जगाच्या अजिबात संपर्कात नसणारी 'ही' जमात कोणती आहे? ते असं का जगतात?

माश्को पिरो जमातीचे लोक

फोटो स्रोत, Fenamad

फोटो कॅप्शन, पेरूतील ॲमेझॉनच्या जंगलात भटक्या जमातींसमोर अनेक प्रकारचे धोके आहेत आणि जवळच राहणाऱ्या गावकऱ्यांनादेखील त्यांच्या सुरक्षेची चिंता वाटते.
    • Author, स्टेफनी हेगार्टी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

टोमास एनेज डॉस सँटोस, पेरूमधील ॲमेझॉनच्या जंगलातील एका छोटाशा मोकळ्या जागेत काम करत होते. त्यांना कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू लागला.

त्यांना जाणीव झाली की त्यांना सर्व बाजूंनी घेरण्यात आलं आहे. ते स्तब्ध झाले.

टोमास म्हणतात, "एकजण धनुष्य-बाण निशाणा लावून सज्ज होता. मी इथं असल्याचं त्यानं कुठून तरी पाहिलं होतं. मग मी पळू लागलो."

टोमास यांची गाठ त्यावेळेस माश्को पिरो जमातीशी पडली होती.

न्यूएवा ओसेनिया नावाच्या एका छोट्याशा गावात टोमास राहतात. ते अनेक दशकांपासून या भटक्या जमातींचे शेजारी आहेत. हे लोक बाहेरच्या जगापासून दूर राहतात, इतरांशी ते संपर्क टाळतात. अर्थात आतापर्यंत टोमास यांनी या लोकांना यापूर्वी क्वचितच पाहिलं होतं.

माश्को पिरो जमातीनं शंभर वर्षांपासून जगापासून अलिप्त राहणंच पसंत केलं आहे. ते लांब धनुष्य आणि बाणाचा वापर करून शिकार करतात. त्यांच्या सर्व गरजांसाठी ते ॲमेझॉनच्या सदाहरित जंगलांवर अवलंबून असतात.

टोमास म्हणतात, "त्यांनी चकरा मारणं आणि शिटी वाजवणं सुरू केलं होतं. ते प्राणी आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढू लागले होते."

"मी म्हणालो 'नोमोले' (भाऊ). मग ते गोळा झाले. त्यांना वाटलं की आम्ही जवळ आहोत. मग आम्ही नदीच्या दिशेनं पळू लागलो."

'सर्व्हायव्हल इंटरनॅशनल' या मानवाधिकार संघटनेच्या एका नव्या अहवालानुसार, जगात किमान 196 असे समूह किंवा जमाती शिल्लक राहिल्या आहेत, ज्यांना 'अनकॉन्टॅक्टेड ग्रुप' म्हटलं जातं. म्हणजेच या लोकांचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नाही.

असं मानलं जातं की अशा समूहांमध्ये माश्को पिरो हा समूह सर्वात मोठा आहे. अहवालात म्हटलं आहे की जर सरकारांनी या समूहांचं संरक्षण करण्यासाठी काही पावलं उचलली नाहीत, तर पुढील दशकात यातील निम्मे समूह नष्ट होऊ शकतात.

या अहवालात दावा करण्यात आला आहे की वृक्षतोड, खाण उद्योग आणि कच्च्या तेलाच्या शोधासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे या जमातींसमोर सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.

अनकॉन्टॅक्टेड जमाती सामान्य आजारांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात.

त्यामुळेच या अहवालात म्हटलं आहे की ख्रिश्चन मिशनरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्याकडून संपर्क होणंदेखील या समूहांसाठी एक मोठा धोका ठरू शकतो.

नकाशा
फोटो कॅप्शन, न्यूएवा ओसेनिया हे मासेमारांचं एक छोटसं गाव आहे.

'ते जसं जगत आहेत, तसंच त्यांना जगू द्या'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्थानिक लोकांच्या मते, अलीकडच्या काळात माश्को पिरोचे लोक न्यूएवा ओसेनिया गावात आधीच्या तुलनेत जास्त वेळा येऊ लागले आहेत.

हे मासेमार समुदायातील 7-8 कुटुंबाचं गाव आहे. ते पेरूमधील ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी असलेल्या ताउहामानू नदीच्या काठावर उंचावर आहे. तिथून सर्वात जवळच्या मानवी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठीदेखील नावेनं 10 तास लागतात.

या परिसराला अनकॉन्टॅक्टेड ट्राइब्ससाठी संरक्षित प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आलेली नाही. इथे वृक्षतोड करणाऱ्या कंपन्या काम करतात.

टोमास म्हणतात की, अनेकदा झाडं आणि लाकडं कापणाऱ्या यंत्रांचा आवाज दिवस-रात्र ऐकू येतो. माश्को पिरोचे लोक त्यांची जंगलं कापली जात असताना पाहत आहेत.

न्यूएवा ओसेनियातील लोक म्हणतात की, त्यांची द्विधा मन:स्थिती आहे. ते माश्को पिरो जमातींच्या बाणांना घाबरतात. मात्र त्यांना जंगलात राहणाऱ्या त्यांच्या 'भावां'बद्दल आदरदेखील आहे आणि त्यांचं संरक्षण देखील करू इच्छितात.

टोमास म्हणतात, "ते जसं जगत आहेत, तसं त्यांना जगू द्यावं. आपण त्यांची संस्कृती बदलू शकत नाही. त्यामुळे, आम्ही त्यांच्यापासून अंतर राखून राहतो."

टोमास
फोटो कॅप्शन, टोमास म्हणतात, "आपण त्यांची संस्कृती बदलू शकत नाही".

न्यूएवा ओसेनियामधील लोकांना चिंता वाटते की माश्को पिरो यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांचं नुकसान होतं आहे, हिंसाचाराचे धोके आहेत आणि जंगलतोड करणाऱ्या लोकांच्या संपर्कात आल्यावर माश्को पिरो जमातीला जे आजार होऊ शकतात, त्यांच्यासाठीची कोणतीही रोगप्रतिकारशक्ती त्यांच्या शरीरात नाही.

आम्ही जेव्हा गावात होतो, तेव्हा माश्को पिरो जमातीनं पुन्हा एकदा त्या परिसरातील त्यांची उपस्थिती नोंदवली. या परिसरात आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह राहणाऱ्या लेटिशिया रॉड्रिगेज लोपेज या तरुण आईनं, ती जंगलात फळं शोधत असताना माश्को पिरोचा आवाज ऐकला.

त्या म्हणाल्या, "आम्ही ओरडण्याचा आवाज ऐकला. लोकांचं ओरडणं ऐकलं. अनेकजण ओरडले. असं वाटत होतं की संपूर्ण समूहच ओरडतो आहे."

त्या पहिल्यांदाच माश्को पिरोला पाहत होत्या. त्या तिथून पळून गेल्या. एक तासानंतर देखील भीतीपोटी त्यांचं डोकं प्रचंड दुखत होतं.

लेटिशिया म्हणतात, "इथे लाकूडतोड करणाऱ्या आणखी कंपन्यादेखील जंगलतोड करत आहेत. बहुधा त्यामुळे भीतीनं ते (माश्को पिरो) पळतात आणि आमच्याजवळ येतात."

"आम्हाला पाहून ते नेमकं कसं वागतील ते आम्हाला माहित नाही. मला याच गोष्टीची भीती वाटते."

बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आल्यानं जमातींना धोका

2022 साली, दोन लाकूडतोड करणारे मासे पकडत असताना माश्को पिरोनं त्यांच्यावर हल्ला चढवला.

एका व्यक्तीच्या पोटात बाण लागला. तो वाचला. मात्र, दुसरा व्यक्ती काही दिवसांनी मेलेला आढळला. त्याच्या शरीरात बाणाच्या 9 जखमा होत्या.

बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अलिप्त राहणाऱ्या स्थानिक लोकांशी कोणताही संपर्क करण्यात येऊ नये असं पेरू सरकारचं धोरण आहे. या लोकांशी बोलणं बेकायदेशीर आहे.

हेच धोरण ब्राझीलमध्ये सुरू झालं होतं. तिथे अनेक दशकं स्थानिक अधिकार समूहांनी मोहीम चालवली. त्यांनी पाहिलं की या जमातींशी पहिल्यांदा संपर्क होताच आजार, गरीबी आणि कुपोषणामुळे संपूर्ण समुदाय नष्ट झाला.

माश्को पिरो जमातीचे लोक

फोटो स्रोत, Fenamad

फोटो कॅप्शन, 2024 मध्ये माश्को पिरो जमातीचा घेतलेला एक फोटो.

1980 च्या दशकात पेरूतील नाहुआ लोक पहिल्यांदा बाहेरच्या जगाच्या संपर्कात आले. त्यानंतर काही वर्षांमध्येच त्यांची 50 टक्के लोकसंख्या नष्ट झाली.

1990 च्या दशकात मुरुहानुआ लोकांच्या बाबतीत देखील असंच झालं.

पेरूतील, 'फेमनाड' या स्वदेशी किंवा स्थानिक अधिकार संघटनेचे इसराइल अक्विसे म्हणतात, "बाहेरच्या जगाशी अजिबात संपर्क नसलेले हे लोक अत्यंत संवेदनशील असतात."

ते म्हणतात, "साथीच्या आजारांच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर कोणत्याही संपर्कामुळे त्यांच्यात रोगराई पसरू शकते. इतकंच काय खूपच सामान्य प्रकारच्या संपर्कामुळेदेखील हे लोक नष्ट होऊ शकतात."

"सांस्कृतिकदृष्ट्या देखील, कोणताही संपर्क किंवा हस्तक्षेप त्यांचं संपूर्ण सामाजिक जीवन आणि आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकतो."

'सरकारनं कठीण परिस्थितीत साथ सोडली'

बाहेरच्या लोकांच्या संपर्कापासून दूर राहणाऱ्या या जमातींच्या शेजाऱ्यांसाठी 'कोणत्याही संपर्काशिवाय राहणं' कठीण ठरू शकतं.

टोमास आम्हाला जंगलातील त्या मोकळ्या जागी घेऊन गेले, जिथे त्यांनी माश्को पिरोला पाहिलं. ते थांबतात, आवाज काढतात आणि मग गुपचूप वाट पाहतात.

ते म्हणतात, "जर त्यांनी उत्तर दिलं, तर आम्ही माघारी परततो. आम्ही फक्त किटक आणि पक्षांचे आवाज ऐकू शकतो. ते इथे नाहीत."

अँटोनिया
फोटो कॅप्शन, अँटोनियो एका कंट्रोल पोस्टवर तैनात आहेत, ते या जमातीवर लक्ष ठेवतात.

टोमास यांना वाटतं की, सरकारनं न्यूएवा ओसेनियाच्या रहिवाशांना या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकटं सोडलं आहे.

ते त्यांच्या बागेत माश्को पिरोला खाण्यासाठी गोष्टी पिकवतात. त्यांनी आणि इतर गावकऱ्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांच्या मदतीसाठी आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी हा उपाय अंमलात आणला आहे.

ते म्हणतात, "जर मला त्यांची भाषा आली असती तर फार बरं झालं असतं. मी त्यांना सांगितलं असतं की, ही घ्या, ही केळी आहेत. ही तुम्हाला भेट आहे. तुम्ही निर्धास्तपणे ते घेऊ शकता. मात्र, कृपया मला मारू नका."

कंट्रोल पोस्ट

या घनदाट जंगलाच्या दुसऱ्या बाजूला जवळपास 200 किलोमीटर आग्नेय दिशेला परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तिथे मानु नदीच्या किनाऱ्यावर, माश्को पिरो लोक एक अशा भागात राहतात, ज्याला अधिकृतपणे राखीव जंगलाचा परिसर (फॉरेस्ट रिझर्व्ह एरिया) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

पेरूच्या संस्कृती मंत्रालय आणि फेमनाडनं इथं 'नोमोले कंट्रोल पोस्ट' बनवली आहे. तिथे आठ एजंट तैनात करण्यात आले आहेत.

माश्को पिरो आणि स्थानिक गावांमध्ये झालेल्या संघर्षात अनेकजण मारले गेल्यानंतर, 2013 मध्ये ही चौकी सुरू करण्यात आली होती.

याप्रकारची घटना पुन्हा घडू नये ही या नियंत्रण चौकीचे प्रमुख अँटोनियो त्रिगोसो हिडाल्गो यांची जबाबदारी आहे.

माश्को पिरो जमातीचे लोक

फोटो स्रोत, Fenamad

फोटो कॅप्शन, कंट्रोल पोस्टशी संपर्क करणारे माश्को पिरो.

माश्को पिरो इथे नियमितपणे दिसतात. कधी-कधी तर एकाच आठवड्यात अनेकदा दिसतात.

ते न्यूएवा ओसेनियाच्या जवळ राहणाऱ्या लोकांपेक्षा समूह आहेत. ते एकमेकांना ओळखत असावेत असं एजंटांना वाटत नाही.

मानु नदीच्या पलीकडे एका छोट्याशा दगडधोंडे असलेल्या किनाऱ्याकडे इशारा करत अँटोनियो म्हणतात, "ते नेहमीच एकाच ठिकाणाहून बाहेर येतात. तिथूनच ते आवाज काढतात. ते केळी किंवा ऊस मागतात. जर आम्ही उत्तर दिलं नाही, तर ते संपूर्ण दिवसभर तिथेच बसून राहतात."

एजंटांचा प्रयत्न असतो की अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. जेणेकरून पर्यटक किंवा स्थानिक बोटी तिथून जात असताना कोणतीही समस्या उद्भवू नये. त्यामुळेच ते सर्वसामान्यपणे या जमातींच्या मागण्या पूर्ण करतात.

प्राण्यांच्या नावांवरून ठेवतात स्वत:ची नावं

या कंट्रोल पोस्टमध्ये एक छोटीशी बाग आहे. तिथे एजंट अन्न पिकवतात. जेव्हा ते संपतं, तेव्हा ते जवळच्या गावात सामान मागतात.

जर तेदेखील उपलब्ध झालं नाही, तर एजंट माश्को पिरोंना सांगतात की, काही दिवसांनी परत या.

आतापर्यंत ही पद्धत उपयोगी ठरते आहे. अलीकडच्या काळात तिथे कोणताही मोठा संघर्ष झालेला नाही.

अँटोनियो नियमितपणे जवळपास 40 लोकांवर लक्ष ठेवतात. त्यात वेगवेगळ्या कुटुंबांमधील पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश आहे.

ते प्राण्यांच्या नावावरून त्यांची नावं ठेवतात.

या समूहाच्या प्रमुखाचं नाव कामोटोलो (मधमाशी) आहे. एजंटांचं म्हणणं आहे की ते कडक स्वभावाचे व्यक्ती आहेत. ते कधीही हसत नाहीत.

आणखी एका नेत्याचं नाव टकटको (गिधाड) आहे. ते चेष्टामस्करी करणारे आहेत. खूप हसतात आणि एजंटांची चेष्टा करतात.

योमाको (ड्रॅगन) या त्यातील एक तरुण महिला आहेत. एजंटन्सचं म्हणणं आहे की त्यांची विनोदबुद्धी चांगली आहे.

माश्को पिरो समूहाला बाहेरच्या जगामध्ये फारसा रस नाही. मात्र, ते ज्या एजंटन्सना भेटतात त्यांच्या खासगी आयुष्यात रस घेतात.

ते त्यांच्या कुटुंबांबद्दल आणि त्यांच्या राहण्याच्या जागांबद्दल विचारतात.

माकडाच्या दातांपासून बनवण्यात आलेला गळ्यातील हार
फोटो कॅप्शन, माकडांच्या दातांपासून बनवण्यात आलेला गळ्यातील हार.

एक एजंट जेव्हा गरोदर झाल्या आणि मॅटर्निटी लीव्हवर गेल्या, त्यावेळेस माश्को पिरो लोक मुलाला खेळण्यासाठी एक रॅटल (गळ्यातील हार) घेऊन आले. तो हाउलर माकडांच्या दातांपासून बनवण्यात आला होता.

त्यांना एजंट्सच्या कपड्यांमध्ये रस आहे. विशेषकरून लाल किंवा हिरव्या रंगाच्या स्पोर्ट्स-क्लॉथमध्ये रस आहे.

अँटोनियो म्हणतात, "आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जातो, तेव्हा आम्ही जुने, फाटके कपडे घालतो. त्यांना बटणं नसतात. जेणेकरून त्यांनी आमचे कपडे घेऊ नयेत."

नियंत्रण चौकीतील एजंट एडुआर्डो पँचो पिजारो म्हणतात, "आधी ते त्यांचे पारंपारिक कपडे घालायचे. किटकांच्या धाग्यांपासून बनलेले सुंदर स्कर्ट घालायचे. हे कपडे ते स्वत:च तयार करायचे. मात्र, आता जेव्हा पर्यटकांच्या बोटी तिथून जातात, तेव्हा काहीजण त्यांच्याकडून कपडे किंवा बूटं घेतात."

मात्र, जेव्हा टीम जंगलातील त्यांच्या आयुष्याबद्दल विचारते, तेव्हा माश्को पिरो बोलणं बंद करतात.

अँटोनियो म्हणतात, "एकदा मी त्यांना विचारलं की आग कशी पेटवतात? त्यावर ते म्हणाले की तुमच्याकडे लाकूड आहे, तुम्हाला माहित आहे. मी जाणून घेण्यासाठी पुन्हा विचारलं तर ते म्हणाले की तुमच्याकडे या सर्व गोष्टी आहेत. मग तुम्हाला हे का जाणून घ्यायचं आहे?"

जर एखादी व्यक्ती प्रदीर्घ काळ दिसली नाही, तर एजंट विचारतात की ती कुठे आहे.

त्यावर जर माश्को पिरो म्हणाले, "विचारू नका," तर एजंट समजतात की त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हे लोक कुठून आले आहेत?

अनेक वर्षांचा संपर्क असूनदेखील, एजंट्सना अजूनही माहित नाही की माश्को पिरो कसे राहतात किंवा त्यांना जंगलातच का राहायचं आहे.

असं मानलं जातं की 19 व्या शतकाच्या शेवटी तथाकथित 'रबर बॅरन' शोषण आणि नरसंहारापासून वाचण्यासाठी जे आदिवासी लोक घनदाट जंगलात पळून गेले होते, त्यांचे हे वंशज असू शकतात.

तज्ज्ञांना वाटतं की माश्को पिरो बहुधा पेरूच्या आग्नेय भागातील यीन आदिवासी समुदायाच्या जवळचे आहेत.

यीन समुदायाशी संबंध असणारे एजंट जी भाषा शिकू शकले आहेत, ते त्याच भाषेच्या एका जुन्या रूपात बोलतात.

मात्र, यीन लोक प्रदीर्घ काळापासून नदीत बोट चालवणारे, शेतकरी आणि मासेमार राहिले आहेत. तर माश्को पिरो मात्र या सर्व गोष्टी विसरले आहेत.

असं असू शकतं की त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी भटकं आणि शिकार गोळा करणारी जीवनशैली अंवलंबली असेल.

अँटोनियो म्हणतात, "मला वाटतं की ते एखाद्या भागात काही काळासाठी थांबतात, एक शिबिर भरवतात, तिथे सर्व कुटुंब एकत्र येतं. जेव्हा त्या जागेच्या जवळपासची शिकार संपते, तेव्हा ते दुसऱ्या ठिकाणी निघून जातात."

फेमनाडमधील इसराइल अक्विसे म्हणतात की आतापर्यंत 100 हून अधिक जण वेगवेगळ्या वेळेस या चौकीवर आले आहेत.

"ते त्यांच्या आहारात बदल करण्यासाठी केळी आणि कसावा मागतात. मात्र, काही कुटुंब यानंतर अनेक महिने किंवा वर्षे गायब होतात."

माश्को पिरो जमातीचे लोक

फोटो स्रोत, Fenamad

फोटो कॅप्शन, ही जमात नेमकी कुठून आली आहे याबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहेन्यूएवा ओसेनिया हे मासेमारांचं एक छोटसं गाव आहे.

त्यांचं म्हणणं आहे की "ते फक्त म्हणतात की मी काही महिन्यांसाठी जातो आहे, पुन्हा परत येईन. त्यानंतर अलविदा म्हणतात."

या परिसरातील माश्को पिरो चांगल्या प्रकारे संरक्षित आहेत. मात्र, सरकार तिथे एक रस्ता बांधतं आहे. हा रस्ता या भागाला बेकायदेशीर उत्खनन होणाऱ्या भागाशी जोडेल.

मात्र, एजंट्सना ही बाब स्पष्ट आहे की माश्को पिरोंना बाहेरच्या जगाशी जोडून घ्यायचं नाही.

अँटोनियो म्हणतात, "या पोस्टवरील माझ्या अनुभवातून मला समजलं आहे की त्यांना 'संस्कृती' अवलंबायची नाही. कदाचित मुलांना असं वाटेल आणि ते जेव्हा मोठे होतील, तेव्हा ते आपल्याला कपडे घातलेले दिसतील. कदाचित 10 किंवा 20 वर्षांमध्ये. मात्र, वयस्कांना तसं वाटत नाही. त्यांना तर आम्ही इथेदेखील नको आहोत."

2016 मध्ये सरकारनं एक विधेयक मंजूर केलं होतं. त्यात माश्को पिरोसाठी राखीव असलेला भाग वाढवून न्यूएवा ओसेनियाचाही त्यात समावेश करण्याचा प्रस्ताव होता. अर्थात, या विधेयकाचं रुपांतर अद्याप कायद्यात झालेलं नाही.

टोमास म्हणतात, "त्यांनीदेखील आपल्याप्रमाणे स्वतंत्र राहावं असं आम्हाला वाटतं. आम्हाला माहित आहे की ते अनेक वर्षे खूपच शांततामय आयुष्य जगत आले आहेत. आता त्यांची जंगलं तोडली जात आहेत, नष्ट केली जात आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)