कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि पत्नी सोफी होणार विभक्त

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो आणि त्यांची पत्नी सोफी यांनी लग्नाच्या 18 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एका अर्थपूर्ण आणि कठीण संवादानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. घटस्फोटानंतरही प्रेम आणि आदर असलेलं कुटुंब म्हणून ते एकत्र असतील असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे

त्यांचं 2005 मध्ये लग्न झालं होतं. या दाम्पत्याला तीन मुलं आहेत.

ट्रुडो यांच्या कार्यालयाने जाहीर केलेल्या निवेदनानुसार या जोडप्याने विभक्त होण्याच्या करारावर सह्या केल्या आहेत. तरीही ते सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणार आहेत.

“त्यांच्या या निर्णयामागे कायदेशीर आणि नैतिक पाठबळ असेल अशी खबरदारी त्यांनी घेतली आहे,” असं या निवेदनात म्हटलं आहे. पुढच्या आठवड्यात कुटुंब म्हणून ते एकत्र सुट्टीवर जाणार आहेत.

त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी त्यांच्या खासगीपणाचा आदर करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे. झेवियर (वय वर्षे 15), एला ग्रेस (वय वर्षे 14) आणि हेड्रियन (वय वर्षे 9) अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत.

“आम्ही एकत्र कुटुंब म्हणून कायम राहू आणि एकमेकांबद्दल कायमच आम्हाला आदर राहील,” असं ट्रुडो यांनी म्हटलं आहे.

ट्रुडो सध्या 51 वर्षांचे आहेत आणि त्यांची पत्नी सोफी 48 वर्षांची आहे.

गेल्या काही वर्षांत त्यांचा एकत्र वावर कमी झाला होता. राजे चार्ल्स यांचा राज्यभिषेक सोहळ्याला त्यांनी एकत्र उपस्थिती लावली होती आणि जो बायडन यांचं कॅनडात मार्चमध्ये ,स्वागत एकत्र केलं होतं.

ट्रुडो यांची 2015 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली होती. वोग मासिकातही त्यांनी स्थान पटकावलं होतं. जस्टीन ट्रुडो आणि सोफी जेव्हा पहिल्यांदा डेटवर गेले तेव्हा जस्टिन म्हणाले होते, “मी 31 वर्षांचा आहे आणि मी तुझी 31 वर्षं वाट पाहिली आहे.” हा किस्सा त्यांनी या मासिकात सांगितला होता.

मे 2022 मध्ये लग्नाच्या वाढदिवसाला त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. त्यात सोफी यांनी दीर्घकाळाच्या नातेसंबंधावर भाष्य केलं होतं. आम्ही अनेक चांगले-वाईट दिवस एकत्र पाहिले आहेत असं त्यांनी लिहिलं होतं.

ट्रुडो यांनीही विवाहसंबंधातल्या आव्हानांवर भाष्य केलं आहे. 2014 मध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यात ते म्हणतात, “आमचं लग्न कधीच परिपूर्ण नव्हतं. त्याच बरेच चढ-उतार आले. तरीही सोफी माझी अतिशय चांगली मैत्रीण राहिली. कितीही वेदनादायी असलं तरी एकमेकांबरोबर आम्ही प्रामाणिक असतो.”

2003 मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. तेव्हा सोफी टेलिव्हिजन क्षेत्रात काम करायच्या. त्यांच्या समाजसेवेसाठी त्या ओळखल्या जातात.

पंतप्रधान असताना घटस्फोट घेणारे ट्रुडो हे दुसरे आहेत. त्यांच्या वडिलांनीही पंतप्रधान असताना 1977 मध्ये घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)