दिल्यावर काय झालं? बीबीसीनं केला प्रयोग

    • Author, क्रिस्तियन जॉन्सन
    • Role, बीबीसी न्यूज

जगभरात स्मार्टफोनमुळं मुलांवर किंवा विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामाची चर्चा होत असते. त्यातच बीबीसीनं केलेलं सर्वेक्षण आणि एका अभिनव प्रयोगातून यासंदर्भातील आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. सर्वांसाठीच महत्त्वाच्या या गोष्टीबद्दल...

स्मार्टफोनपासून पाच दिवस फारकत (Digital Detox) घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सालफोर्डच्या 10 किशोरवयीन मुलांनी स्मार्टफोन बाजूला ठेवून साधे फोन घेतले. त्यातून फक्त कॉल आणि एसएमएस करणं शक्य होतं. पण त्यांनी हे कसं केलं?

विल त्याच्या स्मार्टफोनबरोबर दररोज आठ तासांपेक्षा जास्त वेळ घालवायचा.

लहान असताना त्याला सायकल चालवायला आवडायचं. पण आता तो 15 वर्षांचा झाला आहे आणि महाविद्यालयातून आल्यानंतरचा त्याचा बहुतांश रिकामा वेळ तो टिकटॉकवर व्हिडिओ पाहण्यात घालवतो.

मागील आठवड्यात विलनं फक्त सोशल मीडिया अॅप्सवर 31 तास घालवले. पण, आता पुढील पाच दिवस तो सोशल मीडियाचा वापर करू शकणार नाही.

"मी हे कसं करेन याची मला चिंता आहे. आता मला माझ्या आई-वडिलांबरोबर वेळ घालवावा लागेल," असं तो म्हणतो.

तरुणांच्या स्मार्टफोन वापरासंदर्भातील सवयी बाबतच्या बीबीसीच्या प्रकल्पातील डिजिटल डीटॉक्स हा एक भाग आहे. विल मीडिया सिटीच्या युनिव्हर्सिटी टेक्निकल कॉलेजच्या त्या 10 विद्यार्थ्यांपैकी एक आहे जे त्यांचे स्मार्टफोन बाजूला ठेवून नोकियाचे अगदी प्राथमिक स्वरुपाचे मोबाईल फोन वापरण्यास तयार झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक अंगावर परिणाम होणार आहे. ते स्मार्टफोन वापरत मोठे झाले आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी ते इंटरनेटचा वापर करत आहेत. ते मुख्यत: स्नॅपचॅट किंवा फेसटाइम वर संवाद साधत आहेत. ते गुगल मॅपचा वापर करतात आणि सतत संगीत ऐकत असतात.

"हे खरोखरंच एक आव्हान असणार आहे," असं महाविद्यालयाचे प्राचार्य कॉलिन ग्रॅंड म्हणतात. या प्रयोगादरम्यान ते विद्यार्थ्यांचे स्मार्टफोन ताब्यात ठेवणार आहेत.

अभिनेत्री व्हायचं रुबीचं स्वप्नं आहे. ती म्हणते, ती स्मार्टफोनवर खूप वेळ घालवते आणि टिकटॉक पाहत असताना अनेकदा पालकांकडे दुर्लक्ष करते.

हा प्रयोग सुरू असताना मी तिच्या कुटुंबाला भेटलो.

मी आल्यावर पाहिलं की 16 वर्षाची रुबी कॉलेजला जाण्यापूर्वी तिचा मेक-अप आटपत होती.

तिच्या कामाच्या ठिकाणचा युनिफॉर्म तिच्या बॅगेत असल्याची खातरजमा तिच्या वडिलांनी केली आणि मग रुबीच्या आईनं आम्हाला गाडीनं ट्राम स्थानकापर्यत सोडलं.

स्मार्टफोन दूर ठेवल्यामुळे तिच्या पालकांशी अधिक संवाद होत असल्याचं रुबी मान्य करते. तर तिची आई एम्मा, मान्य करतात की या डिजिटल डीटॉक्समुळे त्यांच्या मुलीच्या वर्तनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

"रुबीला तिच्या स्मार्टफोनचं व्यसन जडलं आहे. त्यामुळे या प्रयोगामुळे ती किशोरवयीन असताना कशी होती हे समजून घेण्याची तिला एक संधी मिळणार आहे," असं एम्मा म्हणतात.

"ती आता अधिक बोलते आहे आणि लवकर झोपते आहे. हा एक छान बदल आहे."

आम्ही स्टेशनवरील अडथळ्यांपर्यत पोचलो तेव्हा पाहिलं की ट्राम आधीच निघून गेली आहे.

सर्वसाधारणपणे पुढील ट्राम कधी येणार आहे हे जाणून घेण्यासाठी रुबी तिच्या स्मार्टफोनमधील अॅपचा वापर करते. ट्राम स्थानकावरील डिस्प्ले बोर्डवरील वेळापत्रक ही पिढी वाचत नाही.

"स्मार्टफोन नसल्यावर ट्रामबद्दल जाणून घेण्याचा माझ्याकडे पर्याय नाही," असं ती म्हणते.

आम्ही पुढील ट्रामची वाट पाहत असताना रुमी मला तिच्या ग्रुप नर्फ गेम्ससाठीच्या केंद्रातील तिच्या पार्ट टाइम नोकरीबद्दल सांगते. ती आठवड्यातून काही दिवस काम करते. मात्र आज तिची शिफ्ट असणार आहे की नाही किंवा ती किती वेळ असणार आहे याबद्दल तिला निश्चित माहित नाही.

तिच्या कामाच्या तासांबद्दल जाणून घेण्यासाठी तिच्या मॅनेजरनं तिला ऑफिसचा टेलिफोन नंबर दिला आहे. मात्र, तिथे फोन करताना तिला थोडंसा दबाव किंवा ताण आल्यासारखं वाटतं आहे.

"अॅपवर तुम्हाला हे कळतं की तुम्ही कोणती शिफ्ट करणार आहे. मात्र आता स्मार्टफोन नसल्यामुळे ते मला कळणार नाही. मी आतापर्यत कामाच्या ठिकाणी कधीही फोन केलेला नाही," असं रुबी सांगते.

ती तिचं ट्रामचं तिकिट काढते. तिच्या स्मार्टफोनमधील वॉलेट नसल्यामुळे तिच्या बॅंक कार्डचा कधी नव्हे तो वापर होतो आहे. त्यानंतर आम्ही तासाभराच्या प्रवासाला निघालो.

काही किशोरवयीन मुलांसाठी त्यांचा स्मार्टफोन दूर सारणं ही खूप कठीण गोष्ट आहे.

फक्त 27 तासांनंतर 14 वर्षांच्या चार्लीनं या प्रयोगातून माघार घेतली आणि त्याचा स्मार्टफोन परत मागितला.

"मला माहित होतं की माझा स्मार्टफोन त्याच इमारतीमध्ये होता," असं तो सांगतो, मात्र त्याला कोणी संपर्क करतं आहे का हे कळत नसल्यामुळे आणि ऑनलाईन जाता येत नसल्यामुळे त्याला खरोखरंच तणाव जाणवत होता.

प्रत्येकालाच तणावपूर्ण वाटत असलेली आणखी एक बाब म्हणजे त्यांच्या स्नॅपस्ट्रीकवरील स्टेटस. म्हणजेच त्यांनी एकमेकांना किती दिवस स्नॅपचॅट वर मेसेज पाठवले होते याची एकूण संख्या.

काही विद्यार्थ्यांनी मान्य केलं की त्यांना स्नॅपस्ट्रीक गमावण्याची चिंता वाटत होती. काही वेळा ते सलग 1,000 दिवसांसाठी सुद्धा असायचं. त्यांनी त्यांच्या मित्रांना त्यांच्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्यास सांगितलं होतं. जेणेकरून ते डिजिटल डीटॉक्स करत असताना त्यांचं स्नॅपस्ट्रीक सुरू राहिल.

चार्लीप्रमाणे या प्रयोगात भाग घेणारे इतर विद्यार्थी या दरम्यान आपण काहीतरी गमावू याची भीती वाटत असल्याचं मान्य करतात. मात्र त्याचबरोबर बहुतांश म्हणतात, त्यांना आश्चर्य वाटतं आहे की या प्रयोगामुळे त्यांना किती मुक्त झाल्यासारखं वाटतं आहे.

ते सांगतात की काहीजणांना चांगली झोप येते आहे. तर काही जणांना वाटतं आहे की स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढली आहे.

"मला वाटतंय की मी नवीन गोष्टी शिकतो आहे आणि इतर गोष्टींमध्ये अधिक सहभागी होतो आहे. मी काहीही गमावतो आहे असं मला अजिबात वाटत नाही," असं 15 वर्षांची ग्रेस म्हणते.

या प्रयोगाच्या पहिल्याच दिवशी तिची शाळा सुटल्यानंतर ती आणि तिच्या मैत्रिणी तिच्या फोनवर लावण्यासाठी प्लास्टिकचे रत्न किंवा शोभेच्या वस्तू विकत घेण्यासाठी गेल्या.

आम्ही बोलत असताना ग्रेसनं ते मला दाखवलं. ग्रेस म्हणाली तिचा स्मार्टफोन तिच्याजवळ नाही या गोष्टीचा विचार करण्यापासून इतरत्र लक्ष वेधण्यासाठी शॉपिंग करणं ही चांगली बाब होती आणि त्यातून आणखी एक अनपेक्षित फायदा देखील होता.

"ते खरंच खूप शांततापूर्ण होतं. मला खूप मजा आली कारण त्यामुळे माझी सर्जनशीलता परतली," असं ती सांगते.

"मी जशी घरी आले, तसं मला चित्रकलेचं साहित्य दिसलं. मला ज्या गोष्टी आधी आवडायच्या त्या पुन्हा शोधण्यास यामुळे मला मदत झाली."

फेब्रुवारीमध्ये सरकारनं विद्यार्थ्यांना शाळेत फोन वापरण्यापासून रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली.

मात्र मे महिन्यात वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांच्या एका गटानं त्यापुढील पाऊल उचललं. ते म्हणाले आम निवडणुकांमध्ये जो कोणी जिंकेल त्यांनी 16 वर्षांखालील सर्व मुलांसाठी फक्त शाळेतच नव्हे तर सरसकट बंदी घातली पाहिजे.

बीबीसी रेडिओ 5 लाईव्ह आणि बीबीसीबाइटसाइज यांनी 13 ते 18 वर्षांदरम्यानच्या 2,000 मुलांच्या केलेल्या एका सर्वेक्षणात तरुणांना मानसिक आरोग्य आणि त्यांच्या स्मार्टफोन वापराच्या सवयींसह जीवनाच्या विविध पैलूंविषयी विचारलं.

सर्वेशन या पोलिंग कंपनीनं केलेल्या या सर्व्हेक्षणातून समोर आलेले निष्कर्ष सांगतात की,

  • 23 टक्के मान्य करतात की, 16 वर्षांखालील मुलांसाठी स्मार्टफोनवर बंदी घातली पाहिजे.
  • 35 टक्क्यांना वाटतं की, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली पाहिजे.
  • 50 टक्के म्हणतात की, स्मार्टफोन जवळ नसल्यास त्यांना चिंता वाटते. मागील वर्षी हाच आकडा किंचित जास्त (56 टक्के) होता

फक्त या डिजिटल डीटॉक्समध्ये सहभागी झाल्यामुळे या किशोरवयीन मुलांना त्यांच्या वयोगटातील इतरांपेक्षा वेगळे केले आहे. बीबीसीच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 74 टक्के तरुणांनी सांगितलं की, प्राथमिक स्वरुपाच्या मोबाईल फोनशी त्यांच्या स्मार्टफोनची अदलाबदल करण्याबाबत विचार करणार नाहीत.

पाच प्रदीर्घ दिवसांनंतर आता विद्यार्थ्यांनी त्यांचे स्मार्टफोन पुन्हा हाती घेण्याची वेळ आली आहे.

शिक्षक विद्यार्थ्यांचे स्मार्टफोन घेण्यासाठी महाविद्यालयात जात असल्यानं मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. अनेक विद्यार्थी तर स्मार्टफोन मिळण्याच्या अपेक्षेनं ओरडतात.

किशोरवयीन मुलांच्या हाती स्मार्टफोन आल्याबरोबर त्यांनी फोन सुरू करताच त्यांचे डोळे स्मार्टफोनच्या स्क्रीनवर खिळले आहेत, ते स्क्रोल करत आहेत आणि त्यांचे ग्रुप चॅट पाहत आहेत.

मात्र या डिजिटल डीटॉक्समध्ये सहभागी होणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना स्मार्टफोनवरील स्क्रीन टाइम मर्यादित ठेवण्यासाठीचे मार्ग शोधायचे आहेत.

"या प्रयोगामुळे मला जाणीव झाली की मी सोशल मीडियावर किती वेळ घालवते आहे आणि मला जाणीव झाली की मी हा वेळ कमी केला पाहिजे आणि घराबाहेर अधिक पडायला हवं. मी प्रयत्न करेन आणि टिकटॉकचा वापर कमी करेन हे मात्र नक्की," असं विल कबूल करतो.

विल मान्य करतो की, हा प्रयोग अवघड होता आणि या प्रयोगादरम्यान त्याला खासकरून संगीत ऐकायची इच्छा व्हायची. मात्र स्मार्टफोनशिवाय वेळ घालवल्यामुळे विलला सायकलिंग करण्याची त्याची आवड पुन्हा एकदा सापडली आहे. तासनतास स्मार्टफोनची स्क्रीन वरखाली करत वेळ घालवण्यापेक्षा आपली ही आवड जपण्याचा निर्धार त्याने केला आहे.

"दिवसाचे आठ तास हे निव्वळ वेडेपणाचं आहे," असं तो म्हणतो.