फॉरेनची आळंदी : 250 वर्षांपासून इथे जोडपी पळून येतात आणि लग्न करतात

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

साधारण दुपार झाली होती, तरी कुडकुडणारी थंडी होती. ब्रेडच्या दोन स्लाईसमध्ये घातलेले चीज असं सँडविच माझं दुपारचं जेवण होते. ते खात मी एका कोपऱ्यात शांत बसून होते.

इंग्लंड-स्कॉटलंडच्या सीमेवरचं छोटंसं, म्हणजेच अगदीच छोटंसं टुमदार गाव.

गावात कोणी माणूस दिसायला तयार नाही. अगदीच दोन कॅफे, दोन-तीन लहान दुकानं चालू होती. तिथल्याच मधल्या मोकळ्या जागेत टाकलेल्या बाकांवर मी बसून खात होते.

अचानक खूप गलका ऐकू आला.

खूप सारी माणसं सजून-धजून येतान दिसली. लग्नाची वऱ्हाडी मंडळी होती ती. नवरा-नवरी तर अगदीच खुशीत दिसत होते. दोघांचीही पन्नाशी उलटलेली असावी.

मधल्या मोकळ्या जागेत अनेक छान फुलंझाडं होती, प्रियकर-प्रेयसीचा पुतळा होता, इतर अनेक पुतळे होते, तिथे यांचं फोटोसेशन सुरू झालं.

माझ्या शेजारी एक आजोबा येऊन बसले आणि हसत मला म्हणाले, “मग तुझा काय विचार आहे. कोणी आहे का शोधलेला/शोधलेली? कोणाचा विरोध असेल तर इथे पळून येऊन लग्न कर. ही जागा त्यासाठीच आहे.”

ग्रेटना ग्रीन – स्कॉटलंडची आळंदी

तब्बल अडीचशे वर्षं इथे जोडपी पळून यायची आणि लग्न करायची.

इंग्लंडहून स्कॉटलंडची वाट धरताना मध्ये हे गाव लागतं. हे लहानसं गावं म्हणजे या दोन्ही प्रदेशांची सीमा. आमचीही बस इथे जेवणसाठी थांबली होती.

ग्रेटना ग्रीन अठराव्या शतकापासून लग्नाची राजधानी आहे.

या गावाची लोकसंख्या साधारण 3000 च्या आसपास आहे, पण लोकसंख्येच्या दुप्पट तर इथे फक्त लग्न होतात. दरवर्षी ग्रेटना ग्रीनमध्ये जवळपास 6000 लग्नं लागतात.

आज आता इथे पळून येऊन लग्न करणारे दिसत नसले तरी ही जागा प्रेमिकांसाठी पंढरी आहे.

मी ज्या कॅफेतून सँडविच विकत घेतलं तिथे काम करणारी लायला मला म्हणाली की, “इथे लग्नासाठी तब्बल दीड वर्षांचं वेटिंग आहे. म्हणजे तू आज नाव नोंदवलं तर दीड वर्षांनी तुला लग्नाची तारीख मिळेल.”

यावर शेजारी बसलेल्या आजोबांचं म्हणणं पडलं की, “जागा आधी बुक करू, मुलगा नंतर शोधता येईल. मुलं येत जात राहातात, जागा महत्त्वाची!”

ग्रेटनाच्या हवेत थंडी असली तर खेळकरपणा होता. लोक हसतखेळत होते, खूश होते आणि तिथले स्थानिक लोकही वऱ्हाड्यांच्या आनंदात सहभागी होत होते.

फिरता फिरता मला आणखी दोन जोडपी दिसली. पांढऱ्या शुभ्र झग्यामधली नवरी आणि टापटीप सुटमधला नवरा.

पण इथे जोडपी पळून का यायची?

त्यासाठी आपल्याला 250 वर्षं मागे जावं लागेल. तर मंडळी गोष्ट आहे 1754 ची. लॉर्ड हेड्रिंक याने इंग्लंडमध्ये नवा कायदा पारित केला.

आता 21 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलामुलींना लग्नासाठी त्यांच्या पालकांची परवानगी लागणार होती. बरं, 21 वर्षांपेक्ष कमी वयाच्या जोडप्यांना लग्नही खाजगी करून चालणार नव्हतं, तर ते सार्वजनिक चर्चमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणं आवश्यक होतं.

त्या लग्नाची रीतसर नोंदणीही करणं आवश्यक होतं.

जर कोणत्याही धर्मगुरूने खाजगी जागेत कोणाचं लग्न लावलं तर त्या धर्मगुरूला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती. काही पाद्री गेलेही तुरुंगात.

त्यामुळे इंग्लंडमध्ये घबराट पसरली आणि घरच्यांच्या इच्छेविरुद्ध प्रेमविवाह करू पाहाणाऱ्यांची पंचाईत झाली.

पण शांत बसतील ते प्रेमिक कसले.

त्यांच्या प्रेमात जालीम जमाना ‘दुश्मन’ झाला होता. मग ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है’ या न्यायाने त्यांनी स्कॉटलंड जवळ केलं.

पुढे जाण्याआधी इतिहासातला एक छोटासा धडा – स्कॉटलंड आणि इंग्लंडमधून आडवा विस्तू जात नाही. बांधाला बांध (ते खरंच आहे) लागल्यासारखे भांडतात. आता दोन्ही देश युकेचा भाग असल्याने त्यांची प्रत्यक्ष भांडणं कमी झाली असली तरी एकमेकांना नाकं मुरडणं चालू असतंच.

तर आता परत येऊ आपल्या लव्ह स्टोरीकडे.

इंग्लंडने जरी लग्नाचे कायदे कडक केले होते तरी स्कॉटलंडमध्ये मात्र 12 वर्षांच्या वरच्या मुली आणि 14 वर्षं वयावरील मुलं स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकत होते. त्यांना कोणाच्या परवानगीची गरज नव्हती.

त्यातही स्कॉटलंडमध्ये मॅरेज बाय डिक्लेरेशनची पद्धत होती.

म्हणजे काय तर दोन साक्षीदारांच्या समोर आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे असं दोघांनी घोषित करायचं. झालं लग्न.

बरं लग्न चर्चमध्येच झालं पाहिजे असा काही नियम नव्हता. तुम्ही स्कॉटलंडच्या भूमीवर कुठेही लग्न करू शकत होता, आणि देवाचं नाव घेऊन कोणीही तुमचं लग्न लावू शकत होतं.

ग्रेटना ग्रीन स्कॉटलंडमध्ये असलं तरी ते अगदीच इंग्लंडच्या सीमेवर आहे. त्यामुळे पुढच्या काही वर्षांतच इंग्लंडची किशोरवयीन जोडपी लग्नासाठी इथे पळून यायला लागली.

पण लग्न लावायला इथे कोणी धर्मगुरू नव्हते. त्यावेळी ग्रेटनातले बहुसंख्य लोक लोहारकाम करायचे. मग तेच लोक ‘ऐरण धर्मगुरू’ झाले.

एका बाजूला ऐरणीवर लोखंड बडवायचं आणि दुसऱ्या बाजूला किशोरवयीन प्रियकर-प्रेयसीची लग्न लावायची.

बरं हे ‘ऐरण धर्मगुरू’ फार पैसेही घ्यायचे नाहीत. कधीकधी तर एकदोन बिअर्समध्येच खूश असायचे.

1843 साली लोहारकाम करणाऱ्या एका धर्मगुरूने तेव्हाच्या टाईम्स वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की 25 वर्षांत त्याने जवळपास 3500 लग्न लावली होती.

ग्रेटना ग्रीनचे उल्लेख साहित्यातही आढळतात. प्रसिद्ध इंग्लिश लेखिका जेन ऑस्टिनच्या ‘प्राईड अँड प्रेज्युडिस’ मध्ये ग्रेटना ग्रीनचा उल्लेख आहे. यात नायिकेची बहीण आणि तिचा प्रियकर इथे पळून येण्याचं ठरवतात असं दाखवलं आहे.

एकदा लग्न झालं की ते स्कॉटलंडच्या नियमाप्रमाणे वैध होतं. मग ही तरुण जोडपी तिथेच काही दिवस राहून आपलं लग्न ‘साजरं’ करायची. नियमाप्रमाणे एकदा पतीपत्नींमध्ये सेक्स झाला की त्यांचं लग्न रद्द करता येत नव्हतं.

साहजिकच याने इंग्लंडचे नेते आणि धर्मगुरू खवळले. स्कॉटलंडमध्ये अशा पळून जाणाऱ्यांची लग्न बंद व्हावीत म्हणून अनेक प्रयत्न झाले.

बीबीसी प्रतिनिधी एस्थर वेबर आपल्या एका लेखात लिहितात, “1885 साली न्यूकॅसलच्या एका खासदारने ग्रेटना ग्रीनमध्ये होणाऱ्या लग्नांविरोधात मोहीम उघडली. त्याने म्हटलं की अशी लग्नांमुळे इंग्लंडची प्रतिमा मलीन होत आहे आणि अथल्या लोकांची पातळी घसरत आहे. त्यांना वाईट सवयी लागत आहेत.”

यानंतर एक वर्षाने कायदा पारित झाला की ज्या जोडप्याला स्कॉटलंडमध्ये पळून जाऊन लग्न करायचं असेल काही काळ स्कॉटलंडमध्ये लग्न न करता आणि एकमेकांशी संबंध न ठेवता राहावं लागेल. याला ‘कुलिंग ऑफ पीरियड’ असं नाव दिलं गेलं.

हा काळ 21 दिवसांचा होता आणि या काळात कमीत कमी एकाला तरी तेवढा काळ इथल्या एखाद्या चर्चच्या आवारात राहाणं बंधनकारक होतं.

भावनेच्या भरात किशोरवयीन मुलांनी लग्नाचा निर्णय घेऊ नये म्हणून हा कायदा करण्यात आला होता.

जसा काळ बदलला तसं ग्रेटनाचं स्वरूपही बदललं.

1940 साली स्कॉटलंडमध्ये ‘मॅरेज बाय डिक्लेरेशन’ बेकायदेशीर ठरवण्यात आलं. म्हणते आता फक्त आम्हाला लग्न करायचं आहे असं म्हणून चालणार नव्हतं. त्या लग्नाची आधी रीतसर नोटीस द्यावी लागणार होती आणि नंतर त्याची नोंदणीही करावी लागणार होती.

1977 मध्ये इंग्लंडमध्ये कायदा बदलला. 18 वर्षं पूर्ण केलेल्या मुलांना पालकांच्या संमतीशिवाय लग्न करता येणार होतं.

आता ग्रेटना ग्रीन विद्रोही प्रेमाचं प्रतीक नसलं तर प्रेमाचं प्रतीक नकक्कीच आहे.

इथे आजही हजारो जोडपी लग्न करण्यासाठी येतात. त्यावरच इथल्या स्थानिकांची कमाई होते.

ग्रेटनाच्या आसपास आता अनेक केक शॉप, फुलांची दुकानं, कपड्यांची दुकानं, वेडिंग प्लॅनरची ऑफिसेस आहेत. तरीही ग्रेटना ग्रीनने आपलं मुळ स्वरूप जपलं आहे.

इथे वसंत आणि उन्हाळा ऋतू सोडून गेलात तर शुकशुकाटच दिसतो. मी ऑक्टोबरमध्ये गेले होते, तरी मी नशिबवान ठरले कारण तिथे मी एक लग्न लागताना पाहिलं आणि दोन लग्नांचे वऱ्हाडी येताना पाहिले.

आजही इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या लग्नाच्या कायद्यात थोडीशी फट आहेच. इंग्लंडमध्ये पालकांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचं वय 18 आहे तर स्कॉटलंडमध्ये 16.

स्कॉटलंडमध्ये लग्नाआधी 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते पण लग्न करण्यासाठी तिथेले रहिवासी असण्याची किंवा तिथे काही काळ वास्तव्य करण्याची अट काढून टाकली आहे.

त्यामुळे आजही ‘चट मंगनी पट ब्याह’ करू पाहाणाऱ्या इंग्लिश जोडप्यांना ग्रेटना ग्रीनचा सहारा आहे.

इतरांनाही ग्रेटना ग्रीनमध्ये लग्न करण्याची इच्छा असते. इथे आता बरंच व्यावसायिकरण झालं आहे. एकेका दिवसात 10-10 लग्न लागतात. अनेकदा तर 15 मिनिटांमध्ये लग्न उरकली जातात पण तरीही ज्यांना इतिहास आणि रोमान्स प्रिय आहेत ते इथे गर्दी करतात.

हेही वाचलंत का?

हा व्हीडिओ पाहिलात का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.