You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट, रशिया-युक्रेन युद्धाबद्दल काय झाली चर्चा?
- Author, बर्न्ड डेबसमन ज्युनियर, हॅरी सेक्युलिक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांची युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेतील फ्लोरिडा इथं भेट झाली आहे.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांनी रविवारी (28 डिसेंबर) ट्रम्प यांच्या मार-ए-लागो इथल्या निवासस्थानी भेट घेतली. युक्रेन युद्धाबाबतच्या सुधारित शांतता योजनेवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. या योजनेतील अनेक महत्त्वाचे मुद्दे रशियानं याआधीच फेटाळले आहेत.
सोमवारी (29 डिसेंबर), झेलेन्स्की म्हणाले की अमेरिकेनं युक्रेनला 15 वर्षांसाठी सुरक्षा हमी देऊ केली आहे. ट्रम्प रविवारी (28 डिसेंबर) म्हणाले की या मुद्द्यावर जवळपास 95 टक्के सहमती झाली आहे.
मात्र युक्रेनच्या डोनबास प्रदेशाच्या भवितव्याबद्दल यावेळेस फारसं काही सांगण्यात आलं नाही. या प्रदेशावर रशियाला पूर्ण नियंत्रण हवं आहे.
या चर्चेमध्ये प्रगती झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प आणि वोलोदीमीर झेलेन्स्की सांगितलं. मात्र त्याचबरोबर 'एक-दोन अतिशय गुंतागुंतीचे मुद्दे' अद्याप बाकी असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिका आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी अतिशय 'उत्तम' चर्चा झाल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी ट्रम्प यांनी भूप्रदेशाचा प्रश्न हा यातील महत्त्वाचा अडथळा असल्याचा पुनरुच्चार केला.
रशियानं यापूर्वी युक्रेननं आखणी भूभाग सोडावा अशी मागणी केली आहे.
यापूर्वी ट्रम्प यांचं फोनवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलणं झालं होतं. याचे तपशील ट्रम्प यांनी दिले नसले तरी ते म्हणाले होते की रशियाच्या नेत्याला 'युक्रेननं यशस्वी व्हावं' असं वाटतं.
त्याचवेळी ट्रम्प यांनी हेही मान्य केलं होतं की रशियाला अशा शस्त्रसंधीमध्ये रस नाही, ज्यामुळे युक्रेनला सार्वमत घेता येईल.
चर्चेबाबत झेलेन्स्की काय म्हणाले?
फ्लोरिडातील मार-ए-लागो इथं पत्रकारांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की 20 कलमी शांतता योजनेबाबत त्यांची '90 टक्के' सहमती झाली आहे. तर ट्रम्प म्हणाले की युक्रेनला देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या हमीबाबत 'जवळपास 95 टक्के' काम पूर्ण झालं आहे.
नंतर झेलेन्स्की म्हणाले की अमेरिका आणि युक्रेनच्या टीम पुढील आठवड्यात भेटतील. रशिया युक्रेनविरुद्ध चार वर्षांपासून करत असलेलं युद्ध संपवण्याच्या उद्देशानं या भेटीदरम्यान पुढील चर्चा होणार आहे.
झेलेन्स्की यांनी टेलीग्राम या मेसेजिंग ॲपवर एक वक्तव्य शेअर केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, "सर्व मुद्द्यांवर आमची सखोल चर्चा झाली. गेल्या आठवड्यात युक्रेन आणि अमेरिकेच्या टीमनं केलेल्या प्रगतीला आम्ही खूप महत्त्व देतो."
ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प म्हणाले की युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास प्रदेश ज्यावर मोठ्या प्रमाणात रशियाचं नियंत्रण आहे, त्याचं निशस्त्रीकरण (लष्कर नसलेला प्रदेश) करण्याबाबतच्या प्रस्तावावर अद्याप 'सहमती झालेली नाही'.
बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितलं की "काही भूप्रदेश ताब्यात घेण्यात आला आहे. त्यातील काही प्रदेश कदाचित कब्जा करण्यासाठी उपलब्ध आहे, मात्र पुढील काही महिन्यांमध्ये तो ताब्यात घेतला जाऊ शकतो."
ट्रम्प म्हणाले, "तो खूप कठीण मुद्दा आहे. ती समस्या सोडवली जाईल."
ट्रम्प म्हणाले, युक्रेनला सुरक्षेची हमी देण्याबाबत '95 टक्के काम पूर्ण झालं' आहे. मात्र ट्रम्प यांनी भविष्यातील हल्ल्यांपासून युक्रेनचं संरक्षण करण्यासाठी लॉजिस्टिक मदत किंवा सैन्याच्या तैनातीबद्दल कोणतीही अधिकृत कटिबद्धता दाखवलेली नाही.
ट्रम्प यांनी अमेरिका, रशिया आणि युक्रेनमधील त्रिपक्षीय चर्चेची शक्यता वर्तवली होती आणि म्हणाले होते की ती योग्य वेळी होऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युक्रेन-रशिया युद्द संपवण्याबाबत उत्सुक अशले तरी त्यांनी सावध केलं होतं की वाटाघाटी थांबल्या किंवा फिस्कटल्या तर युद्ध लांबू शकतं.
काय आहे गुंतागुंत?
युक्रेनच्या डोनेत्स्क प्रांताचा जवळपास 75 टक्के आणि शेजारच्या लुहान्स्क प्रांताचा जवळपास 99 टक्के प्रदेश सध्या रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. या सर्व प्रदेशाला एकत्रितरित्या डोनबास म्हणतात.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेननं गमावलेल्या प्रदेशाबाबतची त्यांची भूमिका वारंवार बदलली आहे.
युक्रेन हा प्रदेश परत मिळवू शकेल, असं सुचवून सप्टेंबरमध्ये त्यांनी निरीक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं. नंतर त्यांनी भूमिका बदलली होती.
पुढे काय?
अमेरिका आणि युक्रेनचं शिष्टमंडळ पुढील चर्चेबाबतच्या योजनांना अंतिम रूप देत असताना, झेलेन्स्की यांनी सूचवलं की जानेवारीमध्ये युक्रेनचे अधिकारी संभाव्यरित्या युरोपियन नेत्यांसोबत व्हाईट हाऊसमध्ये भेटू शकतात.
युरोपियन मित्र देशांबरोबर बैठक झाल्यानंतर झालेल्या दूरध्वनी संभाषणात, युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी फ्लोरिडा इथं चर्चेत झालेल्या 'चांगल्या प्रगती'चं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी युक्रेनला 'पहिल्या दिवसापासून अभेद्य सुरक्षेची हमी देण्याच्या' गरजेवर आणखी भर दिला.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनदेखील म्हणाले की युक्रेनला द्यायच्या सुरक्षा हमीबद्दल चर्चा करण्यासाठी युक्रेनचे मित्र देश पुढील महिन्यात पॅरिसमध्ये भेटतील.
मॅक्रॉन यांनी झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्याशी बोलणं झाल्यानंतर एक्स या सोशल मीडियावर म्हटलं आहे, "प्रत्येकाच्या ठोस योगदानाला अंतिम रूप देण्यासाठी जानेवारीच्या सुरुवातीला आम्ही पॅरिसमध्ये 'कोएलिशन ऑफ द विलिंग'मधील देशांना एकत्र आणू."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.