You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंगालमधील लाखो लोकांच्या मृत्यूंना विन्स्टन चर्चिल जबाबदार होते का?
- Author, जुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दरवर्षी 24 जानेवारीला विन्स्टन चर्चिल यांना श्रद्धांजली वाहताना, केवळ ब्रिटनचे माजी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर दुसऱ्या महायुद्धातील नायक म्हणूनही त्यांची आठवण काढली जाते.
हिटलरसारख्या ताकदवान हुकूमशाहसोबत लढून त्याला पराभूत करणारा नेता म्हणूनही चर्चिल यांच्याकडे पाहिलं जातं.
अर्थात यात कुणाचंच कुठलंच दुमत नाहीये की, विन्स्टन चर्चिल हे ब्रिटनमधील नेतृत्त्वाच्या बातमीत सर्वोच्च उंचीचे नेते होते. मात्र, ब्रिटनच्या वसाहतवादी इतिहासात चर्चिल यांच्या काळात एक काळं प्रकरणही आहे, ज्याचा संबंध भारताशी आहे.
पण ब्रिटनमध्ये जरी विन्स्टन चर्चिल नायक असले, तरी भारतात ते खलनायक आहेत. भारतातील लोक आणि बरेचशे इतिहासकार विन्स्टन चर्चिल यांना 1943 च्या बंगालमधील उपासमारीमुळे झालेल्या लाखो मृत्यूंना जबाबदार मानतात.
या दुष्काळात अन्न न मिळाल्यानं 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक इतिहासकार मानतात की, या दुष्काळातले मृत्यू विन्स्टन चर्चिल यांच्या धोरणामुळे झाले. अन्यथा, बऱ्याच जणांचा जीव वाचवता आला असता.
अनेक इतिहासकारांसह काँग्रेसचे नेते शशी थरूर हेही सातत्यानं सांगतात की, 1943 सालच्या दुष्काळामुळे झालेल्या लाखो मृत्यूंना विन्स्टन चर्चिल जबाबदार होते.
शशी थरूर यांनी ब्रिटनमध्येच एका भाषणात म्हटलं होतं की, “मिस्टर चर्चिल यांच्याबाबत सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. चर्चिल यांचे हात तितकेच रक्ताने माखलेले आहेत, जितके हिटलरचे आहेत. विशेषत: त्यांच्या धोरणांमुळे. कारण या धोरणांमुळे 1943-44 मध्ये बंगालमध्ये अभूतपूर्व उपासमारीचं संकट ओढवलं आणि या संकटात सुमारे 43 लाख लोकांचा मृत्यू झाला.”
मानवनिर्मित संकट
शशी थरूरने पुढे म्हटलं की, “विन्स्टन चर्चिल यांना ब्रिटिश सातत्यानं स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे दूत म्हणून सांगू पाहतात, मात्र माझ्या मते ते विसाव्या शतकातील सर्वांत वाईट शासकांपैकी एक आहेत.”
हॉर्वर्ड विद्यापीठातील इतिहास विषयाचे प्राध्यापक सुगाता बोस गेल्या 40 वर्षांपासून बंगालच्या दुष्काळावर लिहित आहेत.
बीबीसी हिंदीसोबत बोलताना ते म्हणाले की, “बंगालमधील दुष्काळ म्हणजे एक ‘प्रलय’ होता, ज्यास जबाबदार ब्रिटिश सरकार आणि विन्स्टन चर्चिल दोन्ही होते.”
“ब्रिटिशांची वसाहतवादी व्यवस्थेचं शोषणच शेवटी दुष्काळासाठी जबाबदार होतं. त्यातही विन्स्टन चर्चिल यांना दोन कारणांसाठी जबाबदार ठरवलं पाहिजे, पहिलं कारण म्हणजे ते त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान होते आणि दुसरं कारण म्हणजे, त्यांच्या भोवतीचा सल्लागारांचा समूह वर्णभेद मानणारा, वंशवादी होता. या समूहाचं मत होतं की, भारतीयांचे विचार अद्याप पूर्णपणे विकसित नाही आणि त्यामुळे बंगालमध्ये लाखो लोक मृत्युमुखी पडत असल्याचं त्यांना काहीच फरक पडत नव्हतं.”
चर्चिल यांनी जाणीवपूर्वक बंगालमधील उपासमारीकडे दुर्लक्ष केलं?
प्रा. सुगाता बोस म्हणतात की, “बंगालमध्ये काय होतंय, याबाबत विन्स्टन चर्चिल यांना सर्व काही माहिती होतं. कारण भारतातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तसा अहवाल त्यांना पाठवला होता. त्या अहवालातून बंगालमधील संकटाची माहिती दिली जात होती. मात्र, विन्स्टन चर्चिल यांची भूमिका वंशवादी होती, हे आपण सगळे जाणतोच.”
सोनिया पर्नेल यांनी ‘फर्स्ट लेडी : द लाईफ अँड वर्क्स क्लेमेंटाईन चर्चिल’ नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, चर्चिल यांच्यावर सर्वाधिक चरित्रं लिहिली गेलीत, ते हिरोही होते आणि व्हिलनही.
सोनिया पर्नेल यांच्यानुसार, “विन्स्टन चर्चिल यांच्यावर अनेक जबाबदार्या होत्या. कारण त्यावेळी दुसरं महायुद्ध सुरू होतं. या युद्धामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या स्थितीसह त्या काळातील इतर अडचणींशी लढण्याचा प्रयत्न ते करत होते.”
ब्रिटनमधील एक्सेटर विद्यापीठातील इतिहासकार रिचर्ड टोए बीबीसीशी बोलताना म्हणाले की, “चर्चिल यांनी जाणीवपूर्वक बंगालच्या दुष्काळाकडे दुर्लक्ष केलं नाही. भारतीयांविरोधात ते जीवपूर्वक नरसंहार इच्छित नव्हते. त्यांची स्वत:चीही काही अपरिहार्यता होती.”
ब्रिटनमधील इतिहासकार यास्मीन खान यांनी नुकतीच बीबीसीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटलं की, “जागतिक परिस्थितींमुळे दुष्काळ पडला होता. अन्नधान्याची कमतरतात मानवनिर्मिती होती. चर्चिल यांच्यावर आपण दक्षिण आशियाई लोकांच्या तुलनेत गोऱ्या लोकांना प्राधान्य दिल्याचा आरोप नक्कीच करू शकतो आणि त्यांची ही भूमिका भेदभावाचीच होती.”
वेदनादायी कालखंड
जेव्हा लोकांना गावांमध्ये अन्नधान्य मिळालं नाही, तेव्हा ते शहरांच्या दिशेनं निघाले आणि वाटेतच जीव सोडला. अनेक लेखक आणि इतिहासकारांनी नोंदवून ठेवलंय की, कोलकात्यातील रस्त्यांवर दररोज हजारो मृतदेह पडलेले असायचे.
क्रिस्टोफर बेली आणि टिम हार्पर यांनी ‘फॉर्गोटन आर्मीज फॉल ऑफ ब्रिटिश एशिया 1941-1945’ मध्ये लिहिलंय की, “ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कोलकात्यातला मृत्यूदर महिन्याकाठी 2000 इथवर पोहोचला होता. ब्रिटिश आणि अमेरिकन सैनिक सिनेमा हॉलमधून सिनेमा पाहून बाहेर पडायचे, तेव्हा त्यांना कावळे खात असलेले रस्त्यावर पडलेले मृतदेह दिसायचे.”
सहाजिकच, या सर्व गोष्टी विन्स्टन चर्चिल यांच्यापर्यंत पोहोचत होत्या. मात्र, त्यांना काहीच फरक पडताना दिसत नव्हता.
चित्रकुमार शामंतो 1943 साली वयानं लहान होते. मात्र, त्यांना त्यावेळची दृश्य अजूनही आठवतात.
शामंतो म्हणतात की, “मी आणि माझं कुटुंब अनेक दिवस भुकेलं होतं. लोकांना उपासमारीत पाहणं भयावह वाटत होतं. जेव्हा कुणा माणसाला पाहायचो, तेव्हा माणूस पाहतोय की भूत पाहतोय, असं वाटायचं. मी एका कालव्याच्या ठिकाणी जायचो, तिथे मानवी मृतदेहांचा ढीग असायचा आणि त्या मृतदेहांना कुत्रे ओरबाडून खात असायचे. गिधाडेही त्या मृतदेहांचे लचके तोडत असायचे. ब्रिटिश सरकारनं आम्हाला उपासमारीनं मारलं होतं.”
चित्तप्रसाद भट्टाचार्य नामक बंगाली कलाकार आणि पत्रकार आहेत. त्यांनी गावोगावी जाऊन वृत्तांकन केलं. त्यांनी आपल्या वृत्तांकनाचा संग्रह केला आणि त्याचं नाव ‘हंग्री बंगाल’ असं ठेवलं.
बंगालमधील उपासमारीचं वर्णन करतानाच, त्यांनी चित्रांच्या माध्यमातून तत्कालीन भीषणाताही दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रिटिश सरकारने त्यांच्या पुस्तकाच्या जवळपास पाच हजार प्रती नष्ट करून टाकल्या. प्रा. सुगाता बोसत म्हणतात की, ब्रिटिश सरकारनं दुष्काळाच्या वृत्तांकनासही बंदी आणली होती.
अशावेळी चित्तप्रसाद भट्टाचार्य यांचं काम धाडसी होती. प्रा. सुगाता बोस म्हणतात की, एक ब्रिटिश पत्रकारही त्यावेळी धाडसी होता.
ब्रिटिश सेन्सॉरशिप
प्रा. सुगाता बोस म्हणतात की, “मार्च 1943 ते ऑक्टोबर 1943 दरम्यान दुष्काळाचं वृत्तांकन करण्यास मनाई होती. मात्र, स्टेट्समन वृत्तपत्राचे संपादक इयान स्टीफेन्स यांचे आभार की, ज्यांनी सेन्सॉरशिप फेटाळली आणि पहिल्यांदा दुष्काळावरील वृत्त प्रसिद्ध केला. त्यानंतर दुष्काळाचं वृत्तांकन होऊ लागलं. ब्रिटिश संसदेनं सहा महिन्यांनंतर हे स्वीकारलं की, बंगाल विनाशकारी दुष्काळाच्या संकटात सापडलंय.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, “चर्चिल यांना याबाबत माहिती होती. मात्र, ऑगस्ट 1943 मध्ये बंगालसाठी मदतकार्यासाठी आवश्यक साहित्य देण्यास नकार दिला.”
त्यावेळी व्हॉईसरॉय आर्चिबाल्ड वेवेल यांनीही बंगालमधील दुष्काळाची माहिती विन्स्टन चर्चिल यांना दिली होती.
या काळात आपल्या डायरीत त्यांनी लिहिलंय की, “बंगालमधील दुष्काळ सर्वात मोठी संकटांपैकी एक आहे, जो ब्रिटिश सरकारमुळे लोकांवर ओढवलं.”
“गांधी अद्याप मेले का नाहीत?”
जेव्हा व्हाईसरॉय वेवेल यांनी दुष्काळ पीडित जिल्ह्यांना अन्नधान्य पाठवण्याची मागणी केली, तेव्हा चर्चिल यांनी जाणीवपूर्वक उपासमारीने मृत्यूच्या दारात आलेल्या बंगालला अन्नधान्य पाठवण्याऐवजी दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश सैन्यांना पाठवलं.
भारतातली अतिरिक्त अन्नधान्य सीलोन (श्रीलंका) ला पाठवलं. चर्चिल सरकारने ऑस्ट्रेलियाहून आलेले गहूने भरलेले जहाज भारतीय बंदरांवर न थांबवता, मध्य-पूर्वेकडे पाठवलं. अमेरिका आणि कॅनडाने भारताला खाद्यान्न मदत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, चर्चिल यांनी त्यास नकार दिला.
हे सर्व कागदोपत्री लिखित आहे की, चर्चिल दुष्काळाबाबत व्हाईसरॉयकडून पाठवलेल्या संदेशांकडेही दुर्लक्ष करत होते. जेव्हा अधिकाऱ्यांना त्यांना त्यांच्या धोरणामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत सांगितलं, तेव्हा ते चिडून त्यांनी एक तार पाठवली, ज्यात त्यांनी विचारलं होतं की, ‘गांधी अजून मेला का नाही?’
एक गोष्ट स्पष्ट आहे की, ब्रिटनचे हिरो विन्स्टन चर्चिल वादग्रस्त व्यक्तींपैकी एक आहेत आणि भारतात त्यांना कायमच 1943 च्या बंगालमधील भयंकर दुष्काळात मृत्युमुखी पडलेल्यांना जबाबदार मानलं जातं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)