You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जॅकेट असलेले तरंगले, बहीण वरच आली नाही, तिची चप्पल माझ्या हातात होती', दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट बुडली आणि त्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला. भारतीय नौदलाच्या स्पीडबोटीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ही बोट बुडाली.
या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला. त्यात हा भीषण अपघात कसा झाला हे स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ काढणाऱ्यासह अनेक प्रत्यक्षदर्शींनी अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं आहे हे सांगितलं आहे. यातून अनेक गोष्टी समोर येत आहेत.
बोट अपघातातील प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिलं याचा हा आढावा...
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
या बोट अपघाताचा व्हिडिओ काढणारे प्रत्यक्षदर्शी गौतम गुप्ता यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे. हा अपघात कसा घडला याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, "आधी आमच्या बोटच्या आसपास कोणी नव्हतं. थोड्या वेळानं आम्हाला समोरून एक बोट येताना दिसली.
"त्यातले लोक बोट फिरवत मस्ती करत येत होते. आम्ही त्यांचा व्हिडिओ काढत होतो. मात्र अचानक त्यांच्या बोटनं आमच्या बोटला येऊन टक्कर दिली. त्यावेळी त्या बोटीतला एक व्यक्ती आमच्या बोटीवर येऊन आदळला.
"तेव्हा आम्हाला वाटलं की, आमची बोट सुरक्षित आहे. कारण त्यांच्या बोटीतला व्यक्ती आमच्या बोटीवर आदळला तरी आम्हाला काही झालं नव्हतं."
"पण काही वेळातच बोट जशी पुढं सरकू लागली तशी ती पाण्यात खाली जाऊ लागली आणि मग आमच्या बोटीवरील सगळे लोक घाबरले. कारण तिथं आम्हाला पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यासाठी लाइफ जॅकेट देणारं आणि घालणारं कोणी नव्हतं."
"अशा प्रसंगी काय करायचं हे आम्हाला कोणी सांगितलं नाही. आम्ही स्वतःच लाईफ जॅकेट शोधलं आणि घातलं. 10 ते 12 लोकांना तर मी स्वतःच ते जॅकेट घातलं. नंतर मी माझ्या बहीण आणि मावशीला घेऊन बोटमधून बाहेर पडलो," गौतम गुप्ता पुढे म्हणाले.
गौतम पुढे म्हणाले, "तिथून आम्ही तिघं बाहेर तर पडलो, पण त्यानंतर पाण्यात आम्ही 15 ते 20 मिनिटांपर्यंत तरंगत होतो. कोणीतरी येऊन मदत करेल याची आम्ही वाट पाहत होतो.
"कसं तरी पोहत थोडं पुढं जाऊन मी माझ्या बहिणीला दुसऱ्या बोटवर चढवलं. या दरम्यान पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, माझ्या मावशीचा हात बहिणाच्या हातून निसटला आणि मावशी आम्हा दोघांपासून वेगळी झाली. त्यानंतर मावशीचा काही पत्ता लागला लागला नाही. आम्ही रात्रभर सगळीकडे शोधाशोध केली. नंतर एका दवाखान्यात मावशीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांकडून आम्हाला मिळाली."
नाल्यासोपाऱ्यात राहणाऱ्या गौतम गुप्ता यांचं 11 तारखेला लग्नं होतं. त्यासाठी त्यांची मावशी आणि बहीण गावाकडून मुंबईत आले होते.
त्या अपघातावेळी प्रवाशांच्या बचावासाठी बोटवर कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याची तक्रार गौतम गुप्ता यांनी केली आहे. त्यांनी सांगितलं, "बोटमध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती. अशावेळी लवकरात लवकर लाईफ जॅकेट घालून पुढं काय करायचं असतं हे सांगणारं कोणी नव्हतं."
"बोटवर आमच्या सोबत कितीतरी लहान मुलं होती. ती लाईफ जॅकेटशिवाय पाण्यात तरंगत होती. त्यातल्या दोघांना मी स्वतः बोटवर उचलून टाकलं."
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परदेशी जोडप्याने लोकांना वाचवले
या अपघातातून बचावलेल्या प्रवासी वैशाली अडकणे यांनी या भयावह अनुभवाबद्दल बीबीसीबरोबर बोलताना माहिती दिली. यावेळी त्यांचं 14 महिन्यांचं बाळही त्यांच्याबरोबर होतं.
त्या म्हणाल्या की, "आमच्यासोबत एक परदेशी जोडपं होतं त्यांनी जवळपास 7 ते 8 जणांना वाचवलं. ते दोघं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांचे प्राण वाचवण्याचा खुप प्रयत्न करत होते."
3 वाजता बोटमध्ये बसल्यानंतर 40-50 मिनिटं आम्ही बोटीतच होतो. त्यानंतर पाढऱ्या रंगाची बोट येऊन आमच्या बोटला धडकली. धक्क्यानं आम्ही जागेवर खाली पडलो. सुरुवातीला आम्हाला नॉर्मल वाटलं. पण नंतर पाहिलं तर, त्या बोटवरचा एक व्यक्ती आमच्या बोटवर येऊन पडला होता तर एक त्यात बोटच्या कडेला लटकला होता, असंही त्यांनी सांगितलं.
पुढं त्या म्हणाल्या की, "नंतरही आमची बोट चांगली चालली होती. पण पाच मिनिटांतच आम्हाला जॅकेट घाला म्हणून ओरडा ऐकू आला. माझ्या भावाने लगेच जॅकेट्स काढून सगळ्यांना दिले. ज्यांच्यापर्यंत जॅकेट्स पोहोचले त्यांनी ते घातले. थोड्याच वेळात बोट बुडत गेली आणि आडवी झाली. काही लोक बोटीखाली फसले तर काही वाहत गेले. वाहत जाणाऱ्यांमध्ये काही लहान मुलंही होती."
आमच्या 14 महिन्यांच्या बाळाला माझ्या भावानं एका हातानं खांद्यावर पकडलं होतं. आम्ही सगळ्यांनी बोटीला धरून स्वतःला वाचवलं. आम्ही अर्धा पाऊण तास मदत मागत होतो. आजूबाजूला काही बोटी होत्या, त्यातल्या काहींनी दुर्लक्ष केलं पण काहींनी खूप मदत केली, असं त्या म्हणाल्या.
वैशाली अडकणे या त्यांच्या आई-बाबा, भाऊ आणि सासूबाई त्यांच्याकडे कार्यक्रमासाठी आले होते, म्हणून ते फिरायला गेले होते. परंतु त्यांच्यासोबत असं काही होईल याची त्यांना कल्पनाच नव्हती.
'लाईफ जॅकेट्स नव्हते ते वर आलेच नाहीत'
दुर्घटना घडलेल्या या बोटीत विविध राज्यातून आलेले पर्यटक होते. अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण गमावले आहेत.
त्यातीलच एक पठाण कुटुंब. गोव्यात राहणारे मोहम्मद पठाण यांचं कुटुंब मुंबईमध्ये दोन दिवसांसाठी फिरण्याला म्हणून आलं होतं. मोहम्मद पठाण यांच्यासह त्यांची पत्नी, दोन मुलं, मेहुणी हे सुद्धा या बोटीत होते.
या घटनेत मोहम्मद पठाण यांनी त्यांची पत्नी शफिना पठाण यांना गमावलं आहे. अवघ्या दहा महिन्यांच्या अजान पठाण या चिमुकल्याला वडील मोहम्मद पठाण यांनी पाण्यात बुडण्यापासून वाचवलं, मात्र सात वर्षांचा जोहान पठाण अजूनही बेपत्ता आहे.
अपुऱ्या लाईफ जॅकेट्समुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याची भावना या घटनेत बचावलेल्या मोहम्मद पठाण यांच्या मेहुणी सोनाली गावंडर यांनी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. लाईफ जॅकेट्स न मिळाल्यामुळेच आपण आपली बहीण गमावली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
या दुर्दैवी घटनेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, "आम्ही वाचलो कारण मी एका दोरीला घट्ट पकडलं होतं. माझ्या जीजूंनी बॅरलला पकडलं होतं. छोटं बाळ आधी जीजूंकडंच होतं, परंतु नंतर लाईफ जॅकेट घातलेल्या एका परदेशी व्यक्तीनं त्याला घेतलं.
आम्ही बोटच्या वरच्या बाजूला होतो. ज्यावेळी बोट बुडायला लागली तेव्हा लाईफ जॅकेट घ्यायला माझी बहीण आणि जीजू खाली गेले होते. मात्र खाली गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की लाईफ जॅकेट संपले आहेत. मी त्यांना म्हणाले परत वर या परंतु माझ्या बहिणीला येता आलं नाही."
बोटीवरच्या जवळपास 50 लोकांनी लाईफ जॅकेट्स घातले असतील अशी माहिती त्यांनी दिली. त्या म्हणाल्या "ज्या लोकांनी लाईफ जॅकेट्स घातले होते ते पोहत होते. परंतु ज्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स नव्हते ते वर आलेच नाहीत.
माझी बहीणही त्यांच्यात होती, ती वर आलीच नाही, तिची चप्पल माझ्या हातात आली. त्यावेळी काय घडत होतं काही कळत नव्हतं. सुरुवातीला लक्षातच आलं नाही की आपण बुडत आहोत. तेवढा विचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही." असंही पुढं त्या म्हणाल्या.
मदतकार्य करणारे आरिफ बीबीसी मराठीला काय म्हणाले?
या अपघाताची माहिती देताना पायलट बोटीवर काम करणारे आरिफ बीबीसी मराठीला म्हणाले,
"सगळीकडून 'हेल्प', 'हेल्प' आवाज येत होता. जितकं शक्य होतं तितकं वेगानं काम केलं. लाकडी बोटीत अलार्म सिस्टिम नव्हती. माझ्या अंदाजानुसार कपॅसिटीपेक्षा जास्त लोक असावेत. काही लोकांना लाईफ जॅकेट मिळालं नव्हतं, त्यांना आम्ही लाईफ जॅकेट दिलं आणि वाचवलं. आम्ही साधारण वीस ते पंचवीस लोकांना वाचवलं. तिथल्या लोकांना नेव्हल फेरी बोटीत नेऊन सोडलं. 13 पैकी 4 मृतदेह आम्हाला तिथंच दिसले, नेव्हल फेरी बोटीला कळवल्यावर ते उचलण्यात आले. लाकडी बोटीवर सर्व आपत्कालीन यंत्रणा नसते. त्यात फक्त लाइफ जॅकेट, रिंग्ज असतात."
"माझ्या मतानुसार प्रत्येक बोटीत सबमर्सिबल पंप पाहिजे. मदत मिळेपर्यंत त्याचा वापर करुन पाणी बाहेर काढता येईल. ही बोट फार कमी वेळातच बुडली त्यांना कदाचित या उपायांचा वापर करता आला नसेल. प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट घातलंच पाहिजे. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)