You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल-हमास युद्धात गाझामध्ये मारले गेलेले मराठी अधिकारी वैभव काळे कोण होते?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
“गाझासाठी ते निघाले तेव्हा मी त्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता, ‘गाझामध्ये शांतता घेऊनच परत या.’ आता गाझामध्ये शांतता स्थापन होईलही कदाचित, पण माझे भैय्या परत येणार नाहीत. मी त्यांना पाठवलेला तो शेवटचा मेसेज होता.”
गाझातल्या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या कर्नल वैभव काळे (निवृत्त) यांचे चुलत भाऊ चिन्मय काळे सांगतात.
46 वर्षांचे वैभव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा विभागात (UNDSS) काम करत होते.
13 मे रोजी गाझा पट्टीत रफा प्रांतात युरोपियन हॉस्पिटलबाहेर संयुक्त राष्ट्रांच्या एका गाडीवर हल्ला झाला, त्यात वैभव यांचा मृत्यू झाला तर त्यांचे एक सहकारी गंभीररित्या जखमी झाले.
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताच्या दूतावासानं वैभव यांचा मृत्यू झाल्याची माहिती जारी केली.
भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यानंही त्यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं असून, वैभव यांचं पार्थिव भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी बुधवारी जाहीर केलं आहे की हा हल्ला एका इस्रायली रणगाड्यातून झाला होता, याविषी संयुक्त राष्ट्रांना कोणतीही शंका वाटत नाही.
हक असंही म्हणाले आहेत की हा हल्ला कुठल्या परिस्थितीत झाला हे शोधण्याचा प्रयत्न सुरू असून, ते यासंदर्भात इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
UNDSS ने देखील यासाठी चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.
इस्रायलचं म्हणणं आहे की ही गाडी लढाई सुरू असलेल्या भागात अडकली होती आणि त्यांना या गाडीच्या मार्गाविषयी आधी कल्पना दिलेली नव्हती. पण ही गाडी या भागात जाणार असल्याची माहिती आधी इस्रायलला दिली होती आणि गाडीवर संयुक्त राष्ट्रांचं बोधचिन्हही स्पष्टपणे दिसत होतं असं संयुक्त राष्ट्रांनी याआधी म्हटलं आहे.
गाझामध्ये या युद्धात संयुक्त राष्ट्रांच्या एखाद्या आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वैभव यांच्या कुटुंबासाठी त्यांचं अकाली निधन ही धक्कादायक गोष्ट ठरली आहे. आमचा विश्वासच बसत नाही, असं त्यांची काकू मुग्धा काळे सांगतात.
कोण होते वैभव काळे?
वैभव यांच्या मागे त्यांची पत्नी अमृता आणि दोन मुलं – सोळा वर्षांची राधिका आणि चौदा वर्षांचा वेदांत आहेत. एकटे वैभवच नाही, तर या कुटुंबातले इतरही काही सदस्य भारताच्या सैन्यदलांत मोठ्या पदांवर काम करत आहेत.
वैभव यांच्या नातेवाईकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ते मूळचे नागपूरचे होते. त्यांनी नागपूरच्या सोमलवार आणि भवन्स शाळांतून शिक्षण घेतलं होतं.
त्यानंतर त्यांची पुण्यातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एनडीएमध्ये निवड झाली. हे कुटुंब पुढे पुण्यात स्थायिक झालं. जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटमध्येे त्यांची नियुक्ती झाली.
वैभव यांनी संरक्षण दलात जावं, हे त्यांच्या वडिलांचं आणि काकांचं स्वप्न होतं, असं चिन्मय एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगतात.
“युनिफॉर्ममधले वैभव काळे म्हणजे एकदम कडक शिस्तीचे होते. कुणाची त्यांना काही प्रश्न विचारयची हिंमतही होणार नाही, असे. पण तेच वैभव भैय्या कुटुंबीयांमध्ये यायचे तेव्हा कुठल्या तणावात कधीच नसायचे. नेहमी पाहावं हसून बोलायचे, लहान-मोठ्या सगळ्यांशी आदरानं बोलायचे. सगळ्यांचं बोलणं नीट ऐकायचे. एखाद्यानं चांगलं काही केलं असेल तर कौतुक करायचे.”
लष्करातल्या नोकरीदरम्यान वैभव सियाचिनमध्ये, जगातल्या सर्वांत उंचावरच्या युद्धभूमीवर तैनात होतेे. द्रास इथे आणि ईशान्य भारतातही त्यांनी आपल्या तुकडीचं नेतृत्त्व केलं होतं.
वैभव 2009-10 या काळात ते संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेतही होते.
22 वर्ष इंफंट्रीमध्ये काम केल्यावर त्यांनी कर्नलपदावर असताना स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि त्यानंतर एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी करत होते. मात्र डेस्कवरचं काम त्यांना भावत नव्हतं आणि त्यांच्या मनात फील्ड वर्क होतं.
त्यामुळे एप्रिलमध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या सुररक्षाविषयक विभागात UNDSS मध्ये रुजू झाले. गाझा हे त्यांचं पहिलं पोस्टिंग होतं.
गाझामध्ये ते रुजू झाले, तेव्हा UNDSS चे महासचिव गाईल्स मिशॉ यांना भेटले. मिशॉ यांनी त्यांच्याविषयी एक विधान जारी केलं आहे.
ते म्हणतात, “वैभवनं मला सांगितलं होतं की त्याला बदल घडवायचा होता, काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून त्यानं संयुक्त राष्ट्रांमधली नोकरी करण्याचं ठरवलं. ज्यांना मदतीची अत्यंत गरज आहे, अशा लोकांसाठी काम करण्यासाठी ते तयार झाले. तेही जगातल्या सर्वांत धोकादायक जागी, कल्पनाही करता येणार नाही अशा संकटाच्या काळात. ही गोष्ट त्यांच्याविषयी खूप काही सांगून जाते आणि त्याचं योगदान विसरता येणार नाही.”
चिन्मय सांगतात, “वैभव काळेचा, एका भारतीयाचा या युद्धात इस्रायलशी किंवा हमासशी काही संबंध नाही. पण त्यांनी तरीही बलिदान दिलंय. आता तरी गाझामध्ये शांतता यायला हवी असं मला वाटतं.
“त्याच्या बलिदानानंच आता कदाचित युद्ध संपेल. यूएनला कळेल की हे चाललं आहे ते ठीक नाहीये. हकनाक लोकांचे जीव जात आहेत.”
मानवतावादी कार्यकर्त्यांसाठी घातक युद्ध
- संयुक्त राष्ट्रांच्या एका आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची गाझाच्या या युद्धातली पहिलीच वेळ आहे.
- आजवर या युद्धात संयुक्त संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या 190 जणांचा मृत्यू झाला आहे.
- या वर्षी 1 एप्रिलला वर्ल्ड सेंट्रल किचन या संस्थेच्या टीमवर इस्रायलकडून हल्ला झालेला ज्यात सातजण मारले गेले होते.
- संयुक्त राष्ट्रांच्या 30 एप्रिलच्या आकडेवारीनुसार गाझामध्ये 250 हून अधिक सेवाभावी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
- यात MSF (डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स), संयुक्त राष्ट्रांची शरणार्थींसाठी काम करणारी संस्था UNRWA, रेड किसेंट आणि अन्य स्थानिक संस्थांसाठी काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, यांचा समावेश आहे असं ह्यूमन राइट्स वॉच ही संघटना सांगते.
- सोमवारी, 14 मे रोजी इस्रायली कब्जातील वेस्ट बँकमध्ये गाझाकडे मदत घेऊन जाणारे ट्रक इस्रायली आंदोलकांनी रोखले, त्यातली अन्नची पाकीटं फोडली आणि धान्याच्या पिशव्या रस्त्यावर ओतल्या.
- ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात 1,200 जणांचा मृत्यू झाला तर 252 जणांना हमासनं ओलीस ठेवलं. त्यानंतर इस्रायलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझातल्या 35,170 जणांचा मृत्यू झाल्याचं हमासच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.