30-40 विद्यार्थ्यांना शाळेत डांबून ठेवलं?पुण्यातल्या शाळेविरोधात तक्रार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्या खालीलप्रमाणे –
1. 30-40 विद्यार्थ्यांना शाळेत डांबून ठेवलं? पुण्यातल्या शाळेविरोधात तक्रार
शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर 30 ते 40 विद्यार्थ्यांना पाच तास डांबून ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. वाघोलीमध्ये नामांकित असलेल्या लेक्सिकाँन शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
ही बातमी News18 लोकमतने दिली आहे.
तसंच पालक जोपर्यंत येथे येत नाहीत आणि जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सोडणार नाही, अशी धमकीही विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर देण्यात आली असा आरोप पालकांनी केली आहे.
याबाबत पालकांनी शाळा व्यवस्थापनाला जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शाळेवर तक्रारी अर्ज दाखल केला आहे. तसेच शाळेवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी पालकांनी केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिल्याचं वृत्तत म्हटलं आहे.
2. शेकडो गरोदर महिला उसतोड कामगार, मानवाधिकार आयोगाकडून दखल
आपली आणि आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी गरोदर असतानाही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिला मजुरांची दखल थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली आहे.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पुढील एका महिन्यात याबाबतचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे.
ऊसतोड मजुरी करणाऱ्या महिलांपैकी दहा टक्के गर्भवती महिला आहेत, मात्र त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या लाभांबद्दल माहिती नसल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्याला नोटीस पाठवली आहे.
3. कॉलेजमधल्या सिक्युरिटी गार्डकडून विद्यार्थ्यांना लाठीने बेदम मारहाण
सांगलीतल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधल्या सिक्युरिटी गार्डकडून क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतक्यावर न थांबता तर विद्यार्थी तिथून निघून गेल्यानंतर त्यांच्या घरात घुसून पुन्हा त्यांना मारहाण करण्यात आली.
ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार सिक्युरिटी गार्डवर सांगलीतल्या संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बीसीएसच्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी परीक्षा झाल्यावर घरी जात असताना कॉलेजच्या आवारात असलेल्या गाड्यांजवळ सेल्फी काढत होते. त्याचवेळी कॉलेजचे दोन-चार सिक्युरीटी गार्ड तिथे आले आणि त्यांनी विद्यार्थ्याना लाठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत विद्यार्थ्यांच्या पाठिवर, खांद्यावर आणि डोक्यावर लाठीने हल्ला केला.
4. मुस्लीम समाजापर्यंत पोचा: पंतप्रधान मोदी
देशात 2023 मध्ये 9 राज्यांच्या विधानसभा आणि 2024 साली लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सखोल रणनिती ठरवण्यासाठी नुकतंच भाजपाचं राष्ट्रीय मंथन पार पडलं.
यावेळी मतांची अपेक्षा न ठेवता मुस्लिमांसह अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना केलं. तसेच, लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मजबूत करण्यासाठी विविध सूचनाही पंतप्रधानांनी केल्या आहेत.
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, “मतांची अपेक्षा न ठेवता भाजपा कार्यकर्त्यांनी मुस्लीम व्यावसायिक, बोहरा आणि पसमंदा मुस्लीम समुदायातील लोकांना भेटावं. तसेच, विद्यापीठ, चर्चला भेट द्या. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेअंतर्गत सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करावं.”
5. महिलेची छेड काढणारा पोलीस अधिकारी निलंबित
महिलेची छेड काढत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले औरंगाबादचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
गृहविभागाने या संदर्भातील आदेश काढले असल्याची माहिती आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या संदर्भात ट्वीट करत कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
ही बातमी सरकारनामाने दिली आहे.
दारू पिऊन महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








