You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तो 1 कोटी रुपये खर्चून टायटॅनिक पाहायला गेला, ती पाणबुडी फक्त बाहेरूनच उघडते आणि व्हीडिओ गेम कंट्रोलरने चालते
- Author, फेलिप लम्बियास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
समुद्रात बुडालेली टायटॅनिक बघण्यासाठी 4,000 मीटर खोल जाण्याचा विचार कोणी केला असेल का? असं करणारे लोक आहेत, पण फारच कमी.
दोन वर्षांपूर्वी टायटॅनिक दाखवणाऱ्या या पाणबुडीने अॅलन एस्ट्राडा या मेक्सिकन यूट्यूबरचं देखील लक्ष वेधून घेतलं होतं.
अॅलनचं 'अॅलन अराउंड द वर्ल्ड' नावाचं एक लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे.
बीबीसीशी बोलताना अॅलन एस्ट्राडाने सांगितलं की, "आम्ही कोणती जोखीम उचलतोय हे त्या प्रवासात सहभागी असलेल्या प्रत्येकाला माहिती होतं."
त्याने सांगितलं, "मला अजिबात असुरक्षित वाटलं नाही. मला धोक्याची पूर्ण जाणीव होती. समुद्राच्या खोलात जाऊन जर पाणबुडीचं काही बरंवाईट झालं तर आमच्या लक्षातही येणार नव्हतं."
अशा प्रकारच्या प्रवासाची माहिती अॅलनला कोरोना साथरोगाच्या काळात मिळाली.
दरम्यानच्या काळात अॅलन देखील त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी भन्नाट असं काहीतरी शोधत होता.
त्याने या पाणबुडीच्या प्रवासाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली आणि स्वतःसाठी प्रायोजक शोधले.
पुढे 2021 मध्ये अॅलनने या प्रवसासाठी अर्ज केला तेव्हा त्याला एक कोटी रुपये (नेहमीपेक्षा दुप्पट) भरावे लागले.
जुलै 2021 मध्ये त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला.
तो इतर तीन प्रवासी आणि पायलट स्टॉकटन रश (ओशनगेट कंपनीचे अध्यक्ष आणि पाणबुडीचा निर्माता) यांच्यासह टायटॅनिकवर उतरला खरं पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पुन्हा समुद्राच्या पृष्ठभागावर परतावं लागलं.
एक वर्षानंतर तो दुसऱ्या पायलट आणि प्रवाशांसह प्रवासावर निघाला. यावेळी मात्र अॅलनचा हा टायटॅनिक प्रवास यशस्वी ठरला.
पण प्रवासापूर्वी त्याला एका कागदपत्रावर सही करावी लागली होती.
यात लिहिलं होतं की, अटलांटिक महासागराच्या तळाशी असलेल्या टायटॅनिकच्या दिशेने प्रवास करताना निर्माण होणाऱ्या धोक्यांसाठी प्रवासी स्वतःच जबाबदार असतील.
एस्ट्राडा सांगतो, "ज्या गोष्टी घडण्याची शक्यता असते त्या सर्व गोष्टी आपण काळजीपूर्वक वाचतो. जसं की विमानात बसणं देखील धोक्याचं असतं. म्हणजे आपल्याला जरी हे क्षुल्लक वाटत असलं तरी जीवाला धोका असतोच. पण ज्या लोकांनी जोखीम घेऊन हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला त्यांचं म्हणणं होतं की, बुडालेलं टायटॅनिक बघणं सुखद होतं."
तो सांगतो की, "बऱ्याच कारणांमुळे हे सुखद होतं. हे बुडालेलं जहाज पाहण्यासाठी खूप कमी लोक इतक्या खोलवर गेलेले असताना हे जहाज पाहणं विशेष आहे. तुमच्यासमोर ते जहाज असतं जे तुम्ही कित्येकदा चित्रपट, माहितीपटांमध्ये, फोटोंमध्ये पाहिलेलं असतं."
टायटन पाणबुडीवरील प्रवास कसा वाटतो?
अॅलन एस्ट्राडा सांगतो की, पाणबुडीतील प्रवासाच्या सुरुवातीला असं वाटतं की जणू रॉकेटच लाँच केलं जातंय.
अॅलन म्हणतो, "खरं सांगायचं तर पाणबुडीचा प्रवास एवढा काही खास नाहीये. तुम्ही एका कॅप्सूलच्या आत असता, क्लॉस्ट्रोफोबिया असलेल्या कोणालाही ते अकल्पनीय वाटतं. पण त्याव्यतिरिक्त जास्त काही वाटत नाही. यात सर्वांत भारी काय असेल तर टायटॅनिक जहाजासमोर असणं."
कार्बन फायबर आणि टायटॅनियमपासून बनवलेल्या पाणबुडीत चालायला - फिरायला फारशी जागा नसते.
ही पाणबुडी 6.7 मीटर लांब, 2.8 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंच आहे.
यात 5 लोकांसाठी 96 तासांचा ऑक्सिजन असतो. प्रवासासाठी एकूण आठ तास लागतात.
चार हजार मीटर खोल समुद्रात जायला दोन तास, टायटॅनिक बघायला चार तास आणि नंतर परत यायला दोन तास लागतात.
पाणबुडीच्या आत बसून अॅलन त्यावर नियंत्रण ठेवू शकत होता.
ही पाणबुडी वायरलेस व्हीडिओ गेम कंट्रोलरप्रमाणे दिसणार्या एका उपकरणाद्वारे नियंत्रित केली जाते.
अॅलन सांगतो, "पाणबुडी नियंत्रित करणं तसं सोपं आहे. तिला पुढे, मागे, वर आणि खाली फिरवता येतं. पण अंधाऱ्या ठिकाणाहून कम्युनिकेशन आणि नेविगेशन सिस्टमच्या मदतीने टायटॅनिकच्या अवशेषांपर्यंत पोहोचणं अवघडच आहे."
अॅलनने त्याच्या एका व्हीडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, या प्रवासादरम्यान टायटॅनिक चित्रपट देखील पाहिला.
पाणबुडी आतून उघडता येत नाही.
काही खास उपकरणांच्या साहाय्यानेच ही पाणबुडी बाहेरून उघडता येते.
त्यामुळे बाहेरच्या मदतीशिवाय आतल्या प्रवाशांना बाहेर पडता येत नाही.
अॅलनचं म्हणणं आहे की, अशा प्रवासावर होणाऱ्या खर्चामुळे हे प्रवास अत्यंत वादग्रस्त ठरतात.
अॅलनच्या म्हणण्यानुसार, "काही लोक अशा प्रवासांना हलक्यात घेतात, जसं काही श्रीमंतांसाठी हे खेळणंच असल्यासारखं. पण मला आणि शिवाय काही शास्त्रज्ञांनाही वाटतं की, अशा प्रवासांमुळे समुद्राच्या खोलवर संशोधन चालू ठेवता येईल. कारण असं संशोधन करणं बरंच महाग आहे."
लोकप्रिय असा यूट्यूबर एस्ट्राडाला वाटतं की, पाणबुडीवरील प्रवाशांना शोधण्यात बचाव पथकाला यश येईल. शेवटी हा एक धडा आहे ज्यातून आपल्याला बरंच काही शिकता येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)