दुष्काळ आणि पूर स्थितीला तोंड देऊ शकेल असं बटाट्याचे वाण शोधल्याचा वैज्ञानिकांचा दावा

    • Author, क्रिस्टीन रो
    • Role, तंत्रज्ञानविषयक रिपोर्टर, बीबीसी न्यूज

कल्पना करा की जर असं पीक तुम्हाला घेता आलं की जे घेतल्यावर दुष्काळ असो की पूर ते त्याही स्थितीत तग धरून राहील. कोणत्याही किडीचा प्रार्दुभाव देखील होणार नाही आणि एकदा लावल्यानंतर व्यवस्थापनासाठी अगदी अल्प खर्च होईल. तर काय होऊ शकेल?

असं एक बटाट्याचे वाण तयार करण्यात आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हे वाण पिकांवर पडणाऱ्या साथ रोगांचा सामना तर करुच शकतं त्याचबरोबर दुष्काळालाही तोंड देऊ शकतं.

हे पीक क्षारयुक्त जमिनीतही घेता येऊ शकतं असं संशोधकांचे म्हणणे आहे. या वाणाविषयी आपण या लेखातून अधिक माहिती घेऊ.

"लेट ब्लाइट" (Late Blight)नावाचा रोग मानव जातीचा जुना शत्रू आहे. 1845 मध्ये आयर्लंडमध्ये बटाट्याचं पूर्ण पीक नष्ट होण्यामागे पिकांना झालेला हा रोगच होता.

'फायटोप्थोरा इन्फेस्टन्स' नावाच्या एका बुरशीमुळे होणारा हा रोग बटाट्याच्या रोपाला नष्ट करतो. या रोगामुळे बटाटा खराब होतो परिणामी तो खाण्यायोग्य राहत नाही.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये पंजाबच्या काही भागात या रोगानं कहर केला होता. काही भागात तर या रोगामुळे बटाट्याचं 80 टक्के पीक नष्ट झालं होतं.

या रोगाचा जिवाणू उष्ण वातावरणात वेगानं पसरतो. मागील काळात पेरूतील अॅंडीज पर्वतरांगेतील उंच प्रदेशात हवामान उष्ण झाल्यामुळे या जिवाणूमुळे तिथलं बटाट्याचं पीक नष्ट झालं आहे.

पेरूमध्ये बटाट्याच्या उत्पादनावर संशोधन करणाऱ्या इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर (सीआयपी) या संशोधन संस्थेचे वैज्ञानिक, स्वत:हून 'लेट ब्लाइट' रोगाचा सामना करू शकेल अशी बटाट्याची नवी जात शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

बटाट्याची नवी जात : माटिल्डे

यासाठी वैज्ञानिक बटाट्याच्या अशा वन्य जातींच्या वैशिष्ट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते ज्या जातींची लागवड केली जात नाही.

वैज्ञानिकांना बटाट्याच्या काही वन्य जातींमध्ये या रोगाशी लढण्याचे गुण आढळल्यानंतर त्यांनी बटाट्याची वन्य जात आणि शेतीत लागवड केली जाणारी जात यामध्ये क्रॉसब्रीडिंग केलं आणि या माध्यमातून बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती विकसित केल्या.

आता बटाट्याच्या या नव्या जातींच्या चाचणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांची मदत घेण्यात आली. त्या शेतकऱ्यांनी फार छोट्या प्रमाणात या नव्या जातींची लागवड केली. यानंतर या शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांना कोणत्या प्रकारच्या जातीची लागवड करू इच्छितात आणि त्यांना कोणत्या जातीचा बटाटा खायला आवडेल.

वैज्ञानिकांच्या या नव्या शोधाचा परिणाम म्हणजे 'माटिल्डे'. ही बटाट्याची नवी जात असून त्याला वैज्ञानिकांनी 2021 मध्ये जाहीर केलं होतं. या जातीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आता वेगळ्या कीटकनाशकांची आवश्यकता नसते. कारण बटाट्याच्या या जातीवर 'लेट ब्लाइट' रोगाचा परिणाम होत नाही.

जर्मनीतील बॉन येथे असलेल्या क्रॉप ट्रस्टमध्ये वैज्ञानिक म्हणून काम करणारे बेन्जामिन किलियन म्हणतात, "एखादया विशिष्ट रोगाविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता विकसित करणं सर्वसाधारणपणे सोपं असतं."

नवीन जातींच्या चाचण्या

माटिल्डे ही बटाट्याची नवी जात विकसित करण्यासाठी क्रॉप ट्रस्ट पेरूतील वैज्ञानिकांबरोबर काम करत होता. याशिवाय ही संस्था इतर अनेक पिकांच्या नव्या जातींवरदेखील काम करते आहे.

कोणत्याही एका रोगासंदर्भातील रोगप्रतिकारक क्षमतेची बाब सर्वसाधारणपणे एका जनुकाशी निगडीत असते. मात्र दुष्काळ, जमीन अधिक क्षारपट असणं यासारख्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी वैज्ञानिकांना शंभर पेक्षा अधिक जनुकांना तोंड द्यावं लागू शकतं.

दुष्काळात रोपानं तग धरावी यासाठी वैज्ञानिक वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणण्याबाबत विचार करतात. उदाहरणार्थ दुष्काळाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी रोपाला लवकर फूलं येणं, रोपाच्या पानातून पाण्याचं होणारं बाष्पीभवन थांबवणं, रोपाची मुळे लांब असणं जेणेकरून रोप अधिक पसरू शकेल आणि पाण्यापर्यंत पोहोचू शकेल.

आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर्सपासून ते समुदायाच्या सीड बॅंक आणि शेतकऱ्यांबरोबर बेन्जामिन किलियन काम करतात. असे शेतकरी जे एखाद्या पीकाबद्दल आपली मतं व्यक्त करतात आणि नवीन जातींच्या चाचणीसाठी मदत करतात.

किलियन म्हणतात, "आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांची मतं ऐकतो. कधी-कधी एकाच कुटुंबातील लोकांची पिकाबद्दलची आवड वेगवेगळी असते."

अन्नसंस्था

महिला चव आणि पोषणाबद्दल अधिक काळजी करतात तर पुरुष पिकांच्या उत्पादनावर अधिक लक्ष देतात. शेतीशी संबंधित चर्चेत पिकाचा उतारा किंवा उत्पादन (प्रति युनिट जमिनीतून मिळालेलं पिकाचं उत्पादन) हा नेहमीच एक महत्त्वाचा विषय असतो.

किलियन म्हणतात की "कोणत्याही परिस्थितीत पिकाचं उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांमुळे फूड सिस्टम किंवा अन्न व्यवस्था अधिक निरस होते आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींची संख्या जास्त झाली आहे."

ते म्हणतात, "चांगल्या परिस्थितीत आणि लागवडीसाठी अधिक खर्च करून चांगलं पीक घेता येऊ शकतं मात्र यामध्ये सर्वच्या सर्व पीक गमावण्याचा धोका देखील असतो. बहुतांश शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट आवश्यक आहे की त्यांनी सर्व प्रकारच्या वातावरणात स्थिर आणि हमखास उत्पादन देणाऱ्या पिकांचीच लागवड करावी."

किलियन म्हणतात की ते ज्या प्रकल्पावर काम करत आहेत त्यामध्ये त्यांनी 'ग्रास पी' ची एक नवी जात तयार केली आहे. ही नवी जात पूर आणि दुष्काळसारख्या कठीण परिस्थितीतसुद्धा तग धरू शकते.

किलियन सांगतात की "ग्रास पी मध्ये एक प्रकारचं अॅसिड असतं. ज्याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यानं माणसाला आजारांना तोंड द्यावं लागू शकतं. याच प्रकारे वॉटर फर्न या रोपाची पाण्याविना वेगानं वाढ होते. मात्र या प्रकारच्या रोपांच्या क्षमतांकडे लोकांचं दुर्लक्ष झालं आहे."

हवामान बदल

पारंपारिक पिकांच्या वाढीसाठी अधिक वेळ लागू शकतो आणि श्रम देखील जास्त करावे लागू शकतात.

कॅलिफोर्निया विद्यापीठात इन्स्टिट्यूट फॉर जिनोमिक इनोवेशन (आयजीआय) चे कार्यकारी संचालक ब्रॅड रिगिसन म्हणतात की 'अशा परिस्थितीत चांगल्या जातींसाठी जीन एडिटिंग ही एक योग्य पद्धत ठरू शकते.'

ते म्हणतात, "मोठ्या प्रमाणात रोग समोर येत आहेत आणि हवामान बदलामुळे देखील त्रास वाढला आहे."

ते सांगतात की "पिकांनी रोगांसमोर तग धरावी यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्याऐवजी जीन एडिटिंग करणं ही अधिक योग्य पद्धत आहे."

पिकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेव्यतिरिक्त आयजीआय पिकांमध्ये दुष्काळावर मात करण्याची क्षमता निर्माण करावी यावर देखील काम करते आहे.

जीन एडिटिंग पद्धतीचा वापर करून बनवण्यात आलेल्या धान्याच्या काही जातींची चाचणी कोलंबिया घेतली जाते आहे. रोपांमध्ये जास्तीत जास्त पाणी राहावं, यासाठी या जातींतील रोपांमध्ये पानांवरील छिंद्रांची संख्या कमी करण्यात आली होती.

जीन एडिटिंगद्वारे तयार करण्यात आलेल्या जातींचा विपरित परिणाम होऊ नये यासाठी या जातींची चाचणी घेणं अत्यंत आवश्यक असतं.

जीन एडिटिंग

आयजीआयकडून धान्याच्या अशा जाती तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ज्यांच्यावर अधिक पाण्याचा किंवा कमी पाण्याचा परिणाम होणार नाही. फिलिपाईन्समध्ये या संस्थेने धान्याची एक अशी जात तयार केली आहे जी अनेक आठवडे ओलाव्यात राहिल्यावर देखील खराब होत नाही.

मात्र युरोपियन संघामध्ये जीन एडिटिंगवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकारे तयार करण्यात आलेल्या पिकांच्या जातींच्या विस्तारासाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अर्थात इंग्लंड आणि केनिया सारख्या देशांनी आता जीन एडिटिंगला कायदेशीर मान्यता दिली आहे.

जीन एडिटिंगचा विस्तार वेगानं होतो आहे. मात्र अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील एक कंपनी या तंत्रज्ञानाला आणखी विकसित करू इच्छिते. ही कंपनी आहे 'इनारी'.

एका वेळेस एक जीन नाही तर अनेक जीन्सची एडिटिंग करण्याचा या कंपनीचा प्रयत्न आहे. यामुळे हवामान बदलासारख्या संकटाला तोंड देण्यास मदत होईल. कारण हवामान बदलामुळे पिकांवर एकावेळेस एकापेक्षा अधिक गोष्टींचा परिणाम होऊ शकतो.

ही कंपनी सध्या मका, सोयाबीन आणि गहू या पिकांवर संशोधन करते आहे.

बियाणांचं व्यवस्थापन

अर्थात या प्रकारे जीन एडिटिंग करण्यात आलेल्या जातींची एक समस्या शेतकऱ्यांना देखील आहे. काही लोकांना चिंता वाटते आहे की यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्यात आल्यावर त्यांना बियाणं ठेवता येणार नाही आणि बियाणांसाठी त्यांना बाजारपेठेवर अवलंबून राहावं लागेल.

आफ्रिकन सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी सारख्या संघटनांची मागणी आहे की बियाणांच्या व्यवस्थापन कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांच्याच हाती राहिलं पाहिजे. कारण कंपन्या तंत्रज्ञानाचं कारण देऊन बियाणांचं पेटेंट घेऊ शकतात.

हवामान बदलामुळे येणाऱ्या काळात अनेक लोकांना नाईलाजानं आपल्या खाण्याच्या पद्धतीत बदल करावा लागू शकतो. कोको आणि केळीसारख्या पिकांवर हवामान बदलाचा परिणाम आधीच होताना दिसतो आहे.

अशा परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचा आणि पिकांच्या वेगवेगळ्या जातींचा फायदा घेणं उपयुक्त ठरू शकतं.

बेन्जामिन किलियन म्हणतात की "मला वाटतं की आपण सर्वच प्रकारच्या पिकांच्या वैविध्याला महत्त्व दिलं पाहिजे. आपण फक्त काही महत्त्वाच्या पिकांवरच अवलंबून राहू शकत नाही."