You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुर्कीतल्या भूकंपानंतर बचावपथक कसं काम करत आहे? त्यांना कुत्रे कशी मदत करतात?
- Author, तमारा कोवाचेविच
- Role, बीबीसी न्यूज
तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हजारो लोकांचा जीव गेला. 6 फेब्रुवारीला इथे भूकंपाचे धक्के जाणवले होते पण दहा दिवसांनीही बचाव कार्य संपलेलं नाही.
अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. काही ठिकाणी अजूनही मदत पोहोचतेच आहे, त्यामुळे लोकांनी स्वतः ढिगारे उपसण्यास सुरुवात केली.
बचाव कार्यासाठी जगभरातल्या टीम्स तुर्की आणि सीरियामध्ये दाखल झाल्या आहेत.
भारताच्या NDRFच्या टीमनंमही इथे ऑपरेशन दोस्ती अंतर्गत मदत कार्याला बचाव कार्याला हातभार लावला आहे.
पण अशा आपत्तीनंतर ही बचाव पथक नेमकं कसं काम करतात?
‘सर्च अँड रेस्क्यू’ ऑपरेशन कसं चालतं?
एखाद्या भूकंप झालेल्या ठिकाणी बचाव पथक पहिल्यांदा दाखल होतं तेव्हा ते सर्वात आधी इमारतींची कोसळलेल्या इमारतींची पाहणी करतात आणि त्यात कुठल्या इमारतींमध्ये लोक अडकलेले असण्याची शक्यता असेल याचा विचार करतात.
त्यासाठी ते ढिगार्यामध्ये कुठे मोकळ्या जागा असतील याचा शोध शोध घेतात. साधारणपणे मोठे काँक्रीटचे बीम्स जिने यांच्याखाली लोक अडकलेले असण्याची शक्यता असते.
इमारत पूर्णपणे ढासळली नसेल, तरी ती पुढच्या एखाद्या आफ्टर शॉकदरम्यान पडण्याचा धोका विचारात घेतला जातो. तसंच गॅस लिक, पाण्याचे फुटलेले पाईप, पत्रे आणि अन्य धोकेही विचारात घेतले जातात.
प्रत्यक्ष बचाव कार्य करणारी टीम अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असते तेव्हा सपोर्ट टीममधले काही सदस्य इमारतीच्या हालचाली आणि आवाजांवरती वरती लक्ष ठेवून असतात.
म्हणजे बचाव कार्यादरम्यान इमारत पुन्हा कोसळणार नाही याची खबरदारी घेतली जाते.
ज्या इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत तिथे सर्वात शेवटी बचाव कार्य केलं जातं. कारण अशा इमारतीमध्ये कुणी वाचलं असण्याची शक्यता अतिशय कमी असते.
आपत्ती नंतरच्या मदतकार्याचं व्यवस्थापन आणि नियोजन संयुक्त राष्ट्रांतर्फे किंवा स्थानिक देशातील अशा समन्वय साधणाऱ्या संस्थेमार्फत केलं जातं.
रेस्क्यूअर म्हणजे बचाव कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष ट्रेनिंग दिलेलं असतं. ते साधारणपणे दोन किंवा जास्त जणांच्या टीममध्ये काम करतात. अनेकदा बचाव कार्यात स्थानिक रहिवाशांची ही मदत घेतली जाते.
बचाव कार्यात यंत्रांचा वापर
कोसळलेल्या इमारतींचे ढिगारे उपसण्यासाठी बचाव पथक अनेकदा क्रेन, खोदकाम करणारी यंत्र, हायड्रोलिक जॅक्स अशा यांत्रिक उपकरणांची मदत घेतात.
सिमेंट काँक्रीटचे मोठे स्लॅब दूर करण्यासाठी अशा यंत्रांची मदत घेतली जाते त्यामुळे बचाव पथकाला स्लॅब खाली अडकलेल्या लोकांना शोधण्यास मदत होते.
काही वेळा एखाद्या लवचिक दांड्याला लावलेला छोटा कॅमेरा ढिगाऱ्यातल्या मोकळ्या फटीतून किंवा काँक्रीट मधल्या भेगांमधून आत सोडला जातो आणि आत कोणी कुठे अडकलं आहे का, याचा शोध घेतला जातो.
काही साऊंड इक्विपमेंट्स काही मीटरच्या परिसरातला अगदी बारकासा आवाजही नोंदवतात, ज्याचा वाचलेल्या लोकांचा शोध घेण्यात फायदा होतो.
काही वेळा बचाव पथकातील एखादा सदस्य एखाद्या ठिकाणी तीनदा काहीतरी ठोकून आतून कुणाचा प्रतिसाद मिळतोय का हे तपासून पाहतो. त्यामुळेच जिथे बचाव कार्य सुरू आहे, तिथे अगदी शांतता बाळगणं गरजेचं असतं.
जे लोक ढिगार्याखाली बेशुद्ध झाले आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी कार्बन डाय-ऑक्साइड डिटेक्टरचाही वापर केला जातो. विशेषतः छोट्या जागी असे डिटेक्टर उपयोगी पडतात ठरतात कारण उच्छ्वासातून बाहेर पडलेला पडलेल्या कार्बन डाय-ऑक्साइडचं प्रमाण कुठे जास्त आहे त्याचा माग काढून बेशुद्ध व्यक्तीपर्यंत पोहोचता येतं.
थर्मल इमेजिंग इक्विपमेंटही बचाव पथकाला थेट डोळ्यासमोर न दिसणाऱ्या व्यक्तींचा माग काढण्यासाठी मदत करतं कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारी उष्णता आसपासच्या ढिगार्यावरही परिणाम करत असते.
रेस्क्यू डॉग्स काय काम करतात?
कुत्र्यांचं घ्राणेंद्रीय म्हणजेच त्यांचं नाक अतिशय तीक्ष्ण असतं.
विशेष ट्रेनिंग दिलेले कुत्रे ढिगाऱ्याखाली माणसं कुठे अडकली आहे त्याचा शोध घेऊ शकतात आणि अशा जागीही जाऊ शकतात जिथे बचाव पथकातले सदस्य पोहोचू शकत नाहीत.
कुत्रे माणसांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त मोठ्या परिसरात अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेऊ शकतात.
हातांनी ढिगारे उपसले जातात का?
मोठे स्लॅब आणि वासे यंत्रांनी दूर केले की मग बचाव पथकातले सदस्य हातांनी किंवा हातोडी, छिन्नी, कुदळ, फावडं, मेटल कटर अशा छोट्या यंत्रांचा वापर करून ढिगार्यातली माती, स्टीलचे बार दूर करतात.
बचाव पथकाकडे हेल्मेट आणि हातमोज्यांसारखी सुरक्षा कवचं असतात ज्यामुळे त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात येण्याची शक्यता कमी होते.
त्यांना असा पोशाख दिलेला असतो जो पाऊस, वारा, थंडी किंवा आगीपासूनही संरक्षण करू शकतो.
पण तुर्की आणि सिरियामध्ये अनेक ठिकाणी जिथे बचाव पथकं पोहोचू शकली नाहीत किंवा काम धीम्या गतीने होत आहे तिथे स्थानिक रहिवासीही शून्यापेक्षा कमी तापमानात हातांनीच ढिगारे उपसत आहेत.
दक्षिण तुर्कीतल्या आदानामधील बेदीया गुकुम यांनी बीबीसीला सांगितलं, “ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत असल्याची शक्यता निर्माण झाली की मोठी यंत्र बंद केली जातात. मग आम्ही हातानेच ढिगारा दूर करतो. आम्हाला चांगल्या वर्क-ग्लोव्हजची गरज आहे, कारण इथे कडाक्याची थंडी पडली आहे आणि त्यामुळे हातानेच ढिगारे उपसाताना आमचा वेग कमी होतो.”
बचाव कार्य कधी थांबवतात?
संयुक्त राष्ट्रांची बचाव कार्याचा समन्वय करणारी संस्था किंवा देशातील केंद्रीय आणि स्थानिक सरकार हा निर्णय घेतात.
साधारणपणे आपत्ती नंतर पाच ते सात दिवसांनी किंवा सलग एक-दोन दिवस कोणीही जिवंत सापडलं नाही, तर अशा परिस्थितीत बचाव कार्य थांबवलं जातं. पण काही वेळा त्यानंतरही ढिगार्याखाली लोक जिवंत राहिल्याचं आढळून आलं आहे.
2010 साली हैतीमध्ये आलेल्या भूकंपानंतर सत्तावीस दिवसांनी एक माणूस ढिगाऱ्याखाली जिवंत असल्याचा समज दिसून आलं होतं.
2013 साली बांगलादेशात कोसळलेल्या एका इमारती खालून एका महिलेला 17 दिवसांनी वाचवण्यात आलं होतं.
तुर्की आणि सीरियात दहा दिवसानंतरही ढिगाऱ्याखालून लोकांचे आवाज येत असल्याचं काही ठिकाणी बचाव पथकांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)