'लग्नासाठी आलो अन् आयोजकच गायब झालेत', सामूहिक विवाहसोहळ्याला आलेल्या 28 जोडप्यांची फसवणूक

मोहित आणि त्यांची भावी पत्नी

फोटो स्रोत, BIPINBHAI TANKARIYA

फोटो कॅप्शन, सामूहिक लग्नासाठी आल्यानंतर गोंधळलेले वर मोहित आणि त्यांची भावी पत्नी

"आम्हाला वर्तमानपत्रातून या सामूहिक विवाह सोहळ्याची माहिती मिळवली होती. आम्हाला त्याची गरज होती. आम्ही असंही लग्न करणारच होतो. एक महिन्यापूर्वी आम्ही इथला फॉर्म भरला होता. आयोजक नेहमी आम्हाला कॉल करून काय हवं, काय नको ते विचारायचे.

"सामूहिक विवाह सोहळ्याची तयारी कशी सुरु आहे हेही सांगायचे. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की, रिकाम्या हाताने या आणि लग्न करून घरी परत जा. पण आज इथे आलो तर काहीच नाही. हे लोक आम्हाला अशा पद्धतीने फसवत असं वाटलं नव्हतं."

लग्नाच्या कपड्यात बसलेली मोहित खेर यांची होणारी पत्नी आम्हाला सांगत होती. मोहित आणि तिचं लग्न एका सामूहिक विवाह सोहळ्यात होणार होतं.

मोहित आणि त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी 30 हजार रुपये भरून नोंदणी केली होती. पण गुजरातच्या राजकोटमध्ये आयोजित केलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजकच लग्नाच्या दिवशी पसार झाले.

शनिवारी (22 फेब्रुवारी) राजकोटच्या एडीबी हॉटेलसमोर असलेल्या मैदानात 'रिशीवंशी समाज' या नावाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात लग्न करण्यासाठी आलेल्या 28 जोडप्यांकडून किमान 15 हजार ते कमाल 40 हजार रुपयांची देणगी घेण्यात आली होती.

मात्र, ऐन लग्नाच्या दिवशी आयोजकच गायब झाले आणि लग्नासाठी आलेल्या जोडप्यांना एकच धक्का बसला.

लग्न करू पाहणाऱ्या जोडप्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अशा पद्धतीने फसवणूक झाल्याने अनेकांनी लग्नाचा मंडप सोडून जाणं पसंत केलं.

या फसवणुकीबाबत पोलिसांकडे तक्रार केली गेली आणि मग पोलिसांचा एक ताफा मंडपात येऊन धडकला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकरणात फसवणूक झाल्याचा दावा करणाऱ्या कुटुंबीयांनी सांगितलं की, आयोजकांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आणि ते इथून पळून गेले. लग्नाच्या मंडपातून आयोजकच गायब झाल्याने त्यादिवशी विवाहित होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना मोठा धक्का बसला.

शनिवारी सकाळपासूनच विवाहस्थळी वऱ्हाडीमंडळींची आणि नववर-वधूंची गर्दी होऊ लागली होती. मात्र मंडपात आयोजकांचा पत्ताच नव्हता. बराच वेळ वाट पाहून यापैकी काही जोडपी आपापल्या घरी परत निघून गेली.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती कळल्यानंतर त्यांनी आयोजकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या जोडप्यांची लग्नं लावून देण्याची तयारी दाखवली, जेणेकरून या विवाहसोहळ्यात आलेल्यांच्या लग्नाला उशीर होणार नाही. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा विवाहसोहळा सुरु झाला.

या प्रकरणात राजकोट पोलिसांनी पदुमनानगर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे यासारख्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुख्य आयोजकांसह एकूण सहा जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

यापैकी दिलीप गोहिल, दीपक हिराणी, मनीष विठ्ठलपारा यांना अटक करण्यात आली आहे, तर हार्दिक शिशांगिया, दिलीप वरसंडा आणि मुख्य आरोपी चंद्रेश छत्राला यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या सामुदायिक विवाह सोहळ्याकरता काही देणगीदारांकडून देणग्या देखील घेण्यात आल्या होत्या. तसेच वधू आणि वरांच्या कुटुंबियांकडून प्रत्येकी 15 हजार रुपये देखील घेतले गेले होते.

या प्रकरणातल्या आरोपींनी 2023मध्ये देखील अशाच पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून फसवणूक केली असल्याचा आरोप आहे. यानंतरही एक तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी याठिकाणी लग्न करण्यासाठी आलेल्या 28 जोडप्यांपैकी सहा जोडप्यांचं लग्न लावून दिल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी 22 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, या लग्नासाठी त्यांनी सर्व व्यवस्था करून दिली होती.

लग्नासाठी आलेल्या वधू-वरांचं काय म्हणणं आहे?

लग्नाच्या मंडपात बसलेले मोहित खेर म्हणाले, "इथे काहीही व्यवस्था केलेली नाहीये. आयोजकांचे फोन स्विच ऑफ आहेत. कुणीच माझा फोन उचलत नाहीये."

मोहित यांच्या संभाव्य पत्नींनी सांगितलं की त्या कशा पद्धतीने आयोजकांच्या संपर्कात आल्या आणि त्यांना या विवाह सोहळ्याची माहिती कुठून मिळाली. "आम्हाला वर्तमानपत्रातून या विवाहसोहळ्याची माहिती मिळाली. आम्ही लग्न करणारच होतो आणि त्यामुळे आम्हाला याची गरज होती. मग आम्ही या सामूहिक विवाह सोहळ्याचा फॉर्म भरला. हे लोक अशा पद्धतीने आम्हाला फसवतील असं वाटलं नव्हतं."

"आम्ही महिन्याभरापूर्वी इथला फॉर्म भरला. त्यानंतर ते आम्हाला फोन करून काय हवं, काय नको ते विचारायचे. सामुदायिक विवाह सोहळ्याची तयार कशी सुरु आहे त्याचेही अपडेट द्यायचे. तुम्ही रिकाम्या हाताने यायचं आणि लग्न करून परत जायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण सध्या इथे काहीच नाहीये ."

वर अर्जुनभाई आणि त्यांची भावी पत्नी
फोटो कॅप्शन, वर अर्जुनभाई आणि त्यांची भावी पत्नी

मोहित यांच्या संभाव्य पत्नीने बीबीसीला सांगितलं, "आम्ही पहाटे 6:30 पासून इथे बसून आहोत. माझ्या पालकांनी कर्जाने पैसे काढून लग्नाचा खर्च केला होता. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही सगळ्यांनी प्रत्येकी 30 हजार रुपये भरले आहेत."

गुजरातच्या जामनगरमध्ये राहणारे अर्जुनभाईसुद्धा इथे लग्न करून घ्यायला आले होते. या प्रकाराबाबत सांगताना ते म्हणाले, "आम्ही जामनगरवरून इथे आलो आहोत. दोन्ही कुटुंबियांकडून 15 हजार रुपये घेतले होते. पण आम्ही इथे आलो तेव्हा आयोजकच गायब होते."

"आम्ही 100 वऱ्हाडी घेऊन इथे आलो होतो. आमची आब्रू गेली आहे, आम्हाला आमची प्रतिष्ठा परत हवी आहे. आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय."

विवाहस्थळी उपस्थित असलेले कुटुंबातील सदस्य

फोटो स्रोत, BIPINBHAI TANKARIYA

फोटो कॅप्शन, आयोजक कथितरित्या गायब झाल्याने विवाहस्थळी उपस्थित असलेल्या कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटत होती.

अर्जुनभाई पुढे म्हणाले, "आम्ही आयोजकांवर विश्वास ठेवून इथे आलो. पण इथे असं काहीतरी घडलं असं वाटलं नव्हतं. आम्हाला फेसबुकवरून या संस्थेची माहिती मिळाली, त्यानंतर आम्हीही फॉर्म भरला होता."

अर्जुनभाईंच्या संभाव्य पत्नी म्हणतात, "मला आईवडील नाहीत. आम्ही इथे लग्नासाठी आलो होतो. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, लग्नानंतर आम्हाला 208 भेटवस्तू दिल्या जातील. त्या तर सोडाच पण इथे खायला-प्यायला देखील काही नाही. फक्त मंडप उभा केलाय."

या विवाह सोहळ्यासाठी आलेले कथाकार जे. पी. दादा म्हणाले, "संयोजन समितीने एक महिन्यापूर्वी आमच्याशी संपर्क केला होता. मला 28 ब्राह्मणांना घेऊन इथे यायला सांगितलं होतं. आयोजकच ब्राह्मणांना दक्षिण देणार असं ठरलं होतं, पण सध्या इथे कसलीही व्यवस्था नाही."

पोलिसांनी काय म्हटलं?

राजकोट झोन-4 चे पोलीस उपायुक्त सज्जन सिंग परमार यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलिसांनी सामूहिक विवाहात जोडप्यांचे लग्न लावल्याबद्दल आणि नंतर आयोजकांवर कारवाई केल्याबद्दल सांगितलं.

ते म्हणाले, "आम्ही नंतर आयोजकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, पण सध्या इथे लग्नासाठी आलेल्या जोडप्यांना आम्ही मदत करत आहोत. त्यांचं विधिवत आणि वेळेवर लग्न लावून देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत."

"प्राथमिक माहितीनुसार, मुख्य संयोजक आणि त्यांना मदत करणारे लोक तिथे उपस्थित नव्हते. बरीच जोडपी इथून निघून गेली आहेत, पण अजूनही तिथे थांबलेल्या जोडप्यांची लग्नं आम्ही लावून देणार आहोत. लग्न लावून देणारे लोक देखील इथे उपस्थित आहेत, आणि ज्या गोष्टी नाहीयेत त्या पुरवून आम्ही ही लग्न लावून देणार आहोत."

पोलीस

फोटो स्रोत, BIPINBHAI TANKARIYA

फोटो कॅप्शन, आयोजक पळून गेल्यानंतर मुलींच्या लग्नाची जबाबदारी पोलिसांनी घेतली

सहाय्यक पोलीस आयुक्त राधिका भराई म्हणाल्या, "या विवाह सोहळ्याच्या आयोजकांनी इथे काहीच केलेलं नाही आणि ते इथे उपस्थित देखील राहिले नाहीत. त्यांचे फोन बंद आहेत. हे कळल्यानंतर राजकोट पोलिसांनी या सामूहिक विवाह सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. आता तीन-चार जोडप्यांची लग्नं सुरु झाली आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)