सेटनिक टेम्पल : 'सैतानाच्या' या पंथाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रिबेका सील्स
- Role, बीबीसी न्यूज, बॉस्टन
सेटॅनिस्ट्स म्हणजे सैतानांचं संमेलन... जगातलं कदाचित आतापर्यंतचं सर्वात मोठं सेटनिस्ट गॅदरिंग अमेरिकेत बॉस्टन शहरात मॅरिएट हॉटेलमध्ये भरणार होतं. त्यामध्ये उपस्थित राहून जवळून पाहिलेलं हे सैतानांचं जग... किती माहिती आहे तुम्हाला अशी माणसं असतात? देवाला न मानणाऱ्यांचा असा त्यांचा वेगळा पंथ असतो?
एका अंधाऱ्या पण मेणबत्त्यांनी उजळवलेल्या या खोलीत सेटनिक सेरेमनी अर्थात सैतान पंथीयांचे काही विधी/सोपस्कार होणार आहेत.
'द लिटल ब्लॅक चॅपेल' अशी नियॉन साइनने उजळलेली अक्षरं तुमचं स्वागत करतात. खोलीत एका बाजूला उंच मंच आहे आणि त्याच्यासमोर पांढऱ्या रंगाची उलटी चांदणी जमिनीवर रेखाटलेली दिसते.
ही सगळी तयारी आहे 'अनबॅप्टिझम'ची. बॅप्टिझम म्हणजे ख्रिश्चन धर्मीयांचा महत्त्वाचा संस्कार तुम्ही ऐकला असेल.
या संस्कारांमधून ख्रिश्चन धर्मात तुम्ही प्रवेश करते होता. सहसा अगदी लहान वयातच मुलांचं बॅप्टिझम केलं जातं. आता हे अनबॅप्टिझम म्हणजे हे चर्चचे संस्कार झुगारून देण्याचा विधी.
इथे -सैतान संमेलनाला आलेल्यांमध्ये बाप्टिझमचा संस्कार लहानपणीच -अजाणतेपणी झालेल्यांनी तो झुगारून टाकण्यासाठी हे अनबॅप्टिझम करायचं ठरवलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"आमचं नाव घ्यायचं नाही", या अटीवर एका सेटनिस्टने मला त्यांच्या या सोहळ्यात सहभागी व्हायला परवानगी दिली. ओळख उघड न करण्याच्या अटीवरच मी तिथे गेले आणि या समाजाबद्दल, त्यांच्या पंथाबद्दल अगदी जवळून जाणून घ्यायची संधी मिळाली.
तिथे उपस्थित बहुतेकांनी पायघोळ अंगरखे घातले होते आणि चेहऱ्यावर काळा मास्क होता. हात दोराने बांधलेले होते. हा दोर कापून टाकणं हे मुक्तीचे संकेत होते.
या विधींमध्ये धार्मिक जोखडातून मुक्त होणं अपेक्षित होतं. बायबलची पानंही फाडून टाकण्यात आली. धर्ममुक्त व्हायचा एक प्रभावी अनुभव या कृतीतून त्यांना येत असणार हे निश्चित.
या पंथात सामील झालेल्यांशी बोलताना याची जाणीव झाली.
"एक गे - समलिंगी म्हणून वाढताना मी नकोसा आहे, तिरस्करणीय आहे आणि माझ्यासारखे लोक संपून गेले पाहिजेत या विचारांचीच माझ्याभोवती कोंडी होती. सेटॅनिक टेम्पल सापडल्यावर मला अपेक्षित सहानुभूती मिळाली आणि इथे मला तार्किकतेच्या आधारावर स्वीकारलं गेलं. "
सेटॅनिक टेम्पल या पंथाला अमेरिकेन सरकारने वेगळा धर्म म्हणून मान्यता दिलेली आहे. अमेरिकेसह युरोप आणि ऑस्ट्रेलियातही यासाठी मंत्रालय, खाती आणि महामंडळं आहेत.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत बॉस्टन इथे हे सैतानांचं संमेलन ज्याला त्यांनी SatanCon असं नाव दिलं होतं ते पार पडलं. 830 हून अधिक लोकांनी यासाठी तिकिटं घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images
ख्रिश्चन धर्मीयांमध्ये सैतान किंवा डेव्हिल अशी संकल्पना आहे. त्याच्याशी निगडीत नरकाचीही आहे. पण हे सैतानपंथीय या संकल्पनेचा शब्दशः अर्थ घेत नाहीत आणि तसं काही मानतही नाहीत.
त्यांच्या मते, सैतान किंवा सेटॅन (Satan) म्हणजे निरंकुश अधिकाराला प्रश्न विचारण्यासाठी आणि विज्ञानाधारित विचारांना आधार देण्यासाठी वापलेलं एक रूपक आहे. या विचारांवर विश्वास ठेवणारा समाज म्हणजेच आमचा धर्म आहे, असं ते म्हणतात.
लग्नकार्य वगैरे विधींदरम्याने ते सैतानाच्या सांकेतिक चिन्हाचा वापर मात्र आवर्जून करतात. म्हणजे नवीन नाव घेत असतील त्या वेळी किंवा लग्नाच्या वेळी उलटा क्रॉस ते नियॉन साइनच्या माध्यमातून प्रतीकात्मक पद्धतीने झळकवतात किंवा मंचारून 'Hail Satan' असा सैतानाचा जयजयकार करतात.
अनेक ख्रिश्चनधर्मीयांना ही सरळ सरळ ईश्वरनिंदा वाटते.
सेटॅनिक टेम्पलचे प्रवक्ते डेक्स डेसयार्डिन्स हे मान्यही करतात. ते म्हणतात, "तसं वाटणं सहाजिक आहे. कारण आम्ही वापरतो ती बरीचशी प्रतीकं निंदनीय म्हणूनच ओळखली जातात. "
"आमच्यातले अनेक लोक उलटा क्रॉस परिधान करतात. आम्ही आमच्या संमेलनाच्या उद्घाटनाच्यावेळी शोषणाविरुद्धचं प्रतीक म्हणून आणि धार्मिक दडपशाहीचा विरोध म्हणून बायबलची पानं फाडली हे खरं आहे. धार्मिक दबावामुळे खचलेले, विशेषतः LGBTQ, BIPOC समाजातले अनेक जण, स्त्रिया असे धर्मकारणाने गांजलेले लोक आमचे सदस्य आहेत. "
आम्हाला लोकांचा अनादर करायचा नाही किंवा त्यांच्या भावना दुखावण्याचाही हा प्रयत्न नाही. उलट आपापला धर्म, पंथ, विश्वास, श्रद्धा निवडण्याचा ज्याला त्याला अधिकार आहे, असंच आम्ही मानतो, असं सेटॅनिस्ट सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
पण मी तिथे संमेलनासाठी असताना अनेक संप्रदायांतले ख्रिश्चन आंदोलक हॉटेलबाहेर जमा झाले आणि नरकात जाण्याचा शाप देणारे, तसा इशारा करणारे फलक त्यांच्या हातात होते.
"गॉस्पेलवर विश्वास ठेवा नाहीतर पस्तावाल", असं एक फलक सांगतो. "सर्व प्राइडच्या मुलांवर सैतान राज्य करतो" या फलकावर PRIDE हा शब्द इंद्रधनु रंगात रंगवलेला होता म्हणजे LGBTQ प्राइड फ्लॅगशी नातं सांगणारा होता.

फोटो स्रोत, Getty Images
मायकेल शिव्हलर हे एका सनातनी कॅथलिक पंथाच्या अनुयायांपैकी एक म्हणून या आंदोलकांमध्ये सहभागी होते.
ते म्हणाले, "आम्हाला ईश्वराला दाखवून द्यायचं आहे की अशा प्रकारे निंदानालस्ती आम्ही सहन करणार नाही आणि सैतानांसाठी आम्ही कॅथलिक्सनी सार्वजनिक जागा अशा खुल्या सोडलेल्या नाहीत, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे."
तिकडे आत संमेलनासाठी आलेल्यांनी लॉबीमधून हे आंदोलनाचं दृश्य एव्हाना पाहिलेलं असतं. "ते आपल्याला अश्लाघ्य भाषेत हिणवतायत", एकाने बाहेरच्या व्यक्तींचं एक अश्लील शिव्यांचं संभाषणच आत ऐकवलं. "अरेरे, ते आकाशातले बाबा माझ्यावर चिडलेत वाटतं..." दुसऱ्याने त्यावरही विनोद केला.
सैतानाची शिंगं आणि आत्मसुखाची संकल्पना
बॉस्टनच्या मॅरिएट हॉटेलमधला संपूर्ण चौथा मजला या संमेलनासाठी आरक्षित केला होता. रंगीबेरंगी भपकेबाज कपडे, पायघोळ अंगरखे, अँड्रोजिनस स्टाइल म्हणजे - स्त्री-पुरुष असा भेद नाकारणारी फॅशन केलेले, कुणी चित्र-विचित्र टॅटू काढलेले तर कुणी कुर्रेबाज मिशा ठेवणारे अशा अतरंगी माणसांनी हा मजला भरून गेला होता. कुणी कुणी तर हाताने रंगवलेली शिंगंसुद्धा लावून हिंडताना दिसले.
इथे उपस्थित असलेले अनेक जण स्वतः पालक होण्याच्या वयाचे आहेत. अनेक जण त्यांच्या आयुष्यात पालक झालेलेही आहेत. मला एक बाबागाडीसुद्धा दिसली.
वेगवेगळ्या विषयांवरचे सेमिनार आणि प्रेझेंटेशन इथे दिली जात आहेत.
"Hillbillies: Visible Satanism in Rural America" नावाने एक प्रेझेंटेशन इथे झालं आणि आता Satanism and self-pleasure या विषयावर एक सेमिनारही आहे.
राजकीय चळवळींसाठी हा सेटॅनिक टेम्पल धर्म विशेषत्वाने ओळखा जातो. धर्म आणि राज्य या गोष्टी वेगवेगळ्याच ठेवल्या पाहिजेत, अशी त्यांची धारणा आहे. या दोन गोष्टींची सरमिसळ होऊ नये यासाठी त्यांचे कार्यकर्ते वारंवार अमेरिकन कोर्टात खटले दाखल करत असतात. त्यांचा मुद्दा निश्चितच गंभीर आहे. पण त्यावर विडंबनात्मक टिप्पणी करत खिल्ली उडवणं किंवा अत्यंत आक्रमकपणे वाईट शब्दांत किंवा तऱ्हेवाईकपणे ही लढाई लढणं यात सेटॅनिस्टना अधिक आनंद वाटतो.

फोटो स्रोत, Getty Images
उदाहरणार्थ ओकलाहोमामध्ये Monument of the Ten Commandments म्हणजे ख्रिश्चन धर्मीयांना शिरसावंद्य असणाऱ्या दहा आज्ञांविषयी एक स्मारक उभारलं असता त्याला विरोध म्हणून 8 फुटांचा सैतानाचा पुतळा स्टेट कॅपिटॉलमध्ये उभारावा अशी अजब मागणी या पंथींयांनी केली. कारण तिथल्या कायद्यानुसार सर्व धर्मांना सारखीच वागणूक मिळायला हवी. (कोर्टात खटला दाखल झाल्यानंतर अखेर हे 10 आज्ञांचं स्मारक तिथून हलवावं लागलं.)
या पंथाचे लोक गर्भपाताचा हक्क मिळण्याविषयीसुद्धा लढा देत आहेत. प्रत्येकाला आपल्या शरीरावर हक्क आहे, असा त्यांचा या लढ्यातला युक्तिवाद आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी न्यू मेक्सिको इथे एक ऑनलाइन क्लिनिक सुरू केलं. इथून ते गर्भपाताच्या गोळ्या गरजेनुसार कुरिअर किंवा टपालाने पाठवून देतात.
त्यांनी गर्भपात करून घेणाऱ्यांसाठी एक धार्मिक विधीसुद्धा तयार केला आहे. ख्रिश्चन धर्माचा गर्भपाताला विरोध असल्याने तसं करता येत नाही यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या धर्मात एका विधीद्वारेच गर्भपाताला मान्यता देऊन टाकली. या विधीमध्ये गर्भपातापूर्वी केवळ तो करणाऱ्यांची संमती अपेक्षित आहे.
या ‘धार्मिक’ विधीच्या हेतूबद्दल बऱ्याच क्षेत्रातून टीका झाली. नॅशनल कॅथलिक रजिस्टर या कॅथलिक वर्तमानपत्राने तर या सोपस्काराचा उल्लेख - 'धार्मिक विधी आणि प्रतिकांचे विडंबन किंवा खिल्ली उडवण्यापलिकडे याला काहीच महत्त्व नाही'- असा केला.

फोटो स्रोत, Getty Images
गरीब आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींवर अबॉर्शन करण्याची वेळ आली तर त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या यलोहॅमर फंड नावाच्या संस्थेनेही सेटॅनिक टेम्पलच्या या नव्या धार्मिक विधीला विरोध करताना म्हटलं, "यापेक्षा हेच काम करणाऱ्या तळागाळातल्या संस्थांसाठी तुमचे पैसे आणि विश्वास खर्ची करणं हे अबॉर्शन अॅक्सेसला पाठिंबा देण्यासाठी अधिक योग्य ठरलं असतं."
गच्च भरलेल्या सभागृहात The Satanic Temple ने केलेल्या कामाची, चळवळींची माहिती देण्यात येत होती आणि या सैतानपंथीयांच्या प्रत्येक यशासाठी टाळ्या वाजवून, जोराने ओरडून आणि चक्क शिंगांचं प्रतीक दाखवत कौतुक करण्यात येत होतं.
आफ्टर स्कूल सेटॅन क्लब्ज - हा आणखी एक प्रोजेक्ट सर्वाधिक चर्चेत होता. याची घोषणाच 'सैतानाबरोबर शिक्षण' अशी आहे. शिक्षणात धर्म आणू नये, हे खरं तर ‘टेम्पल’वाल्यांचं तत्त्व. पण धर्मप्रचाराच्या उद्देशाने शाळेत येऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणाऱ्यांचा विरोध करण्यासाठी त्यांच्या धार्मिकतेने शाळेची पायरी चढलीच.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे जिथे स्थानिक लोकांनी विचारलं तिथे तिथे असे शाळेनंतरचे सैतान क्लब सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या क्लबामध्ये समाजसेवा, विज्ञान, कला आणि तर्कशुद्ध विचार यावर भर दिला जातो.
याला विरोध करणारे ‘सेटनिक टेम्पलचे प्रयत्न मुलांना घाबरवण्याचे’ असल्याची टीका करतात. पण सैतानपंथीयांचं म्हणणं आहे की, या क्लबात काहीही सैतानी कृत्य होत नाही. त्यांनी लहान मुलांसाठी एक गाणंही तयार केलं आहे.
माझा दोस्त सैतान- अशा अर्थाची शब्दरचना असणाऱ्या या गाण्यात बोकडाचं अॅनिमेशन वापरलं आहे. या गाण्याच्या ओळी काहीशा अशा आहेत.
'सैतान काही वाईट माणूस नाय,
तुम्ही फक्त विचारायला शिकलं पाहिजे का अन् काय.
सैतानाला तुम्ही आनंदाने बागडताना हवंय
आणि बरं का रे पोरांनो
नरक नावाची गोष्टच इथे नाय'
सेटन लव्हज यू
संमेलनाच्या ठिकाणी डझनभर स्टॉल्स लागले आहेत. तिथे कलाकारांनी सैतानाची प्रतीकं वापरून केलेल्या वस्तू विकायला ठेवल्या आहेत.
"Satan Loves You!" लिहिलेल्या कानटोप्या, माकड टोप्या आणि बॅफोमेट नावाचा बोकडाचं तोंड असलेला टेडी आहे. बॅफोमेट हा सैतान्यांचं चिन्ह आहे ज्याला पंखही आहेत.
आता सेटॅनिक टेम्पलवाले आपले टीशर्टही विकत आहेत. हा पंथ सदस्यांकडून कुठलीही फी आकारत नाही. त्यांचा सगळा कारभार हा निधी, दान आणि अशा प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीतून आलेल्या पैशावर चालतो.
'गुड नाईट बॅफोमेट' नावाचं लहान मुलांचं पुस्तक त्यांनी नुकतंच प्रकाशित केलं आहे. ते ही जाणाऱ्या येणाऱ्यांना आकर्षित करत आहे.
सेटॅनिक टेम्पलची आचारसंहिता किंवा मार्गदर्शिक संहिता सात तत्त्वांवर आधारित आहे. यामध्ये सहानुभूती, आपापल्या शरीरावर ताबा आणि लोकांच्या स्वातंत्र्याचा आदर याला प्राधान्य आहे. याशिवाय यामध्ये अपमान करण्याचं स्वातंत्र्य याचाही समावेश आहे.
मुलांच्या पुस्तकात हीच तत्त्व सांगताना छोट्या पद्यरचना किंवा यमक जुळवून गोष्ट सांगितल्या आहेत. याचं उदाहरण - 'पटणारी मतं नसली तरी सगळ्यांच्या असण्याचा आदर करा. त्यांचे शब्द तुम्हाला घायाळ करतील तर वाईट वाटून घेऊ नका, फक्त तुमच्याही शब्दांना मोकळं करा.'

फोटो स्रोत, Getty Images
कॅलिफॉर्नियाहून आलेल्या आर्सेली रोजास यांना या पंथीयांचे सिद्धांत पटणारे आणि आचारसंहिता सहज आचरणात आणता येण्यासारखे वाटतात.
'मला वाटतं मी नेहमीच त्या अर्थाने 'सैतान' होते. फक्त मला माहीत नव्हतं', त्या सांगतात.
त्यांना 2020 मध्ये टिकटॉकच्या माध्यमातून पहिल्यांदा सेटॅनिक टेम्पलबद्दल समजलं. "मी त्यांच्याबद्दल माहिती काढत होते तेव्हा थोडी घाबरलेलीच होते, मला वाटतं. अनेक जणांना अशीच भीती वाटत असणार. हे लोक खरोखर बाळांचे बळी वगैरे देणारे तर नाहीत ना...वगैरे. पण मग हळूहळू मला त्यांची ओळख पटली, संस्कृती समजली आणि मी त्यांच्या बैठकांना उपस्थित राहू लागले. हळूहळू मला जाणीव झाली. सैतानी म्हणावं असं इथे काहीच नाही. ही खूप प्रामाणिक आणि चांगली माणसं आहेत. फक्त ते त्याचा प्रतीक किंवा चिन्ह म्हणून वापर करतात."
स्टॉल्समधून फिरताना अनेक लोकांशी गप्पा झाल्या. तेव्हा बरीच मंडळी सांगत होती की, सेटॅनिक टेम्पलबद्दल 2019 मध्ये आलेल्या हेल सेटॅन नावाच्या डॉक्युमेंट्रीतून समजलं. पेनी लेन यांनी दिग्दर्शिक केलेला हा माहितीपट या पंथाची तत्त्वं आणि सुरुवातीच्या काळातल्या चळवळीविषयी सांगणारा आहे.
2019 मध्ये10 हजारच्या आसपास असलेली सैनात पंथीयांची सदस्यसंख्या आज 7 लाखांवर पोहोचली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बॉस्टनच्या संमेलनाला जमलेल्या लोकांमध्ये स्थानिक सरकारी कर्मचारी, डॉक्टर, इंजिनीअर, कलाकार आणि अर्थविश्व, समाजकारण, थेरपी, सर्कस अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक होते. यातले बरेच LGBTQ पैकी होते. अनेकांनी ख्रिश्चन धर्मीयांशी किंवा नॉन सेटॅनिस्टशी लग्न केलेलं होतं.
या सैतानपंथीयांमध्ये सामील व्हायला कुठली एक राजकीय विचारधारा असावी लागते असं नाही. पण अनेक सदस्य राजकीयदृष्ट्या डावीकडे झुकलेले दिसतात. टेम्पलतर्फे कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार नाही, हेही ते सांगतात.
ल्युसियन ग्रीव्ह्ज हे द सेटॅनिक टेम्पलचे सहसंस्थापक. ते वैयक्तिक सुरक्षारक्षकासह येतात. काळा ड्रेस आणि हातात थर्मास. "थर्मास उंचावत मला म्हणाले,"ब्रिटीश माल विकणाऱ्या एका दुकानातून मला मिळाला. इंग्लिश ब्रेकफास्ट टी."
सवयीप्रमाणे मी त्यांना 'ब्लेस यू' म्हणते तेव्हा ते माझ्याकडे बघून स्मितहास्य करतात.
ग्रीव्हज (अर्थात हे टोपण नाव आहे)यांनी गेल्या दशकात माल्कम जेरी (हेही टोपणनावच)या आपल्या मित्राबरोबर ही चळवळ सुरू केली. धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी ज्या ज्या वेळी ख्रिश्चॅनिटी किंवा धार्मिकता ही कायद्यांवर कुरघोडी करताना दिसेल तेव्हा विरोध केला.
माध्यमं, विशेषतः अमेरिकन वृत्त माध्यमं 'द सेटॅनिक टेम्पल'विषयी सांगताना लक्ष वेधून घेण्यासाठीचे प्रयत्न करणारे आणि स्वतःला धर्म म्हणवून घेणारे टवाळखोर अशी अवहेलना करतात. त्यावर ग्रीव्हज यांचा तीव्र आक्षेप आहे.
"आम्ही सांगतो ते पटत असलं तरी तसं तोंडावर सांगायला लोक संकोचतात. पण आमचं म्हणणं अगदी सरळ आणि रोखठोक आहे. आम्ही अजिबात स्वतःला चुकीच्या पद्धतीने दर्शवत नाही. कधी विपर्यास करत नाही. "
तुम्ही जर केवळ उपहास किंवा ट्रोल्ससारखे नाही हे सांगायचा प्रयत्न करताय तर मग त्या अबॉर्शन क्लिनिकला 'सॅम्युएल एलिटोज मॉम्स सेटॅनिक अबॉर्शन क्लिनिक' असं लांबलचक नाव देणं आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी गर्भपाताचा हक्क नाकारायला पाठिंबा दर्शवल्यानंतर ते टीशर्टवर लिहून मिरवणं हे योग्य होतं का?
"ते करण्यामागचा एक भाग होता की, कुठलीही गोष्ट शांतपणे आणि विनोदबुद्धी न वापरता सांगितली तरच ती खरी असते किंवा गंभीर असते ही कल्पना मोडीत काढायची होती आम्हाला..." ग्रीव्हज सांगतात की, आम्ही टेलिहेल्थ क्लिनिक सुरू करणं गंभीर नव्हतं का? आम्ही मुद्दा पटवून देण्यासाठी आमची विनोदबुद्धी बाजूला ठेवावी असं मला तरी अजिबात आवडणार नाही.
ग्रीव्हज हे अमेरिकेतले महत्त्वाचे सेटॅनिस्ट आहेत. त्यामुळे सैतान म्हणवून जगताना असणारा वैयक्तिक धोका बरोबर घेऊनच त्यांना वावरावं लागतं.
"गेल्या चार वर्षांत मी अनेक ठिकाणं बदलली. मी लोकांना माझ्या घरी बोलावू शकत नाही, कारण पुन्हा जागा बदलण्याची माझी इच्छा नाही."
सेटॅनिस्ट टेम्पलच्या अनेक सदस्यांना त्यांची ओळख सुरक्षेच्या कारणाने उघड करता येत नाही. कारण त्यांच्या जीवितासही धोता असतोच. काही सदस्यांनी त्यांचं सैतानपंथीय असणं उघड केल्यानंतर त्यांना नोकरी सोडावी लागली, काही जण मुलांच्या कस्टडीवरून सुरू असलेली कायदेशीर लढाई हरले तर काहींना तर त्यांच्या कारच्या खाली बनावट बाँबही आढळले.
चॅलिस ब्लाइथ या सेटॅनिक टेम्पलच्या रिलीजस रिप्रॉडक्टिव्ह राइट्स या मोहिमेच्या प्रवक्त्या आहेत. सैतान संमेलन सुरू असतानाच त्यांना ऑनलाइन छळाला सामोरं जावं लागतं. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बायबल फाडतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हॅरासमेंट सुरू झाली.
धमक्या येण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही. चॅलिस यांच्या एका कुटुंबीयानेच 2016 मध्ये त्यांच्या पंथाबद्दलची माहिती ऑनलाइन प्रसिद्ध केली होती. त्यानंतर एक बंदुकधारी थेट त्यांच्या घरावरच येऊन थडकला होता.
'तो बंदूक दाखवत ओरडत होता, यावर त्या चेटकिणीचं नाव लिहिलंय. तो नंतर तुरुंगात गेला हे मला समजलं. पण माझ्या आयुष्यात मोठा फरक करावा लागला. मला नाव कायदेशीररीत्या बदलून घ्यावं लागलं', चॅलिस सांगतात.
पण ते करायलाच हवं होतं, त्या सांगतात. "माझे शत्रू जर अशा प्रकारे इव्हँजेलिकल आणि कट्टरवादी धार्मिक मानसिकतेचे असतील आणि त्यांना माझे हक्क हिरावून घ्यायचे असतील तर तसे शत्रू असण्याचा मला अभिमानच आहे."
टायफून नीक्स या तिशीतल्या व्यक्तीने सैनातपंथीयात वावरण्यासाठी वेगळं नाव धारण केलं आहे. असं करणारे अनेक सदस्य आहेत. त्यांच्या या सैतानी नावाला ते सेटॅनीम असं म्हणतात.
मी आधी नास्तिक होतो, नुकताच सैतानपंथाकडे वळलोय, असं टायफून सांगतात.
"सेटॅनिझममध्ये मी जे मानत होतो ते सर्वकाही आहे. त्यात आदर, सहानुभूती, आपल्या शरीरावरचा आपला हक्क, विज्ञानवाद असं सगळंच आहे. ज्याला इतर समाजाने वाळीत टाकलंय, जे काही वेगळा विचार करतात अशा सगळ्यांना सैतान सामावून घेतात किंवा तेच त्यांचे प्रतिनिधी आहेत."
"ख्रिश्चन समाजाने माझ्या मित्रांना स्वीकारलेलं मी कधीच पाहिलं नाही. पण इथे सैतानाचं आवाहनच आहे मुळी- आहे तसं स्वीकारा आणि म्हणूनच मला हा पंथ किंवा हा सैतान जवळचा वाटतो... "
"मला माहितीये की सैतान असा खराखुरा अस्तित्वात नाही. तरीही हा पंथ जवळचा वाटतो."
हे वाचलंत का ?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








