You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोटात सतत गॅस आणि अपचन होत असेल तर हे 8 पदार्थ कारणीभूत असू शकतात
पादणं हे अगदीच नॉर्मल आहे. सामान्य माणूस दिवसातून 5 ते 15 वेळा पोटातला गॅस बाहेर सोडतो.
एखाद्या दिवशी पोटात भरपूर गॅस होणं हे चांगलं आरोग्य असण्याचं लक्षण आहे (अर्थात तुम्हाला तेव्हा वाटलेली अस्वस्थता आणि लाज थोडी विसरावी लागेल.) कारण ज्या पदार्थांमुळे गॅस तयार होतो ते पदार्थ फायबरयुक्त जटील कर्बोदकांनी बनलेले असतात, तुमचं शरीर त्याचं विघटन करू शकत नाही. पण तुमच्या आतड्यातले बॅक्टेरिया त्याचं विघटन करू शकतात.
इथं आपण कोणते अन्नपदार्थ तुमच्या पोटात गॅस तयार करतात आणि कोणत्या स्थितीत डॉक्टरकडे कधी जायचा निर्णय घ्यायचा याचा विचार करू. या 8 पदार्थांच्या यादीतल्या काही पदार्थांमुळे तुम्हाला धक्काही बसू शकतो.
1) मेदयुक्त पदार्थ म्हणजे मेदयुक्त मांस
मेदयुक्त पदार्थ हे संथगतीने पचतात. त्यामुळे ते तुमच्या आतड्यात सडतात, ते तिथंच आंबतात आणि मग त्याचा वास येऊ लागतो.
मेदयुक्त मांस हे पचायला दुप्पट कठीण असतं कारण त्यात अमायनो अॅसिड मिथिओनाइन असतं, आणि ते सल्फर तयार करतं.
तुमच्या आतड्यातले जीवाणू सल्फरचं विघटन हायड्रोडन सल्फाइडमध्ये करतात आणि त्याचा वास कुजलेल्या अंड्यांसारखा येतो. त्यामुळे पोटातून बाहेर सरणाऱ्या वायूला दुर्गंध येतो.
2. द्वीदल धान्यं
द्वीदल धान्यं आणि डाळींमध्ये भरपूर फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ असतात. त्यांच्यामध्ये रॅफिनोजही असतं.
हा एक साखरेचा जटील प्रकार आहे. तो व्यवस्थित पचत नाही. ही साखर तुमच्या आतड्यापर्यंत जाते. तेथे जीवाणू त्याचा उर्जेसाठी वापर करतात, या प्रक्रियेत हायड्रोजन, मिथेन आणि गंधयुक्त सल्फरही तयार होतो.
3. अंडी
लोकसमजुतीनुसार अंड्यामुळे फारसा फरक पडत नाही. मात्र अंड्यांमध्ये सल्फरयुक्त मिथेओनाईन असतं.
त्यामुळे गंधयुक्त पादणं नको असेल तर गॅस निर्माण करणाऱ्या द्विदल धान्यं, मेदयुक्त मांसाबरोबर अंडी खाणं टाळा.
जर अंड्यांमुळे तुमचं पोट फुगत असेल तर कदाचित तुम्हाला त्याची अॅलर्जी असू शकेल.
4. कांदा
कांदे आणि लसणांमध्ये फ्रुक्टन नावाचं कर्बोदक असतं. त्यामुळे गॅस धरणे, पोट फुगणे असे त्रास संभवतात.
5. दुग्धजन्य पदार्थ
गायी आणि शेळीच्या दुधापासून तयार झालेल्या पदार्थांत लॅक्टोज साखर असते त्यामुळे गॅस धरू शकतो.
जगातल्या 65 टक्के प्रौढांना थोड्याफारप्रमाणात दूध न पचण्याचा त्रास असतो. त्यामुळे त्यांना पोटफुगण्याचा त्रास संभवतो.
6. गहू आणि धान्यं
गॅस तयार करणारं फ्रुक्टन्स आणि त्यासाठी कारणीभूत असणारे फायबर्स ओट आणि गव्हाच्या काही पदार्थांमध्ये असतात.
त्यामुळे ब्रेड, पास्तासारखे पदार्थ वायू धरण्यासाठी कारण ठरू शकतात. जर तुम्हाला ग्लुटेन पचत नसेल तर तुम्हाला वायू धरण्याचा त्रास होऊ शकतो.
7. ब्रोकोली, कॉली, कोबी
कोबी, ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, मोड आलेली धान्यं आणि इतर हिरव्या भाज्यामध्ये भरपूर फायबर्स असतात. मात्र ती पचवण्याचा ताण पोटावर येऊ शकतो.
तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया त्यांचं रुपांतर ऊर्जेत करतात त्या प्रक्रियेत गॅस तयार होतो. अनेक क्रुसिफेरस भाज्यामध्ये सल्फर असतो त्यामुळे पोटातून सरलेल्या वायूला वास येऊ शकतो.
8. फळं
सफरचंद, आंबे, पेअर्ससारख्या फळामध्ये फ्रुक्टोजही नैसर्गिक साखर भरपूर असते. त्यात भर म्हणून सफरचंद आणि पेअर्समध्ये तंतुमय पदार्थही भरपूर असतात.
अनेक लोकांना फ्रुक्टोज पचवणं कठीण जातं, त्यांच्या पोटात गॅस धरू शकतो. अर्थात लॅक्टोज पचण्यात जितक्या लोकांना अडथळा असतो तितक्या प्रमाणात फ्रुक्टोज पचवण्यात अडथळे असलेले लोक नसतात.
तुम्ही पादणं थांबवू शकता का?
जर तुम्ही सध्या कमी प्रणाणात फायबर्स खात असाल तर जेवणात अचानक फायबर्स वाढवल्यास गॅस धरण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे फायबर्सचं प्रमाण तुमच्या जेवणात हळूहळू वाढवा.
पाणी भरपूर प्यायल्यामुळे बद्धकोष्ठ होण्याचा धोका कमी होतो, बद्धकोष्ठामुळे वायूचं प्रमाण वाढतं. जर विष्ठा तुमच्या पोटात राहिली तर ती सतत कुजतच राहिल. त्यामुळे वेळोवेळी भरपूर पाणी पीत राहिलं पाहिजे.
अनेक शीतपेयांमध्ये गॅस असतो. तुम्ही भरपूर प्रमाणात ही पेयं प्यालात तर तुम्हाला भरपूर ढेकर आणि वायू होईल.
फेसाळत्या पेयांमध्ये गॅस असतो, त्यामुळे अशी पेयं जास्त प्यायल्याने जास्त पादण्याची शक्यता असते.
च्युईंग गम खाणं किंवा चमच्याने सूप पिणं यांमुळेसुद्धा गॅस धरतो. आपण हवा पोटात जाऊ देतो तेव्हा तिचं काहीतरी रूपांतर होणं स्वाभाविकच आहे.
डॉक्टरांकडे कधी जायला हवं?
गॅसेस होणं आणि ते पास करणं ही फारशी गंभीर बाब नाही. जीवनशैलीत बदल आणि औषधं घेतली तरी ही समस्या दूर होऊ शकते. पण अनेकदा असं होतं की त्याबरोबर वेगळी लक्षणं दिसू लागतात.
ही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देण्यात येतो.
1. वेदना
2. चक्कर येणं
3. ओकाऱ्या
4. डायरिया
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)