आता शिशापासून तयार करता येणार सोनं ? शास्त्रज्ञांना प्रयोगात यश, महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
स्वित्झर्लंडमध्ये प्रयोग करणाऱ्या संशोधकांनी Lead म्हणजे शिशाचं रूपांतर सोन्यात केलंय.
स्वित्झर्लंडमधल्या Large Hadron Collider (LHC) च्या भौतिकशास्त्रज्ञांनी हे वैज्ञानिक यश साधलंय.
न्यूक्लिअर फिजिक्सशी संबंधित ALICE (अॅलिस) या प्रोजेक्टचा हा एक भाग होता. हे संशोधन सर्नमध्ये करण्यात आलं.
CERN काय आहे?
CERN म्हणजे 'Conseil Européen pour la Recherche Nucléaire'. युरोपियन अणुसंशोधन परिषद असा या फ्रेंच नावाचा अर्थ होतो .
Franco-Swiss Border म्हणजे फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेजवळ जीनिव्हामध्ये हे केंद्र आहे. 1954 मध्ये सर्नची स्थापना करण्यात आली.
जगभरातले हजारो शास्त्रज्ञ इथे संशोधन करतात आणि प्रामुख्याने Nuclear Physics म्हणजे अणुंशी संबंधित संशोधन इथे केले जातात. या सर्नमध्येच Large Hadron Collider (LHC) हा जगातला सगळ्यात मोठा Particle Accelerator आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पार्टिकल अॅक्सिलरेटर म्हणजे लांबलचक बोगद्यासारखी अशी जागा जिथे शास्त्रज्ञांना इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, आणि आयॉन्स सारखे अतिसूक्ष्म कण निर्माण करून अतिशय वेगाने ते एकमेकांवर आदळवता येतात.
याच ठिकाणी 2012 साली Higgs Boson नावाच्या मूलभूत कणांचा शोध लावण्यात आला होता.
CERN बद्दल आणखीन एक रंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1989 मध्ये इथेच काम करत असताना टिम बर्नर्स - ली (Tim Berners-Lee) या ब्रिटीश संशोधकाने World Wide Web (www) चा शोध लावला आणि त्यातूनच पुढे आधुनिक इंटरनेटचा जन्म झाला.
शिशाचं सोन्यात रूपांतर करण्याचा प्रयोग
या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी शिसं म्हणजे Lead चा वापर केला, कारण त्याच्या आणि सोन्याच्या काही गुणधर्मांमध्ये साधर्म्य असतं.
Lead च्या अणुच्या गाभ्यामध्ये (nucleus) मध्ये 82 प्रोटॉन्स असतात. तर सोन्याच्या अणुच्या गाभ्यात 79 प्रोटॉन्स असतात.
या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी CERN (European Council for Nuclear Research) मधल्या जगातल्या सर्वात मोठ्या पार्टिकल अॅक्सिलरेटरचा (Particle accelerator) चा वापर केला.
याच पार्टिकल अॅक्सिलरेटरमध्ये लेडचे ions म्हणजे विद्युतभारित कण एकमेकांच्या दिशेने डागले. त्यापैकी काही एकमेकांवर आदळले, तर काही आदळले नाहीत.
या सूक्ष्मकणांचा वेग जवळपास प्रकाशाच्या वेगाइतका होता.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रयोगादरम्यान शिशाचे काही अणु एकमेकांच्या अगदी जवळ आले. हे कण विद्युतभारित असल्याने ते एकमेकांच्या जवळ आल्यावर शक्तीशाली विद्युत आणि चुंबकीय भार असणारं क्षेत्रं तयार झालं.
परिणामी लेडच्या काही आयॉन्समधल्या एकूण 82 प्रोटॉन्सपैकी 3 प्रोटॉन्स निखळले, आणि त्यांच्यात 79 प्रोटॉन्स उरल्याने त्यांचं सोन्याच्या अणुमध्ये रूपांतर झालं. पण हे अगदी एका मायक्रोसेकंदासाठी होतं.
पुढे हे आयॉन्स आणखी फुटले.
हे सगळं साध्या डोळ्यांना दिसणारं नाही. हे सगळं काही सेकंदांत घडलं आणि sophisticated detectors च्या मदतीने नोंदवलं गेलं.
एखाद्या धातूचं सोन्यात रुपांतर करता येऊ शकतं ?का याबद्दल शास्त्रज्ञ गेली अनेक वर्षं संशोधन करतायत. सर्नच्या शास्त्रज्ञांनी लावलेला हा शोध त्यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.
यापूर्वी सोन्याची अशाप्रकारे कृत्रिम निर्मिती करण्यात आली असली, तरी ALICE प्रयोगाद्वारे पहिल्यांदाच लेडमध्ये होणारे सूक्ष्म बदल एका नवीन पद्धतीने घडवण्यात आलेत आणि त्यांची नोंद करण्यात आलीय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











