You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलांना लांबचं दिसत नाहीये? लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढण्याची 'ही' आहेत कारणं
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये मायोपिया या आजाराचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतं. मायोपिया हा एक डोळ्यांचा आजार आहे.
त्याचीच माहिती या बातमीमध्ये घेणार आहोत.
मायोपियाला सोप्या शब्दांत शॉर्ट सायटेडनेस किंवा निअरसायटेडनेस असं म्हणतात. थोडक्यात या व्यक्तीला ठराविक अंतरापर्यंतच दृश्य दिसते.
थोड्या अंतरावरचे पाहाण्यासाठी मग चष्म्याचा आधार घ्यावा लागतो. या व्यक्तींना होणाऱ्या त्रासाचं निदान वेळीच झालं नाही तर मात्र पुढे वेगवेगळ्या गुंतागुंतीला सामोरे जावं लागतं. विशेषतः लहान मुलांच्या प्रगतीमध्ये हा मोठा अडथळा होऊ शकतो.
13 ते 19 मे हा मायोपिया जागृती सप्ताह म्हणून पाळला जातो, त्यामुळे मायोपियाची सर्व माहिती, लक्षणं, निदान याची माहिती येथे घेऊ
गेल्या अनेक वर्षांत लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. प्रत्येक देशांनी याचा अनुभव घेतला आहे. 1980 ते 1990 या काळात एका चिमुकल्या देशात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हा देश भराभर प्रगती करत होता. नव्या पिढीला शिक्षणाची दारं उघडी होऊन भराभर विकास होत होता, प्रगती होत होती. परंतु एक गोष्ट मात्र चिंताजनक होती ती म्हणजे दिवसेंदिवस मुलांना मायोपियाचं निदान होत होतं.
लांबचं न दिसण्याचा हा त्रास वाढतच होता. आणि कोणालाच काही करता येत नव्हतं. या चिमुकल्या देशाचं नाव आहे सिंगापूर. सिंगापूरमधील आज प्रौढांमध्ये 80 टक्के लोकांना मायोपिया असल्याचं दिसतं.
सिंगापूर नॅशनल आय सेंटरचे वरिष्ठ कन्सल्टंट ऑड्री चिया गेल्यावर्षी म्हणाले होते, “आम्ही या प्रश्नाशी 20 वर्षे झगडत आहोत आणि थिजून गेलो आहोत. सिंगापूरमध्ये जवळपास प्रत्येकजण मायोपिक आहे.”
हीच परिस्थिती आता जगभरात सर्वत्र दिसत आहे. अमेरिका आणि युनायटेड किंग्डमसारख्या प्रगत मानल्या देशांमध्य़े हे प्रमाण जास्त आहे तसंच ते भारतामध्येही आहे.
अमेरिकेत 1971 साली 25 टक्के प्रौढांना मायोपिया असल्याचं निदान झालं होतं. तो आकडा आता 40 टक्क्यांवर गेला आहे. अशीच स्थिती युनायटेड किंग्डममध्येही आहे. दक्षिण कोरिया, चीन आणि तैवानमध्ये ही स्थिती त्याहून भयंकर झाली आहे. अशीच गती राहिली तर जगातील अर्धी लोकसंख्या 2050 साली मायोपियाग्रस्त असेल. ही गती दरवर्षी वेगानं वाढतच आहे असं दिसून येतंय.
चिया सांगतात, चीनमध्ये मायोपिया अतिशय नाट्यमयरित्या वाढला आहे. शाळेत जाणाऱ्या मोठ्या मुलांपैकी 76 ते 90 टक्के मुलांना मायोपिया असल्याचं ते सांगतात.
वरकरणी मायोपिया हा लहानसा आजार वाटू शकतो. याला काय चष्मा वापरला की झालं असं वाटू शकतं. पण तज्ज्ञ सांगतात मायोपियाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, दृष्टी जाणं किंवा कायमचं अंधत्व येण्याचं ते एक कारण बनू शकतं.
याबरोबरच कोरोना हे सुद्धा मायोपियाच्या वाढत्या प्रमाणाचं एक मोठं कारण आहे. तज्ज्ञांनी याला क्वारंटाइन मायोपिया असंच नाव दिलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मायोपियाचं प्रमाण जगभरात वाढलं.
या काळात ज्या देशांमध्ये मायोपिया कमी प्रमाणात होता तिथंही प्रमाण वाढलं. कारण या काळात मुलं घरातच एकाच खोल्यांमध्ये राहू लागली, तिथंच त्यांची शाळा, दिनक्रम होऊ लागला. बाहेर जाणं थांबल्यामुळे तीच सवय पुढेही कायम राहिली. ज्या देशांतील मुलांंमध्ये बाहेर खेळण्याची, वावरण्याची पद्धत जास्त होती तीही अचानक थांबली.
मायोपियाची कारणं
मायोपिया होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. यातील महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे प्रिमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे मुदतीपूर्वी प्रसुतीत जन्मलेल्या बाळांना याचा धोका जास्त असतो. तसेच अगदी जवळून करायची कामं गेल्या काही वर्षात वाढली आहेत. अशी कामं करणाऱ्यांना मायोपिया होतो.
- घराबाहेरची कामं, वावर कमी होणं हे सुद्धा याचं एक कारण आहे.
- घरातच, अंधाऱ्या जागी राहाणं, अंधाऱ्या जागेत काम करणं.
- डिजिटल यंत्रांचा वापर जास्त वाढणं हे सुद्धा त्याचं एक कारण आहे.
मायोपियाची लक्षणं
आता आपल्या मुलाला मायोपिया आहे हे वेळीच ओळखणं अत्यंत आवश्यक असतं. कारण वेळीच डॉक्टरांकडे जाऊन मुलांची तपासणी होणं गरजेचं असतं. तसं झालं तर मुलांच्या प्रगतीमधला अडथळाही वेळीच बाजूला करता येतो. प्रिमॅच्युअर बेबीजच्या पालकांनी तर याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.
मायोपियाची लक्षणं साधारणतः 6 ते 13 या वयोगटातल्या मुलांमध्य़े दिसतात. ही लक्षणं त्याहून लहान मुलांमध्येही दिसतात आणि प्रौढ व्यक्तींमध्येही दिसतात.
- या लक्षणांमध्ये मुलांना वाचताना अडथळे येताना दिसून येतं
- विशेषतः शाळेमध्ये फळ्यावर लिहिलेलं वाचताना मुलांना त्रास होतं.
- ही मुलं टीव्ही, कॉम्प्युटरच्या जवळ जाऊन बसतात, फोन अगदी डोळ्यांजवळ धरुन वापरतात.
- या व्यक्तींचं डोकंही वारंवार दुखायला लागतं.
- मायोपियाचा त्रास असलेली मुलं वारंवार डोळे चोळतात.
जर याकडे लक्ष दिलं नाही तर काही वर्षांमध्ये याचा त्रास वाढतो आणि नवी गुंतागुंत निर्माण होते.
मायोपिया टाळण्यासाठी काय करायचं?
मायोपिया होऊ नये यासाठी पालकांनी आपल्या मुलांची वेळोवेळी नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी केली पाहिजे. विशेषतः प्रिमॅच्युअर बेबीजच्या पालकांनी याकडे आवर्जून लक्ष दिलं पाहिजे.
मुलांना सतत घरामध्ये ठेवण्याऐवजी त्यांना दिवसातून किमान दोन तास घराबाहेर खेळ, किंवा आऊटडोअर अॅक्टिव्हिटीमध्ये गुंतवले पाहिजेत.
सर्व डिजिटल उपकरणं किमान 30 सेंटिमिटर अंतर ठेवून वापरली पाहिजेत.
- पुस्तक वाचताना पुस्तक आणि आपले डोळे यात पुरेसं अंतर असलं पाहिजे.
- पुस्तकावर पडून, झोपून वाचू नये. आपले मूल असं करत असेल तर त्यात सुधारणा करावी आणि डोळ्यांची तपासणीही करुन घ्यावी.
- मोबाईल, कॉम्प्युटर, टॅबलेटसारखी उपकरणं पुरेशा उजेडात वापरावीत, अंधारात त्यावरील मजकूर वाचण्याचा किंवा पाहाण्याचा प्रयत्न करू नये.
- घरामध्ये, कामाच्या ठिकाणी पुरेसा विशेषतः नैसर्गिक उजेड जास्त येईल अशी व्यवस्था करावी.
- डिजिटल उपकरणं, टीव्ही, संगणक 20 मिनिटं वापरल्यावर थोड्यावेळासाठी विश्रांती घ्यावी. योग्य चौरस आहार घ्यावा.
तसेच ज्या पालकांना स्वतःला मायोपिया आहे त्यांनी आपल्या मुलांच्या डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करुन घ्यावी. त्यांच्यामध्ये मायोपियाची लक्षणं दिसत आहेत का याकडे लक्ष ठेवावे.
डॉक्टर काय सांगतात?
भारतामध्ये मायोपियाचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून येत आहे. याबद्दल आम्ही डॉ. अगरवाल्स आय क्लिनिकच्या डॉ. स्मित. एम. बावरिया यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले, “1999 मध्ये भारतात 5-15 वयोगटातील शहरी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण 4.4 टक्के इतके होते. ते 2019मध्ये 21.1 टक्के एवढे वाढले आहे. आमच्या अंदाजानुसार शहरी मुलांमधलं मायोपियाचं प्रमाण प्रत्येक वर्षी 0.80 टक्के गतीने वाढत आहे. म्हणजेच 2030 मध्ये 31.89 टक्के, 2040 मध्ये 40 टक्के आणि 2050 मध्ये48.1 टक्के मुलांना मायोपिया झालेला असेल. म्हणजेच पुढच्या 25 वर्षांत प्रत्येक दोनपैकी एका मुलाला मायोपिया असल्याचं दिसेल.”
ते पुढं म्हणाले, "रुग्णांचा वयोगटही आता गेल्या काही वर्षांमध्ये बदलताना दिसून येतोय. डोळ्यांच्या तपासणीसाठी लहान मुलं वारंवार येत असल्याचं दिसत आहे. त्यातील अधिकाधिक मुलांना मायोपिया असल्याचं दिसत आहे. आम्ही सध्या 5 ते 17 वयोगटातील शालेय मुलांमध्ये मायोपिया असल्याची अनेक उदाहरणं पाहात आहोत. आम्ही 2017 मध्ये, मुंबईतील शहरी झोपडपट्टी भागातील 3-15 वयोगटातील 1,000 मुलांचे सर्वेक्षण केले त्यातील 200 मुलांना मायोपिया असल्याचे आढळून आले आहे. यावरुन मायोपिया किती वेगानं पसरतोय याची कल्पना येईल.”
बहुतांश डॉक्टर मायोपियाच्या या वेगवान प्रसाराला बदललेली जीवनशैली कारणीभूत असल्याचं सांगतात.
सततच्या स्क्रिनच्या वापरामुळे मुलांचे डोळे, रेटिना, मेंदू उत्तेजित राहातात त्यामुळे बुबुळांची वाढ जलद होते आणि मायोपियासाठी पोषक स्थिती तयार होते. यामुळेच मुलांनी घराबाहेर खेळणं, सूर्यप्रकाशात जाणं आवश्यक आहे.