'मला खूप राग आलाय'; पुतिन यांच्या घरावर 'हल्ल्या'नंतर ट्रम्प, मोदी आणि शरीफ नेमकं काय म्हणाले?

युक्रेनने सोमवारी (29 डिसेंबर) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्याचा दावा रशियाने केला.

मात्र, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या बातम्यांमुळे चिंतित असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

दरम्यान, या घटनेमुळे आपण खूप रागावलेलो आहोत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.

'ही घटना कुठे आणि कशी घडली?'

युक्रेनने रात्री 91 लांब पल्ल्याच्या मानवरहित हवाई वाहनांचा (यूएव्ही) वापर करत रशियातील नोव्हगोरोद भागातील पुतिन यांच्या सरकारी निवासस्थानी हल्ला केल्याचा दावा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला.

रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने सर्व यूएव्ही इंटरसेप्ट करून त्यांना नष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

या हल्ल्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचेही ते म्हणाले.

युक्रेनबरोबरच्या शांतता करारावर पुन्हा विचार केला जाईल, असेही रशियाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, हल्ल्याच्यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन तिथे होते किंवा नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे हे आरोप फेटाळले आहेत.

झेलेन्स्की यांनी हा 'रशियाचा बहुचर्चित खोटेपणा' असल्याचा दावा केला. त्याचबरोबर याचा उद्देश हा रशियाला युक्रेनवर हल्ले सुरू ठेवण्यासाठीचे निमित्त असल्याचे त्यांनी म्हटलं.

रशिया आधीपासूनच कीवमधील सरकारी इमारतींवर हल्ले करत आला आहे, असंही झेलेन्स्की म्हणाले.

झेलेन्स्की यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "आता जगाने गप्प बसू नये. रशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला कमकुवत करू नये."

ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

सोमवारी (29 डिसेंबर) सकाळी पुतिन यांनी फोनवर हल्ल्याबाबत माहिती दिली आणि त्यामुळे आपल्याला खूप राग आल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की, पुतिन यांच्या घरावर हल्ला करणे योग्य नाही. मला याची माहिती पुतिन यांनीच फोनवरून दिली आणि त्यामुळे मी खूप रागावलो आहे"

रविवारी (28 डिसेंबर) ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्सकी यांची फ्लोरिडामध्ये भेट झाली होती.

ते युद्ध संपवण्याचा कराराच्या अगदी जवळ पोहोचले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.

दरम्यान, या प्रकरणावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'गंभीर चिंता' व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, "रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या बातम्यांमुळे आम्ही खूप चिंतेत आहोत."

"संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले कूटनीतिक प्रयत्नच सर्वात प्रभावी मार्ग आहेत. सर्व पक्षांनी या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करावं आणि शांततेच्या प्रयत्नांना धक्का लावणारी कोणतीही कृती करू नये," असे मत मोदींनी व्यक्त केले.

पाकिस्ताननेही दिली प्रतिक्रिया

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानी झालेल्या ड्रोन हल्ल्याचा निषेध केला.

शाहबाज शरीफ यांनी एक्सवर म्हटलं, "रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्ताचा पाकिस्तान निषेध करतो."

"जेव्हा शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशावेळी अशा प्रकारच्या घटना शांतता, सुरक्षा आणि स्थैर्यासाठी गंभीर धोका आहेत," असं त्यांनी म्हटलं.

शाहबाज शरीफ यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन तसेच रशियाचे सरकार आणि जनतेशी एकजूट असल्याचं सांगितलं आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलं की, ते सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा विरोध करतात, कारण अशी कृत्ये 'सुरक्षा आणि शांततेला धोका निर्माण करतात'.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)