You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मालेगावमध्ये 3 वर्षीय चिमुरडीची अत्याचार करून हत्या, आरोपीला पोलीस कोठडी; जाणून घ्या आतापर्यंत काय समोर आलं
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
नाशिकच्या मालेगावमधील एका 3 वर्षांच्या चिमुरडीच्या हत्या प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीनं तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका 23 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपीला 20 नोव्हेंबरला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. पण आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तिथं मोठी गर्दी केली.
आरोपीला आमच्या हवाली करा, अशी मागणी करत महिलांनी न्यायालयाचा परिसर दणाणून सोडला. गर्दीमुळे न्यायालयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले.
नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष पाहून आरोपीला न्यायालयात हजर करणं कठीण झालं. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाच्या परवानगीनं आरोपीला व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं.
रिमांड रिपोर्ट सादर करत आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली.
या प्रकरणी आरोपीच्या वतीने त्याच्या कुटुंबियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने न्यायालयामध्ये अर्ज केला होता की, शासकीय खर्चाने त्याला वकील देण्यात यावा. मात्र, मालेगाव वकील संघाने त्याचं वकिलपत्र कुठलाही वकील घेणार नाही, असं जाहीर केल्यामुळे आरोपीला अद्याप वकील मिळालेला नाही.
दरम्यान, आरोपीची बाजू आल्यानंतर या बातमीत ती अपडेट केली जाईल.
'आरोपीचे तपासात सहकार्य नाही'
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पुन्हा 7 दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात यावं अशी तपास अधिकाऱ्यांकडून पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती.
ते म्हणाले, "आरोपीनं पीडितेवर लैंगिक अत्याचार करून तिचा एका हत्यारानं खून केला. मागील पोलीस कोठडीमध्ये आरोपीनं ते हत्यार पोलिसांना दिलेलं नाही. तसेच चौकशी दरम्यान त्यानं कोणतंही सहकार्य केलेलं नाही."
सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं आपण मानसिक रुग्ण असल्याचा दावाही केला होता, पण पोलिसांनी आधीच केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तो मानसिकदृष्ट्या फीट असल्याचं समोर आलं.
दरम्यान, पीडित मुलीचं अपहरण करण्यामध्ये कुणी त्याला मदत केली आहे का, आणखी कुणी सहकार्य केलं आहे का? याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.
शिवाय, वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात तपास करायचा आहे. या घटनेतील प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवायचा आहे. या आधारावर न्यायालयानं आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकमधील मालेगाव येथे आरोपीनं तो राहत असलेल्या परिसरातील ओळखीच्या कुटुंबातील 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर अतिशय क्रूर पद्धतीनं तिची हत्या केली.
ती बेपत्ता झाल्यानं पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी त्यांनी आरोपीला याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यानं मुलीला चॉकलेट दिलं आणि दुकानावर सोडल्याचं सांगितलं. मात्र, नंतर आईवडिलांना आपल्या चिमुकलीचा मृतदेह सापडला.
पोटच्या मुलीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह बघून आई वडिलांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेनं अख्खं गावही हळहळलं.
संपूर्ण गाव एक झालं आणि त्यांनी आरोपीला त्वरित फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत रस्ता रोको केलं. यावेळी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अखेर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणामध्ये मालेगाव अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली. तसेच हा खटला जलद न्यायालयात चालवत आरोपीला कठोर शिक्षा करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं.
मालेगावचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल. तसेच या प्रकरणामध्ये वकील म्हणून उज्वल निकम यांना नेमण्यात येईल, असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.
दरम्यान, या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. दरम्यान 21 नोव्हेंबरला या प्रकरणी रोष व्यक्त करायला नाशिकमध्ये जनतेने मोर्चा काढला. मालेगावमध्येही शुक्रवारी (21 नोव्हेंबरला) बंद पाळण्यात आला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)