You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
BYJU’s ची ‘आकाशी’ झेप घेण्यापासून भरकटण्यापर्यंतची गोष्ट
- Author, अंशुल सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जगभरातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या 'प्रोसस' या कंपनीने भारतातली एड टेक स्टार्ट अप कंपनी बायजूसचं व्हॅल्युएशन कमी करून 5.1 अब्ज डॉलरवर आणलं आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नेदरलँडची कंपनी प्रोसस ने बायजूस चं मूल्यांकन 22 अब्ज डॉलरवरून 5.1 अब्ज डॉलर करण्यात आलं आहे.
आकडेवारीनुसार ही घसरण 75% पेक्षा जास्त आहे.
प्रोसस समूहाची बायजूसमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार 31 मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात प्रोससने बायजूसने त्यांचं 9.6 टक्के मूल्य कमी करून 493 दशलक्ष डॉलर केलं आहे.
2011 मध्ये अस्तित्वात आलेल्या रवींद्रन यांच्या या कंपनीत सध्या सर्वकाही आलबेल नाही.
ही कंपनी भारतात कर्मचारी कपात करत आहे आणि परदेशात कर्जाच्या एका प्रकरणात कायदेशीर लढाई लढत आहे.
बायजूसमध्ये सध्या काय सुरू आहे?
काही दिवसांपूर्वी 'डेलॉईट हास्किन्स अँड सेल्स' या कंपनीने बायजूसच्या ऑडिटर पदाचा राजीनामा दिला होता. त्यांचं कंत्राट 2025 पर्यंत होतं.
2021-22 या वर्षाची आर्थिक माहिती मिळत नसल्यामुळे ते कंपनीचा आर्थिक लेखाजोखा मांडू शकत नाहीये असं डेलॉईट तर्फे सांगण्यात आलं आहे.
डेलॉईटने बायजूसला लिहिलेल्या पत्रात म्हटलं, “आम्हाला आजपर्यंत ऑडिटबद्दल कोणतीच सूचना मिळालेली नाही. त्यामुळे आमच्या एकूण कामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीच्या ऑडिटर पदाचा आम्ही राजीनामा देत आहोत.”
रॉयटर्सच्या मते ऑडिटर गेल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना सांगितलं की या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ते 2022 च्या उत्पन्नाचा आणि डिसेंबरपर्यंत 2023 च्या उत्पन्नाची माहिती देतील.
सध्या कंपनीला एक नवीन लेखाकार मिळाला आहे. कंपनीने बीडीओ (MSKA and associates) / या कंपनीची पाच वर्षांसाठी ऑडिटर म्हणून नियुक्ती केली आहे.
द हिंदू बिझनेस लाईन या वर्तमानमपत्रात आलेल्या एका बातमीत बायजूसच्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीवर ईपीएफ जमा न झाल्याचा आरोप लावला आहे.
कंपनीने दर महिन्यात पगारातून पीएफ कापला मात्र ईपीएफ खात्यात ते पैसे गेले नाही.
ही बातमी समोर आल्यावर बायजूसची मुख्य कंपनी ‘थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड’ ने ऑगस्ट 2022 ते मे 2023 पर्यंत 10 महिन्यांचं ईपीफ कर्मचाऱ्यांना दिलं.
यामागे कंपनीने 123.1 कोटी रुपये खर्ची घातले. अजुनही 3.43 कोटी रुपये काही दिवसात देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
गेल्या आठवड्यात ‘इकॉनॉमिक टाइम्स’ ने दिलेल्या बातमीनुसार कंपनीच्या तीन संचालकांनी राजीनामा दिला आहे.
बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे बोर्डातून पीक एक्सव्ही पार्टनर्सचे जीव्ही रविशंकर, चॅन झुकरबर्ग चे विवियन वू आणि प्रोससच्या रसेल ड्रेसेनस्टॉक यांनी राजीनामा दिली आहे.
बायजूसने मात्र या बातम्यांचं खंडन केलं आहे. ते म्हणाले, “बायजूसच्या संचालकांनी राजीनामा दिल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. बायजूस या दाव्याचं खंडन करत आहे. तसंच प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या छापू नयेत अशी विनंती आम्ही करत आहोत.”
फाउंडर शेअरधारकांचं बंड थोपवण्यासाठी ते गुंतवणूकधारांकडून पैसे मिळवण्याच्या बेतात आहेत.
‘ब्लूमबर्ग’ या अमेरिकन प्रसारमाध्यमाने दिलेल्या एका बातमीनुसार बायजूस नवीन शेअरधारकांसाठी एक कोटी अब्ज फंड गोळा करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे.
कंपनीचा प्रयत्न आहे की यामुळे संस्थापक बायजूस रवींद्रन यांच्या कंपनीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल असा कंपनीचा प्रयत्न आहे.
‘मिंट’ वृत्तपत्रात छापून आलेल्या एका बातमीनुसार जून महिन्यात एक हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.
या आधी बायजूस ने गेल्यावर्षी तीन हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून काढून टाकलं होतं. सध्या कंपनीत कमीत कमी पन्नास हजार लोक काम करत आहेत.
याशिवाय बायजूस अमेरिकेत कायदेशीर लढाईसुद्धा लढत आहे.
अमेरिकेने बायजूसला 1.2 अब्ज डॉलरचं कर्ज दिलं होतं. त्याचं एक प्रकरण न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टात दाखल केलं आहे.
कंपनीला या कर्जाची परतफेड करायची होती मात्र कंपनी सध्या या स्थितीत नाही.
बायजू रविंद्रन यांच्या मते त्यांच्यावर टर्मलोन ची परतफेड वेगाने करण्यासाठी रेडवूड कंपनीने दबाव आणला आहे.
जेव्हा बायजूसने खूप प्रगती केली...
मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागला, तेव्हा सगळं बंद होतं. तेव्हा लोक त्यांच्या घरी होते आणि इंटरनेटला चिकटून होते.
रोगाच्या साथीमुळे शाळा बंद झाल्या तेव्हा मुलांनी एडटेक कंपन्यांमध्ये प्रवेश घेतला आणि अचानक बायजूसची प्रगती होण्यास सुरुवात झाली.
कंपनीने एक वर्षाच्या आत बाजारातून एक अब्ज डॉलर पेक्षा अधिक गुंतवणूक मिळवली.
या गुंतवणुकीमुळे त्यांच्या एक डझन प्रतिस्पर्ध्यांचं अधिग्रहण केलं आणि त्यांना बाजारातून बाजूला केलं. त्यात आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस, ग्रेट लर्निंग आणि व्हाईट हॅट ज्युनिअर सारख्या अधिग्रहणाचा समावेश आहे.
असं करत करत ते मुलांसाठी कोडिंग क्लास पासून ते स्पर्धा परीक्षांची तयारी एका छताखाली करून देऊ लागल्या.
जाहिरातींवर खर्च करण्यात सुद्धा ते मागे राहिले नाही.
एक वेळ अशी होती की भारताच्या टीव्ही चॅनलवर सगळ्यात जास्त दिसणारा टीव्हीचा ब्रँड बायजूस होता.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान कंपनीचा ब्रँड अँबेसडर आहे.
त्याचवेळी बायजूसच्या कोडिंग प्लॅटफॉर्म व्हाईट हॅट ज्युनिअरचे ब्रँड अँबेसेडर ऋतिक रोशन होते.
इतक्यावरच कंपनी थांबली नाही आणि नोव्हेंबर 2022 मध्ये एकीकडे कर्मचारी कपात सुरू असताना फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला ब्रँड अम्बेसेडर केलं.
त्याशिवाय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड, आयसीसी, फिफा यांच्याबरोबर ब्रँडिंग पार्टनरशिपसुद्धा केली.
जवळपास तीन वर्षांपर्यंत बायजूस बीसीसीआयची मुख्य प्रायोजक होती. फीफा वर्ल्ड कप 2022 ची प्रायोजक असलेली तरी पहिली भारतीय कंपनी होती.
सध्या बायजूसने तीन संस्थांशी त्यांची ब्रँडिग पार्टनरशिप संपवली आहे.
बायजूस संकटात का आहे?
कायम संकटात असलेल्या बायजूसबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही पत्रकार आणि रिसर्च कंपनी मॉर्निंग कॉन्टेक्स्ट चे सह संस्थापक प्रदीप साहा आणि अँजल गुंतवणूकदार मॉडेलचे टीकाकार डॉ.अनिरुद्ध मालपाणी यांच्याशी संवाद साधला.
प्रदीप साहा यांचं म्हणणं होतं की बायजूस मध्ये जे काही होत आहे ते अचानक झालेलं नाही.
प्रदीप सांगतात, “सामान्य लोकांना असं वाटतं की बायजूस ने वेगाने चांगला विकास केला आणि उत्तम कामगिरी केली. हे असंच झालं होतं हे आपल्याला माहिती नाही. या दरम्यान सबस्क्रिप्शन्सची वाढती संख्या पाहून त्यांनी बराच पैसा गोळा केला. त्याशिवाय कोरोना साथीत त्यांनी चांगली कामगिरी केली याचा कोणताच पुरावा नाही.”
साहा सांगतात, “उदाहरणादाखल आर्थिक वर्ष 2020-21 चा आर्थिक अहवाल पाहिला तर त्यांचं उत्पन्न स्थिर होतं आणि तोटा 19 टक्के वाढला. बायजूसकडे कॅश फ्लोची समस्या आहे.”
साहा सांगतात, “त्यांच्यावर टर्म लोन बी च्या कर्जदारांचं संकट आहे आणि व्यापाराची गती मंदावली आहे. जेव्हापर्यंत 2022 आणि 2023 चा आर्थिक अहवाल येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्या परिस्थितीचा अंदाज येणार नाही.”
त्याचवेळी डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांचं म्हणणं आहे की ग्राहक आणि कर्मचाऱ्यांबरोबर दुर्व्यवहार कंपनीसाठी एक मोठं संकट आहे.
डॉ.अनिरुद्ध सांगतात, “बायजूस यांच्यासाठी सुरुवातीपासूच असं वातावरण तयार होत होतं. त्यांनी सातत्याने बाजारातून पैसा उभा केला. त्यांच्याकडे पैसा नसता तर त्यांचं पितळ या आधीच उघडं पडलं असतं. ग्राहकांना पैसे दिले नाहीत आणि कर्मचाऱ्यांना मशीन असल्यासारखं वागवण्यात आलं.”
त्यांचं मत आहे, “मला वाटतं या घटनेचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहे. वाईट हे आहे की एडटेक स्टार्टअप एक शोकांतिका झाली आहे. चांगली गोष्ट ही आहे की लोक यापासून धडा घेतील आणि मुल्यांकनाऐवजी मूल्यावर जास्त भर देतील.”
बायजूसकडे काय पर्याय आहेत?
प्रदीप साहा यांच्या मते कंपनीने नफा मिळवला तर पुन्हा ते पूर्वस्थितीत येतील.
प्रदीप सांगतात, “बायजूस संकटातून बाहेर येईल की नाही हे अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. पहिलं म्हणजे अमेरिकेतल्या टर्म लोन प्रकरणाला ते कसं तोंड देतात. दुसरं म्हणजे ते गुंतवणूक कशी आणतात तिसरं म्हणजे नफा कधी मिळवतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश चा आयपीओ कधी आणतील हेही तितकंच महत्त्वाचं आहे.”
डॉ. अनिरुद्ध मालपाणी यांचं मत असं आहे की बायजूस असो किंवा आणखी कोणत एडटेक स्टार्टअप जर तुम्ही गुंतवणूकदारांच्या जागी ग्राहकांना प्राधान्य दिलं तर निश्चितच एडटेक स्टार्टअप यशस्वी होतील.
“भविष्य कायम अनिश्चितच असतं. बायजूस कडे त्यांची मूळ संकल्पना कोणतीच नव्हती. त्याआधी अनअकॅडमी हा एक ब्रँड होताच.” ते म्हणतात.
“सध्या भारतातली शिक्षण व्यवस्था पैसे कमावण्याची एक मशीन झाली आहे. त्यामुळे कंपन्यांनी सामाजिक उद्योगीकरणाच्या दिशेनेही विचार करावा.”
त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या संकटातून वर येण्यासाठी ग्राहकांचं मन जिंकावं लागेल असं प्रदीप साहा आणि अनिरुद्ध मालपाणी दोघांनाही वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)