'ते मिठी मारतात अन् चुंबनही घेतात', 50 हून अधिक वर्षे चिंपांझींचा अभ्यास करणाऱ्या संशोधिकेनं काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मायलेस बुक्रे
1960 मध्ये जेन गुडल चक्क टांझानियातल्या जंगलात चिंपांझींसोबत राहू लागल्या. तीच त्यांच्या क्रांतिकारी अभ्यासाची सुरूवात ठरली. 1986 मध्ये बीबीसीशी बोलताना चिंपांझी आणि माणूस यांच्यात किती सारखेपणा आहे हे त्या सांगत होत्या.
14 जुलै 1960 ला, म्हणजे 65 वर्षांपूर्वी याच आठवड्यात, एक तरूण ब्रिटिश महिलेनं 'गोंबे स्ट्रिन गेन रिझर्व्ह' या टांझानियातल्या एका राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदा पाऊल टाकलं.
विज्ञानाची कोणतीही औपचारिक पार्श्वभूमी किंवा पदवी नसलेल्या या महिलेला जंगली चिंपाझींचा अभ्यास करायचा होता. त्यांचा हाच अभ्यास नवी दिशा दाखवणारा ठरला.
त्यांच्या शोधानं फक्त प्राण्यांच्या वागणुकीबद्दलची आपली समज बदलवली नाही, तर आपण माणूस म्हणून स्वतःची व्याख्या कशी करतो याला नवा आकार दिला.
त्यावेळी त्या फक्त 26 वर्षांच्या होत्या. पण प्राण्यांसोबत राहायचं आणि त्यांचा अभ्यास करायचं स्वप्न जेन गुडल अनेक वर्ष उराशी बाळगून होत्या.
"मी एक-दीड किंवा दोन वर्षांची असेन, तेव्हापासूनच किड्यांचा अभ्यास करणं सुरू केलं होतं. ती आवड वाढतच गेली आणि त्यात मला गतीही मिळाली. त्यानंतर मी 'डॉ. डेलिटल आणि टार्झन' अशी पुस्तक वाचत गेले. त्यातूनच आफ्रिकेत काम करायचं हे ध्येय निश्चित झालं," बीबीसीचे टेरी वोगन यांच्या कार्यक्रमात बोलताना जेन सांगत होत्या.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर जेन गुडल यांनी सचिवालयाच्या एका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी त्यांचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे जमवण्याच्या उद्देशानं त्या वेटर म्हणून आणि एका चित्रपट निर्मितीत सहाय्यक म्हणून काम करू लागल्या.
1957 पर्यंत केनियाच्या नैरोबीत राहणाऱ्या एका मित्राला भेटायला जाण्याइतके पैसे त्यांच्याकडे जमले होते. तिथं असताना खटपट करून त्यांनी प्रसिद्ध केनियन-ब्रिटिश पुराजीवमानवशास्त्रज्ञ प्राध्यापक लुईस लीकी यांच्याकडून भेटीची वेळ मिळवली. प्राण्यांबद्दल फक्त त्यांच्याशी बोलता यावं एवढीच आशा गुडल यांच्या मनात होती.

फोटो स्रोत, Getty Images
लीकी यांची सहाय्यक नुकतीच नोकरी सोडून गेली होती. गुडल यांच्या ठाम निर्धारानं आणि आफ्रिकन जंगली जनावरांबद्दल स्वतः कमवलेल्या ज्ञानानं लीकी एवढे प्रभावित झाले की त्यांनी नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये त्यांच्या सहाय्यक पदाची नोकरी गुडल यांना देऊ केली.
त्यानंतर लीकी गुडल यांचे मार्गदर्शक बनले. "त्यांनीच मला सांगितलं की चिंपाझींचं वर्तन आपल्याला आदिमानवाच्या वागणुकीबद्दल बरंच काही सांगू शकतं. त्यामुळे चिंपाझींवर अभ्यास करण्यासाठी ते कोणाच्या तरी शोधात होते," गुडल वोगन यांच्या कार्यक्रमात बोलताना सांगत होत्या.
गुडल यांची शैक्षणिक पार्श्वभूमी विज्ञान शाखेतली नसणं याकडे लीकी यांनी अडथळा म्हणून नाही तर संधी म्हणून पाहिलं. त्यांच्या निरीक्षणांवर आधीच्या शास्त्रीय सिद्धांतांचा प्रभाव नसेल आणि त्यामुळे त्या अधिक स्वच्छ, समतोल नजरेनं अभ्यास करू शकतील, असा विश्वास लीकी यांना वाटला.
गोंबेच्या उद्यानात गुडल यांना एकटं पाठवण्यात आलं नव्हतं. त्यावेळेच्या वसाहतवादी सुरक्षा नियमांप्रमाणे गुडल यांची आई वॅनी निगराणीदार म्हणून त्यांच्यासोबत होत्या.
"सुरूवातीला मला एकटं राहण्याची परवानगी नव्हती," त्या बीबीसीशी बोलताना सांगत होत्या. "तेव्हाच्या ब्रिटिश सरकारनं सांगितलं, 'नाही, एका तरूण मुलीने जंगलात जाऊन एकट्यानं राहणं हे अतिशय अनैतिक आहे.' त्यामुळे मला एक सोबती निवडावा लागला आणि माझी आई तीन महिन्यांसाठी माझ्यासोबत राहायला आली."

फोटो स्रोत, Getty Images
गुडल आणि त्यांच्या आईसाठी पहिला महिना खरोखरच अवघड गेला. एका जुन्या लष्करी तंबूत त्या एकत्र रहात होत्या तेव्हा दोघींनाही मलेरियाची लागण झाली.
त्यातून सावरल्यानंतरही गुडल यांना आसपासच्या राखीव जंगलात एकट्यानं फिरण्याची मुभा नव्हती. स्थानिक सोबत्यांसोबतच त्यांना जावं लागे.
अनेकदा त्यांच्या येण्याची चाहूल लागताच चिंपांझी दाट झाडाझुडपांत गायब होऊन जात.
पण हळूहळू जंगलातल्या पायवाटा गुडल यांना माहीत झाल्या. घनदाट भागात फिरण्याची सवय त्यांना झाली. "तेव्हा अधिकाऱ्यांनी ठरवलं की मी वेडी आहे आणि एकट्यानंही व्यवस्थितपणे फिरू शकेन," त्या म्हणाल्या.
हळूहळू जंगलातल्या डोंगरांमध्ये एकटीनं भटकत असताना एका टेकडीवरून बायनोक्युलर्सच्या सहाय्यानं दोन दऱ्यांमध्ये लपून बसणारे प्राणी आणि चिंपांझीही गुडल यांना दिसू लागले.
त्यांच्या जवळ जाण्यासाठी गुडल यांनी एक वेगळीच अभ्यासपद्धती वापरणं सुरू केलं. चिंपांझींना अन्न मिळतं अशा ठिकाणी त्या जाऊ लागल्या. एक दिवस चिंपांझींच्या घोळक्यात बसता येईल या आशेनं त्या रोज थोडं थोडं पुढे सरकत त्यांच्या जवळ जात होत्या.
माणसासारखा संवाद करतात चिंपांझी
"मी दररोज एकाच रंगाचे कपडे घालायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला त्यांच्यावर कधीच लादलं नाही," 2014 ला बीबीसीच्या विटनेस हिस्ट्री या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या.
"मी कधीच त्यांच्या खूप जवळ जायचा प्रयत्न केला नाही. मी एका फळांच्या झाडाखाली वाट बघत बसे. चिंपाझी तिथे येतात हे मला माहीत होतं. तिथून ते निघून जाऊ लागले तरी मी त्यांचा पाठलाग करायचे नाही.
निदान सुरुवातीच्या काळात मी तसं कधीही केलं नाही. कारण तसं करणं म्हणजे माझ्या नशिबाची परिक्षा पाहणं ठरलं असतं.
मग हळूहळू माझ्याकडून त्यांना कोणतीही इजा पोहोचणार नाही हे चिंपांझींनी स्वीकारायला सुरूवात केली."
ही माकडांची प्रजाती अशी बेफिकीर झाली तेव्हा त्यांच्यात तासन् तास जाऊन बसणं गुडल यांना शक्य झालं.
त्यांच्या वागण्याचं शांतपणे निरिक्षण करणं आणि त्यांच्या तोपर्यंत अज्ञात अशा गुंतागुंतीच्या सामाजिक रचनेची उकल करणंही त्यांना जमलं.
पूर्वीच्या समजुतीप्रमाणे चिंपाझीं शाकाहारी नसतात हा शोध त्यांना लागला. तर ते सर्वभक्षी असतात आणि मांसासाठी शिकार करायची वेळ येते तेव्हा एकमेकांशी संवादही साधतात.
यासोबतच, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध किती घट्ट असतात आणि प्रत्येक प्राण्याच्या व्यक्तिमत्वाचं वेगळं वैशिष्ट्य त्याच्या वागण्यावर कसा प्रभाव टाकतं हेही गुडल यांना पाहता आलं.
"चिंपांझींच्या समाजात एखाद्या मादीसोबत सगळे नर संबंध ठेवू शकतात, किंवा एखादा नर तिला एकटीला दूर नेऊन तिच्यावर हक्क राखून ठेऊ शकतो. आणि नरांमध्ये अतिशय जवळकीचं नातं असतं," असं गुडल यांनी वोगन यांना सांगितलं.
"त्यांच्या समाजाच्या सीमेचं ते रक्षण करतात, अनोळखी प्राण्यांना ते बाहेर ठेवतात. नव्या तरूण मादीचं स्वागत असतं आणि समुहातल्या सगळ्या बाळांप्रती सगळे नर, प्रेमळ, सहनशील, कोमल आणि संरक्षक बापाची भूमिका पार पाडतात."

फोटो स्रोत, Getty Images
संशोधनात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे प्राण्यांना क्रमांक देण्याऐवजी गुडल यांनी प्रत्येकाला नावं दिली. प्रत्येक प्राण्याचं वेगळं व्यक्तिमत्त्व असल्याचं त्या अधोरेखित करत होत्या.
एका नर चिंपांझीचं नाव त्यांनी ठेवलं होतं - डेव्हिड ग्रेबिअर्ड
या डेव्हिड गेर्बिअर्डचंच निरिक्षण करताना त्यांना पहिल्यांदा लक्षात आलं की तो उपकरणंही वापरतो आणि ती तयारही करतो.
याआधी हे असं फक्त माणसंच करू शकतात असं वैज्ञानिकांना वाटत असे.
"माणूस वगळता इतर कोणत्याही जीवापेक्षा चिंपाझी फार वेगळ्या गोष्टींचा उपकरण म्हणून वापर करतात. उदाहरणार्थ, एका छोट्याशा डहाळीवरून ते सगळी पानं काढून टाकतात आणि त्याचा टरमाईट्स नावाचे किडे पकडण्यासाठी वापर करतात," गुडल वोगन यांच्या कार्यक्रमात सांगत होत्या.
"एक लांबसडक काठी घेऊन त्यावरची साल सोलून काढतात. तीचा वापर चावणाऱ्या आक्रमक मुंग्यांना खाण्यासाठी केला जातो. त्याआधी ती काठी ते चावून मऊ केली जाते.
एखाद्या छोट्या फटीतून पाणी प्यायचं असेल आणि थेट ओठ पोहोचत नसतील, तेव्हा ओली पानं वाकवून त्याचा द्रोण बनवतात. कधी अंगावरचं रक्त पुसण्यासाठीही तीच पानं वापरतात. तसंच, शस्त्रही बनवतात. दगडं फेकतात, एखाद्याला धमकवण्यासाठी किंवा मारण्यासाठी फांद्या वापरल्या जातात," गुडल पुढे म्हणाल्या.
त्याकाळी त्यांची ही निरिक्षणं क्रांतीकारी होती. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या वैज्ञानिक विचारांना त्यांनी आव्हान दिलं होतं.
तेव्हापासून प्राणी उपकरणं कशी वापरतात याचे पुरावे देणारी अनेक संशोधनं झाली. इंडोनेशिया मधले ऑक्टोपस माणसाने फेकलेल्या नारळाचे करवंटे कशा पद्धतीनं शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी वापरतात हे शोधलं गेलं; तर न्यू कॅलेडोनियन कावळे चोचीनं लहान काठ्या किंवा तारा वाकवून झाडाच्या खोडात लपून बसलेल्या लार्वा आळ्या कशा बाहेर काढतात याचाही शोध लागला.
गुडल शांतपणे चिंपांझींचं जितकं निरिक्षण करत होत्या तितकं त्यांचे कौटुंबिक नातेसबंध आणि त्यांच्यातला अ-शाब्दिक संवाद किती माणसांसारखा आहेत हे त्यांना समजत गेलं.
"चिंपांझी एकमेकांना काही काळानंतर भेटले, तर ते हातात हात घेतात, एकमेकांना मिठी मारतात, आणि चुंबनही घेतात," असं त्या म्हणाल्या.
"माणसांशी असलेल्या या साध्यर्म्याची जाणीव झाली, तेव्हा हे 'पश्चिमेत आपण आपल्या मुलांना कसं वाढवत आहोत' याबाबत नवे प्रश्न निर्माण झाले," असं गुडल वोगन यांच्याशी बोलताना म्हणाल्या.
समान पूर्वज
"मूल रडत असूनही आपण रात्रभर त्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला तासन् तास खेळण्यासाठी एकटं सोडून दिलं, सतत लोक ये-जा करत राहतात अशा डे केअर सेंटरमध्ये मुलाला सोडलं तर आपली मुलं अतिशय बुद्धिमान होतील.
पण चिंपाझींचं बालपण किती अवघड असतं ते अनुभवल्यानंतर असं लक्षात येतं की, अशी मुलं मोठी झाल्यावर इतरांशी जवळीकीचं नातेसंबंध प्रस्थापित करू शकणार नाहीत आणि तणावाच्या परिस्थितीत तगही धरू शकणार नाहीत. हे फार महत्त्वाचं आहे," असं गुडल म्हणाल्या.
गुडल यांनी ओळखलं की, चिंपांझींचं नेहमीचं वागणं आणि भावनांचं माणसाच्या सवयींशी किती साध्यर्म असतं आणि आपल्या सारखंच, त्यांच्यातल्या विध्वंसक आणि हिंसक प्रवृत्तींमुळे एखाद्या चिंपाझीची क्रूर हत्या होऊ शकते.
"पहिल्या 10 वर्षांतच आम्हाला हे कळालं होतं की, चिंपांझी आपल्यासारखे मैत्रीपूर्ण स्वभावाचे असले तरी आपल्यासारखेच ते आक्रमकही होतात.
काही परिस्थितीत ते स्वतःच्याच प्रजातीतील प्राण्यांनाही खातात. त्याच्यातला दोन समुहांमधला संघर्ष अशा पद्धतीनं होतो की ते माणसानं केलेलं सुरूवातीच्या पातळीवरचं युद्धच वाटतं," गुडल म्हणाल्या.
त्यांच्या या अपवादात्मक, सूक्ष्म शोधाच्या जोरावर 1962 ला लीकी यांच्या प्रोत्साहानानं गुडल यांनी कोणतीही पदवी नसताना पीएचडीचा अभ्यास सुरू केला.
त्याच वर्षी, नॅशनल जिओग्राफीक सोसायटीने त्यांच्या कामाचं दस्ताऐवजीकरण करण्यासाठी करण्यासाठी हुगो व्हॅन लॉविक या डच छायाचित्राकार आणि चित्रपट निर्मात्याला पाठवलं.
त्यातून 'मिस गुडल अँड द वाईल्ड चिंपांझींज' हा माहितीपट 1965 ला प्रदर्शित झाला.

फोटो स्रोत, Getty Images
ओर्सोन वेलेस सांगतात त्याप्रमाणे या माहितीपटाने गुडल यांचा शोध अनेकांपर्यंत पोहोचला. पुढे व्हॅन लॉविक यांच्याशीच गुडल यांनी पहिलं लग्न केलं. त्यातून त्यांना एक मुलगा झाला. त्याचं टोपणनाव 'ग्रुब' ठेवण्यात आलं होतं.
गुडल यांच्यासोबत राहताना तो सुरक्षित रहावा आणि गुडल यांना त्यांचं कामही पूर्ण करता यावं यासाठी त्यांनी एक सुरक्षित निवारास्थान उभारलं.
"चिंपांझी आपल्यासारखेच शिकारी असतात," गुडल वोगन यांना सांगत होत्या.
"ते एकमेकांच्या मदतीनं मध्यम आकाराच्या प्राण्यांची शिकार करतात. त्यांनी मानवी मुलांची शिकार केल्याचीही नोंदी काही ठिकाणी करण्यात आल्या आहेत. माणसं चिंपांझींची शिकार करतात तसं. त्यामुळे माझा मुलगा खूप लहान होता आणि त्याला चालताही येत नव्हतं तेव्हा तो अक्षरशः पिंजऱ्यासारख्या व्हरांड्यात असायचा आणि त्याच्याभोवती सतत कुणीतरी असणं आवश्यक होतं," त्या म्हणाल्या.
गुडल यांच्या माकडशास्त्रातील क्रांतिकारी संशोधनानं हे दाखवून दिलं की माणूस हा प्राणीविश्वापासून वेगळा नाही, तर होमो सेपियन्स (माणूस) आणि चिंपांझी यांचे पूर्वज समानच आहेत.
नंतरच्या संशोधनातून हेही सिद्ध झालं की चिंपांझी आणि माणूस यांच्यात अत्यंत जवळचं आनुवंशिक नातं आहे. त्यांच्यात आणि आपल्यात सुमारे 98.6 टक्के डीएनए सारखे आहेत.
"हीच तर ती गोष्ट आहे," गुडल म्हणतात. "आपण आज माणसांचं आणि चिंपांझीचं जे वागणं पाहतो ते त्यांच्या समान पूर्वजांमध्येही असणार. "
"अश्मयुगीन लोक एकमेकांमध्ये कशा पद्धतीने मैत्रीपूर्ण नाती ठेवत असतील, छोटी फांद्या वापरून एकमेकांना अन्न देत असतील, आणि एकमेकांना मिठ्या मारत असतील. मला अशी कल्पना करायला खूप आवडतं," गुडल म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











