मुन्नार हनिमून हत्याकांड: इंदूरच्या हत्येप्रमाणेच 20 वर्षांपूर्वी झाला होता खून, ऑटो चालकामुळे समोर आलं सत्य

    • Author, मुरलीधरन कासी विश्वनाथन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

सध्या संपूर्ण देशभरात इंदूर येथील राजा रघुवंशीच्या मेघालय येथे झालेल्या हत्येचीच चर्चा सुरू आहे. नुकतंच लग्न झालेला राजा आपल्या पत्नी सोनमसोबत मेघालय येथे हनिमूनला गेला होता.

तिथं पत्नी सोनमने तिच्या प्रियकराच्या मदतीने राजाची हत्या केल्याचा आरोप आहे. सध्या सोनम अटकेत असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.

स्वप्नांनी सुरू झालेला राजा रघुवंशीचा हनिमून प्रवास अखेर दुःस्वप्नात बदलला.

इंदूरमधलं हे प्रकरण दोन दशकांपूर्वी केरळला हादरवून टाकणाऱ्या एका गुन्ह्याची आठवण करून देतं.

मुन्नारमध्ये वीस वर्षांपूर्वीही असंच प्रकरण घडलं होतं. चेन्नईतील एक नवविवाहीत जोडपं हनिमूनसाठी मुन्नारला गेलं होतं. मुन्नारमध्ये त्या चेन्नईच्या जोडप्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊ.

मुन्नारमधील शोकांतिका

18 जून 2006.

केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. धुक्यानं वेढलेल्या मुन्नारच्या डोंगररांगेत, निसर्गरम्य कुंडला धरणाजवळ 24 वर्षांची एक तरुणी श्रीविद्या रडत बसलेली दिसली.

तिने सांगितले की, दोन चोरट्यांनी तिच्यावर आणि तिच्या पतीवर हल्ला करून 25 हजार रुपये लंपास केले आणि तिच्या पतीची हत्या केली.

या प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडलेल्या खुनानं केरळमध्ये खळबळ उडाली.

मुन्नारचे उपअधीक्षक के.ए. मोहम्मद फैझल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

तपासाची सुरुवात श्रीविद्याकडूनच झाली.

तिने पोलिसांना सांगितलं की, ती आणि तिचा नवरा धरणाजवळ बसले असताना दोन अनोळखी पुरुषांनी त्यांच्यावर हल्ला केला, तिच्या पतीची हत्या केली आणि त्यांच्याकडील ऐवज घेऊन पळ काढला.

त्यानंतर पोलिसांनी या संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू केला. पण या प्रकरणात एक धक्कादायक वळण आलं.

ऑटो ड्रायव्हरनं सर्व काही बदलून टाकलं

अन्बाळगन नावाच्या ऑटो चालकानं पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. त्यानं सांगितलं की, त्या दिवशी दोन पुरुषांना धरणाजवळ सोडलं होतं. त्यापैकी एका व्यक्तीने खराब सिग्नलमुळे त्याचा फोन मागितला होता. नंतर त्या फोनवर एक संशयास्पद संदेश आला, जो गुन्हा घडलेल्या ठिकाणाकडे इशारा करत होता.

हा पुरावा तपासाला पूर्णपणे वळण देणारा ठरला. पोलिसांना लवकरच समजलं की, श्रीविद्यानेच हत्येची योजना आखली होती.

प्रेमकथेला मिळालं प्राणघातक वळण

श्रीविद्या चेन्नईमधील पम्मल शंकर नगरची आणि श्रीमंत कुटुंबातील होती. ती मेडिकल ट्रान्सक्रिप्शनमध्ये काम करत होती आणि अनकापुथूर येथील आनंदवर प्रेम करत होती.

तिच्या पालकांची या नात्याला मान्यता नव्हती आणि त्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी केलं. त्याचं नाव होतं अनंतरामन.

तीस वर्षीय अनंतरामन चेन्नईतील एका कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक होता.

श्रीविद्या आणि अनंतरामन यांचं 7 जून 2006 रोजी दिमाखात लग्न झालं.

या नवविवाहितांनी त्यांच्या हनिमूनसाठी गुरुवायूर आणि मुन्नारला जाण्याची योजना आखली होती. त्यांना केरळच्या आसपास फिरण्यासाठी सॅम व्हिन्सेंट नावाचा ड्रायव्हर ठेवला होता. त्रिशूरला रेल्वेने पोहोचल्यावर सॅमने त्यांना आधी गुरुवायूर आणि नंतर मुन्नारला नेलं.

ते आनंदात दिसत होते, प्रवासादरम्यान ते मनमुरादपणे हसत आणि गप्पा मारत.

कुंडला धरणाजवळील इको पॉइंटवर सॅमने गाडी थांबवली आणि तो तिथेच झोपी गेला.

अचानक श्रीविद्याच्या ओरडण्यानं तो जागा झाला.

श्रीविद्यानं त्यांच्यावर हल्ला झाला असून त्यात तिच्या पतीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. सॅमने लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

आणि कोडं सुटत गेलं...

सुरुवातीला पोलिसांना श्रीविद्याची गोष्ट खरी वाटली. पण अन्बाळगनच्या टिपमुळे पोलिसांना आनंद आणि त्याचा साथीदार अनबुराज सापडले.

हे दोघे मुन्नारला पळ काढण्याच्या प्रयत्नात होते, तेव्हा एका जागरूक ऑटो चालकानं त्यांना पाहिलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

श्रीविद्या आणि आनंदचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले. ते दोघे 2004 पासून संपर्कात नसल्याचे श्रीविद्यानं सांगितलं तरी पुरावे वेगळंच सांगत होते.

आनंदकडे सापडलेल्या कागदाच्या स्लिपवर श्रीविद्याचे हस्ताक्षर होते, त्यांच्या प्रवासाच्या योजनांचा तपशील त्यात होता.

हत्येपूर्वी तिने आनंदला अनेकदा फोन केल्याचे फोन रेकॉर्डवरून दिसून आले.

श्रीविद्या आणि आनंदला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

श्रीविद्या, आनंद आणि अनबुराज यांना अटक करून देवीकुलम येथील तुरुंगात ठेवण्यात आलं. आनंद हा मुख्य आरोपी होता, अनबुराज दुसरा, तर श्रीविद्या तिसरी.

थोडुपुझा कोर्टातील न्यायालयीन प्रक्रियेत तीनही आरोपींनी अपराधाचा नकार दिला होता. पण श्रीविद्या आणि आनंद यांच्यातील फोन रेकॉर्ड्स आणि संदेशांनी त्यांची गुन्ह्यातील भूमिका सिद्ध केली.

सप्टेंबर 2007 मध्ये न्यायालयाने श्रीविद्या आणि आनंद यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला. अनबुराज याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

केरळ उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेले अपील फेटाळण्यात आले.

दि. 15 फेब्रुवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मूळ निकाल कायम ठेवला.

(हे वृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तपशीलांवर आधारित आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)